नियोजनातून बसविली शेतीची घडी

परभणी जिल्ह्यातील धामोनी (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील शांताबाई रंगनाथ मुळे या उपक्रमशील महिला शेतकरी. पीक लागवड ते विक्रीची कामे स्वतः करतात. त्यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली आहे. उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करत कुटुंबाची आर्थिक बाजू भक्कम केली आहे. याचबरोबरीने गावातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
नियोजनातून बसविली शेतीची घडी
Shantabai Mule Agrowon

सोनपेठ तालुक्याच्या ठिकाणापासून १५ किलोमीटरवर बीड जिल्ह्याच्या सीमेलगत सोनपेठ ते परळी वैजनाथ रस्त्यावरील माजलगाव धरणाच्या कालव्याजळून धामोनी गावात जाण्यासाठी फाटा आहे. शांताबाई रंगनाथराव मुळे यांचे माहेर डिघोळ देवी (ता. सोनपेठ) हे आहे. त्यांना एक मुलगा, दोन मुली आहेत. शांताबाई या कुटुंब प्रमुख आहेत.

धामोनी शिवारातील माजलगाव धरणाच्या मुख्य कालव्याच्या बाजूला त्यांची हलकी ते मध्यम प्रकारची सहा एकर जमीन आहे. काही वर्षांपूर्वी विविध कारणांनी छोटे क्षेत्र असलेल्या कोरडवाहू शेत जमिनीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी जमीन नातेवाइकांना कसायला दिली.

कामासाठी मुंबई येथे स्थलांतर केले. मुंबई येथे दहा वर्षे बांधकाम व्यवसायात रोजंदारीवर काम केले. त्याचवेळी ठरावीक रकमेची बचत सुरू केली. परंतु त्यांची गावाची ओढ कायम होती.चांगल्या पद्धतीने शेती करावी असे वाटत असे. म्हणून दहा वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब गावी परतले. शेतामध्ये विहीर खोदली.

सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यामुळे विविध बागायती पिकांचे उत्पादन घेता येऊ लागले. उत्पन्नात वाढ झाली. याचबरोबरीने तीन वर्षांकरिता त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याची १३ एकर शेती करार पद्धतीने घेतली आहे.

विविध पिकांचे उत्पादन

घर आणि कराराची शेती मिळून त्यांच्याकडे एकूण १९ एकर जमीन आहे. खरिपात सोयाबीन, कापूस, मूग, तूर आदी पिके घेतात. रब्बीमध्ये ज्वारी, हरभरा लागवड असते. याचबरोबरीने हंगामनिहाय वर्षभर भाजीपाला लागवड केली जाते. दरवर्षी एक एकर उन्हाळी भुईमुगाची लागवड करतात.यामुळे शेंगा तसेच जनावरांसाठी चाऱ्याची सोय होते.

पाच एकरावर ऊस लागवड असते. यंदा त्यांनी एक एकरावर हळद लागवड केली होती. दरवर्षी सोयाबीनचे एकरी आठ क्विंटल, कापसाचे एकरी सात क्विंटल, हरभऱ्याचे एकरी आठ क्विंटल आणि उसाचे एकरी पंचेचाळीस टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यांच्याकडे खिल्लार बैलजोडी तसेच अन्य मिळून सहा जनावरे आहेत. जनावरांपासून शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होते.

रासायनिक खतांचा गरजेनुसार संतुलित वापर करतात. शेणखतामुळे जमिनीची सुपीकता टिकून आहे. मशागत, आंतरमशागत आदी कामांसाठी बैलजोडीचा वापर केला जातो. नांगरणी, पेरणी आदी कामे भाडेतत्वावरील ट्रॅक्टरद्वारे केली जातात.

बचत गटाची साथ

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सोनपेठ येथील सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्राच्या संचालिका सय्यद नसीमा यांच्या मार्गदर्शनाखाली शांताबाई यांनी २०१८ मध्ये गावातील महिलांना एकत्र करून स्वयंसाह्यता गट स्थापन केला. त्यानंतर त्यांच्या प्रेरणेतून चार बचत गट स्थापन झाले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोनपेठ येथील शाखेत बचत गटाचे खाते आहे. दर महिन्याला प्रति सदस्य शंभर रुपये बँकेत बचत करतात. सुरुवातीच्या काळात बचत गटातील महिला सदस्य अंतर्गत पैशाची देवाण-घेवाण करत होत्या. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी आर्थिक मदत मिळत असे. काही महिन्यांपूर्वी बँकेने बचत गटांतील सदस्यांना पूरक व्यवसायासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये कर्ज दिले आहे. त्याचा चांगला फायदा झाला आहे.

शेतीपूरक व्यवसायाला गती

शांताबाई यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली. शेतामध्ये निवारा बांधून त्यामध्ये गावरान कोंबडी पालन सुरू केले. सध्या त्यांच्याकडे ३० कोंबड्या आहेत. परिसरात गावरान कोंबडीच्या अंड्यांना मागणी आहे. प्रतिनग दहा रुपये याप्रमाणे विक्री होते. दोन ते अडीच किलो वजनाचा कोंबडा, कोंबडी प्रतिनग ५५० ते ७०० रुपये या दराने विक्री होते. कुक्कुटपालन व्यवसायातून वर्षाकाठी १५ ते २० हजारांचे उत्पन्न मिळते.

शांताबाईंकडे दोन म्हशी आहेत. घरची गरज भागून शिल्लक ३ ते ४ लिटर दुधाची विक्री ५० रुपये लिटर दराने करतात. तसेच तूप तयार करून विकतात. दुग्ध व्यवसायातून वर्षाकाठी ७० ते ८० हजारांचे उत्पन्न मिळते. नुकतेच बचत गटामार्फत मिळालेल्या कर्जातून त्यांनी दोन शेळ्या विकत घेऊन शेळीपालन सुरू केले आहे.

कुटुंब राबते शेतात...

शांताबाईंना शेती नियोजनात पती रंगनाथराव, मुलगा युवराज आणि सून रोहिणी यांची चांगली साथ मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी शेतामध्येच त्यांनी घर बांधले. शेतामध्ये कुटुंब वास्तव्यास असल्यामुळे शेती कामांचा उरक वाढला आहे. पिकाची चांगली राखण होते. शांताबाई दरवर्षीचे पीक नियोजन निश्‍चित करतात. इतर सदस्यांसोबत मशागत, पेरणी, खुरपणी, खत, पाणी व्यवस्थापन आदी कामे करतात.

रंगनाथराव, युवराज हे मशागत, पेरणी, बैलजोडी, जनावरांचे चारा, पाणी व्यवस्थापन यांसह अन्य अंगमेहनतीची कामे करतात.सुगीच्या वेळी तसेच पेरणीच्या वेळी महिला मजुरांची मदत घेतली जाते. घरातील सर्व सदस्य शेतात राबत असल्यामुळे मजुरीवरील खर्चात बचत होते.त्यामुळे एकंदरीत उत्पादन खर्च कमी झाला आहे.

स्वतः करतात शेतीमालीची विक्री

सिंचनाची सुविधा झाल्यापासून शांताबाई वर्षभर अर्धा ते पाऊण एकर क्षेत्रावर विविध भाजीपाला पिकांची लागवड करतात. प्रामुख्याने मिरची, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, पालक, मेथी या पिकांची लागवड केली जाते. कुटुंबातील सदस्य भाजीपाल्याची काढणी, स्वच्छता, प्रतवारी करतात. त्यामुळे बाहेरच्या मजुरांची गरज भासत नाही.

धामोनी गावपरिसरातील दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील सोनपेठ, शेळगाव तसेच बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ, सिरसाळा आदी ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी आठवडे बाजार भरतात. या बाजारांमध्ये भाजीपाला तसेच अन्य शेतीमाल दुचाकीवर बांधून स्वतः शांताबाई विक्रीसाठी घेऊन जातात. बाजारामध्ये दुकान थाटून विक्री करतात. त्यामुळे आर्थिक नफा वाढीला चालना मिळाली आहे. दर आठवड्याला चार हजारांची भाजीपाला विक्रीतून उलाढाल होते.

संपर्क ः शांताबाई मुळे ः ९५९४८२८९३३

(छायाचित्रे ः माणिक रासवे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com