Biodiversity : जैवविविधता नोंदींतून हरित रोजगार

आपल्या देशात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. तिचे सर्वेक्षण करणे, आधुनिक जगात प्रवेश करताना या साधन संपत्तीचा अधिकाधिक उपयोग कसा करून घेता येईल याचा अभ्यास महत्त्वाचा आहे. आपल्याकडे मानव संसाधन विपुल प्रमाणात आहे. तसेच नैसर्गिक संसाधने देखील आहेत. या दोघांची सांगड घालून त्याचे ग्रामपंचायत स्तरांपासून नियोजन करावे.
Biodiversity
BiodiversityAgrowon

डॉ. सुमंत पांडे

मागील लेखामधून जैवविविधता नोंदणी पत्रकांच्या अनुसूचीबाबत चर्चा केली होती. या अनुसूचीमध्ये नोंद करावयाच्या बाबींमध्ये समितीची रचना, सदस्यांची नावे, आणि इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींची नावे उद्‍धृत करावयाची होती. आजच्या लेखात आपण जैवविविधता नोंदींची उपयुक्तता, त्यावर आधारित हरित रोजगार आणि उद्योग,या विषयी चर्चा करणार आहोत. तसेच यानंतर भाग दोन मधील प्रपत्राबाबत माहिती देखील घेणार आहोत. भाग दोनमध्ये एकूण ३२ प्रपत्रे असून, त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील कृषी जैवविविधता, लोकांची/समूहाची माहिती, निसर्गाची माहिती, पाळीव प्राणी, जंगली प्राणी /वनस्पती, औषधी वनस्पती, वृक्ष, जमिनीवरील मत्स्य, सागरी जैवविविधता, वन्य जैवविविधता इ. माहिती संकलित करावयाची आहे. लक्षात घेणे गरजेचे आहे, की ही केवळ प्रपत्रे नसून गावाच्या सर्व नैसर्गिक संसाधनांचा तो एक आरसा आहे. त्यामध्ये सर्व बाबींचा प्रतिबिंब दिसते. याबाबत विस्ताराने आपण समजून घेऊयात.

Biodiversity
स्थापना जैवविविधता समितीची...

जैवविविधतेबाबत कायम एक विरोधाभास लक्षात येतो, जी राष्ट्रे जैवविविधतेने समृद्ध आहेत, ती राष्ट्रे गरीब आहेत. पुढारलेल्या देशांना मात्र या जैविवैविध्यापासून वंचित राहावे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर आपल्या देशाची परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या जवळ असलेले जैविक वैविध्य वाखाणण्यासारखे आहे, आपला औद्योगिक पायाही व्यापक आहे, तंत्रशास्त्रातील आपली झेप चांगली आहे. मात्र हा औद्योगिक पाया आणि ही तंत्रज्ञानातील प्रगती अधिकाधिक भक्कम करावी लागेल. आपल्याला लाभलेला जैविक वैविध्याचा अमूर्त वारसा आणि आपल्याजवळ असलेले तंत्रज्ञान या दोघांची व्यवस्थित सांगड घालून परिश्रमपूर्वक आणि योजनाबद्ध रीतीने आपण या क्षेत्रात प्रगती करू शकलो तर जगातील एक प्रबळ अर्थसत्ता होण्याचा मार्ग सुकर होईल हे मात्र नक्की. जर तंत्रज्ञानातील आधुनिकतेसाठी पश्‍चिमेकडे बघत राहिलो तर आपल्यासारखे दुर्दैवी मात्र आपण, कारण आपल्या जैविक वैविध्याचा लाभ आपोआपच पाश्‍चात्त्यांना मिळेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

Biodiversity
जैवविविधता नोंदणी पत्रकासाठी माहिती संकलन

नैसर्गिक साधनसंपत्तीचे सर्वेक्षण ः

१) आपल्या देशात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. तिचे सर्वेक्षण करणे, आधुनिक जगात प्रवेश करताना या साधन संपत्तीचा अधिकाधिक उपयोग कसा करून घेता येईल याचा अभ्यास महत्त्वाचा आहे. या सर्वांच्या शेवटी सामान्यातल्या सामान्य नागरिकाला त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावर विचार करून एक सूत्र रूपाने निश्‍चित कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. हे विचार आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आहेत.

२) देशाची पुढील वीस वर्षांची वाटचाल आणि क्षमता याचा अभ्यास करताना त्यांनी मांडलेली मूळ संकल्पना आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या विपुल नैसर्गिक संसाधने, साधन संपत्ती आणि तिचे सर्वेक्षण याचा अर्थ स्पष्ट आहे, की आपल्याकडे एवढी विपुल विविधता आहे, त्याचे योग्यरीत्या संकलन आणि नोंदी झाल्यास अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

३) २००२ मध्ये नैसर्गिक संसाधने साधन संपत्ती या अनुषंगाने कायदा करण्यात आला त्याबाबत आपण सध्या माहिती घेणे महत्त्वाचे आहे. या कायद्यांतर्गत जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकांचे जैवविविधता नोंदणी पत्रक तयार करणे हे महत्त्वाचे कार्य आहे. सातत्याने नूतनीकरण देखील करावे. भारताची अर्थव्यवस्था आणि रोजगारक्षम क्षेत्रामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित रोजगाराच्या विपुल संधी आहेत, त्या इतर देशांमध्ये अत्यंत नगण्य अशा आहेत. तथापि, याचे संवर्धन आणि व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण आवश्यक आहे.

३) आपल्याकडे मानव संसाधनदेखील विपुल प्रमाणात आहे. नैसर्गिक संसाधने देखील आहेत. या दोघांची सांगड घालून त्याचे ग्रामपंचायत स्तरांपासून नियोजन करावे. तथापि या सूक्ष्म नोंदी करण्यासाठी समर्पित व्यक्तींची फळी आवश्यक आहे. त्याचे महत्त्व आणि पद्धती आपण मागील काही लेखांमध्ये विस्ताराने पाहिले आहे.

आपल्या जैवविविधतेचा वारसा जतन करावयाचा असेल आणि त्याचा उपयुक्त वापर हरित रोजगार निर्मितीसाठी करावयाचा असेल, तर त्याचे योग्य सर्वेक्षण आणि आकलन गरजेचे आहे. लोकांच्या जैवविविधता नोंदणी पत्रकामधून आपल्याला विविध क्षेत्रांतील गाव स्तरावरील माहितीचे संकलन एकत्र करणे आवश्यक आहे.

Biodiversity
Biodiversity : जैवविविधता व्यवस्थापन समितीसाठी अनुसूची

जैवविविधतेवर अवलंबून असणाऱ्या रोजगाराच्या संधी ः

१) आपल्याकडे असलेल्या विस्तीर्ण प्रशासकीय संरचनेमध्ये ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील जैवविविधतेबाबतची माहिती जैवविविधता समितीच्या द्वारे तसेच त्या क्षेत्रात असलेल्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांना सोबत घेऊन जमा करण्याची एक मोहीम आपण जर राबवली तर ही मौलिक माहिती जमा होईल.

२) जमा झालेल्या माहितीचे व्यवस्थित परीशीलनाची पुढची पायरी याच संस्थात्मक रचनेच्या माध्यमातून गाठता येऊ शकेल. या माहितीच्या बळावर एक व्यवहार्य कृती आराखडा तयार करून तो शिस्तबद्ध पद्धतीने राबविल्यास एका बाजूला जमवलेल्या मौलिक माहितीचे संरक्षण आणि जतन तर होईलच पण पुढे संशोधनासाठी एक पायाभूत काम संशोधकांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहील.

३) जमा झालेल्या माहितीद्वारे बौद्धिक संपदेच्या क्षेत्रातील अनेक गोष्टी बाबतचे अधिकार आपल्याला मिळवता येतात. याबाबत बौद्धिक संपदा अधिकार मिळवता येतील. या संदर्भात काही काही आपत्कालीन काही मध्यमकालीन आणि काही दीर्घकालीन उपाय करावे लागणार आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये नैपुण्य असणारी एक सक्षम पिढी तयार करणे गरजेचे आहे आणि या सर्वांसाठी आवश्यक आहे ती अचूक माहिती. याबाबत मागील लेखात आपण चर्चा केली आहे.

४) बदलत्या मुक्त आर्थिक वातावरणात या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. हे संशोधन आर्थिक लाभासाठी वापरता येईल. या पारंपरिक ज्ञानशाखेत ज्ञान हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत तोंडी दिले जाताना दिसते ते कुठेतरी लेखी स्वरूपात उपलब्ध होण्याचा मोठा फायदा होईल.

सागरी जैवविविधता ः

१) आपल्याला लाभलेला विस्तीर्ण सागरी किनारपट्टी अगदी महत्त्वाच्या जैविक पदार्थ मिळवण्याच्या हक्काचा मार्ग आहे. महाराष्ट्राला सुमारे ७२० किलोमीटरचा सागरी किनारपट्टी लाभली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी कांदळवने आहेत. समुद्रातील मिळणाऱ्या माशांचा उपयोग अगदी नगण्य प्रमाणात आहे असे गृहीत धरल्यास; सागरी पाण्यात उगवणाऱ्या अनेक एकपेशी वनस्पती आपण अन्न किंवा औषधी म्हणून वापरू शकतो.

२) समुद्रातून मिळणाऱ्या अनेक पदार्थांचे उपयोग औषधी म्हणून करता येतो. कर्करोगावर उपचारासाठी यातील काही पदार्थ या आधीच उपयोगात आणले गेले आहेत. समुद्र आणि त्याची किनारपट्टी हा निसर्गाने आपल्याला दिलेला जैविक विविधता खजिना पाहिजे. धनसंपदेचे आपल्या प्रगती बरोबर मानवी कल्याणासाठी कसा उपयोग करता येईल याचे तंत्र आणि मंत्र आपण शिकून घेणे गरजेचे आहे.

औषधी वनस्पती :

१) इसवी सन पूर्वी ४५०० ते १५०० या वैदिक कालखंडापासून भारतामध्ये वनस्पतीचा औषध म्हणून उपयोग होताना दिसतो. ऋग्वेदातील सुक्तामध्ये औषधी वनस्पतींचा उल्लेख आहे. औषधी वनस्पतीबाबत ऋग्वेदातले उल्लेख त्रोटक असले तरी अथर्ववेद आणि बरीच याबाबत बरीच सखोल माहिती दिलेली आहे.

२) वैदिक कालखंडानंतर चरक आणि सुश्रुत यांनी चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या ग्रंथात रोजच्या वापरातील सुमारे सातशे औषधी पदार्थ आणि त्यांच्या विशिष्ट वापराबाबतची माहिती आलेली दिसते.

३) समर्थ रामदासांनी आपल्या देशभ्रमणातून त्यांना ज्या ज्या गोष्टीचे कौशल्य आणि ज्ञानप्राप्ती झाली त्या आधारे बाग प्रकरण यामध्ये सुमारे २७७ वनस्पतींचे वर्णन एकाच श्‍लोकात केले आहे. या सर्व वनस्पती आपल्याला पश्‍चिम घाटाच्या परिसरात आढळतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com