Paddy New Variety : विकिरण तंत्राच्या वापरातून भाताचे चार वाण विकसित

तळोधी (जि. चंद्रपूर) येथील आसावरी पोशेट्टीवार यांचे संशोधन
Paddy New Variety
Paddy New VarietyAgrowon

शुद्ध बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी तळोधी (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) येथील भात मिल (Rice Mill) मालक अण्णासाहेब पोशेट्टीवार (Annasabh Poshettiwar) यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या सूनबाई आसावरी हाच शुद्धीकरणाचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी स्थानिक वाणांचा शुद्धीकरणासोबतच निवड पद्धतीने व पुढे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे (Bhabha Atomoic Research Center) माजी तज्ज्ञ डॉ. शरद पवार (Dr. Sharad Pawar) यांच्या मदतीने विकिरण (रेडिएशन) तंत्रज्ञानाचा (Radiation Technology) वापर नवे वाण विकसित केले आहेत. गेल्या वीस वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आसावरी यांनी भाताचे तब्बल चार नवे वाण (Paddy Variants) विकसित केले असून, आणखी दोन वाणांच्या चाचण्या सुरू आहेत.

अण्णासाहेब पोशेट्टीवार यांनी १९५७ मध्ये ‘प्रभाकर ॲण्ड कंपनी’ स्थापन करून, तळोधी येथे भात गिरणी (राइस मिल) सुरू केली. सुरुवातीला क्रूड ऑइलवर वीजनिर्मिती करून त्यावरही ही मिल चालवली जाई. पुढे त्यात अनेक सुधारणा केल्या. मूळ भाताच्या बियाण्याचा दर्जा चांगला असला तरच त्यापासून उत्तम प्रतीचा तांदूळ मिळतो. आपल्याकडे भाताचे चांगले वाण नसल्याची बाब अण्णासाहेब पोशेट्टीवार यांना खटकत होती. त्या संदर्भात त्यांनी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी)मधील डॉ. शरद पवार आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. आनंद मोकेवार यांच्याशी चर्चा केली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००२ पासून अण्णासाहेबांनी भात (धान) शुद्धीकरण प्रक्रियेला सुरुवात केली. सुरुवातीची पाच ते सहा वर्षे स्थानिक भात वाणांच्या शुद्धीकरणावरच काम केले. त्यांचा हा वारसा पुढे नेण्याचे काम त्यांची सून आसावरी नीलेश पोशेट्टीवार यांनी ताकदीने केले. मूलतः बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) असे शिक्षण असलेल्या आसावरी यांची माहेरची पार्श्‍वभूमी अजिबात शेतीची नव्हती. मात्र सासरी आल्यानंतर आपल्या सासरे अण्णासाहेब यांच्यासह त्या भात शेतीमध्ये रमू लागल्या.

त्यातूनच त्यांनी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे माजी शास्त्रज्ञ डॉ. शरद पवार यांच्याकडून निवड पद्धतीने वाण विकसित करण्याची रीत जाणून घेतली. प्रत्येक वाणाची गुणवैशिष्ट्ये, उत्पादन, रोग कीड प्रतिकारकता यांच्या नोंदी घेतल्या. पहिल्या टप्प्यात त्यांनी ३१ वाणांची लागवड केली. त्यातून प्रत्येक रोपाची उंची, फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी अशी गुणवैशिष्ट्ये जाणून टॅग करण्यावर भर दिला. प्रत्येक वाणाची काढणी करताना मळणीपूर्वीची दाण्याची लांबी, जाडी आणि प्रक्रियेनंतर लांबी, जाडी अशा नोंदीही घेतल्या. अशा प्रकारे वेगळेपणा असलेल्या ओंब्या वेगळ्या करून त्यांची वेगळी लागवड केली जाते. अशा प्रकारे निवड पद्धतीने वाण विकसनाची प्रक्रिया राबवली जाते.

इच्छा तिथे मार्ग ः

पोशेट्टीवार कुटुंबीयांनी शेतकऱ्यांना शुद्ध बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र नव्या वाणाऐवजी शेतकऱ्यांची स्थानिक वाणांनाच अधिक पसंती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी आपल्या भागातील पूर्वापार वापरात असलेल्या वाणांमधूनच निवड पद्धतीने नवे भात वाण मिळविण्यावर भर दिला. अशा प्रकारे एच.एम.टी. या वाणातून निवड पद्धतीने ‘पळसगाव (सोना)’ हे १६० दिवसांचे वाण विकसित केले.

पुढे त्यातूनही १३५, १४५ व १५० दिवसांत परिपक्‍व होणारे वाण वेगळे केले. तरीही अभ्यास थांबला नाही. पुढील अभ्यासामध्ये ज्यांचा पक्वता कालावधी केवळ १२५ दिवसांचा आहे, अशी सुमारे ४८ झाडे वेगळी करून काढण्यात यश आले. या वाणाला प्रयोगादरम्यान ‘२७ नंबर’ असे संबोधले जात होते. मात्र पुढे पोशेट्टीवार यांच्या शेतात पार्वती मातेचे मंदिर आहे. येथून तयार झालेले वाण म्हणून या वाणाला ‘पार्वतीसूत’ असे नाव देण्यात आले.

त्याचे सरासरी उत्पादन १६ ते १७ क्विंटल प्रति एकर आहे. प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या शेतावर पार्वतीसूत वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या. सर्व कसोटीवर उतरल्यानंतर प्रसारणासाठी ब्रीडर, फाउंडेशन, ट्रुथफुल असे बियाणे तयार केले. भंडारा, गडचिरोली आणि रामटेक (नागपूर) परिसरांतील शेतकऱ्यांच्या सुमारे १० हजार एकरांवर पार्वतीसूत, पार्वती चिन्नोर ५, तळोधी हीरा १३५ हे वाण पोहोचले आहेत. या शेतकऱ्यांचे अभिप्राय चांगले आले आहेत.

विकिरण प्रक्रियेद्वारे तयार केलेले नवे वाण ः

१) ‘भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. शरद पवार यांनी कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने विकिरण (रेडिएशन) प्रणालीच्या माध्यमातून अनेक वाण विकसित केले होते. त्यांची मदत घेऊन ‘परभणी चिन्नोर’ या वाणावर २५० ग्रेड क्षमतेची रेडिएशन प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याचे गुणधर्म बदलले. त्यापासून ‘पार्वती चिन्नोर ५’ हा सुगंधित, उत्तम चवीचा सुपर फाइन तांदळाचा वाण मिळाला. मूळ वाण १६० दिवसांत परिपक्‍व होत असे. रेडिएशननंतर पक्वता कालावधी १४५ दिवसांपर्यंत कमी झाला आहे. या वाणाची उत्पादकता एकरी १८ ते १९ क्‍विंटल आहे.

२) त्यानंतर पश्‍चिम बंगालमधील ‘गोविंद भोग’ या भात वाणावर विकिरण प्रक्रिया केली. त्यातून ‘साई भोग’ हा वाण विकसित केला.

३) जयप्रकाश या स्थानिक वाणावर विकिरण प्रक्रिया करून त्यापासून नवा वाण विकसित केला आहे. (त्याचे नामकरण अद्याप केलेले नाही.) हा १२५ दिवसांत पक्व होणारा सुगंधित, लांब व टणक दाण्याचा वाण आहे. यांचे उत्पादनही चांगले आहे. सध्या त्याच्या चाचण्या सुरू आहेत. येत्या दोन वर्षात हे वाण शेतकऱ्यांच्या शेतावरील चाचणीसाठी उपलब्ध होऊ शकेल, असे आसावरी यांनी आत्मविश्‍वासाने सांगितले. रेडिएशन दिल्यानंतर शुद्ध बियाणे विकसित होण्यास सुमारे चार वर्षाचा कालावधी लागतो.

निवड पद्धतीने विकसित केलेले वाण ः

- सुरुवातीला ‘पळसगाव सोना’ आणि ‘पार्वतीसूत’ हे दोन वाण निवड पद्धतीने विकसित केले.

- ‘जय श्री राम’ हे १४५ ते १५० दिवसांचे सुपर फाइन वाण आहे. त्यापासून निवड पद्धतीने ‘तळोधी हीरा १३५’ हे वाण विकसित करण्यात आले. एकरी १७ ते १८ क्‍विंटल उत्पादकता असून, १३५ दिवसांचा परिपक्‍वता कालावधी आहे.

- ‘निलम’ या वाणातून नवे ‘निलम-४९’ हे वाण निवड पद्धतीने विकसित केले आहे. मूळ निलम वाणाचा परिपक्‍वता कालावधी १४० दिवस असतानात नव्या वाणात दहा दिवसांनी कमी झाला आहे. खतमात्रा कमी वापरल्यानंतरही त्यापासून एकरी सरासरी २० क्‍विंटल उत्पादन मिळते.

- ‘तळोधी रेड २५’ हे वाण शिलाँग (आसाम) येथील उंच वाढणाऱ्या आणि लाल रंगाच्या जाड दाण्याच्या भातजातीपासून निवड पद्धतीने विकसित केले आहे. ही जात विदर्भात लागवड योग्य असून, त्यातील ॲण्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे उच्च रक्तदाब व मधुमेही लोकांसाठी उत्तम मानली जाते.

- ‘तळोधी माणिक’ हे वाण श्रीराम या स्थानिक वाणापासून निवड पद्धतीने विकसित केला आहे. १४५ दिवसांत तयार होणाऱ्या वाणापासून एकरी १७ ते १८ क्विंटल उत्पादन मिळते.

आसावरी पोशेट्टीवार, ९५०३११६१०८

डॉ. शरद पवार, ९८२०५१८७५७

(माजी शास्त्रज्ञ, डॉ. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com