Processing Industry : गृहोद्योगातून घेतली भरारी

रोजगाराच्या मर्यादित संधी उपलब्ध असतानाही पाच हजार लोकसंख्या असलेल्या कळंबा महाली (जि. वाशीम) येथील मीरा दीपक कापसे यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत मसाला उद्योगातून स्वावलंबनाचा मार्ग निवडला. भूमिहीन कुटुंबातील मीराताईंनी पतीच्या सहकार्याने गृहोद्योगातून कुटुंबाला आर्थिक प्रगतीची वाट दाखवली आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

कळंबा महाली (जि. वाशीम) येथील मीरा दीपक कापसे यांच्या कुटुंबाची शेती नसल्याने अर्थांजनासाठी लघू उद्योगाची (Small Industry) गरज होती. या विचारातून मीरा कापसे यांनी २००८ मध्ये स्टेशनरीचा छोटा व्यवसाय (Stationary Business) सुरू केला. नंतर याला सोबत म्हणून ब्युटी पार्लरची सुरुवात केली. वर्षभरात साड्या तसेच लहान मुलांच्या कपडे विक्रीचाही व्यवसाय थाटला. यानंतर शिलाई यंत्र खरेदी करून ब्लाऊज, ड्रेस निर्मितीस सुरुवात केली. काही कपडे शिवून त्याची इतर दुकानदारांना विक्री सुरू केली. पुढील काळात सहा महिलांना रोजगार देत त्यांच्याकडून त्यांनी पेटीकोट शिवून घेणे सुरू केले. प्रति नगामागे १५ रुपये शिलाई खर्च त्यांना देत होत्या. एक महिला दिवसभरात १२ ते १५ नग शिवून द्यायची. महिलांना घरच्याघरी २०० रुपयांपर्यंत मजुरी मिळू लागली होती. इतर महिलांसाठी तयार केलेल्या या रोजगारामुळे त्यांनाही समाधान मिळाले.

Food Processing
Food Processing : जायफळाच्या सालीपासून सरबत, मुरंबा, कॅण्डी, लोणचे

‘स्वराली’ गृहोद्योगाची सुरुवात ः

मीराताईंना विविध प्रकारच्या घरगुती उद्योगातून आर्थिक मिळकत होऊ लागली. याच टप्प्यावर न थांबता त्यांनी परिसरातील बाजारपेठेचा अंदाज घेत मसाला उद्योगात उतरण्याचे ठरवले. बाजारपेठेत घरगुती स्तरावर बनविलेल्या दर्जेदार मसाल्यांना मागणी आहे, हे त्यांच्या आधीच लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी एक ग्राइंडर विकत घेऊन मसाले निर्मितीचा घरगुती उद्योग सुरू केला. पहिल्या टप्प्यात तयार मसाल्याचे पॅकिंग हाताने मेणबत्तीच्या साह्याने केले जात होते. पैसे जमल्यानंतर पॅकिंग यंत्र विकत घेतले. हळूहळू मसाल्याला मागणी वाढू लागली. बाजारपेठेत ओळख तयार होण्यासाठी त्यांनी ‘स्वराली’ गृहोद्योगाची स्थापना केली. या उद्योगाच्या माध्यमातून खडा मसाला, मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर तयार करणे सुरू केले. हळद आणि धने स्थानिक पातळीवरच शेतकऱ्यांकडून विकत घेऊन त्याचं पावडर तयार केली जाते.

Food Processing
Food Processing : गाईच्या दुधापासून बंगाली मिठाई

बचत गटाची उभारणी ः

उद्योगात जम बसू लागल्याने मीरा कापसे यांना किफायतशीर आर्थिक फायदा होऊ लागला. मसाला उद्योग वाढविण्यासाठी त्यांनी पुढील टप्प्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने संत गजानन बाबा महिला बचत गट तयार केला. या गटामध्ये १४ महिला सदस्या झाल्या. काही दिवसांनी गावामध्ये आरसीटी व्यवसाय प्रशिक्षण बँकेमार्फत ठेवण्यात आले होते. वाशीममधील स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पाच दिवसांचे हे प्रशिक्षण जानेवारी २०२१ मध्ये घेतले गेले. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध प्रकारच्या व्यवसायाची माहिती दिल्याने गटातील महिलांचा उत्साह वाढला. व्यवसायाचे सर्व बारकावे समजले. घरगुती व्यवसाय कसा वाढवावा याचे गणित समजले. या व्यवसायाला लागणारे भांडवल तसेच कर्ज कसे मिळवावे याची माहिती मिळाली. बऱ्याच वेळा अर्धवट कागदपत्रे, खात्यामध्ये उलाढाल नसणे, आदी बाबींमुळे बँका कर्ज देत नाहीत. हे लक्षात घेऊन त्यांनी वाशीम येथे इंडियन बँकेत खाते उघडले. या खात्यात कुटुंबातील व्यवसायाचा सर्व व्यवहार केल्याने वर्षभरातच खात्यामध्ये नऊ लाखांची उलाढाल झाली. त्यामुळे बँकेत पत तयार झाली. याचा फायदा त्यांना पुढील काळात कर्ज प्रकरणासाठी झाला. यातून प्रक्रिया उद्योगाच्या वाढीस गती मिळाली.

प्रक्रिया उद्योगाचे आधुनिकीकरण ः

कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेबाबत मीरा कापसे यांना माहिती मिळाली. या अंतर्गत दहा लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते, असेही समजले. या योजनेतून

लाभार्थ्याला ३५ टक्के अनुदान मिळत असल्याने त्यांनी प्रयत्न सुरू केले. कृषी अधिकारी श्री. ठोंबरे, गोपाल मुठाळ यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कर्जासाठी वाशीमच्या इंडियन बँकेत संपर्क केला. त्यांनीही खात्यातील उलाढाल पाहून कर्ज मंजूर होऊ शकते, असे सांगितले. काही दिवसांनी कर्जप्रकरण मंजूर झाल्याचा निरोप मिळाला. या दहा लाखांच्या रकमेतून त्यांनी स्वयंचलित पॅकिंग यंत्र, कोडिंग यंत्र आणि दोन ग्राइंडर विकत घेतले. या यंत्रणा प्रकल्प स्थळी बसल्यानंतर गुढीपाडव्याला प्रक्रिया उद्योगाचे उद्‍घाटन झाले. प्रक्रिया उद्योगामध्ये १२ महिलांना त्यांनी रोजगार दिला आहे. आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून हळद, मिरची पावडर, धने पावडर, मसाला निर्मितीला सुरुवात झाली. दर महिन्याला विविध उत्पादनांची विक्री होऊन सरासरी तीस हजारांचा नफा त्यांना मिळतो.

मीराताई प्रक्रिया उद्योगाचा सर्व कारभार सांभाळतात. त्यांचे पती दीपक हे विक्रीची बाजू पाहतात. तयार उत्पादनांचे आकर्षक पॅकिंग करून विविध शहरांत विक्री केली जाते. तयार केलेले विविध मसाल्याची विक्री वाशीम, मंगरूळपीर, अनसिंग, कन्हेरगाव, मालेगाव, रिसोड, रिठद, कारंजा, धानोरा, डोणगाव, चिखली, हिंगोली अशी विविध ठिकाणी गावातील विक्रेत्यांना केली जाते. मागणीनुसार मसाले पोहोचविली जातात. मसाला उत्पादनांचा दर्जा राखल्याने दिवसेंदिवस मागणीत वाढ होत आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रोत्साहन

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उन्नयन योजनेअंतर्गत वाशीम येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या प्रशिक्षणात अन्नप्रक्रिया उद्योग व क्षमता बांधणीमध्ये मीरा कापसे यांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अन्न प्रक्रियेतील विविध बाबींचे तंत्रज्ञान समजून घेतले. तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, ब्रॅण्डिंग, मार्केटिंगचे सखोल मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ सुधीर देशमुख, शुभांगी वाटाणे, अर्चना कदम, गोपाल मुठाल यांनी दिले. आजही प्रक्रिया उद्योगात येणाऱ्या अडचणीवर कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ उपाय सांगतात. त्यानुसार मीराताई नियोजन करतात. मीरा कापसे यांचा प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विविध महिला गट भेटी देतात.

संपर्क ः मीरा कापसे, ९०७५५२२५१४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com