Tribal Development : मार्ग बिकट असला, तरी मागे मी वळणार नाही

सातपुड्याच्या पर्वतरागांमधील अतिदुर्गम गावांमध्ये आव्हानात्मक, कष्टप्रद अवस्थेत अविरत कार्य करीत संस्थेने केलेली तब्बल ७३ वर्षांची यशस्वी वाटचाल प्रेरणादायी आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

छळून घ्या संकटांनी,

संधी पुन्हा मिळणार नाही, कर्पूराचा देह माझा जळून पुन्हा जळणार नाही,

सहेन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव,

असाच नेईन किनाऱ्याशी चुकलेली नाव,

मार्ग बिकट असला, तरी मागे मी वळणार नाही

या ओळी पाल (ता. रावेर, जि.जळगाव) या अतिदुर्गम क्षेत्रातील सातपुडा विकास मंडळ (Satpuda Vikas Mandal) या संस्थेला पुरेपूर लागू होतात. निरक्षरता निवारण, शेती, सिंचन, आरोग्य, रस्ते, शिक्षण, आदी विविध प्रकारे आदिवासींचा सर्वांगीण विकास (Rural\Tribal Development) साधण्यात संस्थेचे अतुलनीय योगदान आहे. सातपुड्याच्या पर्वतरागांमधील अतिदुर्गम गावांमध्ये आव्हानात्मक, कष्टप्रद अवस्थेत अविरत कार्य करीत संस्थेने केलेली तब्बल ७३ वर्षांची यशस्वी वाटचाल प्रेरणादायी आहे.

Rural Development
Indian Agriculture : शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

पाल (ता. रावेर, जि.जळगाव) या अत्यंत दुर्गम भागात सुमारे ७३ वर्षांपासून सातपुडा विकास मंडळ

ही संस्था कार्यरत आहे. येथील आदिवासी बांधवांमध्ये शेती- मातीची प्रगती, शैक्षणिक, आरोग्य, रस्ते असा ‘अजेंडा’ घेऊन संस्थेचे कार्य सुरू आहे. खिरोदा येथील स्वातंत्र्य सैनिक धनाजी ऊर्फ दादासाहेब नाना चौधरी यांनी संस्थेचा पाया घातला. महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांच्याच पुढाकाराने १९३६ मध्ये काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन फैजपूर (ता. यावल, जि. जळगाव) येथे महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत झाले. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद आदी दिग्गज त्यात सहभागी झाले. खेड्याकडे चला या मंत्रासोबत १९४७ च्या सुमारास महात्मा गांधी यांनी सर्वोदय योजना दिली. त्या प्रेरणेतून दादासाहेबांनी आदिवासी भागात कार्य करण्याचा निर्धार केला.

Rural Development
Crop Damage Compensation : कळंब तालुक्यात ४८ गावांत मदतवाटप रखडले

संस्थेची स्थापना

गारखेडा (त्या वेळचे गौरखेडा) (ता. रावेर) हे सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम गाव होते. त्याच्या नावे गौरखेडा रचनात्मक सहकारी कार्यकारी मंडळी ही संस्था दादासाहेबांनी १९४९ मध्ये स्थापन केली. सुमारे ३५ गावांमध्ये विस्तार कार्याचे उद्दिष्ट होते. सुरुवात झाली ती शेतीतील समस्या सोडवण्यापासून. वन्यप्राणी शेतीचे मोठे नुकसान करायचे. त्यांच्यापासून शेती संरक्षण करणारे गट तयार केले. आदिवासी बांधवांचा विश्‍वास संपादन करण्यास सुरुवात केली. बोलीभाषेची अडचण होती. रस्ते नसल्याने सातपुड्यातील गावांत पोहोचणे कठीण होते. वन्यप्राण्यांचा हल्ला होण्याची सतत भीती असायची. बैलगाडीने प्रवास करीत दादासाहेब आपल्या गावापासून २७ किलोमीटर अंतर कापून आदिवासींपर्यंत पोहोचायचे. संस्था स्थापन करताना ते एकटे होते. परंतु आमू आखा एक से... हा आदिवासी बांधवांचा मंत्र व साथ कामी आली. आम्ही सर्व एकत्र आहोत, कुठलेही संकट झुगारून लावू, अशी ऊर्जा या मंत्रातून मिळाली. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रीपासून पहाटेपर्यंत शिवारात थांबावे लागे. अनेकदा हिंस्र प्राणी दिसायचे. कमकुवत हृदयाच्या व्यक्तीने हे काम केव्हाच सोडून दिले असते. पण दादासाहेब निर्धारापासून ढळले नाहीत.

Rural Development
Crop Damage Compensation : तीन कोटी ४६ लाख अनुदान नुकसानग्रस्तांना वाटप

कार्याचा विस्तार

संस्थेने आरोग्यसुविधा उभारण्यास सुरुवात केली. पाल येथे आदिवासींच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा सुरू केली. रावेरातील ३४ गावांत संस्था पोहोचली. आदिवासींची मदत घेऊन कच्चे रस्ते निर्मितीवर भर दिला. सातपुडा पर्वतातील आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या रानभाज्या, बियांचे तेल यांची विक्री करून उत्पन्नस्रोत तयार केले. बांबूच्या टोपल्या, डिंक, शेती अवजारेही अन्य भागांत नेऊन त्यास व्यावसायिक रूप दिले. दादासाहेबांच्या निधनानंतर पुत्र मधुकर ऊर्फ बाळासाहेब चौधरी यांनी संस्थेची जबाबदारी हाती घेतली. सन १९५२ मध्ये संस्थेची सहकार कायद्यांतर्गत नोंदणी केली. मधुकर राजकारणातही सक्रिय झाले. पण त्यापलीकडे जाऊन संस्था झटत राहिली. यावलमधील जामन्या- गाडऱ्या हा मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील आदिवासीबहुल भाग. येथेही चारचाकीने पोहोचणे शक्य नव्हते. मात्र संस्थेने इथपर्यंत शिक्षणाचे काम १९५६ ते १९६० या काळात केले. तेथील विद्यार्थ्यांना पाल येथील आश्रमशाळेत शिक्षणासाठी आणले.

सिंचन, वैद्यकीय सुविधा

शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था होण्यासाठी इंधन यंत्रणा काही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. त्या वेळेस पाल, गारखेडा व लगतचे नाले हिवाळा संपेपर्यंत प्रवाही असायचे. त्यामुळे किमान तीन महिने शेती बागायती करणे शक्य झाले. त्यातून परिसरात भाजीपाला क्षेत्र तयार झाले. एव्हाना संस्थेच्या पाच आश्रमशाळा परिसरात स्थापन झाल्या. इमारतींच्या अभावामुळे त्या झोपडीत भरायच्या. सोबत फिरते दवाखाने सुरू करून आरोग्याबाबत जनजागृती केली. ज्या आदिवासींनी औषधे, गोळ्या कधी पाहिल्या नाहीत त्यांच्यापर्यंत वैद्यकीय प्रबोधन झाले.

सातपुडा विकास मंडळाची स्थापना

संस्थेचे रूपांतर १९७१ मध्ये सातपुडा विकास मंडळात झाले. शासनावर अवलंबून न राहता संस्थेने आपले काम अव्याहत सुरू ठेवले. या वेळेस संस्थेची धुरा कृषी पदवीधर सुनीत बोंडे यांच्याकडे आली. त्यांनी संस्थेचे कृषी सेवा केंद्र सुरू केले. जुन्या वाणांचे संवर्धन करतानाच नवे वाण आणले. दापोली तसेच राहुरी येथील कृषी विद्यापीठांची मदत घेतली. ज्वारी, बाजरी, मका या सातपुड्यातील प्रमुख चारा व धान्य देणाऱ्या पिकांचे सुधारित, संशोधित वाण ३५ गावांमध्ये देण्यात आले. दापोली येथून आंब्याचे केशर व अन्य नवे वाण आणून त्यांची लागवड सातपुड्यात केली. कलमे तयार करून पाच वर्षांत उत्पादन देणारी झाडे प्रसारित केली. बोंडे सातपु़ड्यात सुनीतभाई म्हणून परिचित झाले.

मोह, आवळा व बोरांपासून उत्पन्नस्रोत

सातपुड्यात मोहाची भरपूर झाडे आहेत. ही बाब लक्षात घेऊन मोह वृक्ष संवर्धन व लागवड कार्यक्रम राबविला. मोहाच्या बियांपासून तेलनिर्मिती, साठवण याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून ४०० कुटुंबांना आर्थिक स्रोत तयार झाला. पुढे तेलाला एवढी मागणी वाढली, की तुलनेत पुरवठा अशक्य झाला. असाच प्रयोग आवळ्यासंबंधी केला. पाल व मध्य प्रदेशच्या सीमेत तेत्राण्या (जि. खरगोन) येथे सुमारे ८०० पर्यंत आवळ्याची झाडे आहेत. मध्य प्रदेशातील बाजारात आदिवासी बांधव तो विक्रीसाठी नेतात. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, खरगोनच्या बाजारातही तो प्रसिद्ध आहे. आठ गावांमध्ये चार हजारांपेक्षा देशी बोरांच्या झाडांवर जळगावातील प्रसिद्ध मेहरूण व उमराण या बोरवाणांचा प्रयोग केला. सात गावांमध्ये २३ जणांच्या ४० हेक्टर क्षेत्रात पेरू, चिकू, डाळिंब, लिंबू आदींच्या फळबागा उभ्या केल्या.

संस्थेचे कार्य दृष्टिक्षेपात (इन्फो १)

-आदिवासी क्षेत्रातील भगर, रवा, मका, लाल ज्वारी आदींच्या वाणांचे जतन, क्षेत्रवाढ.

-पठारी, विकसनशील भागात हे वाण पोहोचविण्याचा १९५५ ते १९६० यादरम्यान प्रयत्न.

-बियाणे साठवणुकीसाठी सामग्री तयार केली.

-पाल येथील संस्थेच्या आश्रमशाळेत पहिली ते १० वीपर्यंत शिक्षणव्यवस्था (१९५४). त्यातून

अनेक आदिवासी विद्यार्थी घडले.

-गारखेडासह परिसरातील १० गावांत हलक्या जमिनीत १० हेक्टरमध्ये कोरडवाहू फळझाडे लागवड.

-कृषी विद्यापीठ संशोधित हरभरा, सूर्यफूल आदींच्या नव्या वाणांबाबत प्रोत्साहन.

-ऑस्ट्रेलिया येथील ‘युनिटी ॲण्ड ॲब्रॉड’ संस्थेच्या मदतीने ८५ आदिवासींकडे १६० हेक्टरवर

सहकारी उपसा सिंचन योजना (पाल). याच धर्तीवर गारखेडा, अभोडा व जिनसी येथेही कार्य.

-सुमारे आठ गावांत पाणलोट विकास सर्वेक्षण.

-सन १९८० च्या दरम्यान शासन, महाफेड यांच्या साह्याने तेलबिया पीक प्रात्यक्षिके व प्रशिक्षण कार्यक्रम. चारशे शेतकऱ्यांना त्याचा लाभ.

-गारखेडा येथे ३० कुटुंबांसाठी घरगुती कुक्कुटपालन योजना. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत.

-नवे शेती तंत्र, काजू लागवड, एकात्मिक की़ड नियंत्रण, सेंद्रिय शेती, दातेरी पासाचा वापर, अन्नपदार्थ ठेवण्यासाठी लटकती टोपली, मातीच्या भांड्यात भाजीपाला रोपनिर्मिती आदींबाबत प्रशिक्षण.

शेकडो शेतकऱ्यांकडे मातीपरीक्षण केले. त्यानुसार पिके, खते वापर याबाबत गावोगावी मार्गदर्शन

-दोन चाड्यांची तिफण, खत व बी पेरणी यंत्र, दातेरी कोळपे, सुधारित लोखंडी वखर, दातेरी हातकोळपे, मका काढणी यंत्र, भुईमूग शेंगा फोडणी यंत्र, कोळपे, विळा, खुरपणी अशी यंत्रे

सातपुड्यात संस्थेने प्रथम आणली.

-केळी खोडापासून धागानिर्मिती यंत्र आणून प्रात्यक्षिके. संस्थेने पठारी भागातही कार्य करून चोपड्यापर्यंत पोहोचवले.

मनुष्यबळ ठरले महत्त्वाचे (इन्फो २)

बोंडे तांत्रिक ज्ञान असलेली व्यक्ती आहे. सोबतीला आश्रमशाळेतील शिक्षकांनाही शेती, आरोग्य व लोकसहभागाच्या कार्यात योगदान दिले. त्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडले नाही. शिक्षक, तज्ज्ञमंडळी आपल्याकडे येऊन राबतात हे पाहून आदिवासी मुले, पुरुषमंडळींनाही उत्साह यायचा. एक ‘माहोल’ तयार होऊन कार्य यशस्वी व्हायचे. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष मधुकर चौधरी यांनी मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष अशी वाटचाल केली. त्यांनी दिलेल्या योजनांमध्ये जिल्हा परिषद शाळांचा आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील विस्तार कार्यक्रम आवर्जून सांगण्यात येतो. या शाळा पाल परिसरात आल्यानंतर संस्थेने आपल्या आश्रमशाळा बंद केल्या. सध्या पाल येथे ती कार्यरत आहे. सध्या शिरीष मधुकर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे. अजित पाटील सचिव आहेत. विविध संस्था, शासनाचीही मोठी मदत आहे.

वाघाशी थेट भेट (इन्फो ३)

अशोक झांबरे (फैजपूर, ता. यावल) हे १९६९ पासून संस्थेशी जोडले आहेत. पाल येथील

आश्रमशाळेत ते कार्य करायचे. तेथेच राहायचे. त्या वेळी वन्य प्राण्यांची मोठी संख्या सातपुड्यात होती. एकदा पाल भागातील घाट दुचाकीने ओलांडताना दुपारी अचानक वाघ समोर आला. सारे संपले असे वाटले. पण वाघाने वाट सोडली व तो निघून गेला. झांबरे यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. दुसऱ्या वेळेसही असाच अनुभव आला. पण या वेळी झांबरे यांनी हिंमत एकवटली. ते तसेच रस्त्यात उभे ठाकले. वाघ या वेळीही निमूटपणे निघून गेला. हा माणूस आपल्या भागात वावरतो, जंगलाशी, झाडांशी बोलतो, घरदार सोडून आदिवासी बांधवांची सेवा करतो. याला जीवदान द्यावं असं वाघाला कदाचित वाटलं असावं असं गमतीनं झांबरे सांगतात.

संपर्क ः अशोक झांबरे, ९०९६५३४८५०

महेश महाजन, ९९७०६६१५४६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com