भाजीपाला उत्पादनात टोमॅटो शेतकरी गटाची आघाडी

नगर जिल्ह्यात खांडगाव (ता. संगमनेर) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत विविध भाजीपाला पिकांची शेती सुकर होण्यासाठी गटाची स्थापना केली आहे. रोपे, खते व अन्य साहित्याची एकत्रित खरेदी करून उत्पादन खर्च वाचवण्याही त्यांचा प्रयत्न आहे.
Vegetable Production
Vegetable ProductionAgrowon

नगर जिल्ह्यात संगमनेर शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर खांडगाव आहे. गावातील ७०० कुटुंबांपैकी साधारणपणे साडेचारशे ही शेतीवर अवलंबून आहेत. या भागातील जवळे कडलग येथील प्रगतिशील संशोधक शेतकरी व कृषिभूषण रावसाहेब कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील पाच- सहा शेतकऱ्यांनी टोमटॉचे यशस्वी उत्पादन घेतले. त्यानंतर १९९५ पासून बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला उत्पादनाकडे कल वाढवला. आज गावांतील तीनशेपेक्षा अधिक शेतकरी भाजीपाला उत्पादनात कार्यरत आहेत.

Tomato Farmers Group
Tomato Farmers Group Agrowon

खांडेश्‍वर टोमॅटो उत्पादक शेतकरी गटातील सदस्य.

तरुण शेतकऱ्यांचा गट

सन २०१९ मध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्याचे संचालक रमेशभाऊ गुंजाळ यांच्या मार्गदर्शनातून अनेक शेतकरी एकत्र आले. ‘आत्मा’ अंतर्गत त्यांनी खांडेश्वर टोमॅटो उत्पादक शेतकरी गट तयार केला. कपिल सुधाकर गुंजाळ गटाचे अध्यक्ष तर महेश साहेबराव गुंजाळ सचीव आहेत. गटात ३२ हून अधिक शेतकरी आहेत. टोमॅटो, फ्लॉवर या दोन मुख्य पिकांसह वांगी, कारले, काकडी, कोबी, कांदा, कलिंगड आदींचे उत्पादन घेण्यात येते. संगमनेर येथे शेतमाल विक्रीस पाठवला जातो. जानेवारी-फेब्रुवारीत टोमॅटोसह काकडी, कारले आदींची लागवड केली जाते. फ्लॉवरसारखे पीक जवळपास वर्षभर टप्प्याटप्प्याने घेतले जाते. गटाचे अध्यक्ष गुंजाळ म्हणाले, की टोमॅटोचे क्षेत्र गावात १५० ते २०० एकरांत, तर फ्लॉवरचे सुमारे १०० एकर आहे.

एकत्र आल्याचा फायदा

भाजीपाला उत्पादनासाठी पॉली मल्चिंगचा वापर केला जातो. त्याची खरेदी सामुहिक स्तरावर केली जाते. त्यातून खर्चात बचत केली जाते. त्याचे प्रातिनिधीक उदाहरण द्यायचे तर सातशे बंडल्स एकत्र घ्यायची असल्याने प्रति बंडल २१०० रुपये दर हा कमी होऊन १९०० रुपयांपर्यंत आला. टोमॅटोच्या सात लाख रोपांची आवश्‍यकता असल्याने एकत्र घेतल्याने प्रति रोप २० ते २५ पैशांची बचत होते. एकत्रित खरेदीतून सुमारे वीस टक्क्यांपर्यंत खर्चात बचत करता येते. कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाउनमध्ये अनेक शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीअभावी मोठे नुकसान सोसावे लागले. मात्र खांडेश्वर गटातील सदस्यांनी विविध भागांत सुमारे ५० ते ६० टन भाजीपाला विक्री करून नुकसान टाळले. गटातील सदस्य सुमारे ७० टक्के सेंद्रिय व ३० टक्के रासायनिक पद्धतीचा वापर करतात. गटाने ‘बेड’ तयार करण्याचे यंत्रही खरेदी केले आहे. शेतीत सध्या मजुरांची मोठी टंचाई आहे. त्यामुळे सदस्यांनी बाहेरील मजुरांचा पर्याय शोधला आहे. उत्पन्नातील ३३ टक्के वाटा त्यांना देण्यात येतो. त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही शेतकरी करतात.

Tomato Crop On Mulching
Tomato Crop On Mulching Agrowon

भाजीपाला पिकांत पॉली मल्चिंगचा वापर.

अकोले, संगमनेर तालुक्यात दोन वर्षांपासून टोमॅटो पिकात विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक काढून टाकण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. त्यामुळे क्षेत्रही घटले आहे. अशावेळी खांडगावातील काही शेतकऱ्यांनी टोमॅटोएवजी कारले पिकाचा पर्याय शोधला. यंदा २० एकरांत त्याची लागवड झाली आहे. विषाणूजन्य रोगांना रोखण्यासाठी कृषी विभागाच्या सहकार्याने कपिल गुंजाळ यांच्याकडे तर खासगी कंपनीच्या सहकार्याने संदीप गुंजाळ यांच्या शेतात प्रत्येकी सुमारे ११ गुंठ्यांत कमी खर्चातील शेडनेट हाऊस उभारणी करून टोमॅटो लागवड केली आहे.

संपर्क ः कपिल गुंजाळ, ८१४९२७३०९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com