शेतीला शेळीपालनाची भक्कम जोड

व्यावसायिक पद्धतीने व प्रशिक्षण घेऊन कोणताही व्यवसाय केल्यास व त्यात चांगले सातत्य ठेवल्यास तो यशस्वी करता येतो. जालना जिल्ह्यातील वखारी या अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी निवृत्ती घुले यांनी याच पद्धतीने चिकाटीने कमी खर्चात आपल्या शेळीपालनाला चांगला आकार दिला. आज शेतीसह कुटुंबाचे अर्थकारण उंचावण्यास या व्यवसायाचा त्यांना भक्कम आधार मिळाला आहे.
शेतीला शेळीपालनाची भक्कम जोड
Goat FarmingAgrowon

जालना जिल्ह्यातील वखारी येथील निवृत्ती घुले यांची सुमारे पाच एकर शेती. सतत अवर्षणग्रस्त स्थिती असल्याने कुटुंबाचा चरितार्थ भागविणे तसे अवघडच असायचे. शेतीला जोड आणि संकटसमयी आर्थिक आधार म्हणून व्यावसायिक शेळीपालनाचे (Goat Farming) महत्त्व त्यांना २०१५ च्या सुमारास खरपुडी कृषी विज्ञान केंद्रातील (केव्हीके) शास्त्रज्ञ डॉ हनुमंत आगे यांनी प्रशिक्षणातून पटवून दिले. पावसाळा व हिवाळा या काळात पूर्ण बंदिस्त तर उन्हाळ्यात अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालनाचे (Incentive Goat Farming) सूत्र निवृत्तीरावांनी स्वीकारले.

शेळीपालनाला व्यावसायिक (Commercial Goat Farming) स्वरूप देण्यापूर्वी साध्या पद्धतीने काही प्रमाणात शेळीपालन होतेच. त्यातील चांगल्या पाच शेळ्या व एक बोकड निवडला. शेड उभारणीसाठी फार खर्च न करता घरी असलेल्या साहित्याचाच वापर केला. छतासाठी मेणकापडाचा वापर केला. हळूहळू व्यवसायात सातत्य ठेवत आजमितीला २५ शेळ्या व दोन बोकडांचे संगोपन करण्यापर्यंत निवृत्तीराव पोचले आहेत.

प्रशिक्षणाचा झाला फायदा

केव्हीकेतर्फे अर्धबंदिस्त शेळीपालन प्रशिक्षणात सहभाग घेतल्याचा फायदा निवृत्तीरावांना झाला. आजार, लसीकरण याची माहिती मिळाली. त्यामुळे पूर्वी होत असलेले मरतुकीचे प्रमाण घटले. सुरवातीला पाटी घरीच ठेवण्याचा व बोकड विकून उत्पन्न मिळवण्याचा निर्णय घेतला. सन २०१७ मध्ये त्यांच्याकडे १५ शेळ्या होत्या. त्या पुढील वर्षी ही संख्या २२ वर गेली. दहा बोकड त्यावेळी विकता आले. असे करीत २०२१ शेळ्यांची संख्या ४४ वर पोचली. एक नर विक्रीमागे पाचहजार रुपये मिळतात. तर बकरीईद सणासाठी बोकडाला सुमारे २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रत्येक वर्षी दोन ते तीन बोकड विकणे शक्य होते. निवृत्तीराव यंदा या सणासाठी पाच बोकड विक्रीसाठी तयार करीत आहेत. रामनगर जालना बाजारात विक्री होते. वर्षाकाठी खर्च वजा जाता एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न त्यांच्या पदरात पडते आहे. शेती व कुटुंबाचे अर्थकारण चांगल्या प्रकारे सुधारण्यापर्यंत उत्पन्न गेल्या सहा वर्षांत मिळाले आहे. आज याच उत्पन्नातून मुलांना चांगले शिक्षण देता आले.कमी भांडवलात हमखास उत्पन्न देणारा हा उत्तम व्यवसाय त्यांच्यासाठी ठरला आहे.

शेतीतही विविध प्रयोग निवृत्तीराव कपाशी पिकातील अभ्यासू शेतकरी म्हणून ओळखले जातात. कोरडवाहू जमिनीत कापसाचे सातत्यपूर्ण उत्पादन घेण्यात त्यांनी हातखंडा तयार केला. मात्र अलीकडे काळाची गरज ओळखून कपाशीचे क्षेत्र कमी करून संकरित भाजीपाला बीजोत्पादनाकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. जवळपास अडीच एकरांवर भोपळा, कारले, दोडका आदींचे बीजोत्पादन ते घेतात. द्राक्ष पीकही त्यांनी घेऊन पाहिले. शेळीपालनातून शेतीसाठी अत्यंत उपयुक्त लेंडीखताची सुमारे सहा ट्रॉलीपर्यंत दरवर्षी उपलब्धता होते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासह रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे, उत्पादन खर्चात बचत करणे व सोबत पीक जोमदार राहून उत्पादनही चांगले येत असल्याचा अनुभव आहे.

संपर्क- निवृत्ती घुले- ९९२३३८९५८४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com