गडहिंग्लज भागात शेळीपालनातील ‘स्टार्ट अप’

आपल्या बेकरी व्यवसायात स्पर्धा तयार झाली असताना भडगाव (जि. कोल्हापूर) येथील चंद्रकांत खैरे यांनी पर्यायी उत्पन्नाची व्यवस्था म्हणून तीन वर्षांपूर्वी शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली. सध्या ५८ पर्यंत शेळींची संख्या पोहोचलेला हा त्यांचा स्टार्ट अप म्हणावा लागेल. शेडची रचना, विविध सुविधा, व्यवस्थापन या बाबी चांगल्या प्रकारे ठेवल्या असून, वर्षाला पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून खैरे यांनी कामकाज पद्धत आखली आहे.
गडहिंग्लज भागात शेळीपालनातील ‘स्टार्ट अप’
Goat FarmingAgrowon

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज या मुख्य शहरापासून चार किलोमीटरवर भडगाव आहे. नदीकाठी गाव असल्याने ऊस व मका ही इथली प्रमुख पिके आहेत. याच गावातील अल्पभूधारक शेतकरी चंद्रकांत खैरे यांची पावणेदोन एकर शेती आहे. मात्र त्यातून सक्षम होण्याइतके उत्पन्न मिळत नाही. अनेक वर्षांपासून ते बेकरी व्यवसायातील वितरक म्हणूनही काम पाहतात. मात्र या व्यवसायातही स्पर्धा निर्माण झाल्याने उत्पन्नाच्या पर्यायी साधनाच्या शोधात खैरे होते. विचारांती शेळीपालन व्यवसाय त्यांना योग्य वाटला. मुलगा सुमितचीही त्यांना साथ मिळाली.

व्यवसाय उभारणी

सर्व अभ्यास करून तीन वर्षांपूर्वी पाच शेळ्यांपासून व्यवसाय सुरू केला. सिरोही व पंजाब बीटल हे ब्रीड त्यासाठी निवडले. व्यवसायातील धोके स्वीकारत, प्रसंगी नुकसान सोसत व संयम राखत आज लहान-मोठी मिळून शेळ्यांची संख्या ८५ पर्यंत पोहोचली आहे. बंदिस्त शेडचे क्षेत्रफळ ५७ बाय ३० फूट, तर खुले शेड १०० बाय ३० फूट आकाराचे आहे. शेड व त्याचे फाउंडेशन उभारण्यासाठी १२ लाख रुपयांचा खर्च आला. आजमितीला शेड, शेळ्यांची खरेदी व अन्य मिळून एकूण भांडवल गुंतवणूक २३ लाखांवर गेली आहे.

केलेल्या सुविधाकेलेल्या सुविधा

-थंडीवेळी शेडभोवती पडद्यांचे आच्छादन

-पिलांसाठी हीटरची सोय, बल्बच्या साह्याने तापमान गरम ठेवण्याचा प्रयत्न.

-पिण्याच्या पाण्यासाठी बकेटचा वापर

-केबिन व्यवस्था. पिल्ले व मोठ्या शेळ्यांसाठी स्वतंत्र कप्पे. बसण्यासाठी लाकडी आसने.

-व्यवस्थापन बाबींची दैनंदिन नोंद.

-थंडीवेळी शेडभोवती पडद्यांचे आच्छादन

-पिलांसाठी हीटरची सोय, बल्बच्या साह्याने तापमान गरम ठेवण्याचा प्रयत्न.

-पिण्याच्या पाण्यासाठी बकेटचा वापर

-केबिन व्यवस्था. पिल्ले व मोठ्या शेळ्यांसाठी स्वतंत्र कप्पे. बसण्यासाठी लाकडी आसने.

-व्यवस्थापन बाबींची दैनंदिन नोंद.

व्यवस्थापन

१) सकाळी सहा वाजता शेड स्वच्छ केले जातो. सकाळी आठ वाजता प्रत्येक शेळीला तुरीचा भुस्सा एक किलो दिला जातो. सकाळी दहा वाजता मका, गवत आदी ओला चारा, दुपारी मुरघास, सायंकाळी खुराक म्हणून मका, गहू, सोयाबीन भरडा दिला जातो. तीन महिन्यांतून एकदा जंतुनाशक औषधे दिली जातात. लाळ्या खुरकुत वा पीपीआर रोगासाठी वर्षातून तीनदा लसीकरण केले जाते. शेळ्यांच्या चांगल्या वाढीसाठी चाऱ्यात वैविध्य व आपल्या शेतीत तो बारमाही राहण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने चारापिकांची लागवड होते.

२) चांगल्या जातीच्या शेळ्यांची पैदास व जातिवंत नराची उपलब्धता हे सूत्र स्वीकारले. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली. सध्या बीटल जातीचा ७५ किलोचा तर सिरोही जातीचा ८५ किलोचा नर उपलब्ध आहे. प्रत्येक शेळीच्या गर्भधारणेच्या तारखांची नोंद असल्याने कोणत्या वेळी पिले जन्माला येणार याचा अंदाज येतो. त्यानुसार विक्रीचेही नियोजन केले जाते.

पैदाशीसाठी विक्री

सध्या पैदाशीसाठी म्हणूनच तीन ते चार महिने वयाच्या नर व मादी पिलांची विक्री केली जाते. प्रति किलो एक हजार रुपये किंवा प्रति नग १५ हजार ते १८ हजार रुपये दर आहे. गेल्या वर्षापासून उत्पन्नास सुरुवात झाली आहे. ग्राहकांसोबत संपर्कही वाढत निघाल्याने विक्री सुकर होत आहे. वर्षभरात सुमारे वीसपर्यंत शेळ्यांची विक्री झाली आहे. खर्च वजा जाता १५ टक्क्यांपर्यंत नफा मिळाला आहे. दरवर्षी पाच लाख रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवून त्यादृष्टीने व्यवसायाची दिशा ठेवली आहे. वर्षाला दहा ट्रॉली लेंडीखत उपलब्ध होते. ते शेतातच वापरले जाते. त्यामुळे शेतीची प्रत चांगली राहून उत्कृष्ट चारा तयार होतो. जास्त प्रमाणात लेंडीखत उपलब्ध होऊ लागल्यानंतर त्याच्याही विक्रीचे नियोजन आहे

बोकड विक्रीचे प्रयत्न

बकरी ईदसारख्या सणांचे उद्दिष्ट ठेऊन बोकडांच्या विक्रीचे पुढील नियोजन आहे. मुंबई व गोवा मार्केट त्यासाठी गृहीत धरले आहे. या भागात एक- दोन बोकडांऐवजी किमान दहा बोकडांची मागणी एकत्रित नोंदवली जाते. एकदमच त्यांची खरेदी होते. हे लक्षात घेऊन या कालावधीत जास्तीत जास्त संख्येने बोकड तयार व्हावेत असे नियोजन आहे. काही व्यावसायिक शेळीपालन व्यवसाय सुरू करताना शेळ्यांची संख्या आणि विक्री यावरच नफा तोट्याचे गुणोत्तर ठरवतात. प्रत्यक्षात मात्र अनेक अडचणींमुळे हे सूत्र फक्त कागदावरच राहते व व्यवसाय तोट्यात जातो. या भागातील शेतकऱ्यांना असाच अनुभव असल्याने काहींनी हा व्यवसाय बंद केला. रोग व अनाहूत संकटांमुळे शेळ्यांची मर होते. यामुळे अनपेक्षित नुकसान होते. नियोजन केल्यास ते कमी होऊन व्यवसाय फायद्यात येऊ शकतो असे खैरे म्हणतात. व्यवसाय सुरू केल्यापासून पहिली दोन वर्षे नफा गृहीत धरता कामा नये असे सूत्र त्यांनी स्वीकारले आहे. आता परराज्यांतील बाजारपेठाही ते शोधत आहेत.

संपर्क ः चंद्रकांत खैरे, ९५४५९०३५३०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.