
Onion Rate : नाशिक जिल्ह्यातील साताळी (ता. येवला) येथील रावसाहेब व संदीप (धाकटे) हे कोकाटे बंधू प्रगतिशील कांदा उत्पादक (Onion Producer) म्हणून प्रसिद्ध आहेत. कांदा हे त्यांचे मुख्य नगदी पीक व रब्बी- उन्हाळी उत्पादनावर भर आहे.
अपुऱ्या सिंचन व्यवस्थेवर मात करण्यासाठी पाइपलाइन तसेच दोन शेततळ्यांची निर्मिती व सायफन पद्धतीने पाणी देण्याची सोय केली आहे.
कांद्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन
शास्त्रीय पद्धतींनी व्यवस्थापन, रासायनिक कीडनाशकांचा मर्यादित वापर, जैविक निविष्ठांवर अधिक भर, काढणीपश्चात साठवणूक व बाजारपेठांचा अभ्यास ही कोकाटे यांच्या शेतीची बलस्थाने आहेत. वडिलोपार्जित टिकवलेला ‘नाशिक गुलाबी’ हा वाण दरवर्षी घेण्यात येतो.
लागवडीचा विस्तार करून उत्पादन वाढवण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात उत्पादकता वाढ हे ध्येय असते. मजूरटंचाई भासत असल्याने कामांचे पूर्वनियोजन केले जाते. त्यासाठी पानसेमल (मध्य प्रदेश) भागातून दरवर्षी कुशल मनुष्यबळ १२ वर्षांपासून कार्यरत ठेवले आहे.
गुणवत्तापूर्ण कांदा व्यवस्थापन-
-दरवर्षी १७ एकरांसाठी पुरेल एवढे बियाणे तयार करण्यासाठी स्वतःच बीजोत्पादन करतात.
त्यातून खात्रीशीर व गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध होते.
-पाण्याची उपलब्धता पाहून १ ते २५ डिसेंबर दरम्यान ४५ दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड.
-जमीन काळी कसदार भारी असल्याने काढणीआधी १५ दिवस आधी सिंचन बंद केले जाते.
-कांदा पात पिवळी होऊन ६० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणीस सुरुवात.
-कांद्याच्या मानांजवळ योग्य अंतर ठेवून कापणी. कांदा ट्रॉलीमध्ये भरून चाळीजवळ सावलीत आणून पोळ मारून साठवला जातो.
-अनिश्चित पाऊस व तापमान अधिक असल्याने कांदा वाळविण्यासाठी शेतात ठेवणे टाळले जाते.
-चाळीच्या बाजूला ढीग केल्यानंतर कांद्यावर २ ते ३ सेंमीची पात पसरवून झाकल्यामुळे कांद्यावरील आवरण लवकर परिपक्व होते, रंग येतो व कांदा बुडाची माती गळून पडते.
शास्त्रीय पद्धतीने कांदाचाळ
पूर्व-पश्चिम ५० बाय ३५ फूट आकाराच्या दोन चाळी व त्यात ५० बाय ४.५ फूट आकाराच्या तीन पाखी आहेत. तर दक्षिण-उत्तर ५० बाय ४.५ फूट आकाराच्या एकेरी पाखीच्या तीन चाळी आहेत.
एकूण तीन हजार क्विंटल साठवणूक क्षमता आहे. आर्द्रता व तापमान नियंत्रणासाठी नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून चाळीची उभारणी केली आहे. तळाशी हवा खेळती ठेवली आहे.
बाजूच्या भिंती बांबूच्या व त्यास फटी ठेवल्या आहेत. पाणी साचणार नाही यासाठी तळापासून दगड- मुरूमांचा थर ठेवून उंची तीन फूट केली आहे. पाखीच्या बाहेरील उभ्या भिंतीच्या पुढे पत्र्याची पन्हाळी तीन फूट असल्याने पावसाचे पाणी पुढे पडते.
कांदा काढणीपश्चात साठवणूक
-साठवणुकीसाठी चाळीची स्वच्छता व चार दिवस आधी बुरशीनाशक फवारणी.
- चिंगळी- गोल्टी, जोड कांदे व सुपर माल अशी प्रतवारी.
-दर्जेदार ४५ ते ६५ मिमी आकाराच्या कांद्याची निवड (सुपर माल)
-तळभागात विटा. त्यातही ठरावीक अंतर ठेऊन त्यावर कांदा पसरला जातो. त्यामुळे हवा खेळती राहते. विटा पाणी शोषून घेत असल्याने सड होण्याचे प्रमाण कमी होते.
-पाखीत जास्त उंचावरून न ओतता योग्य अंतरावरून कांदा ओतला जातो.
-पावसाळ्यात कांदा भिजणार नाही यासाठी चारही बाजूने बारदान पडद्यांचा वापर.
-आर्द्रता वाढल्यास चाळ बंद तर दमट वातावरण खुली केली जाते.
-ऑगस्टमध्ये पावसाची झड असते. गारव्यात मोड येण्याची शक्यता असते. त्यासाठी दोनशे वॉटचे बल्ब प्रत्येकी १० फूट अंतरावर लावले जातात.
-घुमतारे, किडे दिसून आल्यास सल्फर धुरळणी.
-या सर्व बाबींमुळे कांदा जानेवारीपर्यंत टिकतो असा अनुभव.
बाजारपेठ विश्लेषण
प्रामुख्याने जूननंतर दरांचा आढावा घेत लासलगाव, विंचूर व येवला बाजारपेठांत खुल्या पद्धतीने विक्री होते. ती जानेवारीपर्यंत सुरू असते. गुणवत्ता ‘ए’ ग्रेड व टिकवणक्षमताही चांगली असल्याने निर्यातदारांमार्फत आखाती देशांमध्ये आपला ८० ते ९० टक्के कांदा निर्यात होत असल्याचे संदीप अभिमानाने सांगतात.
शेतकरी उत्पादन कंपन्यांनाही थेट जागेवर विक्री होते. काही वेळा साठवणुकीत सड होण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजारपेठेचा अंदाज घेत विक्री होते.
मिळणारे दर (प्रति किलो)
-सरासरी २५ रु.
-मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात ३२ ते ३३ रु.
-चार वर्षांपूर्वी कमाल दर १०० रु.
भाग ४
एकूण शेती- २२ एकर, कांदा- १७ एकर.
एकरी उत्पादन खर्च- ९० हजार रुपये.
उत्पादन- एकरी १७५ ते २०० क्विंटल.
अभ्यासू, प्रयोगशील कुटुंब
वडील आनंदा व आई वत्सलाबाई यांचे मार्गदर्शन दोघा बंधूंनी होते. रावसाहेब मजूर, सिंचन व्यवस्थापन तर संदीप व पुतणे रोशन कांदा विक्री व्यवस्थापन पाहतात. संदीप यांना पत्नी उज्ज्वला व भावजय ज्योती यांची मोलाची मदत होते. संदीप व रोशन सातत्याने कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रांना भेटी देतात.
प्रदर्शने, परिसंवाद,चर्चासत्रे यात सहभाग घेतात. संदीप हे ‘महाराष्ट्र ओनियन फार्मर्स’ या व्हॉट्सॲप ग्रुपचे ‘ॲडमिन’ आहेत. नाशिक येथे कृषिथॉन प्रदर्शनात ‘प्रयोगशील कांदा उत्पादक’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
‘ॲग्रोवन’मुळे ज्ञान संपन्न
कोकाटे बंधू ॲग्रोवनचे जुने व नियमित वाचक आहेत. त्यातून विविध शास्त्रीय संकल्पना, तंत्र अवगत करणे व ज्ञानसंपन्न होणे त्यांना शक्य झाले. कृषी अधिकारी व अभ्यासकांचेही त्यांना सातत्याने मार्गदर्शन होते.
संपर्क : संदीप कोकाटे, ८३२९८७३२३०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.