Turmeric Processing Industry : हिंगोलीतील कावेरी बोरगड बनल्या हळदीच्या यशस्वी प्रक्रिया उद्योजक

हिंगोली जिल्ह्यातील सातेफळ येथील कावेरी प्रल्हाद बोरगड यांनी यशस्वी प्रक्रिया उद्योजक अशी ओळख मिळवली. मूल्यवर्धित व नावीन्यपूर्ण उत्पादने देशपातळीवर सूर्या ब्रॅण्डद्वारे पोहोचविली. सूर्या शेतकरी कंपनीतही महत्त्वाचे योगदान त्या देत आहेत.
Turmeric Processing Industry
Turmeric Processing IndustryAgrowon

Success Story : हिंगोली जिल्ह्यातील सातेफळ (ता. वसमत) येथील कावेरी प्रल्हाद बोरगड यांचे भोगाव (ता. वसमत) हे माहेरघर. अल्पभूधारक कुटुंबातील प्रल्हाद बोरगड यांच्याशी त्यांचा १९९९ मध्ये विवाह झाला. सासरची तीन एकर शेती होती. हळद हे मुख्य होते.

क्षेत्र कमी असल्यामुळे अन्य शेतकऱ्यांकडे मजुरीस जावे लागे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजनेअंतर्गत महिला बचत गटांची चळवळ सुरू झाली. शेतीला प्रक्रियेची जोड दिल्यास अर्थकारण उंचावू शकते हे कावेरीताईंनी जाणले.

सन २००४ मध्ये गावातील दहा महिलांना सोबत घेऊन त्यांनी सूर्यकांता महिला स्वयंसाह्यता गटाची स्थापना केली. बँकिंग व्यवहारांबाबत ज्ञान घेतले. गटाच्या माध्यमातून कर्ज व म्हैस घेत दुग्ध व्यवसाय सुरू केला.

हळद प्रक्रिया

सन २०११ मध्ये घरच्या हळदीपासून पावडर आणि लोणचे निर्मिती सुरू केली. बचत गटाच्या मेळाव्यांमधून विक्रीचे व्यासपीठ उभारले. कृषी विभागाचे अर्थसाह्य मिळाले. उत्साह वाढला. तेलगाव येथे यांत्रिक उभारणी झाली. शेतकऱ्यांकडूनही हळद खरेदी सुरू केली.

हळद पावडरीचा सूर्या ब्रॅण्ड लोकप्रिय केला. ओल्या हळदीच्या विशिष्ट स्वादाच्या लोणच्यास ग्राहकांची मोठी पसंती असते. बाजारपेठेतील मागणी व ग्राहकांचा कल ओळखण्यात कावेरीताई कुशल आहेत.

नैसर्गिक मालाला असलेले ‘मार्केट’ ओळखून त्यांनी मूग, उडीद, तूर, हरभरा आदींपासून जात्यांवर डाळी तयार केल्या. पॅकिंग, लेबलिंग करून ‘सूर्या ब्रॅण्ड’ने ही उत्पादने बाजारपेठेत आणली.

Turmeric Processing Industry
Turmeric Cultivation : सांगली जिल्ह्यात हळद लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता

शेतकरी कंपनीपर्यंत वाटचाल

कावेरीताईंना पती प्रल्हाद यांची प्रक्रिया उद्योगात भक्कम साथ, तर सासू लक्ष्मीबाई यांचे प्रोत्साहन लाभले आहे. परिसरातील शेतकरी गटांच्या संघटनेतून जानेवारी, २०१५ मध्ये सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली.

प्रल्हाद कंपनीचे अध्यक्ष असून, संचालकांमध्ये कावेरीताईंचा समावेश आहे. वसमत-परभणी राष्ट्रीय महामार्गावरील तेलगाव येथे कंपनीचे मुख्यालय आहे.

सुमारे ३३ गावांतील ५४८ शेतकरी कंपनीचे सभासद आहेत. स्वच्छता, प्रतवारीद्वारे सोयाबीन, तूर, हरभरा, हळद आदींची उद्योजकांना विक्री होते.

‘एनसीडीएक्स’च्या प्लॅटफॉर्मवर दोन वर्षात ७१ लाख रुपयांची उलाढाल झाली. कंपनीने प्रसिद्ध सह्याद्री शेतकरी कंपनीच्या (नाशिक) माध्यमातून बांगला देशात ३०० टन हळदीची निर्यात केली.

उसाच्या रसापासून कुल्फी (गन्ना चुस्की), गन्ना गोला, गन्ना इमली चटणी, हर्बल टी, गूळ यातून उत्पादनांच्या श्रेणीत वाढ केली. पुण्यातील भीमथडी जत्रा, मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शन, दिल्ली, चेन्नई आदी ठिकाणच्या प्रदर्शनात भाग घेत परराज्यांपर्यंत आपली उत्पादने पोहोचविली.

Turmeric Processing Industry
Turmeric Harvest : हळद काढणी आली अंतिम टप्प्यात

सक्षम केले अर्थकारण

घर चालविण्यासाठी एकेकाळी कावेरीताईंना शेतमजुरीचा आसरा घ्यावा लागला. पण कोणत्याही कामात कमीपणा न मानता त्या कायम प्रयोगशील राहिल्या. संघटन कौशल्य त्यांच्यात होतेच. टप्प्याटप्याने खरेदी करीत आज बोरगड कुटुंबाची सातेफळ, तेलगाव, भोगाव शिवारात एकूण आठ एकर जमीन झाली आहे.

सन २०१२ पासून सेंद्रिय शेतीवर भर आहे. लाल कंधारी, गीर हे देशी गोधन आहे. पती प्रल्हाद कंपनी व्यवस्थापन, विक्री तर कावेरीताई शेती व्यवस्थापन, साठवणूक, प्रक्रिया या जबाबदाऱ्या पार पाडतात. उत्कृष्ट उत्पादनासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनात २०१६, २०१७ तर भोपाळ प्रदर्शनात २०१८ मध्ये पुरस्काराने त्यांना गौरविले आहे.

सूर्या कंपनीला ई-नाम अंतर्गत पुरस्कार मिळाला आहे. कृषी विभाग, आत्मा, नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळ आदीचे सहकार्य दांपत्याला लाभते. मुलगी कामिनी ‘बीएएमएस’ तर मुलगी रोहिणी परभणी येथे अन्न तंत्र पदवीचा अभ्यासक्रम शिकते आहे.

संपर्क - कावेरी बोरगड ९४२१५८११४५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com