Silk Farming : रेशीम व्यवसायात पायवाट केली भक्कम

सांगली जिल्ह्यातील पेठ येथील वैभव माळी यांनी ऊस पट्ट्यात रेशीमकोष निर्मिती (Silk Cocoon Production) व्यवसाय सुरू करून त्यात पाच वर्षांपासून सातत्य ठेवत आपले पाऊल भक्कम केले आहे. जिद्द, सचोटी, मार्गदर्शन आणि कुटुंबातील सर्वांचा एकोपा यातून त्यांना व्यवसाय विस्तार करता आला. अर्थकारण उंचावता आले. प्रयत्नांमधून कोषविक्रीसाठी स्थानिक बाजारपेठही शोधणेही त्यांना शक्य झाले आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्याच्या हद्दीत पुणे- बंगळूर राष्ट्रीय मार्गावर पेठ गाव व त्याच नावावरून असलेला नाका प्रसिद्ध आहे. वाळवा तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो ऊस पट्टा. याच पट्ट्यात आणि गावात साधे सरळ राहणीमान असलेले अशोक माळी यांचे घर आहे. त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे.

पैकी दोन एकरांत ऊस (Sugarcane) घेतला जातो. हे नगदी पीक असले तरी सोळा ते अठरा महिन्यानंतर पैसा हाती येतो. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक ओढाताण व्हायची. मग त्यांनी भाजीपाला शेतीचा (Vegetable Farming) मार्ग स्वीकारला. दोन एकरांवर त्याची लागवड सुरू केली.

कोल्हापूर येथे विक्री केली जायची. परंतु बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक आणि दरांत सातत्याने होणारी चढ-उतार या साऱ्यांचा ताळमेळ घालण्यास पुरेसे यश आले नाही. पण तरीही माळी कुटुंब निराश झाले नाही. एका मार्गावर अडचण आली तर दुसरा शोधला जायचा.

Silk Farming
Silk Farming : रेशीम उद्योगाने साधली कुटुंबाची आर्थिक प्रगती

दरम्यानच्या काळात दावणीला चार गायी बांधल्या. दूध विक्रीतून पैसा उभा करण्याची जिद्द समोर ठेवली. पण तांत्रिक कारणांमुळे त्यात यश मिळाले नाही. कुटुंबातील सावंता आणि वैभव या बंधूंनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘आयटीआय’चे शिक्षण घेतले. त्यातून स्वतःचे ‘वर्कशॉप’ सुरू केले. त्यातून घरखर्चाला हातभार लागू लागला.

अखेर मार्ग दिसला

आपल्याकडून होणाऱ्या चुका आणि अपुरे ज्ञान यामुळे व्यवसायात अपयश येते. शिवाय अनेक संकटेही सोबत असतात. त्यावर मात करण्याची जिद्द असावी लागते. आपण यशस्वी का होत नाही याचे आत्मपरीक्षण करीत पुढे गेले तर जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग सापडतो असे अशोक सांगत होते.

त्यानुसार संकटावर मात करण्यासाठी पुढाकार घेतला खरा. पण काय करायचे याचे ध्येय अजून डोळ्यासमोर येत नव्हते. सन २०१६ च्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सांगली येथील रेशीम कार्यालयातील अधिकारी रेशीम शेतीचा प्रसार करण्यासाठी आले होते.

Silk Farming
Silk Farming : रेशीम किटक संगोपनगृह कसे असावे?

त्या वेळी तुती लागवड आणि कोषनिर्मिती संदर्भात मार्गदर्शन मिळाले. उद्योग उभारणीसाठी मनरेगाअंतर्गत अनुदानही दिले जाते असेही कळले. वेळोवेळी मार्गदर्शनही मिळणार म्हटल्यावर मनात आशेचा दीप पेटला. उत्साह तयार झाला. त्यातून रेशीम कोषनिर्मिती व्यवसाय उभारणीचा निश्‍चय झाला. एक एकरावर तुती लागवडीचे नियोजन झाले.

ज्ञानवृद्धीतून व्यवसायास प्रारंभ

माळी यांच्यासाठी रेशीम शेती नवीनच होती. मग रेशीम अधिकाऱ्यांकडून ज्ञान घेण्यात संकोच केला नाही. भागातील रेशीम कोष उत्पादकांकडे जाऊन व्यवसायातील बारकावे समजून घेण्यास सुरुवात केली. अनुभवाची जोड मिळू लागली. माहिती व अभ्यासात हळूहळू परिपूर्णता येऊ लागली. व्यवस्थापन, उत्पादन, गुणवत्ता या बाबी चांगल्या जमू लागल्या. अर्थकारणास आकार येऊ लागला. सन २०१७ सुरू केलेल्या व्यवसायात जम बसू लागला असे वाटल्यानंतर सन २०१९ मध्ये एक एकरावर नव्याने तुतीची लागवड केली आणि दुसरे शेड उभारले.

Silk Farming
Silk Farming : शेतकरी नियोजन : रेशीमशेती

विक्री व्यवस्था

रेशीम व्यवसाय म्हटला की डोळ्यासमोर येते ती रामनगर (कर्नाटक) येथील मोठी बाजारपेठ. त्याचाच आधार माळी यांनी घेतला. बंगळूर येथेही विक्री सुरू केली. परिसरातील काही शेतकरी एकत्र येऊन एकाच वेळी विक्रीसाठी तेथे माल नेत. दरही चांगला मिळायचा. परंतु बाजारपेठांचा अजून शोध करताना कऱ्हाड तालुक्यातील वाठार, कोल्हापूर जिल्ह्यातील आरळे आणि सांगली जिल्ह्यातील गार्डी येथे धागा निर्मितीचे काही प्रकल्प सुरू असल्याचे समजले. त्या ठिकाणी भेटी दिल्या. वाहतूक, त्यातील कष्ट व दर आदी सर्व बाबींचा तपशील घेता ही बाजारपेठ अधिक फायदेशीर वाटली. आज याच ठिकाणी विक्री होते. सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद येथेही गेल्या वर्षी धागा तयार करण्याचा कारखाना उभारला आहे. तेथेही कोष पुरवठा सुरू केला आहे.

माळी यांच्या व्यवसायातील ठळक बाबी

-दोन एकरांत व्ही- वन तुतीचे वाण. ५० बाय २८ फूट आकाराची दोन शेड्‍स. त्याआधारे वर्षातून ८ ते ९ बॅच घेतल्या जातात.

-सहा रॅक्स. त्याची रुंदी ४० बाय ५ फूट.

-बायव्होल्टाइन रेशीम कीटकांचे संगोपन.

-स्वतः चॉकी उत्पादन घेतात.

-प्रति बॅच ३०० अंडीपुंजांची. जिल्हा रेशीम कार्यालयाकडून खरेदी. प्रति शंभर अंडीपुंजांचा दर एक हजार रुपये

-प्रत्येक शेडला एक ते दीड महिन्याची विश्रांती.

-प्रत्येक बॅच आटोपल्यानंतर शेडचे निर्जंतुकीकरण.

-अळ्यांची वाढ होईल तशी जागा उपलब्ध करून दिली जाते.

-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी चुना आणि विजेता पावडरची धुरळणी

-प्रति बॅच सरासरी २०० किलो कोष उत्पादन

-स्थानिक बाजारात मिळणारा दर- ४०० ते ५०० रुपये प्रति किलो.

-प्रति बॅच उत्पादन खर्च- किमान २० ते ३० हजार रु.

कुटुंबातील सर्वांचे श्रम

वैभव यांना वडील अशोक आई पद्मा, पत्नी स्नेहा, बंधू सावंता, त्यांची पत्नी रेखा अशी सर्वांची व्यवसायात मोठी साथ मिळते. त्यामुळेच हा व्यवसाय विस्तारला आला. उत्पादन खर्च कमी झाला. शेतीच्या तुलनेत याच व्यवसायातून दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळू लागले. चिकाटी, सातत्याच्या जोरावर व्यवसायात खंड पडू दिला नाही.

वैभव सांगतात की कोरोनाच्या काळात कोषांचे दर किलोला ४० ते ५० रुपयांपर्यंत घसरले. आमच्या भागातील काहींनी व्यवसाय सोडून दिला. मात्र आम्ही सातत्य टिकवले. आणि यशासाठी तेच महत्त्वाचे असते. रेशीम संचालनालय, नागपूर कार्यालयाने माळी यांच्या व्यवसायातील प्रयत्नांची दखल घेतली. यंदाचा सांगली जिल्ह्यातील सर्वोकृष्ट रेशीम कोष निर्मितीचा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला आहे.

संपर्क ः वैभव माळी, ८९७५५०६०५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com