सोयाबीन उत्पादनातील आदर्श शेतकरी

नवे वाण, विविध लागवड पद्धती, व्यवस्थापनात सुधारणा या जोरावर अकोला जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी हेक्टरी ३५ ते ४० क्विंटलपर्यंत सोयाबीनची (Soybean) उत्पादकता मिळवली आहे.
Soybean
SoybeanAgrowon

सोनाळा (ता. जि. अकोला) येथील मनोहर व विजय या शेगोकार पितापुत्रांनी राज्यासाठी आदर्श ठरू शकेल असे सोयाबीन (Soybean) पिकात नाव कमावले आहे. शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, सुधारित नवे वाण, शास्त्रीय व्यवस्थापन, बियाण्याची सर्वोत्तम गुणवत्ता व एकरी १४ ते १७ क्विंटल उत्पादकता अशी वैशिष्ट्ये त्यांनी सोयाबीन शेतीत जपली आहेत.

नवे वाण, विविध लागवड पद्धती, व्यवस्थापनात सुधारणा या जोरावर अकोला जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी हेक्टरी ३५ ते ४० क्विंटलपर्यंत सोयाबीनची (Soybean) उत्पादकता मिळवली आहे. बियाणे वापर, लागवड पद्धत, किडी-रोगांचे व्यवस्थापन आदी पातळ्यांवर उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढीवर जोर देण्यात येत आहे.

सोनाळा (ता. जि. अकोला) येथील मनोहर व विजय हे शेगोकार पितापुत्र त्यापैकीच एक असून सोयाबीन शेतीत राज्याला आदर्श ठरेल असे नाव त्यांनी मिळवले आहे. विजय ‘एमएस्सी ॲग्री’ असल्याने त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा शेतीत उपयोग होत आहे. सोयाबीनचे नवनवे वाण विविध कृषी विद्यापीठांमधून उपलब्ध करून उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अलीकडील काळात दरवर्षी २० ते २२ एकर त्यांचे सोयाबीन (Soybean) असते.

व्यवस्थापनातील बाबी

-कुजवलेल्या शेणखताचा एकरी सुमारे १० बैलगाड्यांचा वापर. त्यानंतर मशागत करून पेरणीची तयारी.
-रासायनिक व जैविक अशा दोन्ही पद्धतींची बीजप्रक्रिया. त्यामुळे पीक जोमदार उगवते. किडींना पहिल्या टप्प्यात प्रतिबंध घालता येतो.
-वाण- सुमारे चार वर्षांपासून फुले संगम, अलीकडे फुले किमया, तर मागील वर्षी पीडीकेव्ही अंबा (दोन एकरांत प्रयोग.
-शेतकरी एकरी २५ ते ३० किलो बियाणे वापर करतात. शेगोकार मात्र मजुरांकरवी टोकण पद्धतीने दोन फूट बाय १० सेंटिमीटर अंतरावर लावण करतात. त्यामुळे एकरी १० किलो एवढ्याच माफक प्रमाणात बियाण्याचा वापर. त्यावरील खर्चातही मोठी बचत. (हंगामात सुरुवातीलाच एकरी दीड ते दोन हजार रुपये खर्च कमी). ट्रॅक्टरचलित टोकण यंत्राचा वापर केल्यास हाच वापर २० किलोपर्यंत.
-हेक्टरी ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ३० किलो पालाश. गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक. हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट १० किलो बोरॅक्स.

-टोकणणीनंतर १५ दिवसांनी खोडमाशी व पाने खाणाऱ्या अळ्यांपासून संरक्षणासाठी फ्लुबेंडियाएमाईडची फवारणी. तर २५ ते ३० दिवसानंतर पानावरील ठिपके नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइडची फवारणी. पांढऱ्या माशीचा अटकाव करण्यासाठी एकरी सात पिवळे चिकट सापळे. तर अळ्यांच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे.
-तांबेरा नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइडचा वापर. ७० ते ७५ दिवसानंतर शेंगेवरील करपा नियंत्रण तसेच बियाण्याची प्रत सुधारण्यासाठी शेवटची फवारणी.
-वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी. (१९:१९:१९, ०:५२:३४, १३:०:४५)
-फांद्या वाढीसाठी जिबरेलिक ॲसिड.
-ओलिताची व्यवस्था उपलब्ध असल्याने फुलोरा व शेंगेत दाणे भरायच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्यास संरक्षित सिंचन.

उत्पादन (क्विंटल प्रति एकर)
वर्ष उत्पादन
२०१८-१९ १३ ते १४
२०१९-२० १४ ते १६
२०२०-२१ १५ ते १७
-मागील वर्षी फुले संगम वाणाचे १०० चौरस मीटरला ५१ क्विंटल (एकरी २० क्विंटल) उत्पादन.
जिल्हा पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक.
-मागील वर्षी पीडीकेव्ही अंबा- एकरी साडे १२ क्विंटल.

बियाणे म्हणूनच विक्री
कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्रातर्फे विकसित नवनवीन वाणांची लागवड शेगोकार करतात.
तीन-चार वर्षांपासून बियाणे म्हणून विक्री होते. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील व छत्तीसगडपर्यंतचे शेतकरी त्यांच्याकडून बियाणे घेतात. प्रति किलो १०० ते ११० रुपये एवढाच माफक दर असतो.

बियाणे प्रक्रिया
यंत्राद्वारे ३५०-४०० पर्यंत ‘आरपीएम’ ठेवून मळणी होते. तयार सोयाबीनची ‘स्पायरल सेपरेटर’ यंत्राद्वारे व मजुरांकडून स्वच्छता होते. गोदामामध्ये कोरड्या जागेत साठवणूक होते. विक्रीपूर्वी उगवणशक्ती तपासली जाते.

मार्गदर्शन
काही वर्षांपूर्वी शेगोकार यांची सोयाबीन उत्पादकता सात ते ८ क्विंटल होती. आता आठ ते दहा क्विंटलने वाढ करण्यापर्यंत मजल गाठली आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळाले आहे. यात डॉ. मिलिंद देशमुख, डॉ. सतीश निचळ, डॉ. मिलिंद गिरी, कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) कुलदीप देशमुख, डॉ. चारुदत्त ठिपसे आदींचा समावेश आहे. आता शेगोकार पितापुत्रही अन्य शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक झाले आहेत.

सोयाबीनची उत्पादकता वाण, त्या हंगामातील हवामान, व्यवस्थापन आदी बाबींवर अवलंबून असते. आपल्याकडे सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता २० ते २५ क्विंटलपर्यंत आहे. चांगले व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळू शकते.

-डॉ. सतीश निचळ, सोयाबीन पैदासकार, पंदेकृवि प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती

संपर्क ः विजय शेगोकार, ८८८८७५७५७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com