Womens Self-help Group
Womens Self-help GroupAgrowon

Spices Production: मसाला निर्मितीमध्ये ‘संस्कृती’ची ओळख

नसरतपूर (ता.जि.नांदेड) येथील उपक्रमशील महिला क्रांती वसंत हाटकर यांनी संस्कृती महिला स्वयंसाह्यता समूहाच्या माध्यमातून पापड, तसेच मसाला निर्मिती उद्योगाला (Spices Production Business) चालना दिली. विविध प्रकारचे मसाले आणि गुणवत्तेमुळे बाजारपेठेत महिला समूहाच्या ‘गृहिणी ब्रॅण्ड’ची वेगळी ओळख तयार झाली आहे.

कृष्णा जोमेगांवकर

नसरतपूर (जि.नांदेड) या गावातील क्रांती वसंत हाटकर यांनी समविचारी दहा महिलांना एकत्र करून १३ ऑगस्ट, २०२० रोजी महिला बचत गटास (Women Self-help Group) सुरुवात केली. दर महिन्याला बचतीसाठी मासिक वर्गणी जमा करणे हा पहिल्यांदा बचत गटाचा मर्यादित उद्देश होता. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्कृती महिला स्वयंसहाय्यता समूहाची शासकीय नोंदणी केली.

सध्या संस्कृती महिला स्वयंसाह्यता समुहामध्ये क्रांती वसंत हाटकर, वैशाली संजय पवार, करुणा शिवाजी नरवाडे, वंदना विजय जोगदंड, गंगासागर साहेबराव हाटकर, कलावती उत्तम डोईबले, उज्ज्वला राहुल थोरात, विशाखा वसंत हाटकर, लक्ष्मीबाई विश्वनाथ कंधारे, प्रजावती सिद्धार्थ थोरात या सदस्या कार्यरत आहेत.

मसाले निर्मितीला सुरुवात

हटकर कुटुंबीयांकडे शेती नसल्याने क्रांतीताईंनी उपजीविकेसाठी मूग, उडीद पापड निर्मिती आणि विक्री व्यवसाय सुरू केला. परिसरातील ग्राहकांकडून पापडाला चांगली मागणी होती. पापड विक्रीतून त्यांनी पंचक्रोशीत वेगळी ओळख तयार केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार मसाला निर्मितीला देखील सुरुवात केली.

Womens Self-help Group
Onion Seed Production : उत्तम बीजोत्पादन, यांत्रिक प्रतवारीद्वारे दर्जेदार कांदा बी निर्मिती

दरवर्षी किमान तीन ते चार क्विंटल पापड विक्री होत होती. पापड उत्पादन आणि मसाला विक्रीतून आर्थिक उत्पन्नही चांगले मिळायचे. परंतु मजूरटंचाई आणि मूग, उडदाचे दर वाढल्याने पापड व्यवसाय मर्यादित केला. यानंतर मसाला निर्मिती उद्योगाच्यावाढीवर भर दिला. शहरी बाजारपेठेमध्ये मसाला विक्री करताना महिला गटाची मोठी कसोटी लागली.

पंचक्रोशीतील काही विक्रेते आमच्याकडे इतर मसाले आहेत, त्यामुळे तुम्ही मसाला सॅम्पल ठेवा, असे सांगायचे. त्यामुळे क्रांतीताईंना नांदेड शहरातील दुकानदारांना सुरुवातीला साडेचार हजार रुपयांचा मसाला केवळ सँपलसाठी द्यावा लागला. पहिल्या टप्प्यात उत्पन्नाची शाश्वती नव्हती. परंतु हळूहळू ग्राहक, दुकानदार मसाल्याची मागणी करू लागल्याने उद्योगाला गती मिळाली.

विविध गावांमध्ये विक्री व्यवस्था

क्रांतीताई पहिल्यापासून घरगुती स्तरावर मसाला निर्मिती करत होत्या. बचत गटातील महिलांची साथ मिळाल्यामुळे त्यांनी मसाला निर्मिती उद्योगाला गती दिली. मसाला निर्मितीसाठी कच्चा माल विकत घेण्यासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सात हजाराचे भांडवली कर्ज घेतले. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी पहिल्या टप्प्यात चार प्रकारचे मसाला बनविण्यास सुरवात केली. मसाल्याची वेगळी चव आणि योग्य

दर्जा यामुळे ग्राहकांकडून मागणीत वाढ होऊ लागली. बचत गटाने मसाला गुणवत्तेमध्ये तडजोड न करता व्यवसायाची वाटचाल सुरु केली आहे. स्वतःच्या कष्टाने बाजारपेठ वाढवून मसाला उद्योगासाठी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेऊन महिला गटाने वेळेवर

परतफेड केली आहे. गटातील दहा महिलांना वर्षभर हक्काचा रोजगार मिळाला आहे. सध्या नांदेड तालुक्यात विविध गावांमधील साठ दुकानदारांच्या मदतीने मसाला विक्रीचे जाळे पसरविले आहे. नांदेड शहरातील काही विक्रेते जागेवर येऊन विविध प्रकारचा मसाला खरेदी करतात. काही छोट्या विक्रेत्यांना जागेवर जाऊन मसाले पोहोच करावे लागतात. दरमहा एक लाख रुपयांच्या उलाढालीतून ३० टक्के नफा मिळतो, असे क्रांतीताई सांगतात.

महिलांना मिळाला रोजगार

मसाल्याच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन क्रांतिताईंनी मसाला उत्पादनात वाढ तसेच पॅकिंगसाठी बचत गटातील महिलांना सोबत घेतले. विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती सुरू झाली. या वेळी मसाला विक्रीतून टप्याटप्याने नफा मिळणार होता. पहिल्यांदा कच्चा माल खरेदी करण्यासाठी भांडवली गुंतवणूक करावी लागणार होती.

Womens Self-help Group
Farmer Producer Company : जागतिक बाजारपेठेत ओळख मिळवलेली ‘ओम गायत्री’ कंपनी

गटातील महिलांना पहिल्या टप्यात आर्थिक गुंतवणूक करणे शक्य नव्हते. त्यामुळे क्रांतीताईंनी गटातील महिलांना दररोजच्या मसाला निर्मिती कामाचे मानधन देण्यास सुरवात केली. कच्चा माल खरेदीसाठी क्रांतीताईंनी गटातील बचतीची गुंतवणूक केली.

बचत गटातील महिला रिकामे बॉक्स तयार करणे, त्यामध्ये वजनानुसार मसाला पॅकिंगचे काम करू लागल्या. मसाला निर्मिती करताना पहिल्यापासून स्वच्छता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्यात आले. या उद्योगातून गावातील दहा महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे

तयार केला ‘गृहिणी’ ब्रॅण्ड

बाजारपेठेत महिला गटाच्या मसाल्यांची वेगळी ओळख तयार होण्यासाठी क्रांतीताईंनी ‘गृहिणी मसाले‘ हा ब्रॅण्ड तयार केला. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती, नांदेड येथे महिला गटाची नोंदणी केली. त्यामुळे बाजारपेठेत गटाच्या मसाल्यांना नवी ओळख मिळाली. विक्रेत्यांची मागणी वाढू लागल्याने गटाचा आत्मविश्वास दुणावला.

Womens Self-help Group
Crop insurance : प्रलंबित पीक नुकसानीची रक्कम तातडीने अदा करा

हळूहळू मसाला उत्पादनांना स्वतःची बाजारपेठ तयार झाली. यासाठी पहिल्यांदा प्रचंड कष्ट गटाला करावे लागले. बचत गटाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, प्रकल्प संचालक संजय तुबाकले, उमेद अभियानाचे नांदेड तालुका अभियान व्यवस्थापक डी.बी.ढवळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, जिल्हा व्यवस्थापक (मार्केटिंग) धनंजय भिसे यांचे सहकार्य लाभले आहे.

सध्या गटातील महिला गरम मसाला, पाव भाजी मसाला, सब्जी मसाला, धने पावडरसह पाच प्रकारचे मसाले तयार करतात. याचबरोबरीने ग्राहकांच्या मागणीनुसार उडीद, मूग पापड तसेच कुरडया निर्मिती केली जाते. पहिल्या टप्प्यात प्लॅस्टिक पाऊचमध्ये मसाले पॅकिंग केले जात होते. परंतु बाजारपेठेत उत्पादनांचा वेगळेपणा जपण्यासाठी गटाने मसाल्याचे बॉक्स पॅकिंग सुरू केले.

आतून चंदेरी रंगाचे पॅकिंग आणि वरून बॉक्स पेटी असे स्वरूप आहे. दहा, बारा, पंधरा आणि तीस ग्रॅममध्ये मसाल्याचे पॅकिंग केले जाते. विविध मसाल्यांचा प्रति किलो ५६० रुपये असा विक्री दर आहे. शहरी बाजारपेठ तसेच विविध गावांतील जत्रेमध्ये मसाला उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने मसाल्याची ओळख तयार होण्यास मदत झाली. बचत गटाची मसाला उद्योगातील प्रगती लक्षात घेऊन क्रांती हटकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबरीने परिसरातील बचत गटांना क्रांतीताई प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com