
हिंगोली : अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाणी, कमी उत्पादन खर्चात (Less Input Cost) किफायतशीर उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे वसमत तालुक्यातील शेतकरी करवंद लागवडीकडे (Karvand Farming) वळले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात तालुक्यात करवंद लागवड क्षेत्र दोनशे एकर पर्यंत विस्तारले आहे. शेतकरी गटांमार्फत थेट शेतातून करवंदांची विक्री केल्यामुळे फायदा होत आहे. तालुक्यामध्ये करवंदांची शेती बहरत आहे.
वसमत तालुक्यात दर एक दोन वर्षाआड दुष्काळाला सामोरे जावे लागते. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. केळी, ऊस या पिकांचे क्षेत्र कमी होत आहे. या परिस्थितीत शेतकरी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकांचा पर्याय शोधत आहेत. गेल्या दहा वर्षात पारंपारिक हळदीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, गेल्या काही वर्षात वाढलेला उत्पादन खर्च, घटलेली उत्पादकता, कमी बाजारभाव आदी कारणांमुळे हळद हे पीक देखील परवडत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
वसमत तालुक्यातील लिंगी येथील बालाजी यशवंते, कुरुंदा येथील सदाशिव गवळी, वसमत येथील संजय लोंढे आदींसह अनुभवी, प्रयोगशील शेतकरी एकत्र आले. शाश्वत उत्पन्न देणाऱ्या फळपिक लागवडीसाठी अभ्यास सुरु केला. आंबा, फणस, सीताफळ आदी फळपिकाच्या लागवडीची चाचपणी केली. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना करवंद लागवडीबाबत माहिती मिळाली. करवंद बाजारपेठाचा अभ्यास केला. २०१६ मध्ये तालुक्यातील अनेक गावात करवंद लागवड सुरु झाली. आजवर वसमत, पांगरा सती, लिंगी, हयातनगर, कुरुंदा, जवळा बुद्रक, आसेगाव, हिरडगाव, खंदारबन, इंजनगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी करवंद लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे करवंद उत्पादन सुरु झाले आहे.
‘करवंदाचे चांगले उत्पन्न’
तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड म्हणाले, की कमी खर्चात चांगले उत्पादन, उत्पन्न मिळत आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल करवंद लागवडीकडे आहे. अनेक शेतकऱ्यांनी करवंद रोपवाटिका सुरु केल्या आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत करवंद लागवडीस मान्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.