Rose Farming : गुलाबशेतीतून जीवनात आनंदाचा बहर

नाशिक शहरालगत तपोवन परिसरात सचिन व धीरज या जेजुरकर बंधूंनी बारा वर्षांपासून गुलाबशेतीत सातत्य ठेवले आहे. तांत्रिक अभ्यास, व्हॅलेंटाइन डेसह बाजारपेठेतील वर्षभराच्या मागणीनुसार वाणांची निवड व गुणवत्तापूर्ण उत्पादन ही त्यांच्या शेतीची वैशिष्ट्ये आहेत.
Rose Farming
Rose FarmingAgrowon

Nashik Rose Farming : नाशिक शहरालगत तपोवन परिसरात सचिन व धीरज या जेजुरकर बंधूंचे एकत्रित कुटुंब राहते. सन १९८० च्या काळात कुटुंबातील रमेश व धनंजय ही पहिल्या पिढीतील भावंडे द्राक्षशेती (Grape Farming) करायची.सन १९९४ साली धनंजय यांचे निधन झाले.

त्यानंतर रमेश यांचा थोरला मुलगा सचिन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून शेती पाहू लागला. सन १९९७ मध्ये द्राक्षशेती थांबवून ते वेलवर्गीय पिकांचे उत्पादन घेऊ लागले. पुढे त्यात बदल करून शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, काकडी घेण्यास सुरवात झाली.

त्यावेळी जानोरी, मोहाडी भागात पॉली हाऊसमध्ये (Polly House) गुलाबशेती (Flower Farming) विस्तारत होती. दरम्यान सचिन यांच्या सोबतीला चुलतभाऊ धीरज हे देखील पदवीचे शिक्षण पूर्ण करून शेतीत उतरले. दोघांनी मिळून २०११ च्या दरम्यान पॉलीहाऊसमधील गुलाबशेतीचा अभ्यास सुरू केला.

मित्रांकडून मार्गदर्शन घेत लागवडीचा निर्णय घेतला. बँकेकडून अर्थसाहाय्य घेत २० लाखांची गुंतवणूक केली. सर्व प्रयत्नांतून २० गुंठ्यावर पॉलीहाऊसची उभारणी केली. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून ३० टक्के अनुदान मिळाले.

Rose Farming
Rose Export : वाहतूक दर, ‘जीएसटी’मुळे गुलाब निर्यातीत अडचणी

वाण निवडीला प्राधान्य

गुलाबाच्या ‘बोर्डेक्स' वाणाची रोपे तळेगाव दाभाडे (पुणे) येथून उपलब्ध केली. साडेचार फुटी बेडवर शेणखत भरून लागवड पूर्ण केली. प्रयोगशील गुलाब उत्पादकांच्या भेटी घेऊन उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान अवगत केले. टप्प्याटप्प्याने यश मिळू लागले.

'टॉप सिक्रेट' वाणाला दोन ते तीन रुपये अधिक दर मिळतो हे कळले. त्यानंतर जुना वाण बदलून आकर्षक, फुलांची दांडी आकाराने चांगली व बाजारात मागणी असलेल्या 'टॉप सिक्रेट' वाणाची लागवड (२०१६) केली.

सन २०२१ मध्ये पुन्हा वाण बदल करत नव्या 'नटल' वाणाची लागवड केली. यात सफेद, गुलाबी, पिवळा, बेबी पिंक असे पर्याय मिळाले आहे. या वाणाची मागणीही चांगली आहे.

Rose Farming
Rose Processing : गुलाब प्रक्रियेला चांगली संधी

गुणवत्ता पाळली

दिल्ली, जयपूर, बंगळूर, कोलकता अशा बाजारपेठा उपलब्ध होत्या. मात्र खात्रीशीर बाजारपेठेचा शोध घेतला. वाहतूक व पुरवठ्यासाठी दादर (मुंबई) ही बाजारपेठ जवळची वाटली. व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

मागणीनुसार पुरवठा होऊ लागल्याने त्यांच्यासोबतचा स्नेह वाढत गेला. फुलाचा रंग, आकार, दांड्याची लांबी, निरोगी हिरवी पाने या बाबींवर मागणी टिकून असतो.

हे तांत्रिक निकष पाळून त्या गुणवत्तेची फुले उत्पादित होण्याचा प्रयत्न केला. माल पाठविल्यानंतर दर कळतात हे सूत्र समजल्यावर अचूक कामकाजावर भर दिला.

गुलाब शेतीचे व्यवस्थापन

-एकूण शेती- ३ एकर. पैकी नांदूर व तपोवन परिसरात मिळून प्रत्येकी २० गुंठ्याची तीन अशी ६० गुंठ्यात पॉलीहाऊसेस. त्यात टॉप सिक्रेट ४० गुंठे तर नटल २० गुंठे.

-सीसीटिव्हीची सुविधा.

-बेडवर डबल लॅटरल ठिबक सिंचन. दररोज सकाळी २० मिनिटे प्रति झाड ८०० मिली पाणी

-एक विहीर, बोअरवेल व ५० हजार लिटर पाणी टाकी असा संरक्षित पाणीसाठा.

-माती- पाणी परीक्षणाद्वारे संतुलित खते. .

-वर्षातून दोन वेळा दर सहा महिन्यांनी २० गुंठ्यासाठी दोन ट्रॅक्टर शेणखत.

-मातीतील बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी प्रति २० गुंठ्यासाठी एक हजार किलो मात्रेत वर्षातून एकदा निंबोळी पेंडीचा वापर. महिन्यातून एकदा जीवामृत. विद्राव्य व जैविक खतांचाही वापर.

-उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी पॉलिहाऊस पेपरवर चुन्याची फवारणी. दर चार वर्षानंतर नवे आच्छादन.

-फूल काढणीच्या अनुषंगाने कळी अवस्थेत ‘बडकॅप’चा वापर.

-एकाच काडीवरील अधिक कळ्या कमी करून मर्यादित फुले.

-छाटणीद्वारे अनावश्यक काड्यांची काढणी

-सकाळी ९ ते १२ दरम्यान थंड वातावरणात काढणी.

-दांड्याच्या २०, ३०, ५० व ६० सेंमी लांबीनुसार फुलांचे चार आकारात वर्गीकरण,

-प्रति २० फुलांचे बंडल. कोरूगेटेड बॉक्समध्ये ४० ते ५० बंडल्स.

-१२ बाय १२ फूट आकाराच्या शीतगृहाची उभारणी.

बाजारपेठ, विक्री

-वर्षभर मुंबई, दिल्ली व स्थानिक नाशिक येथे बाजारपेठ. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, लग्नसराई, व्हॅलेंटाइन डे व अन्य सण-उत्सव हा मागणीचा प्रमुख काळ.

-वर्षभरातील अन्य काळात दर पडतात. पितृपक्षात मागणी व दरही कमी असतात.

-उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी गुणवत्तापूर्ण फूल उत्पादन वाढवण्यासह नवीन बाजारपेठांचा शोध घेतला.

-तीनही पॉलीहाऊस मधून वर्षभरात साडेसात लाखांपर्यंत फुलांची विक्री

-'समृद्धी' नावाने रंगीत तर 'आराध्या' नावाने लाल फुलांचे ब्रॅण्डिंग.

फुलांच्या रंगानुसार मार्केट

लाल रंग- व्हॅलेंटाइन डे, लग्न सराई

पांढरा रंग- नाताळ

पिवळी, गुलाबी फुले- लग्न सराई, वर्षभर पुष्पगुच्छ

Rose Farming
Rose Prunning : गुलाब छाटणीचे प्रकार आणि नियोजन

व्हॅलेंटाइन डे साठी नियोजन

दरवर्षी व्हॅलेंटाइन डे’ साठी विशेष पूर्वतयारी केली जाते. त्यातून ४० हजार ते ५० हजार फूल उत्पादनाचे नियोजन असते. यंदाही तेवढी फुले देशांतर्गत मार्केटला पाठवली. त्यासाठी १ ते १५ डिसेंबर दरम्यान बहार छाटणी घेतली जाते.

पुढील ४५ दिवसांनंतर फुले काढणीयोग्य होतात. एक ते १२ फेब्रुवारी दरम्यान दिवसभर १२ हजार फुलांची काढणी होते. प्रति फूल १० ते १५ रुपये दर मिळतो. वर्षभराचा दर ७ ते ८ रुपये व किमान दर तीन रुपयांदरम्यान मिळतो.

गुलाबाने फुलवले कुटुंबाचे आयुष्य

शेतीत सचिन व धीरज यांना त्यांच्या पत्नी अनुक्रमे शीतल व त्रिवेणी यांची मदत होते. चार कायमस्वरूपी मजूर आहेत. फुले काढणीसाठी त्यांना हातमोजे, कात्री, दांडा कापणी यंत्र पुरविले आहे.

सचिन यांचे वडील रमेश, आई नंदा, धीरज यांची आई वत्सला यांचे मार्गदर्शन मिळते.जितके कष्ट अधिक तितके यश अधिक असा विचार अंगीकारला. कोरोना सारख्या संकटकाळात अडचणी आल्या. मात्र एकी व सातत्यातून यशस्वी होत हे कुटुंब फूलशेतीत टिकून राहिले आहे.

संपर्क: धीरज जेजूरकर- ९९२१११८७१४, सचिन जेजूरकर- ९३२६३५२४६९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com