Nursery : खात्रीशीर रोपांसाठी गावडे पाटील नर्सरी

जुन्नर तालुकाच नव्हे तर शेजारच्या चार-पाच जिल्ह्यांमध्ये गावडे पाटील नर्सरीचा लौकिक वाढला आहे. दर्जेदार रोपे, विक्रीपश्‍चात सेवा आणि सल्ला यामुळे शेतकऱ्यांचा ओढा या नर्सरीकडे वाढतो आहे. राजेश पाटील गावडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची साथ मोलाची आहे.
Nursery
NurseryAgrowon

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे शेतकऱ्यांना विविध फळे आणि भाजीपाल्याची दर्जेदार रोपे पुरविण्यासाठी २००६ मध्ये १० गुंठ्यावर राजेश गावडे पाटील यांनी उभारलेल्या ‘गावडे पाटील हायटेक नर्सरी’चा (High Tech Nursery) विस्तार आता सहा एकरांपर्यंत वाढला आहे. त्यांचे शेतीक्षेत्र ४० एकरपर्यंत वाढले आहे. २५ हजार रोपांच्या विक्रीचा व्यवसाय (Palnt Selling Business) आता वर्षाला सुमारे अडीच कोटी रोपांच्या विक्रीपर्यंत वाढला आहे. कृषिप्रधान जुन्नर तालुक्यासह आंबेगाव, खेड, चाकण, नाशिक, पालघरसह नगर जिल्ह्यातील पारनेर, अकोला, संगमनेरपर्यंत रोपांचा पुरवठा (Plant Supply) होतो आहे.

सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या जुन्नर (जि.पुणे) तालुक्यातील पाच धरणांच्या शृंखलेमुळे सिंचनाचे जाळे विस्तारले. शेतीमधील तंत्रज्ञानामुळे तरुणदेखील शेतीकडे वळू लागल्याने फळे भाजीपाला आणि फुलशेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. शेतीमधील बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि पीकपद्धतींचा भविष्यातील वेध घेऊन पिंपळगाव तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील श्री. राजेश गावडे पाटील यांनी कृषिनिष्ठ शेतकरी असणाऱ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली २००६ मध्ये नर्सरीची स्थापना केली. घरची पारंपरिक ३० एकर शेती होती. या शेतीला पूरकव्यवसाय म्हणून नर्सरी सुरू करण्याचा सल्ला वडील शिवाजीराव गावडे पाटील यांनी दिल्याचे राजेश यांनी सांगितले.

ते म्हणाले, की २००६ मध्ये १० गुंठ्यांवर सुरू केल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांची विविध भाजीपाल्याची पिकांच्या रोपांची मागणी होऊ लागली. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटोच्या रोपांना मोठी मागणी होती. पहिल्या टप्प्यात केवळ बेडवर रोपांची निर्मिती करत होतो. दर्जेदार रोपांच्या पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास वाढला. शेतकऱ्यांकडून टप्प्याटप्प्याने विविध फळे व भाजीपाल्यांच्या रोपांची मागणी होऊ लागली. व्याप वाढल्याने बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा, सल्ला-मसलत करून, कोकोपीटमध्ये रोपे तयार करण्याचा टप्प्याटप्प्याने ग्रीन हाउस आणि पॉलिहाउसची उभारणी करत दर्जेदार रोपांची निर्मिती करू लागलो.

Nursery
Wild Vegetable : रानभाज्यांची श्रीमंती

...अशी होते रोपांची निर्मिती

कोकोपीटमध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनोस आणि पॅसिलोमायसिस यांचे मिश्रण करून त्यामध्ये रोपांची निर्मिती केली जाते. ही रोपे नंतर संरक्षित आणि नियंत्रित पोषक वातावरणात ठेवून त्याची काळजी घेतली जाते. यामुळे सुरुवातीपासूनच रोपे सशक्त केली जातात. यामुळे रोपांची पुनर्लागवड करताना मरतुकीचे प्रमाण अत्यल्प राहते. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होतो. उत्पादनदेखील चांगले मिळते. शेतकऱ्यांच्या विश्‍वासावरच २५ हजार रोपांपासून सुरू केलेली नर्सरी आता अडीच कोटी रोपांची निर्मिती करू शकली. रोपे सक्षम, सुदृढ होण्यासाठी रोपे सक्षम, सक्षम आणि सुदृढ होण्यासाठी १९-१९-१९ ,१२- ६१- ० ,०-५२-३४, १३- ० -४५, ०-०-५० , मॅग्नेशिअम सल्फेट, ह्युमिक अ‍ॅसिड तसेच गरजेनुसार बुरशीनाशक वापरले जाते. त्यामुळे दर्जेदार रोपे तयार होतात. ही तयार झालेली रोपे शेतकऱ्यांना घरपोच दिली जातात.

Nursery
Nursery : नव्या मूळखंड उत्पादन तंत्रामुळे रोपवाटिकाधारकांच्या नफ्यात वाढ

भाजीपाल्याची दर्जेदार रोपे उपलब्ध

जुन्नर तालुका आणि लगतच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर तालुके हे कृषिप्रधान असून, तिथे विविध फुले, फळभाजी आणि भाजीपाल्यांचे मोठे उत्पादन खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये घेतले जाते. यामुळे भाजीपाल्यांच्या रोपांची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली यानुसार बहुतांश भाजीपाल्याची रोपे उपलब्ध असतात. यामध्ये टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, हिरवी मिरची, सिमला मिरची, कलिंगड, खरबूज, झेंडू, बिजली, स्टर, शेवंती, ऊस (को. २६५ आणि को. ८६०३२) शेवगा, काकडी, पपई, दुधीभोपळा, कारली, दोडका, ब्रोकोली आदींचा समावेश आहे.

सल्ला आणि मार्गदर्शन

बाजारपेठेच्या अंदाजानुसार कोणत्या पिकांची किती लागवड झाली आहे याचा अंदाज नोंदणीमुळे नर्सरी चालकांना येतो. यामुळे हंगामात कोणत्या पिकांचे किती उत्पादन होईल आणि किती दर राहतील याचा अंदाज बांधला जातो. या अंदाजावर शेतकरी देखील विचारणा करत असतात. त्यानुसार लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या विविध टप्प्यांवर ज्या शेतकऱ्यांनी रोपांची खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन रोपांची उगवण आणि भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा करून सल्ला दिला जातो. यासाठी विविध बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय साधला जातो. यामुळे शेतकरी आणि गावडे पाटील नर्सरीचा ऋणानुबंध जुळल्याने शेतकऱ्यांचा विश्‍वास वाढला असल्याचे राजेश गावडे पाटील सांगतात.

नर्सरीचा हायटेक परिसर

पॉलीहाऊसमध्ये रोपांची निर्मिती झाल्यानंतर ही रोपे नंतर ५० टक्के शेडनेटमध्ये सेमी हार्डनिंगसाठी ठेवली जातात त्यानंतर शेतकऱ्यांना देण्यापूर्वी सहा ते सात दिवस बाहेर ओपन हार्डनिंग मध्ये ठेवली जातात त्यामुळे रोपांना बाहेरच्या वातावरणाची सवय होते व शेतकऱ्यांनी शेतात लावल्यानंतर त्याची मर होत नाही. रोपे विक्रीनंतर शेतकऱ्यांना त्याविषयीचे मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादन वाढते परिणामी शेतकऱ्यांचा विश्‍वास वाढतो.

पत्नी रेश्माची समर्थ साथ

नर्सरी व्यवस्थापन, रोपांची नोंदणी, विक्री आदी महत्त्वाच्या क्षेत्रात पत्नी रेश्मा यांची समर्थ साथ असल्याचे राजेश अभिमानाने सांगतात. स्वतः मार्केटिंगसाठी प्रत्यक्ष फिल्डवर शेतकऱ्यांशी संवाद आणि सल्ला देण्यासाठी फिरत असलो, तरी नर्सरीमधील सर्व व्यवस्थापन पत्नी सौ. रेश्मा गावडे पाटील पाहतात. कोणत्या भाजीपाल्याची किती रोपे शिल्लक आहेत, किती नोंदणी झाली आहे, किती रोपांची निर्मिती करावायची आहे. यापासून ते दैनंदिन शेतकऱ्यांची मागणी नोंदणी, स्टॉक रजिस्टर ठेवणे, कामगारांचे व्यवस्थापन, रोपांची निगा आदी विविध पातळीवरील व्यवस्थापनात पत्नी रेश्मा यांचा सिंहाचा वाटा आहे, असे राजेश नमूद करतात.

नर्सरी असोसिएशनचे नेतृत्व

जुन्नर, आंबेगाव तालुक्यात सिंचन सुविधेबरोबरच शेतीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची तरुण पिढी शेतीकडे वळू लागली आहे. यामुळे शेतीतील वाढत्या तंत्रज्ञानामध्ये बियाणे लावण्याचा कल कमी झाला आणि थेट रोपांची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली. यामुळे २००५-२००६ मध्ये बोटावर मोजण्याएवढ्या नर्सरी जुन्नर, आंबेगाव तालुक्यात होत्या. आता मात्र या नर्सरींची संख्या ५५ च्या पुढे गेली आहे. या नर्सरीचालकांनी एकत्र येत, जुन्नर, आंबेगाव नर्सरी असोसिएशनची स्थापना केली आहे. या असोसिएशनची जबाबदारी राजेश गावडे पाटील यांच्यावर आहे. हवामान बदलांमुळे आणि काही समस्यांमुळे काही रोपे खराब निघाली तर, त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी नर्सरी असोसिएशन कंपनी, शेतकरी आणि शासन पातळीवर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी समन्वय साधत असते, असे गावडे पाटील यांनी सांगितले.

- राजेश गावडे पाटील

७५८८५९४७७९

दर्जेदार रोपांच्या पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांचा गावडे पाटील हायटेक नर्सरीवर विश्‍वास वाढला. शेतकर्‍यांकडून टप्प्याटप्प्याने विविध फळे व भाजीपाल्यांच्या रोपांची मागणी होऊ लागली. नर्सरीच्या ग्राहकांचा विस्तार आता चार-पाच जिल्ह्यांपर्यंत झाला आहे. गुणवत्तेला मिळालेली ही पावती आहे.
राजेश गावडे पाटील

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com