शेती, पूरक उद्योगांससह करंदीची शैक्षणिक आघाडी

एकेकाळी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे व पारंपरिक पिके घेणारे करंदी (जि. पुणे) या गावाने विकासकामे घडवून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. चासकमान धरणाच्या कालव्याच्या पाण्यामुळे गावात पाण्याची समृद्धी तयार झाली. सुमारे हजार- अकराशे उंबरे असलेल्या या गावाने शेती, पूरक व्यवसायांसह शैक्षणिक क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. पुस्तकांचे व सनदी लेखापालांचे गाव म्हणून ओळख मिळवली आहे.
शेती, पूरक उद्योगांससह करंदीची शैक्षणिक आघाडी
Rural DevelopmentAgrowon

पुणे जिल्ह्यातील करंदी (ता. शिरूर) गाव पूर्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून होते. साहजिकच पीक पद्धतीही पारंपरिक स्वरूपाची होती. गावकऱ्यांनी संघटित होऊन गावाचा विकास करायचे मनावर घेतले आणि चळवळीला सुरुवात झाली. काही वर्षांपासून चासकमान धरण प्रकल्पाचा कालवा गावातून गेला आणि गावात पाण्याची संपन्नता येण्यास मदत झाली. त्यातून पीक पद्धती सुधारली.

नगदी पिकांसह चारा पिके होऊ लागली. सध्या गावचे मुख्य पीक ऊस झाले आहे. भीमाशंकर सहकारी कारखान्यासाठी हा ऊस जातो. हंगामी भाजीपाला पिकांसह कांदा लागवडीचे प्रमाण वाढले आहे. काही प्रयोगशील, अभ्यासू शेतकरी सुगंधी तेलासाठी लागणाऱ्या जिरेनिअम वनस्पतीच्या प्रयोगाकडे वळले आहेत. तेलप्रक्रिया उद्योगातून उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

पूरक व्यवसायांना चालना

गावात डेअऱ्यांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय वाढीस लागला आहे. दररोज सुमारे १० हजार लिटर दूध संकलित होऊन त्यावर प्रक्रिया करून ते पुढे पाठवले जाते. अनेक पोल्ट्री फार्म्स गावात दिसून येतात. ट्रॅक्टर व त्याआधारित यंत्रांमुळे आता बैलचलित कामांची गरज कमी झाली. तरीही करंदीकरांनी चांगल्या प्रकारे पशुधन जोपासले आहे. त्याचे कारण म्हणजे बैलगाडी शर्यतीत गावातील अनेक जणांचा उत्साहाने सहभाग असतो. विविध घाटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे ग्रामस्थ गावात पाहावयास मिळतात.

कृषी ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्र

कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी गावात तयार झालेला करंदी वॉरियर हा तरुणांचा गट आजही सक्रिय आहे. मूळ गावातीलच पण नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांची करंदी कायाकल्प संस्था आहे. दोन्हींमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. त्यात कृषी ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. त्यात पुस्तके, मासिके, ‘ॲग्रोवन’ आणि ‘सकाळ प्रकाशन’ची पुस्तके उपलब्ध आहेत.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. भविष्यात कृषी ग्रंथालय ही चळवळ व्यापक व्हावी व करंदी हे पुस्तकांचे गाव म्हणून सुद्धा पुढे यावे यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प या संस्थेनेही हे गाव विकासकार्यासाठी निवडले आहे. त्यांच्यामार्फत मुलींना सायकल वाटप, जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लॅन्ट, खेळ साहित्य अशी मदत केली आहे.

शिक्षणात अग्रेसर गाव

गावातच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेसह माध्यमिक शाळा, कनिष्ठ विद्यालय, इंग्रजी माध्यमाच्या दोन अद्ययावत शाळा गावात आहेत. शालेय जीवनातच स्पर्धा परिक्षांचे बाळकडू मिळावे यासाठी शिष्यवृत्ती तसेच नवोदय प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यात विद्यार्थी उल्लेखनीय यश मिळवत आहेत. गावात आत्तापर्यंत ११ तरुण सनदी लेखापाल (सीए) झाल्यामुळे करंदी हे ‘सीएंचे’ गांव म्हणून ओळखले जाते. साहजिकच गावात शैक्षणिक वातावरण तयार झाले आहे. सन २०११ मध्ये गावातील साक्षरतेचे प्रमाण ७१ टक्के होते. आता ते १०० टक्क्यांचा पल्ला गाठत आहे. प्रशासकीय सेवा, पोलिस, लष्कर, प्रशासन, वैद्यकीय, राजकारण आदी क्षेत्रांमध्येही विद्यार्थी अग्रेसर असून, उपजिल्हाधिकारी, महसूल अधिकारी यांसारख्या पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.

धार्मिक अधिष्ठान

पारंपरिक देवस्थानांचा जीर्णोद्धार करत ग्रामस्थांनी आदर्श निर्माण केला आहे. ग्रामदैवत नरसिंहाचे सुंदर मंदिर, मारुतीचे कौलारू मंदिर भव्य स्वरूपात उभारले आहे. ही मंदिरे गावचे प्रमुख आकर्षण झाली आहेत. दावल मलिक, शिवरामाचा डोंगर येथे शिवालय आहे. सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे गावात असून जानपीरबाबा (जालिंदरनाथ) यांच्या नावाने यात्रा भरते.

व्यसनमुक्तीकडे वाटचाल

विद्यमान सरपंच सुभद्राताई ढोकले यांच्या नेतृत्वाखाली गाव व्यसनमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी चळवळीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी दारूभट्टी उद्ध्वस्त केल्याचे उदाहरण ताजेच आहे.

विकासकामे

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करंदी हे आदर्श संसद ग्राम म्हणून दत्तक घेतले होते. त्या काळात मारुती मंदिर, ‘हायस्कूल’साठी दोन खोल्या, रस्ते, पवन ऊर्जा प्रकल्प, दशक्रिया विधीसाठी शेड यासाठी मदत केली. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात मोलाचे सहकार्य केले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निधी आणि प्रयत्नांतून ग्रामपंचायत इमारत, भव्य प्रवेशद्वार, बाग, वस्त्यांना जोडणारे रस्ते, उपयुक्त सभामंडप आदी कामे झाली. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातूनही विकासकामे प्रस्तावित आहेत. भविष्यात वन विभागाची मदत घेऊन गायरानात आयुर्वेदिक वनस्पती उद्यान उभारण्यात येणार आहे.

दोन वर्षांपासून सुगंधी तेलनिर्मिती प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. त्यासाठी सुमारे १२ एकरांवर जिरॅनिअमची लागवड आहे.
नवनाथ ढोकळे ९८५००३२६४२
गाव शेतीसह पूरक उद्योगांत आघाडीवर आहे. प्रक्रिया उद्योग गावात उभारण्यासाठी विविध संस्थांसोबत चर्चा सुरू आहेत. आरोग्यसेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी राज्य शासनाकडून नऊ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
सुभद्रा ढोकळे सरपंच, करंदी ७५०६२०५६७७
पायाभूत सुविधांसह ग्रामपंचायतीद्वारे १० विविध सेवा ऑनलाइन पद्धतीने देत आहोत. सध्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभारला आहे. शेतकऱ्यांना रास्त दरात सेंद्रिय खत उपलब्ध होणार आहे.
दिलीप पानसरे ९७६५५५००५६ ग्रामसेवक, करंदी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com