शिवणकाम,शेतीपूरक उद्योगातून मिळाला रोजगार
EmpolymentAgrowon

शिवणकाम,शेतीपूरक उद्योगातून मिळाला रोजगार

कोलगाव भोम (ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग) येथील मनिषा महेश कासार यांनी गावामध्ये शिवणकामातून स्वतःसोबतच आठ महिलांना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला. महिला बचत गटाच्या माध्यमातून सुधारित शेती,पूरक व्यवसाय आणि शेतीमाल आधारित उत्पादनांच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

सावंतवाडी-कुडाळ मार्गावर कोलगाव भोम हे निसर्गरम्य गाव. या गावशिवारात आंबा, काजू, नारळ, सुपारी, भात याचबरोबरीने भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. याच गावातील मनिषा कासार या प्रयोगशील महिला. मनिषाताईंचे माहेर झाराप, त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्यामुळे दहावीनंतर त्यांनी शिवण कला शिकून घेतली. या काळात त्यांचा झारापमधील भगीरथ प्रतिष्ठान या संस्थेशी संपर्क झाला. त्या या संस्थेच्या सदस्य झाल्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर यांचा ग्राम विकास, महिला सक्षमीकरण, जलसिंचन, शेती, बायोगॅस संयंत्र निर्मितीवर भर आहे. डॉ.देवधर यांनी शिवणकामातून रोजगार निर्मितीबाबत मनिषाताईंना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी शिवण कामासाठी एक शिलाई यंत्र खरेदी केले. मनिषाताईंचे वडील मातीची भांडी बनविण्याचे काम करायचे. त्यामुळे मनिषाताई कधी कधी गावोगावी जाऊन मातीच्या भांड्यांची विक्री करायच्या. सायकांळी घरी आल्यानंतर कपडे शिवण्याचे काम त्या करीत होत्या. खरिपात वडिलांना शेती कामातदेखील मदत करायचा. शिवण कामात त्यांचा हातखंडा तयार झाल्याने हळूहळू त्यांच्याकडे शिलाई काम चांगल्या प्रकारे वाढले.

शिवणकामाबरोबरच आणखी काही शिकता येईल का ? असा मनिषाताईंचा विचार सुरू असतानाच भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी एक महिन्याचे फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षणाचे आयोजित करण्यात आल्याचे त्यांना समजले. या प्रशिक्षण वर्गात ५८ महिला सहभागी झाल्या होत्या. मनिषाताईंनी अतिशय मनापासून प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणात त्यांना अनेक लहान मोठ्या गोष्टी शिकता आल्या. मनिषाताईंना शिवणकामातील सर्वच येत असल्यामुळे डॉ.देवधरांनी त्यांना झाराप बाजारपेठेतील दुकानात शिवणकाम सुरू करण्याचा सल्ला दिला.त्यानुसार त्यांनी घरी आणि झाराप येथे दुकानात काम सुरू केले.

लग्नानंतर देखील मनिषाताईंनी सासरी म्हणजेच कोलगाव भोम येथे देखील शिवणकाम करण्यास सुरवात केली. शिवणकामासाठी पती महेश कासार, सासरे वसंत कासार आणि सासू वर्षा कासार यांचे मनिषाताईंना चांगले प्रोत्साहन मिळाले. शिवणकामासारखी एक अतिशय उत्तम कला तुझ्याकडे आहे.ती जपली पाहिजे.त्याचा उपयोग अन्य महिलांसाठी करावा अशी अपेक्षा घरच्यांनी व्यक्त केली.त्यातूनच मनिषाताईंनी शिवणकाम मोठ्या प्रमाणात सुरू केले. मनिषाताईंच्या गावात अनेक गरजू महिला होत्या. त्यांना उत्पन्नाचा कोणताच मार्ग नव्हता. अशा महिलांना मनिषाताईंनी शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. यातून आठ महिलांना त्यांनी कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिला आहे.

बाजारपेठेतील मागणीनुसार पुरवठा ः

शिवणकामामध्ये वेगळेपणा आणि दर्जा असल्याने मनिषाताईंना लोकांच्याकडून विविध प्रकारच्या शिवण कामांची मागणी येऊ लागली. बाजारपेठेच्या अभ्यासात त्यांच्या लक्षात आले की, लोकांना लहान बाळांना मापात लागणारी आंगरे टोपरे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी बाळांना लागणारी विविध आकाराची आंगरी टोपरी,गोधडी बनविण्याचे काम सुरू केले. बाळांना कोणताही त्रास होणार नाही असे कापड त्या वापरतात. उत्तम दर्जाचे आंगरे टोपरे तसेच लहान मुलांचे कपडे मिळत असल्यामुळे गाव परिसरातील ग्राहकांकडून मोठी मागणी त्यांना मिळू लागली आहे.

कोकणात मकरसक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात.या कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांना वाण देण्याची पध्दत आहे. हा कार्यक्रम लक्षात घेऊन त्यांनी खास कार्यक्रमांसाठी पिशव्या बनविण्याचे काम सुरू केले. मनिषाताई विविध आकार आणि महिलांच्या मागणीनुसार योग्य दरात पर्यावरणपुरक पिशव्या बनवून देतात.आता अनेक गावातील महिला आगाऊ कल्पना देवून विविध पिशव्या तयार करून घेतात.

शासनाने प्लॅस्टिक बंदीवर भर दिल्याने अनेक ग्रामपंचायतींनी गावामध्ये प्लॅस्टिक पिशव्यावर बंदी घातली. याकडे मनिषाताईंनी संधी म्हणून पाहिले. दुकानदार आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी पर्यावरणपूरक कापडी पिशव्या निर्मितीवर भर दिला. पिशव्यांचा दर्जा उत्तम असल्याने विविध ग्रामपंचायतीकडून त्यांना विविध आकाराच्या पिशव्यांची मागणी मिळू लागली.आतापर्यंत मनिषाताईंनी १५ हजारांहून अधिक कापडी पिशव्या ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

समूह शेती, कुक्कटपालनावर भर

१) उमेद अभियानातर्गंत मनिषाताईंना काम करण्याची संधी मिळाली.या कालावधीत त्यांनी गावामध्ये महिला बचत गट स्थापन केले.त्यांनी आपल्या भोमवाडीतील महिलांचा महालक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता बचत गट तयार केला.या बचत गटाच्या माध्यमातून समूह शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.गटामार्फत मिरची लागवड, एसआरआय पद्धतीने भात लागवडीला चालना मिळाली आहे.

२) बचत गटातील महिलांना काजू लागवड करण्यास प्रोत्साहित करण्यात आले.गटातील पाच महिलांनी प्रत्येकी ५० काजू कलमांची लागवड केली. यावर्षीपासून काजूचे उत्पादन देखील सुरू झाले आहे.

३) शेतीपूरक व्यवसाय म्हणून बचत गटातील महिलांना कुक्कुटपालन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. सध्या गटातील सहा महिला परसबागेतील कुक्कुटपालन करतात.

४) बचत गटातील महिला बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन तांदूळ पीठ, नाचणी पीठ, घावन पीठ, विविध प्रकारची लोणची,नाचणी पापड तयार करतात. गाव परिसरातील कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल घेऊन ग्राहकांना या उत्पादनांची थेट विक्री केली जाते.

५) इंधनामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी गटामार्फत गावात बायोगॅस बांधणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

६) तालुका कृषी विभागाकडून कासार यांच्या महालक्ष्मी गटाला उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार.

महिलांना मिळाला रोजगार ः

मनिषाताई बाजारपेठेच्या मागणीनुसार लहान बाळांचे कपडे, लहान गोधडी याचबरोबरीने भाजी पिशवी, साधी पिशवी, टिफीन पिशवी, रेक्झिन पिशवी, वेलवेट पिशवी,मोबाईल पिशवी निर्मिती करतात. मागणीनुसार रजई,पाय पुसणी तयार केली जातात. साधारणपणे दहा रुपयांपासून अगदी ५० ते १००,१५० रुपयांपर्यंत पिशव्यांच्या किमती आहेत.मनिषाताईंची शिवण कामातून दरवर्षी सुमारे पाच लाखांची उलाढाल होते. शिवणकामातून त्यांनी आठ महिलांना रोजगार दिला आहे. या महिलांना घरच्या घरी काम दिले जाते.

मनिषाताईंनी भगीरथ प्रतिष्ठान, जनशिक्षण संस्था, विविध ग्रामपंचायती, विविध संस्थांनी आयोजित केलेल्या शिवणक्लास प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून तसेच स्वतः असे एकूण आतापर्यंत तीन हजाराहून अधिक महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले आहे.त्यातील अनेक महिलांनी घरच्या घरी शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला आहे.

-------------------------------------

संपर्क ः मनिषा कासार,७३८५६३०१७३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com