Nagali Production : सुधारित पद्धतींमुळे नागलीमध्ये उत्पादनवाढ

नाशिक येथील ‘प्रगती अभियान’ या स्वयंसेवी संस्थेने आदिवासी विकास विभागाच्या पाठबळाने गेल्या चार वर्षांपासून नाशिक, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात आदिवासी नागली विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. उच्च पोषणमूल्य असलेल्या स्थानिक नागली जातींचे संवर्धन, प्रसार आणि उत्पादनवाढीसाठी सुधारित तंत्रज्ञानाच्या अवलंबनावर भर दिला आहे. त्याचा फायदा नागली उत्पादकांना होत आहे.
Nagali Production : सुधारित पद्धतींमुळे नागलीमध्ये उत्पादनवाढ

अधिक कष्ट घेऊनही अपेक्षित नागली उत्पादन (Nagali Production) हाती येत नसल्याने शेतकरी या पिकाची लागवड (Nagali Cultivation) मर्यादित क्षेत्रावर करत आहेत. मात्र मानवी आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्त असलेल्या नागली पिकाच्या लागवडीला सुधारित पद्धतीची जोड देण्यासाठी २०१६ साली नाशिक येथील प्रगती अभियान संस्थेने पुढाकार घेतला. यास पुढे राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे पाठबळ मिळाले. संस्थेतील सदस्यांनी ‘ रीवायटलायझिंग रेनफेड ॲग्रिकल्चर नेटवर्क’ आणि ‘ओदिशा मिलेट मिशन'च्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेत सुधारित नागली लागवडीबाबत प्रशिक्षण घेतले. ‘पेरणी ते कापणी’ अशी सर्व कामे सुधारित पद्धतीने करण्याचे प्रयोजन करून पिकाच्या प्रत्येक अवस्थेत तंत्र विकसित करून २०१७ पासून त्याचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये करण्यास सुरवात केली. वर्षानुवर्षे संवर्धित केलेले बियाणे वापरून स्थानिक नैसर्गिक स्रोतांच्या आधारे कामकाज अनुकूल होईल,असे नियोजन त्यामध्ये आहे. त्यानुसार नागली उत्पादकांना संघटित करून प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील काही शेतकरी आता ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून परिसरातील शेतकऱ्यांच्यामध्ये सुधारित नागली लागवड तंत्राचा विस्तार करत आहेत.

Nagali Production : सुधारित पद्धतींमुळे नागलीमध्ये उत्पादनवाढ
उन्हाळ पिकांत मुगाला पसंती; बाजरी, उडदाचे क्षेत्रही वाढले

तंत्रज्ञान प्रसार ः

सुरवातीला मोजके शेतकरी होते. गेल्या चार वर्षात उत्पादन वाढ झाल्याने तीन हजाराहून अधिक शेतकरी या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. या प्रकल्पाचा विस्तार ३ जिल्हे आणि ७ तालुक्यात झाला आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास अभियानच्या मदतीने प्रगती अभियान या संस्थेने तंत्रज्ञान प्रसाराला चालना दिली आहे. कृषी विस्ताराला विभागाच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. यासह कृषी, आत्मा, महाबीज देखील तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमात वेळोवेळी सहभागी झाले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या कळवण, नाशिक, मोखाडा व शहापूर या प्रकल्प कार्यालयांतर्गत शेतकरी मेळावे घेऊन सुधारित पद्धतीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

तीन जिल्ह्यात विस्तार:

जिल्हा...तालुका(कंसात गाव संख्या)

नाशिक...सुरगाणा(८),पेठ(१०),त्र्यंबकेश्वर(११),कळवण(११)

ठाणे...शहापूर(११)

पालघर...मोखाडा(११)

उत्पादनवाढीसाठी व्यवस्थापनातील प्रमुख मुद्दे:

-पारंपारिक पद्धतीने जमीन भाजून राब न करता रोपनिर्मितीसाठी गादीवाफ्याची निर्मिती.

- बीजामृत तयार करून संवर्धित बियाण्यांवर पेरणीपूर्व बीजप्रक्रिया.

- गादी वाफ्यावर एका सरळ रेषेत पेरणी.

- सशक्त १५ ते ३० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करताना अंतर निश्चित करून एका दोरीत पुनर्लागवड.

- पुनर्लागवड पश्चात दर पंधरा दिवसांनी तणनियंत्रणासाठी तीनवेळा निंदणी, खुरपणी.

- रोपांच्या वाढीच्या अवस्थेत कीड,रोग नियत्रंणासाठी सेंद्रिय कीडनाशकांचा वापर.

- पीक पोषणासाठी जीवामृत, मडका खताचा वापर.

- ५ बाय ५ फूट जागेत पीक कापणीचे शास्त्रीय पद्धतीने प्रयोग.

- कापणी दरम्यान दाणेदार, भरीव नागली गोंडे बाजूला काढून बियाणे संकलन.

Nagali Production : सुधारित पद्धतींमुळे नागलीमध्ये उत्पादनवाढ
बाजरी, ज्वारी, गहू स्थिर, हरभरा हमी दराच्या आतच

कामकाजाचे टप्पे:

गादीवाफा निर्मिती:

पावसाळ्याअगोदर जमिनीची खोल नांगरट केली जाते. कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केली जाते. तयार केलेल्या जमिनीवर १ मीटर रुंद, ३ मीटर लांब आणि १५ सेंमी उंच गादीवाफा तयार करण्यात येतो. तयार गादीवाफ्यात २ घमेले शेणखत किंवा गांडूळखत आणि ५० ग्रॅम मिश्र खत मिसळले जाते.

२. बीजप्रक्रिया:

बियाणे गादीवाफ्यावर टाकण्यापूर्वी बीजप्रक्रिया केली जाते. यामुळे रोगाचे नियंत्रण मिळते. नागली बियाणास बिजामृताची प्रक्रिया केली जाते.

स्थानिक पातळीवर नैसर्गिक स्रोत वापरून निविष्ठा निर्मिती:

बीजामृत निर्मिती ः

१) पाच किलो गायीचे शेण कापडात बांधून २० लिटर पाणी असलेल्या बादलीत १२ तास बुडवून ठेवले जाते. दुसऱ्या बादलीत ५० ग्रॅम चुना एक लिटर पाण्यात मिसळून रात्रभर ठेवला जातो.

२) दुसऱ्या दिवशी कापडातील शेणाचा अर्क बादलीमध्ये पिळून घेतला जातो. शेणअर्क असलेल्या पाण्यात मुठभर माती मिसळली जाते. तसेच ५ लिटर गोमूत्र आणि तयार केलेले चुन्याचे द्रावण एकत्रित मिसळले जाते.

३) असे तयार झालेले ५० मिलि द्रावण एक किलो बियाण्याला व्यवस्थित एकसारखे चोळले जाते. त्यांनतर हे बियाणे वाळल्यानंतर गादी वाफ्यावर एकसारखे पसरवले जाते.

जीवामृत निर्मिती:

१) वीस लिटर पाण्यामध्ये एक किलो शेण आणि अर्धा लिटर गोमूत्र एकत्र करावे. त्यात २०० ग्रॅम गूळ, २०० ग्रॅम डाळीचे पीठ आणि १ मूठ वारूळ किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती मिसळून जीवामृत द्रावण तयार केले जाते. हे द्रावण ४८ तास सावलीत ठेवतात. साधारणपणे ३ ते ४ वेळा हे द्रावण हलवून घेतले जाते.

२) २४ तासानंतर हे द्रावण वापरण्यास योग्य होते. तयार द्रावण थेट पाण्यातून दिले जाते किंवा १० लिटर पाण्यात १ लिटर गाळलेले द्रावण मिसळून फवारणी केली जाते.

३.मडका खत निर्मिती:

१) १० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, अर्धा किलो गूळ, अर्धा किलो बेसन पीठ घ्यावे. कडुनिंब, करंज आणि रुई असा प्रत्येकी १ किलो पाला एकसारखा कापावा. एका मडक्यात शेण, गोमूत्र, गूळ आणि कापलेला पाला एकत्रित करावा.

२) हे मडके हवाबंद करून ८ दिवस ठेवले जाते. दर दोन दिवसांनी यातील मिश्रण हलवावे.

३) दहा दिवसानंतर यातून १० लिटर मडका खत मिळते.

४) फवारणीसाठी १४ लिटर पाण्यात १ लिटर मडका खत मिसळावे. एकरी दहा पंप लागतात.

पीक पोषण, कीड नियंत्रणासाठी हे खत फायदेशीर आहे.

पुनर्लागवड पद्धती:

पूर्वी नागली बियाणे फोकून जमिनीवर रोपनिर्मिती केली जायची. रोपे लागवडीयोग्य झाल्यानंतर पावसाच्या ओलीतावर शेतकरी लागवड पूर्ण करायचे. मात्र आता पुनर्लागवड करताना रोपे जीवामृतामध्ये बुडवून घेतली जातात. एका ओळीत रोपे खोचून लागवड केल्यानंतर आर्द्रता टिकून राहते. त्यामुळे पावसाचा खंड पडल्यानंतर रोपांची मरतूक होण्याचे प्रमाण कमी झाले. रोपांची संख्या टिकून राहत असल्याने उत्पादनावर परिणाम होत नाही. याशिवाय रोपांवर कीड,रोगांचा होणारा प्रादुर्भाव कमी होतो. फुटव्यांची संख्या वाढते. तसेच श्रम व वेळात बचत होते.

लागवड अंतर(सेंमी):

रोप स्थिती...दोन ओळीतील अंतर...ओळीतील रोपांचे अंतर

१५ दिवसांचे रोप...२५...२५

२० दिवसांचे रोप...२०...१०

३० दिवसांचे रोप...१०...१०

पीक व्यवस्थापन ः

-रोप वाढीच्या अवस्थेत कीड, रोगांचा प्रादुर्भाव निदर्शनास येताच वेळीच नियंत्रण.

-लागवडीपश्चात दर आठवड्याला पाहणी करून रोपांवर कीड,रोगांचा प्रादुर्भाव दिसताच सेंद्रिय कीडनाशकांची फवारणी.

- पिकावर गरजेनुसार जीवामृत तसेच निंबोळी अर्काची फवारणी.

- रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने निंदणी. तणनाशकाचा वापर नाही.

- निंदणीसाठी सायकल कोळप्याचा वापर. यामुळे वेळ, श्रमाची बचत होऊन कार्यक्षमता वाढ.

विद्युत मळणी यंत्रामुळे कामकाज सुलभ ः

पूर्वी नागली मळणीसाठी अधिक कष्ट लागायचे. याशिवाय मळणीपश्चात धान्य स्वच्छ करण्यास अडचणी येत होते. हे लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने पीक कापणी पद्धती रुजवण्यात आली. पीक काढणीपश्चात मळणी करण्यासाठी विद्युतचलित मळणी यंत्रे लुधियाना(पंजाब) आणि कोईम्बतूर(तमिळनाडू) येथून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

बियाणे निवड, साठवणूक:

शेतकऱ्यांनी अनेक पिढ्यांपासून चालत आलेले नागली बियाणे संवर्धित केले आहे. याच बियाण्यांपासून रोपे बनवून लागवड केली जाते. पीक कापणीला आल्यानंतर मोठे दाणेदार व भरीव गोंडे निवडून वेगळे काढले जातात. ते दुपारच्या कडक उन्हात वाळवून, हवाबंद पिशवीत साठवून ठेवले जाते. त्यामुळे बियाणे संवर्धनाला चालना मिळाली आहे.

झालेले फायदे :

-शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण लागवड पद्धती आत्मसात केल्यामुळे उत्पादन वाढ शक्य.

- पारंपारिक पीक पद्धतीच्या तुलनेत श्रम कमी.

- सुधारित पीक पद्धतीचा प्रचार, प्रसार.

- यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांच्या कार्यक्षमता सुधारणा.

-नागली मूल्यांचा प्रसार होऊन स्थानिक शेतकऱ्यांकडून मागणीत वाढ.

-पारंपारिक भाकरीसोबतच मूल्यवर्धित उत्पादनांकडे वाढता कल.

प्रक्रिया उद्योग वाढीसाठी पुढाकर:

संस्थेच्या माध्यमातून नागली मूल्यवर्धनाच्या अनुषंगाने अभ्यास करून विविध पाककृती बनविण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिला, महिला शेतकरी यांना नागली लाडू, उपमा,खीर,पेज, बर्फी आदी पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच या पदार्थांचा आहारातील वापर वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

संपर्क ः अश्विनी कुलकर्णी, ९८२३२८१२४६

‘‘आदिवासी शेतकऱ्यांनी नागली उत्पादनवाढ साधली आहे. आता घरच्या गरजेपुरती नागली पुरेशी झाली हा विचार न करता प्रक्रिया करून विक्रीयोग्य बनवणे हा उद्देश आहे. नागलीचा उपयोग आहारात वेगवेगळ्या पद्धतीने वाढवून कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करता येऊ शकेल, याचा आम्ही प्रसार करत आहोत.‘‘
अश्विनी कुलकर्णी, (कार्यकारी संचालक-प्रगती अभियान)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com