विदर्भातील कंपनीची समृद्धीकडे वाटचाल

बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांच्या एकत्र येत विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली आहे. सध्या हा स्टार्ट अप असला तरी दोन वर्षांच्या काळात कंपनी विविध क्षेत्रात घोडदौड करीत आहे. यंदा शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत तब्बल ३५ हजार क्विंटल हरभरा कंपनीने खरेदी केला असून, हंगामाच्या अखेरीपर्यंत ५० हजार क्विंटलचा टप्पा ओलांडेल असा कंपनीला विश्‍वास आहे.
विदर्भातील कंपनीची समृद्धीकडे वाटचाल
Farmer Producer Company Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील जानेफळ हे प्रमुख गाव असून, ३५ ते ४० गावांची बाजारपेठ असलेल्या या ठिकाणी मोठी उलाढाल होत असते. या भागात शेतीत विविध प्रयोग करणारे शेतकरी मोठ्या संख्येने आढळतात. शेतकऱ्यांचे अर्थकारण भक्कम होण्याच्या उद्देशाने या परिसरातील काही गावांतील तरुण एकत्र आले. त्यांनी ३१ जुलै २०२० रोजी विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. १३५ संस्थापक सभासद, तर एकूण सभासदांची संख्या आज ५०० पर्यंत पोहोचली आहे. संतोष साखरे कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष मोहन धोटे तर सचिव अमोल माडोकार आहेत.

हमीभाव खरेदीत आघाडी

सन २०२० मध्ये कंपनी स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षांपासून संचालक मंडळ सक्रिय झाले. सन २०२०- २१ च्या हंगामात कंपनीला हमीभाव खरेदी केंद्र मिळाले. या वर्षी १५ हजार क्विंटल हरभरा हमीभावाने खरेदी करून कंपनीने शासनाला दिला. सुमारे ९१४ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. तर ७२ लाख रुपये जास्तीचे मिळाले. हा अनुभव उत्साहवर्धक होता. त्यानंतर २०२२ च्या हंगामाची चांगली तयारी केली.

हरभरा खरेदीचा पुढील टप्पा

शेतकरी कंपन्यांचे फेडरेशन असलेल्या ‘महाएफपीसी’च्या सहकार्याने खरेदी केंद्र मिळाल्यानंतर जानेफळ परिसरातील ४२ गावांमधील शेतकऱ्यांकडील हरभरा खरेदीचे काम सुरू केले. शेतकऱ्यांची नोंदणी, खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. बघता बघता आतापर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल हरभरा खरेदी करीत शासकीय गोदामात जमा झाला आहे. अद्यापही केंद्रावर हरभरा खरेदी व्हायचा असून, हा आकडा हंगामाच्या अखेरीपर्यंत तब्बल ५० हजार क्विंटलपर्यंत पोहोचेल अशी कंपनीला आशा आहे. अद्याप जूनपर्यंत हंगाम चालेल. खरेदी केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांना आपुलकीची वागणूक, योग्य वजनकाटा व वेळेत मोजमाप, चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी पाठपुरावा, अशा विविध पातळ्यांवर कंपनी कार्यरत असल्याने शेतकऱ्यांचा केंद्रावरील ओढा सातत्याने वाढत आहे.

हजार टन क्षमतेचे गोदाम

कंपनीला बुलडाणा जिल्हा कृषी विभागाचेही पाठबळ मिळाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी अंबादास मिसाळ, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. यामुळे कंपनीने जानेफळ शिवारात एक एकर जागा विकत घेतली. तेथे एक हजार मे टन क्षमतेचे भव्य गोदाम उभे केले आहे. यामध्ये शासकीय खरेदी केली जाते. उभारणीसाठी पोकरा प्रकल्पाचे मोठे अर्थसाह्य मिळाले. शिवाय कंपनीच्या सभासदांनीही वर्गणी उभी केली.

स्वच्छता, प्रतवारी केंद्र

शेतीमाल प्रतवारी, स्वच्छता करण्यासाठी कंपनीने अत्याधुनिक सुविधा असलेल्या यंत्राची उभारणी केली आहे. त्याद्वारे धान्यातील माती, कचरा दूर होऊन शेतकऱ्यांकडील शेतीमालाचा दर्जा वाढवण्याचे काम होत आहे. हा माल शासनाला पुरविण्यात येत आहे.

बीजोत्पादनात सक्रिय

या भागात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. कंपनीने दर्जेदार व अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचे बीजोत्पादन दोन हंगामांपासून सुरू केले आहे. यात केडीएस ७२६ फुलेसंगम, एमएयूएस ६१२ या वाणांचा समावेश आहे. सध्या कंपनीकडे १३० क्विंटल बियाणे तयार असून, येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना हे बियाणे पुरवले जाईल. गेल्या रब्बीत हरभऱ्याचेही सुधारित वाण शेतकऱ्यांना देण्यात आले. त्याद्वारे पीडीकेव्ही कांचन, जॉकी ९२१८, फुले विक्रम या वाणांचे सुमारे ४०० क्विंटलपर्यंत बियाणे तयार होणार आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन

जानेफळ भागात कार्यरत शेतकरी गटांच्या सहकार्याने नव्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याचे काम सुरू आहे. यंदाच्या रब्बी हंगामात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर येथील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. त्यातून मोहरीची तब्बल २०० एकरांपर्यंत लागवड झाली. चार ते पाच एकरात जवस पेरण्यात आले. या पिकांचे शेती दिन घेण्यात आले. प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मोहरीच स्थानिक बाजारपेठेतील दर क्विंटलला ५५०० ते ५७०० रुपये आहे. मात्र कंपनीच्या मार्फत ती राजस्थानात पाठवण्यात येणार आहे. तेथे ६५०० रुपयांपर्यंत दर मिळेल.

पीकनिहाय गट

जानेफळ भागात फळबागा, भाजीपाल्याचे क्षेत्र वाढत आहे. या परिसरातूनच समृद्धी महामार्ग तयार होत आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी निर्यातक्षम फळे, भाजीपाला उत्पादनासाठी कंपनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊ लागली आहे. त्या उद्देशाने लिंबू, सीताफळ, कांदा, संत्रा असे पीकनिहाय शेतकऱ्यांचे गट बनविणे सुरू झाले आहे. निर्यातक्षम माल उत्पादनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. निर्यातदारांसोबत करार करण्याचे प्रयत्न आहेत. भविष्य काळात केळीसाठी रायपनिंग चेंबर, माती परीक्षण यंत्रणा, कोल्ड स्टोअरेज, जिवाणू संवर्धकांची निर्मिती, गांडूळ खत बनविण्यासाठी शेतकऱ्यांना कंपनीच्या पाच टक्के नफ्यातून ५० टक्के अनुदानावर प्रकल्पसाह्य करण्याचा विचार आहे.

संपर्क ः संतोष साखरे, ९०११७१०५२३ (अध्यक्ष) अमोल माडोकार, ९९२१६७२२१८ (सचिव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.