
पूर्णा नदी खोऱ्याचा (Purna River Valley) भाग असलेल्या अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांत खारपाणपट्टा आहे. पाण्याची मुबलकता (Water Availability) असली तरी क्षारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच शेतीसाठी या पाण्याच्या वापरावर मर्यादा येतात. पाटपाणी (Irrigation) किंवा ठिबक, तुषारद्वारे गोडे पाणी जादा दिल्यास जमिनीतील क्षार वरती येतात. हा देखील धोका असतो. त्यामुळे गरजेपुरतेच पाणी द्यावे लागते. याच खारपाणपट्ट्यात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात असलेल्या रुस्तमपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत ५५० लोकसंख्येच्या रामागडचा समावेश होतो.
शेततळ्यांची क्रांती
कृषी विभागाने २००८ मध्ये शंभर टक्के अनुदानावर शेततळ्याची योजना आणली. परंतु यात जमिनीचे जास्त क्षेत्र गुंतवावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र रामागड शिवारात विनायक लोणकर, सुभाष लाजूरकर, सुषमा लाजूरकर, शंकरराव लाजूरकर, विजय लाजूरकर यांनी सर्वांत आधी शेततळ्यासाठी पुढाकार घेतला. वीस बाय वीस मीटर तसेच दहा फूट खोल असे शेततळे खोदले. त्यावर्षी पाऊस कमी झाला. रब्बी हंगामासाठी पुरेसा ओलावा उपलब्ध झाला नाही. अनेकांचे पीक धोक्यात आले. मात्र ज्यांच्याकडे शेततळ्याचा पर्याय होता त्यांनी सरासरीपेक्षा चांगली उत्पादकता मिळाली. हा फायदा पाहून अन्य शेतकरीही मग तिकडे वळले. आज गावातील शेततळ्यांची संख्या ८४ वर पोहोचली आहे.
हरभऱ्याची वाढली उत्पादकता
खारपाणपट्ट्यातील हरभरा चवीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे अकोला, अमरावती बाजारपेठेत विक्रीस आल्यानंतर दिल्ली भागातील व्यापारी गर्दी करतात. रामागड गावात रब्बी हंगामात हरभरा घेणारे शेतकरी सर्वाधिक आहेत. पूर्वी ओलिताची सोय नसल्याने उत्पादकता एकरी पाच क्विंटलपर्यंत होती. आता शेततळ्याची साथ व व्यवस्थापन यातून ती नऊ ते ११ क्विंटलपर्यंत पोहोचल्याचे सुभाषराव लाजूरकर सांगतात. खरिपात पावसाच्या पाण्यावर पीक घेतले तर रब्बी हंगामातील पिकांना पुरेसा ओलावा मिळणार नाही. त्यामुळे अनेक शेतकरी खरिपात पीकच घेत नव्हते असे सांगितले जाते. त्यामुळे हरभरा, गव्हासारखी पिके त्यांच्यासाठी महत्त्वाची होती.
सहकार्य
तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किसन मुळे यांच्या प्रयत्नांतून रामागड शेततळ्यांचे गाव म्हणून नावारूपास येण्याला मदत झाली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे माजी शास्त्रज्ञ डॉ. सुभाष टाले, अरविंद नळकांडे, ‘कम्युनिटी ॲक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट’ संस्थेचे विजय लाडोळे, ग्रामसचिव डोळे, कृषी सहायक प्रशांत हाडोळे यांनी कंटूर बांध-बंधिस्ती, तलावातील पाण्याचा नियोजनबद्ध वापर अशा उपक्रमांना बळ दिले
पाणीउपसा पंपासाठी अनुदान
शेततळ्यातील पाणी उपसण्यासाठी ५० टक्के अनुदानावर पंपसेटचा पुरवठा कृषी विभागाकडून करण्यात आला. त्याचा वापर सुरुवातीच्या काळात शेतकरी करायचे. पुढे शेतकऱ्यांनी सौरऊर्जेचा पर्याय अवलंबिला. यासाठी सुरुवातीला पाच एचपी क्षमतेसाठी सहा लाख ७५ हजार रुपये शुल्काचे युनिट होते. ९५ टक्के अनुदान देण्यात येत असताना शेतकरी हिस्सा म्हणून ३३ हजार ७५० रुपये भरावे लागत होते.
आता मागासवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदानाची तरतूद वेगवेगळी आहे. गावात ब्रिटिशकालीन तीन तलाव आहेत. त्यातील पाण्याचा आपत्कालीन प्रसंगी शेतीसाठी उपयोग केला जातो. रामागडपासून सहा किलोमीटरवर सामदा लघू सिंचन प्रकल्प आहे. त्यातील पाणी गावशिवारातील शेतीला बंदिस्त पाइपलाइनद्वारे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. कामही सुरू झाले आहे. त्यासाठी पाणी वापर संस्था येत्या काळात स्थापन केली जाणार आहे.
सेंद्रिय शेतीत आघाडी
रामागडने सेंद्रिय शेतीतही आघाडी घेतली आहे. ‘जैविक शेती मिशन’अंतर्गत पोशिंदा जैविक शेती गट, तसेच भूमाता शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना गावात झाली आहे. यात २३ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. सेंद्रिय शेतीचे हे तिसरे वर्ष आहे. पाण्याची शाश्वती झाल्यानंतर सुभाषराव व संदीप लाजूरकर या पितापुत्रांनीही सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. बहुमजली पीक पद्धतीची रचना केली आहे.
यात पालेभाज्या, वेलवर्गीय, फळपिके आदी विविध पिकांचा समावेश आहे. त्यातून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेणे शक्य झाले आहे. गीर, गावरान, गवळाऊ, साहिवाल जातीच्या गायींचे संगोपन केले आहे. ‘गो-आर्गो’ या उभारलेल्या विक्री केंद्राद्वारे ते दुधाची विक्री करतात. सेंद्रिय मालाची विक्रीही याच केंद्रातून करण्यावर भर आहे. अकोला-दर्यापूर मार्गावर हे केंद्र असल्याने ये जा करणारे प्रवासी न चुकता भेट देतात. नैसर्गिक पद्धतीने जवस उत्पादन करून लाजूरकर चटणी उत्पादनही घेतात. सर्व प्रकारच्या डाळी ‘व्हॅक्यूम पॅकिंग’द्वारे त्यांनी उपलब्ध केल्या आहेत.
पाण्यामुळे झाली प्रगती
गावातील शंकरराव लाजूरकर यांनी १५ एकर शेती ओलिताखाली येण्यासाठी तीन शेततळी घेतली आहेत. सौरपंपाचा वापर केला आहे. कपाशी, सोयाबीन, हरभरा ते घेतात. हरभऱ्याचे एकरी नऊ ते ११ क्विंटल उत्पादन ते घेत आहेत. नागोराव गुलाबराव लाजूरकर २० एकरांत हरभरा घेतात. ते एसटी महामंडळात नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर ते आता शेतीत राबतात. रोशन अंबादास भवर यांनी तूर आणि हरभरा पद्धत राबविली आहे.
सुषमा सुभाषराव लाजुरकर यांनी आवळा, बांबू अशा लागवड केली आहे. एक-दोन पाण्याची सोय झाल्याने विनोद व छाया लाजूरकर दांपत्याने खारपणपट्ट्यात भाजीपाला व फळपिकांची पद्धती अवलंबिली आहे. सध्या शिवारात पपई व सापळा पीक म्हणून झेंडू आहे. शेततळे आणि त्यातील पाण्याचा वापर करता आला नसता तर वेगवेगळे पर्याय निवडणे शक्य झाले नसते असे विनोद सांगतात. खारपाणपट्ट्यातील जमीन उन्हाळ्यात भेगाळते. परिणामी, फळपीक लागवड शक्य त नाही. मात्र विजय लाजूरकर यांनी शेततळ्याचे पाणी उपलब्ध झाल्याने पेरू लागवड यशस्वी केली आहे.
सुभाषराव लाजूरकर, ९५४५४६२७०३
विजय लाजूरकर, ९५४५४६३२५०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.