वैविध्य, उद्यमशीलतेतूत शेतीतील वाढवला नफा

फळपिके, भाजीपाला पिके, सेंद्रिय हळद, त्याची पावडर निर्मिती, विविध यंत्रे भाडेतत्त्वावर देणे, शिवाय दुग्ध व्यवसाय. शेतीत अशी विविधता ठेवून सतत उद्यमशील राहून उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याबरोबर पथ्रोट (जि. अमरावती) येथील उमाकांत व वसंत या तपासे बंधूंनी व्यावसायिक शेतीचा आदर्श उभा केला आहे.
Agriculture Profit
Agriculture ProfitAgrowon

अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात पथ्रोट गाव आहे. शहानूर प्रकल्प गावापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा कालवा या भागातून गेला आहे. परंतु वैयक्‍तिक विहिरी, बोअरवेल या भागांत असल्याने शेतकऱ्यांना त्याची फारशी गरज वाटली नाही. परिणामी, अनेक भागांत कालवे बुजले आहेत. याच भागात पूर्वी एक हजार हेक्‍टरपर्यंत केळी लागवड (Banana Cultivation) होती. विहिरींची खालावलेली पातळी, मिळणारा कमी दर, वाढते तापमान आदी कारणांमुळे आज हे क्षेत्र २०० हेक्‍टरपर्यंत घसरले आहे. याच भागात कपाशी, हरभरा (Chana), सोयाबीन (Soybean तर काही क्षेत्रावर कांदा (Onion), मिरची, पालक, लसूण आदी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

उपासे बंधूंची शेती

गावात वसंतराव आणि उमाकांत या उपासे बंधूंची संयुक्त २२ एकर शेती आहे. तीन विहिरी आणि सात बोअरवेल्सचा व ठिबक आणि तुषार सिंचनाचा पर्याय आहे. शेतीत कायम उद्यमशील व गुंतून राहण्याचा उपासे यांचा स्वभाव आहे. शेतात त्यांचे घरही आहे. मुख्य हंगामी पिके, त्यास फळे- भाजीपाला पिकांची जोड, सेंद्रिय हळद, त्याची पावडरनिर्मिती, विविध यंत्रे भाडेतत्त्वावर देणे आणि छोटेखानी दुग्ध व्यवसाय अशी विविधता हेच उपासे यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे.

हळद उत्पादन व प्रक्रिया

सुमारे पंधरा वर्षांपासून एक एकरात हळद लागवडीत (सेलम वाण) सातत्य आहे. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न असतो. वाळलेल्या हळदीचे एकरी २५ ते ३० क्‍विंटल उत्पादन मिळते. बाजारात हळद विकण्याऐवजी पावडर तयार करून त्याची किरकोळ पद्धतीने ग्राहकांना विक्री केली जाते. हळदीवर प्रकिया करण्यासाठी बॉयलरचा वापर टाळून पारंपरिक भट्टींचा वापर केला जातो. या प्रक्रियेत हंगामात पाच मजुरांना काम मिळते. उकळून सुकविल्यानंतर आठ किलो हळकुंडांपासून एक किलो पावडर मिळते. उपासे यांच्या घरातच गिरणी आहे. दर्जा पाहता ग्राहकांकडून मागणी हळूहळू वाढू लागली आहे. आज घरूनच हंगामात १५ ते २० क्‍विंटल पावडरची विक्री १५० रुपये प्रति किलो दराने होते. पथ्रोटसह अन्य गावांतून तसेच हॉटेल व्यवसायिकांकडून हळदीला मागणी राहते. त्यामुळे विक्री व्यवस्था सोपी झाली आहे.

वांगी उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव

पथ्रोट गाव हिरव्या वांग्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गोंदिया, बालाघाट, तुमसर, नागपूर, ओडिशापर्यंत या भागातील वांगी जातात असे उपासे सांगतात. एप्रिलमध्ये लागवड होते. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून वांगी काढणीस येतात. आठवड्याला एकरी १५ क्‍विंटलपर्यंत तोडा होतो.

दररोज सुमारे ८ ते १० ट्रक वांगी भरून नेतात. एकाचवेळी भरपूर माल उपलब्ध होत असल्याने व्यापारी थेट बांधावरून खरेदी करतात. किलोला सात ते दहा रुपये दर मिळतो. पथ्रोट परिसरात कांद्याचे

सुमारे दोन हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. उपासे सुमारे सात एकरांत उन्हाळी कांदा घेतात. एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन घेतात. यंदा ‘थ्रिप्स’चा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादन घटले आहे. दरांतही घसरण झाली आहे.

फळबागांमध्ये दहा एकरांवर संत्रा लागवड आहे. गेल्यावर्षी चार एकर बाग हुंडी पद्धतीने साडेसात लाख रुपयांना व्यापाऱ्याला दिली. बाजाराची स्थिती, उत्पादन व उत्पन्नाचा अंदाज घेत विक्री किंवा हुंडी याविषयीचा निर्णय घेतला जातो.

यंत्रांचा व्यवसाय

शेतकऱ्याच्या शेतात सबमर्सिबल पंप लावून पाण्याचा उपसा करून चाचणी करून देण्याचे काम उपासे करतात. प्रति २५० ते तीनशे फूट खोलीच्या बोअरवेलसाठी तीन हजार रुपयांची आकारणी केली जाते. या माध्यमातून बोअरवलेला पाणी किती, उपसा करण्यासाठी किती एचपीचा पंप लागेल हे तपासण्याचे काम होते. त्यासाठी एचडीपीई पाइप, केबल, स्टार्टर, चेन ब्लॉक व लोखंडी पाइप आदी साहित्य आहे.

वीस वर्षांपासून या कामात सातत्य व हातखंडा असल्याने अमरावती जिल्ह्यासह अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतील गावांमधूनही मागणी राहते. गावाचे अंतर जास्त असल्यास त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जातात. सोयाबीनची प्रतवारी करणारे ‘स्पायरल सेपरेटर’ देखील आहे. त्यासाठी दिवसाला २०० रुपये आकारले जातात. विहिरीतील गाळ काढणारी पाच यंत्रे आहेत. दिवसाला तीनशे रुपये शुल्क त्यासाठी

आकारले जाते. पथ्रोट गाव अमरावती व अकोला यांच्या मध्यवर्ती असल्याने दोन्ही बाजूंकडील गावांमधून या यंत्राला मागणी असते. भाडेतत्त्वावर अशा प्रकारे यंत्रांची सेवा देत उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपासे यांनी तयार केला आहे.

दुधाचेही पैसे

तीन म्हशी व एक गाय आहे. दररोज सुमारे १८ ते २० लिटर दूध उपलब्ध होते. घरासाठी शिल्लक ठेवून उर्वरित दुधापासून ताक, दही असे पदार्थ तयार केले जातात. दूध प्रति लिटर ५० रुपये, तर तुपाची ६०० रुपये प्रति किलो या दराने घरूनच विक्री होते.

संपर्क ः उमाकांत उपासे, ९८२२६४८५९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com