Herbal Tea : स्वादयुक्त गवती चहा व्यवसायाने सावरला संसार

नगर- पुणे राज्यमार्गावर असलेल्या कामरगाव (ता. नगर) येथील बाबासाहेब ठोकळ यांनी शेतीला जोड म्हणून गवती चहा या सुगंधी वनस्पतीच्या वापरातून चहा विक्री व्यवसाय सुरू केला. उत्पादित काही दूध व एक एकरांत गवती चहाची देखील स्वतः लागवड केली. वीस वर्षापासून सातत्य ठेवत साईबाबा गवती चहा सेंटर हा परिसरात ब्रॅण्ड तयार केला आहे. नगर-पुणे राज्यमार्गावर प्रवाशांचे चहासाठी मुद्दाम थांबवण्याचे पसंतीचे ते ठिकाण झाले आहे.
Herbal Tea Farming
Herbal Tea FarmingAgrowon

नगर- पुणे राज्यमार्गावर नगरहून पुण्याकडे जाताना कामरगाव (ता. जि, नगर) लागते. येथे ''साईबाबा गवती चहा सेंटर (Saibaba Herbal Tea Center) नावाचे छोटे हॉटेल आहे. जाणारे- येणारे बहुतांश प्रवासी येथे आवर्जून थांबून सुगंधी व स्वादयुक्त गवती चहाची (Herbal Tea) लज्जत आवर्जून घेतात. हॉटेलचालक बाबासाहेब ठोकळ यांनी आपल्या चहाचा तसा ब्रॅण्डच तयार केला आहे. (Herbal Tea Farming)

Herbal Tea Farming
कशाला हवं मुंबईतलं संघर्षाचं जिणं! गावी गवती चहानं दिला सक्षम पर्याय

एकत्रित कुटुंबाची शेती

अर्जुनराव व भाऊसाहेब या दोन ठोकळ भावांचे एकत्र कुटुंब होते. आता ते विभक्त झाले असले तरी एकमेकांबद्दल जिव्हाळा कायम होता. अर्जुन यांना बाबासाहेब व मारुती ही दोन मुले. बाबासाहेब दहावी शिकलेले. मारुती पुण्यात कंपनीत नोकरी करतात. चुलत भाऊ शरद यांचे अभियांत्रिकी शाखेतील शिक्षण झालेले. तेही शेती करतात व बाबासाहेबांना मदत करतात.

बाबासाहेब यांना पाच एकर वडिलोपार्जित शेती. साधारण अर्धा ते एक एकर गवती चहा, एक एकर फुलशेती, तूर, मुगाचे प्रत्येकी एका एकरावर पीक तर कांद्याचे पीकही ते घेतात. मात्र गवती चहाचा चहा विक्री व्यवसायात खुबीने वापर करीत त्यांनी शेतकरी कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण केलीच. शिवाय त्यातून कुटुंबाचे अर्थकारण सक्षम केले. शेतीसोबत कुटुंबातील सदस्य देखील या व्यवसायात मदत करतात.

Herbal Tea Farming
Organic Farming: श्रीलंकेतल्या चहा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती कशी आहे?

संधी ओळखली

घरची परिस्थिती बेताची असल्याने बाबासाहेबांना पूर्ण शिक्षण घेता आले नाही. शिर्डी व अन्य ठिकाणी साधारणपणे आठ- दहा वर्षे इतरांच्या हॉटेलवर कामगार म्हणून त्यांनी काम केले. ते ज्या हॉटेलमध्ये कामाला होते तेथे चहासाठी गवती चहाचा वापर व्हायचा. साधारणपणे पंचवीस वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी हॉटेलमधील काम सोडून घरची शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र हॉटेल कामाचा अनुभव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. कामरगाव हे पुणे-नगर राज्य मार्गावरील गाव. त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशाची संख्या मोठी. हीच नामी संधी त्यांनी ओळखली. याच राज्यमार्गावर १९९७ मध्ये स्वतःचे चहाचे हॉटेल सुरु केले. सुरवातीला काही काळ चहासाठी लागणारा गवती चहा बाहेरून विकत घेत. या गवती चहाला हळूहळू ग्राहक पसंती देऊ लागले.

गवती चहाची शेती

सुमारे बारा वर्षापूर्वी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून गवती चहाच्या गावरान वाणाची एक हजार ठोंबे आणून अर्ध्या एकरावर लागवड केली. त्यातून निघणाऱ्या उत्पादनाचा स्वतःच्या हॉटेलसाठी वापर होऊ लागला. एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षे उत्पादन घेता येते. त्यानंतर जागा (फेरपालट) बदलून दुसरीकडे लागवड करावी लागते. दर १५ दिवसांनी कापणी होते. आज सुमारे एक एकरांत लागवड आहे. दररोज दहा ते पंधरा किलो गवती चहाची गरज भासते. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने तो पिकवला जातो. गरजेनुसार केवळ शेणखताचा वापर होतो. अन्य कोणत्या निविष्ठांची फारशी गरज पडत नाही.

व्यवसायातून केली प्रगती

हॉटेल पहाटे तीनच्या दरम्यान उघडते. ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु असते. दर दिवसाला सुमारे दीड ते दोन हजार कप चहाची विक्री होते. त्यातून महिन्याला सुमारे ३० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. याच व्यवसायाने ठोकळ कुटुंबाचा संसार सावरला किंवा उंचावला आहे. शेतीतही प्रगती केली आहे. दोन विंधन विहिरी तसेच एक विहीर खोदून शेतीसाठी पाणी सुविधा उपलब्ध केली. घराचे बांधकाम मुलांच्या शिक्षणासह अन्य बाबीतही आर्थिक प्रगती याच व्यवसायातून साधता आली.

दुग्धव्यवसायाची मदत

बाबासाहेब पूर्वी सहा ते सात गायींचा सांभाळ करीत. बारा वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करत. संकलित होणारे शंभर ते १२५ लिटर दूध संकलित करून ते चहा व्यवसायासाठी वापरत. कोरोनातील लॉकडाऊनच्या काळात हॉटेल बंद असल्याने दूधविक्रीचा प्रश्न तयार झाला. त्यामुळे गायींची संख्या कमी केली. सध्या ते व चुलत भावाकडे मिळून तीन गायी असून वीस लिटररपर्यंत दूध संकलन होते. हॉटेलला दररोज ७० ते ८० लिटर दूध लागते. घरच्या दुधाबरोबर बाहेरून विकत घेऊन गरज भागविली जाते. आता परिस्थिती सावरू लागल्याने गायींच्या संख्येत वाढ करण्याचा विचार आहे.

फुलशेती फुलवली

नगर तालुक्यात चास, कामरगाव, अकोळनेर व परिसरातील साधारणपणे आठ ते दहा गावे फूलशेतीत प्रसिद्ध आहेत. या भागात साधारण एक ते दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात फुलांचे उत्पादन घेतले जाते. ठोकळ कुटुंबाने देखील दहा ते बारा वर्षांपासून फूलशेतीत सातत्य ठेवले आहेत. यंदा पांढरी भाग्यश्री या नव्या वाणाच्या शेवंतीची लागवड केली आहे. गणपती, दसरा, दिवाळी या काळात फुलांना अधिक मागणी असते. साडेतीन महिन्याने फुले विक्रीला येतात. साधारणपणे एकरी ७० हजार रुपयांपर्यंत उत्पादन खर्च तर एकरी पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते. नगर व पुणे येथील बाजारात त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार किलोला पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत दर मिळतो. काहीवेळा १० रुपये एवढाही तो घसरतो. तर कोरोना काळात हा दर ४०० रुपयांवर पोचला होता असे बाबासाहेबांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्ती, लॉकडाऊनचा फटका

कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटेल बंद ठेवावे लागले. चार टन फुले विक्रीस आली होती. मात्र विक्री व्यवस्था बंद असल्याने फेकून द्यावी लागली. दोन लाखांपेक्षा अधिक रुपयांचा आर्थिक फटका बसला. काही वेळी फुले विक्रीला येण्याच्या काळात वादळ, गारपीट, पाऊसही होतो. त्याचाही फूलशेतीला अनेक वेळा फटका बसला आहे. तरीही ठोकळ कुटुंबाने धैर्याने सर्व संकटांचा सामना करून शेतीत यश मिळवले आहे.

संपर्क- बाबासाहेब ठोकळ- ९७३०३३४९४९, ९१७२१२१११३

शरद ठोकळ ः ७२४९६८१९३०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com