एकीच्या जोरावर आर्थिक स्रोत केले बळकट

कठोरा (ता. जि. जळगाव) येथील सपकाळे कुटुंबीयांनी एकी, काटेकोर आर्थिक नियोजन आणि काटकसरीच्या माध्यमातून केळी, हळद (Turmeric) व कापसाची शेती (Cotton Farming) भक्कम केली आहे. उत्पादन खर्च कमी करतानाच गुणवत्तापूर्ण हळद उत्पादन, हळद पूड निर्मिती आणि थेट विक्रीतून उत्तम आर्थिक स्रोतही तयार केला आहे.
Turmeric
TurmericAgrowon

जळगाव जिल्ह्यातील तापी नदीकाठी असलेल्या कठोरा गावातील जमीन काळी कसदार आहे. येथील देविदास, भगवान, लक्ष्मण, इच्छाराम, बळीराव व जगदीश हे सपकाळ कुटुंबातील सहा बंधू. यातील देविदास, भगवान व जगदीश हे तिघे एकत्र राहत. देविदास यांच्या निधनानंतर भगवान व जगदीश आणि त्यांचे पुतणे संदीप व मनोज हे वडिलोपार्जित २६ एकर शेतीची धुरा चालवतात. त्यांना भगवान यांचे पुत्र गणेश व नीलेश यांची साथ मिळते. संदीप हे सैन्यात सुभेदार या पदावर कार्यरत असूनही शेतीतील वित्त व पीकविषयक नियोजनाच्या निर्णयांमध्ये मोलाची भूमिका निभावतात. शेतीकामासाठी दोन सालगडी, एक बैलजोडी आहे. दूध दुभत्यासाठी १२ गायी (Cow) आहेत. सिंचनासाठी (Irrigation) तीन कूपनलिका आहेत. दोन मोठे ट्रॅक्टर व एक मिनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर व अन्य अवजारेही (Agriculture Tools) घेतलेली आहेत.

Turmeric
Turmeric : हळदीच्या वायद्यांवर बंदी नकोच !

केळी हे पारंपरिक पीक असले भगवान, जगदीश यांचा अनुभव आणि संदीप, मनोज यांच्या नव्या संकल्पना, तंत्र यांची सांगड घालत केळीशेतीत बदल केले आहेत. पूर्वी कंदाच्या साह्याने लागवड केली जाई. त्या ऐवजी उतिसंवर्धित रोपांचा वापर केला जातो. चांगले दर मिळतील, यानुसार लागवडीचे नियोजन केले जाते. दरवर्षी १२ ते १३ एकरात १६ ते १८ हजार केळी झाडे लावली जातात. पाच ते सात एकर कापूस आणि चार एकर हळद पीक असते. फेरपालटीसाठी गहू, हरभरा यांची पेरणी केली जाते.

सैन्यातील नोकरीदरम्यान दिल्ली येथे कार्यरत असताना (सन २०१५) संदीप यांनी पुसा येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून आयोजित कृषी प्रदर्शनास भेट दिली होती. तिथे त्यांना जैविक खते, कीडनाशके व अन्य चांगल्या उपाययोजनांची माहिती मिळाली. मग त्यांनी जैविक, नैसर्गिक व आवश्यकतेनुसार रासायनिक घटकांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. केळी व इतर पिकांसंबंधी पुसा (दिल्ली) येथील आयसीएआरचे संचालक डॉ. ए. के. सिंह, डॉ. लिवलीन शुक्ला, डॉ. चिकप्पा, डॉ. सुनील पब्बी, सूक्ष्मजीव विज्ञान विभाग, जळगाव तालुका कृषी विभागाचे सचिन बाविस्कर, कृषी सहायक आरती कोळी आदींचे मार्गदर्शन व सहकार्य मिळते.

Turmeric
Turmeric : हळदीची झळाळी वाढणार की मंदावणार?

व्यवस्थापनात सुधारणा

-तीन भावांचे एकत्रित कुटुंब असल्याने पीक व्यवस्थापन, प्रक्रिया, मार्केटिंग यासाठी अधिक वेळ देणे शक्य होते. विचारविनिमयातून नवनवे तंत्र स्वीकारले जाते.

-केळी, कापूस व हळद ही नगदी पिके असली तरी रोग, कीड आणि नैसर्गिक समस्या यांमुळे नुकसान वाढू शकते. त्यावर मात करण्यासाठी जैविक खते व जैविक कीडनियंत्रणाचा वापर वाढवला आहे. त्यातून खर्च कमीत कमी राहील, हे पाहिले जाते.

-हळद, केळी पिकाची लागवड गादीवाफ्यावर करतात. यामुळे काळ्या कसदार जमिनीत अतिपावसात पिकाची हानी टाळता येते.

-पीक फेरपालट, त्यातही बहुपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. एका पिकात नुकसान झाल्यास अन्य पिकांतून भरपाई होऊ शकते.

-कामे वेळच्या वेळी करण्यासाठी ट्रॅक्टर, यंत्रे व अवजारे उपयोगी ठरतात. मजुरीच्या खर्चात बचत होते.

-टप्प्याटप्प्याने कूपनलिका खोदत संपूर्ण क्षेत्र बागायतीखाली आणले आहे.

आर्थिक शिस्त महत्त्वाची...

-दरवर्षी वार्षिक ताळेबंद मांडला जातो. कोणत्या पिकातून किती फायदा किंवा नुकसान झाले, याचा अंदाज घेतात. या नोंदी व त्यामागील कारणांचा शोध घेतात. त्यानुसार पुढील वर्षाचे पीक नियोजन व अंदाजपत्रक तयार केले जाते. आर्थिक शिस्तीवर संदीप यांचा भर असतो.

-सपकाळे बंधूंची मुले सध्या उच्च शिक्षण घेत आहे. त्यांना दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे.

- पिकांमधून येणाऱ्या नफ्यातील काही भाग नेहमी शेती सुधारणा, सिंचन स्रोतांचे बळकटीकरण, यंत्रणांची देखभाल, दुरुस्ती व बहुतांश उत्पादनक्षम बाबींमध्येच गुंतवला जाईल, यावर भर असतो.

उत्पादनातील गुणवत्ता व बचत

-सुधारित वाण, उतिसंवर्धित रोपे यावर भर.

-अनेक वर्षांपासून जैविक खते व कीडनियंत्रणावर भर देत आहेत. उदा. पक्षिथांबे, कामगंध सापळे, पिवळे चिकट सापळे यातून एकरी ३० टक्क्यांपर्यंत खर्च वाचतो.

- जैविक खते, गोमूत्र इ. वापरामुळे रासायनिक खतांवरील खर्चात ५० टक्क्यांपर्यंत बचत साधता आली.

- शत्रू किडी आणि मित्र किटक यावर लक्ष ठेवले जाते. फवारणी करताना सर्व काळजी घेतात.

-एकाच क्षेत्रात वारंवार कापूस पीक घेण्यापेक्षा फेरपालट करतात. यामुळे जमिनीचा पीएच नियंत्रणात आहे.

-सर्व पिकांसाठी ठिबक आहे.

-जूनमध्ये कापसाची लागवड करतात. तर जून ते जुलैदरम्यान मृग बहर केळी आणि सप्टेंबर अखेरीस कांदेबाग केळी पिकाची लागवड करतात.

-डिसेंबरच्या सुरुवातीला कापूस पीक काढल्यानंतर अन्य रब्बी पिके घेतली जातात. फरदड घेत नसल्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र रोखण्यासाठी मदत होते.

-पिकांचे अवशेष शेतातच गाडतात.

- तज्ज्ञ, खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी, अभ्यासू शेतकरी यांच्या सतत संपर्कात राहत असल्यामुळे कृषी क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत राहत असल्याचे त्यांचे मत आहे.

प्रक्रिया व थेट विक्रीतून अधिक नफा

-केळी व कापसाची थेट किंवा जागेवर विक्री केली जाते. कमाल शेती गावानजीक किंवा रस्त्यानजीक असल्याने केळी कापणी सुकर होते. कमी मजुरी खर्च लागतो. दर्जेदार उत्पादनामुळे निर्यातदार कंपन्या केळीची खरेदी करतात.

-सुमारे आठ वर्षांपासून अन्य एका उद्योजकांकडून हळद पावडर पावडर तयार करून घेत होता. मात्र नुकतेच हळद प्रक्रियेसाठी यंत्र खरेदी केली आहेत. त्याद्वारे एप्रिल ते जूनदरम्यान शेतामध्ये उत्पादित सर्व हळदीपासून पावडर तयार केली जाते. दरवर्षी सुमारे ३५ क्विंटल हळद पावडरची छोटी मोठी पॅकेट्स थेट ग्राहकांना विकली जातात. त्यामुळे ओली हळद विकण्याच्या तुलनेमध्ये अधिक नफा मिळतो.

एकूण क्षेत्र ः २५ एकर

कापूस (सात ते आठ एकर), केळी (१२ ते १३ एकर), हळद (चार ते पाच एकर)

विविध पिकांचे उत्पादन आणि सरासरी दर

पीक --- सरासरी उत्पादन (एकरी, क्विंटलमध्ये) --- उत्पादन खर्च (रुपये) ---०० --- तीन वर्षांतील सरासरी दर (उत्पादन रुपये व प्रतिक्विंटल) --- ०० --- निव्वळ नफा (रुपये)

०० --- ०० --- ०० --- २०१९ --- २०२० --- २०२१ --- ००

कापूस --- १० --- २० हजार रु. --- ५००० --- ५२०० --- ८५०० --- ३५ हजार

हरभरा --- ८ --- पाच हजार रु. --- ४००० --- ४००० --- ४८०० --- ४० हजार

केळी --- एक घड २२ ची रास--- एक लाख रु. --- १००० --- ११०० --- १२०० --- एक लाख (सरासरी)

हळद --- १५० (ओली) --- ६० हजार रु. --- ९० (किलो) --- १२३ --- १४० --- १ लाख ५० हजार

गहू --- १२ --- चार हजार रु.--- १८०० --- १८०० --- २२०० --- ४० हजार

संपूर्ण शेतीतून प्रति वर्ष सुमारे ६५ ते ७० लाखांचे उत्पन्न हाती येते. केळी दरातील चढ उताराचा उत्पन्नावर प्रमुख परिणाम होतो. निव्वळ नफा कमी अधिक होत असला तरी सर्वसाधारणपणे ३५ ते ४० टक्के एवढा नफा शिल्लक राहतो.

--------------------

मनोज सपकाळे, ९११२१३९४४१

संदीप सपकाळे, ८८२६२८७५८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com