Potato Cultivation : दुष्काळी पट्ट्यात उंचावले बटाट्यातून अर्थकारण

भालगाव (जि. नगर) परिसरात पाण्याचे मोठे स्रोत नव्हते. परिणामी, शेतकऱ्यांनी कमी कालावधीचे पीक म्हणून बटाटा घेण्यास सुरुवात केली.
Potato Cultivation Guidance in Marathi
Potato Cultivation Guidance in MarathiAgrowon

Potato Cultivation : नगर जिल्ह्यातील पूर्व भागातील पाथर्डी तालुक्यातील बहुतांश गावांत पाण्याचा कायमचा स्रोत नाही. अनेक गावांना सतत दुष्काळाशी (Drought) सामना करावा लागतो. बीड जिल्ह्याच्या सीमेवरील भालगाव, मुंगुसवाडे, कासळवाडी ही गावेही त्यास अपवाद नाहीत.

पारंपरिक पिकांमधून अर्थकारण (Economy) उंचावत नव्हते. भालगावचे राहिवासी आणि पुणे जिल्ह्यातील मंचर येथे नोकरीस असलेले जगन्नाथ सुपेकर यांनी मंचर भागातील बटाटा उत्पादन (Potato Production) पाहून वीस वर्षांपूर्वी एक एकरावर या पिकाचा श्रीगणेशा केला.

अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाण्यात व कालावधीत या पिकाने चांगले उत्पादन व दरही दिला. हा अनुभव पाहून भागातील अन्य शेतकरीही या पिकाकडे आकर्षित झाले.

कृषी विभागाचा सहभाग

दुष्काळी पट्ट्यात चांगले अर्थकारण देण्याची बटाट्याची क्षमता पाहून कृषी विभागानेही पुढाकार घेतला. तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, मंडळ कृषी अधिकारी रामदास मडके, अतुल बनकर, कृषी सहाय्यक मिनीनाथ बेल्हेकर, प्रकाश गायके यांनी शेतीशाळा, मार्गदर्शन, क्षेत्रभेटी असे उपक्रम राबविले.

बारा वर्षांपूर्वी गाव परिसरात शंभर एकरांपर्यंत लागवड असावी. नंतरच्या आठ वर्षांत क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. गेल्या वर्षी अडीचशे एकर, तर यंदा लागवड साडेतीनशे ते चारशे एकरांपर्यंत असावी.

Potato Cultivation Guidance in Marathi
Potato Cultivation : पाथर्डीत बटाटा शेतीकडे ओढा

बटाटा लागवड व्यवस्थापन (ठळक बाबी)

-१५ ऑक्टोबर ते डिसेंबर हा लागवड कालावधी. १५ ऑक्टोबरपर्यंत लागवड केल्यास ६५ दिवस, तर १५ नोव्हेंबरपर्यंत लागवड केल्यास ७५ दिवस पाणी लागते. ८० टक्क्यांहून अधिक शेतकरी ठिबकचा वापर करतात.

-भालगाव, कासळवाडी, मुंगसवाडे शिवारात एक सरळ सरी पद्धतीसोबत चार फूट बेड व दोन सरी पद्धतीने लागवड. बेडवर दोन सरींतील अंतर सव्वा फूट, तर दोन ठोंबांतील अंतर सहा इंच.

-मंचर, आंबेगाव भागातून बियाणे आणले जाते. एकरी आठ क्विंटलपर्यंत बियाणे लागते. दीड हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर. यंदाचा दर अडीच हजार रुपये.

Potato Cultivation Guidance in Marathi
Palghar Potato: आता पालघरचा बटाटाही बाजारात

-तीन वर्षांपासून ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे लागवड. त्यामुळे मजूरटंचाईवर मात करण्यासह वेळ आणि खर्चात बचत झाली. भालगावातील गोवर्धन खेडकर यांनी हे यंत्र खरेदी केले आहे.

-बटाट्याला चकाकी, टिकाऊपणा व दर्जेदारपणा यावा यासाठी वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांच्या मात्रा.

-काढणीसाठीही ट्रॅक्टरचलित यंत्राचा वापर. एका दिवसात २० मजुरांच्या मदतीने एक एकर काढणी होते. यंत्राच्या वापरामुळे शेत भुसभुशीतही होते. त्यामुळे पुढील पिकासाठी नांगरणीची गरज भासत

नाही. नांगरणीचा प्रति एकर दोन ते अडीच हजारांचा खर्चही वाचतो असे येथील ज्येष्ठ शेतकरी अर्जुन सुपेकर सांगतात.

उत्पादन, प्रतवारी, दर

-मोठा, मध्यम व छोटा अशा तीन प्रतीत विक्री.

-नगर, पैठण, बीड या बाजारपेठा असून, व्यापारी थेट बांधावर येऊनही खरेदी करतात.

-अन्य ठिकाणच्या बाजारांतही ठोकमध्ये विक्री. जागेवर विकलेल्या बटाट्याला त्या दिवशीच्या बाजारभावापेक्षा दोन ते तीन रुपये प्रति किलो कमी दर मिळतो. मात्र वाहतूक व अन्य खर्चात बचत होत असल्याने शेतकऱ्यांकडून जागेवर विक्रीस प्राधान्य.

-मोठ्या प्रतीच्या मालाला प्रक्रियेसाठी मागणी.

-जानेवारीत काढणीस आलेल्या बटाट्यास किलोला १५ ते १६ रुपये दर. पुढे सर्व भागांतून आवक वाढल्यानंतर (मार्च) हा दर १० ते १२ रुपये. यंदा भालगावच्या बटाट्याला १० ते १५ रुपये दर मिळाला.

अर्थकारण व शीतगृह फायदा

बटाट्याचे एकरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते. उत्पादन खर्च वगळल्यास एकरी ४० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न हे पीक तीन महिन्यांत देऊ शकते. त्यामुळेच भागात या पिकाचा विस्तार झाल्याचे गोवर्धन खेडकर सांगतात.

त्यांनी स्वखर्चाने ५० टन क्षमतेचे शीतगृह उभारले आहे. त्यांना या पिकाचा वीस वर्षांचा अनुभव आहे. दरवर्षी आठ ते १० एकरांवर त्यांचा बटाटा असतो. तो शीतगृहात साठवल्यास पुढे बाजारभाव वाढतात त्या वेळी किलोला पाच रुपयांपासून ते दहा रुपयांची वाढ मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

खेडकर यांनी पाच टन बियाणे २४०० रुपये प्रति क्विंटल दराने आणून मार्चमध्ये शीतगृहात ठेवले. लागवडीवेळी त्याचा दर ३४०० रुपये झाला होता. म्हणजेच क्विंटलला एक हजार रुपयांची बचत त्यांना शीतगृहामुळे करता आली. यात बटाटा सात ते आठ महिने टिकवता येतो.

Potato Cultivation Guidance in Marathi
Food Processing : केळी, बटाटा चिप्स अन् नमकीन उत्पादने

जलसंधारणाचा फायदा

जलयुक्त शिवार यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणारे प्रगतिशील शेतकरी व महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक जयहिंद खेडकर म्हणाले, की भालगाव, कासळवाडी व परिसरात डिसेंबर- जानेवारी अखेरपर्यंतच पुरेसे पाणी उपलब्ध असायचे.

२०१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानातून दगडीबांध, सलग समतल चर, गॅबियन व नदीवर साखळी बंधारे उभारले. शेततळी झाली. दोन-तीन वर्षांपासून पाऊस चांगला झाला. परिणामी, बटाटा, गहू, हरभरा क्षेत्र वाढले.

गोवर्धन प्रल्हाद खेडकर, ९०२१२०५०६० - (बटाटा उत्पादक)

रामदास रावसाहेब खेडकर, ९४२१३३१६१२ - (बटाटा उत्पादक)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com