बांबूसाठी प्रसिद्ध झाले कांबरे गाव

पुणे जिल्ह्यात राजगडच्या कुशीत वसलेल्या कांबरे (ता. दौंड) गावाने बांबू पिकात स्वतःची ओळख तयार केली आहे. बहुतांश मेस जातीच्या तसेच मजबूत, नितळ व उंच अशा बांबूचे उत्पादन गावातील शेतकरी घेतात. दिवाळी ते होळी या कालावधीत गावातून सुमारे २५ ते ३० ट्रक एवढ्या बांबूची विक्री होते. या पिकातून शेतीचे व कुटुंबाचे अर्थकारण उंचावण्यास गावकऱ्यांना मदत झाली आहे.
Bamboo
BambooAgrowon

पुणे जिल्ह्यात राजगडच्या कुशीत कांबरे (खुर्द) हे छोटंसं गाव वसलं आहे. तसं गावकऱ्यांचे मुख्य पीक म्हणाल तर भातच. गावचे भौगोलिक क्षेत्र ३५० ते ४०० एकर आहे. यापैकी जवळपास ७० एकरांच्या आसपास क्षेत्र भाताखाली आहे. उर्वरित भाग डोंगराळ असल्याने मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची वन्य झाडे, वनस्पती आढळतात. भातातून पुरेसे अर्थार्जन होत नसल्याने शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात होते. बांबू हे पीक समोर आल्याने व त्याचे महत्त्व पटल्याने शेतकऱ्यांनी त्याला प्राधान्य दिले. आज काही गुंठे, एक एकर ते सहा एकरांपर्यंत कमी अधिक प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्याकडे हे पीक दिसून येते. अन्य पिकांच्या तुलनेत हे पीक जोपासनेसाठी कमी कष्टाचे आहे. त्यातील अडचणीही तशा कमी आहेत.

...अशी होते लागवड

कांबरे गावातील अनेक लोक बांबूला डोंगराळ भागाचा ऊस समजतात. बहुतांश शेतकरी मेस जातीच्या लागवडीवर भर देतात. बांबूचे जे जुने बेट असते त्यातील जुना किंवा नवा बांबू शेतकरी आपल्या अनुभवाच्या जोरावर काढतात. तो काढताना शेजारील एकाही बांबूला त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घेतात. नव्या जागेवर खड्डा घेऊन लागवड कंद पद्धतीने व पावसाळ्यातच म्हणजे भात लावणीच्या आधी जूनमध्येच केली जाते. मात्र आवश्यक तितके कंद न मिळाल्यास शेतकऱ्यांची अडचण तयार होते. यावर पर्याय म्हणून गावातील सुवर्णा सुकाळे व त्यांचे पुतणे तुषार व सुवर्णा यांनी बांबूच्या पेरांपासून रोपे तयार करण्याचा पर्याय सुरू केला आहे. त्यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात त्यासंबंधीचे प्रशिक्षण घेतले आहे. आपल्या पाच गुंठे क्षेत्रावर त्यांनी रोपवाटिका उभारली आहे. पहिल्या वर्षी बाराशे पेरांची लागवडीतून त्यांना ७०० रोपे मिळाली. यंदा २५०० पेरांची लागवड केली असून, त्यातून २१०० ते २२०० रोपांची अपेक्षा आहे. तुषार यांचीही बांबूची सुमारे ४०० ते साडेचारशे झाडे आहेत.

तोडणीचे नियोजन

मजुरांकरवी आकडी लोखंडी कोयत्याचा वापर करून बांबूची तोडणी होते. प्रति मजुराला एक नग बांबू तोडून व साफ करून जागेवर बांधून देण्यासाठीची सरासरी दहा रुपये मजुरी दिली जाते. दिवसभरात एक मजूर सुमारे ५० ते ६० बांबू तोडू शकतो. बुडखा, मधला भाग व शेंडा असे वेगवेगळे भाग मागणीनुसार तयार केले जातात. दहा बांबूची मोळी बांधून लांबीनुसार विक्री केली जाते. बांबूची उंची ३५ ते ४५ फुटांपर्यंत असते. उंची आणि जाडी पाहून दर निश्‍चित केला जातो.

मागणी व उलाढाल

सुरुवातीच्या काळात बैलगाडीत टाकून शेतकरी बांबू बाजारात विकण्यासाठी जात. परंतु आता गावात ट्रक येतात. दरवर्षी दिवाळी ते होळी या कालावधीत मोठी मागणी असून त्या काळात सुमारे २५ ते ३० ट्रक बांबू गावातून पाठवण्यात येतो. प्रति गाडीत एक हजार बांबू बसतात. हा माल पुणे, उरुळी कांचन, नगर, सोलापूर, जुन्नर या भागांत जातो. गावातील शेतकरी साखळी पद्धतीने तोडणी करून विक्री करतात. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होते. प्रति शेतकऱ्याला एक नग बांबूपासून (पूर्ण बांबू) ७० ते ८० रुपये मिळतात. व्यापारी पुढे किरकोळ विक्रेत्यांना १०० ते १२० रुपये दराने त्याची विक्री करतात. एकूण बांबू पिकातून गावात काही लाख रुपयांची उलाढाल होते.

कांबरे गाव व बांबू शेती- ठळक बाबी

-भोर मेस किंवा मावळ मेस म्हणून या बांबूची ओळख.

- या बांबूची काठी मजबूत, नितळ असून पॉलिश चांगले धरून ठेवते. तिच्या पट्ट्या काढणे सोपे असल्यामुळे घरबांधणी, फर्निचर व अन्य बांधकामासाठी उपयोगी. त्यामुळे उद्योगांकडून मागणी.

-जास्तीत जास्त ४० ते ४५ फुटांपर्यंत उंच होतो.

- लागवड आणि जोपासना खर्च तुलनेने कमी, पाण्याची गरज कमी.

संपर्क ः तुषार सुकाळे, ८८८८६१४८७९

भाताइतकेच बांबू शेतीला महत्त्व देतो. दरवर्षी शंभर ते दीडशे रोपांची लागवड करतो. त्यातून खर्च आणि कमी कष्टाचे हे पीक आहे. दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते.
लालाबापू शिळीमकर, कांबरे
बांबू हे भोर तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यातील महत्त्वाचे नगदी पीक झाले आहे. त्यापासून शोभेच्या वस्तू, शेतीपयोगी, गृहपयोगी वस्तू तयार करता येतात. त्यामुळे त्याचे महत्त्व वाढत आहे. कृषी विभागामार्फत शंभर टक्के अनुदानावर लागवडीवर भर देण्यात येत आहे. त्याचा फायदा शेतकरी घेऊ शकतात.
पी.जी. भोये, कृषी सहायक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com