सुधारित, व्यावसायिक शेतीची वाट पकडली

एक भाऊ मुंबईत आणि एक गावी अशी कोकणातील प्रत्येक कुटुंबाप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातील मळण कुंभारवाडी येथील साळवी कुटुंबाचीही रचना होती. मात्र कुटुंबातील मनोहर व विलास या दोघा बंधूंनी सुधारित, व्यावसायिक शेतीची वाट पकडली. त्यासाठी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. अभ्यास केला. सुधारित तंत्र वापरले व थेट विक्रीचे तंत्रही जाणले. आज प्रगतीच्या वाटेवरून साळवी बंधू आश्‍वासक वाटचाल करताना शेतीतून आर्थिक व मानसिक समाधान मिळवू लागले आहेत.
Commercial Agriculture
Commercial Agriculture Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील मळण कुंभारवाडी येथील मनोहर नारायण साळवी आणि त्यांचे बंधू विलास यांनी सुधारित तंत्राने (Improved Techniques In Agriculture) आपली शेती करण्याचे निश्‍चित केले. सर्वांत महत्त्वाचे की पारंपरिक शेतीत (Traditional Agriculture) अडकून न पडता आपल्याला पुढे जायचे आहे हा निर्धार असणे महत्त्वाचे. तशी दिशा पकडणे व त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असते. साळवी बंधूंनी हेच केले आणि आज त्यांना त्याचे चांगले फळ मिळू लागले आहे.

सुधारित शेतीची दिशा

विलास यांची मुंबईत टॅक्सी व्यवसाय आहे. तर गावी मनोहर जनरल स्टोअर्स व रिक्षा व्यवसाय करतात. त्यांची साडेतीन एकर शेती आहे. त्यात भात, नाचणी ही पारंपरिक पिके व्हायची. आपण नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यावसायिक, प्रगत करायची असे मनोहर यांना सतत वाटे. त्यातच २०१८ मध्ये विलास गावी आले. त्या वेळी मित्रांसोबत कऱ्हाड (जि. सातारा) येथील नर्सरी पाहण्यासाठी दोघे बंधू गेले. तेथे झेंडू लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांकडून माहिती मिळाली. परंतु पावसाळ्यात कोकणात झेंडू (Marigold) चांगल्या प्रकारे होत नाही, नुकसान अधिक होते असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. परंतु योग्य मार्गदर्शनातून झेंडू यशस्वी करायचा असे साळवी यांनी ठरविले.

Commercial Agriculture
सुधारित शेती, ग्रामविकासाच्या उपक्रमातून लहान ठरले ‘स्मार्ट ग्राम’

व्यवस्थापन सुधारले

सन २०१८ मध्ये जूनमध्ये झेंडूची कोलकाता जातीची ५०० रोपे आणली. थोडेफार उत्पादन मिळाले. स्थानिक बाजारात विक्री केली. आत्मविश्‍वास वाढल्याने पिवळ्या व लाल फुलांच्या एक हजार रोपांची लागवड वाढवली. हळूहळू पिकांची श्रेणी वाढत चालली. आज सुमारे प्रत्येकी १० ते २० गुंठ्यांत झेंडू, हळद., भेंडी, मिरची अशी पिके घेतली जात आहेत. यात दोन भाज्या उन्हाळी हंगामात घेण्यात येतात. प्रत्येक पिकासाठी गादीवाफा, पॉलिमल्चिंग पेपर, तसेच बेसल डोसचा वापर होतो.

Commercial Agriculture
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे पॅटर्न'

विक्री यंत्रणा उभारली

साळवी केवळ शेतीची स्थिती सुधारून थांबले नाहीत. त्यांनी आपली विक्री व्यवस्थाही उभारली. जवळच असलेल्या शृंगारतळी येथे बाजारपेठ आहे. गुहागर परिसरामध्ये झेंडू उत्पादक कमी असल्याने परजिल्ह्यातून फुले आणली जातात. मात्र साळवी बंधूंनी गणपती उत्सव काळात १०० ते १२० रुपये व कमाल १५० रुपये प्रति किलो दराने थेट विक्री केली. पुढे हार व्यावसायिकांना किलोला ३० ते ४० रुपये दराने विक्री केली. मात्र साडेतीन महिन्यांत चांगले पैसे मिळाले. नफ्याचे प्रमाण पाहून यंदा तीन हजार रोपांची लागवड केली आहे. शुंगारतळी बाजारपेठेनजीकच हॉटेल व्यावसायिकांसह भाजी विक्रेत्यांना भाज्यांची विक्री होत आहे. भेंडी ३० रुपये, तर मिरचीची ६० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. खर्च वगळता ५० ते ६० टक्के नफा मिळतो आहे. सलग तीन वर्षे आता उत्पन्न सुरू आहे.

हळद व कलिंगड

मागील वर्षी हळद लागवडीतून सुमारे २० किलो पावडर तयार करून त्याची २०० रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात साळवी यशस्वी झाले. उत्पादनाचा दर्जा वाढविण्यासाठी कंद पॉलिश केले जातात. त्याची साल काढून टाकली की आतील भाग सुकवून त्याची गडद पिवळ्या रंगाची हळद मिळते. त्याला मागणीही अधिक असते. यंदा पंचायत समिती कृषी विभागाच्या साह्याने हळदीची एक हजार रोपे लावली आहेत. थंडीच्या कालावधीत गुहागरमध्ये कलिंगडाची लागवड चांगली होते. गेल्या वर्षी २० ते ३० गुंठ्यांत दोन जातींची लागवड केली. त्याचे सहा टन उत्पादन मिळाले. सुमारे तीन ते साडेतीन महिन्यांत उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला व्यापाऱ्यांना एक टन विक्री २० रुपये प्रति किलो दराने केली. पुढे मात्र २० ते २५ रुपये दराने थेट ग्राहकांना विक्री करून नफ्याचे प्रमाण वाढवले.

मार्गदर्शनातून तंत्र सापडले

मनोहर सांगतात, की कऱ्हाड तसेच आमच्या भागातील अनुभवी शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष जाऊन शेतीतील तंत्र, बारकावे शिकून घेतले. मल्चिंग पेपर वापरल्याने पावसाळ्यात गवताचा त्रास उद्‍भवत नाही. गेल्या वर्षी वाफे उभ्या पद्धतीने तयार केले. मात्र यंदा पाणी साचून राहू नये यासाठी जमिनीच्या स्थितीनुसार ते आडव्या पद्धतीने बनवले. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होतो. ते जास्त काळ साचून राहत नाही. पावसाळ्यात झेंडूची नीट बांधणी केल्यास नुकसान कमी होते अशा अनेक बाबी आत्मसात होत गेल्या. त्यातून लागवड यशस्वी होत गेली. कोकणातील अनेक तरुण मुंबईसारख्या शहरात जाऊन कमी पगाराची नोकरी करत संघर्ष करीत राहतात. त्यापेक्षा हाच वेळ व हीच ऊर्जा आपली शेती विकसित करण्यासाठी वापरायची असे ठरवले तर शेतीतून आर्थिक व मानसिक दृष्ट्याही समाधानी होता येते. आम्हाला हाच अनुभव येत असल्याचे मनोहर सांगतात. कृषी विभागाचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे.

मनोहर साळवी, ७८२१८६२८४१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com