
Poultry Business अमरावती जिल्ह्यात नायगाव ( ता. दर्यापूर) येथील सुभाषराव कोकाटे यांची शेती आहे. त्यांच्या मुलाने म्हणजेच अनिकेत याने पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर वयाच्या विशी ते बावीशीतच नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले.
शेतीपूरक व्यवसाय (Agricultural Based Business) करावा असा घरच्यांचा आग्रह असल्याने अभ्यासातून २०१७ मध्ये लेअर (अंडी उत्पादन) (Egg Production) पोल्ट्री व्यवसायाची (Poultry Farming) सुरवात दहा हजार पक्षांपासून केली.
या क्षेत्राचा अनुभव नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र व्यवस्थापन (Poultry Management) व तंत्रज्ञान पहिल्यापासून चोख ठेवण्यावर भर दिला.
व्यवसायास दिला आकार
शेड उभारणीपासून ते विविध साहित्य, पक्षी अशी सर्व गुंतवणूक काही कोटी रुपयांमध्ये होती.मात्र बॅंकेचे कर्ज, घरातील रक्कम आदी प्रयत्नांमधून भांडवल जमा केले. आज ‘ब्रूडर- ग्रोअर’ असे सर्व मिळून चार शेडस आहेत.
प्रति शेडची क्षमता २५ हजार पक्षी असून एकूण पक्षांची क्षमता एक लाखांपर्यंत आहे. एक दिवसाचे पक्षी ब्रूडर शेडमध्ये ठेवले जातात. वाढीच्या अवस्थेनुसार पुढे अन्य शेडसमध्ये त्यांचे स्थलांतरण केले जाते. सोळा ते १८ आठवड्यामध्ये पक्षी अंडी देण्यास सुरवात करतात.
पोल्ट्री व्यवस्थापन- ठळक बाबी
-दर्यापूर तालुका खारपाणपट्टयात आहे. परिणामी पक्षांना पाणी देण्यासाठी क्षारांचे प्रमाण कमी असलेले पाणी गरजेचे होते. ही बाब लक्षात घेत तशी ‘फिल्टर’ यंत्रणा उभारली आहे.
-खाद्यासाठी ‘फीड प्लॅंट’ उभारला आहे. सुरवातीला ताशी दोन टन अशी त्याची क्षमता होती. पक्षांची संख्या वाढल्यानंतर ही क्षमता तासाला पाच टन अशी झाली आहे.
-गरजेप्रमाणे सोया, मका, जवस, शेंगदाणे, सूर्यफूल, खनिजे, जीवनसत्वे आदी घटकांचा खाद्यात समावेश असतो. दर दिवशी १० ते १२ टन खाद्य तयार केले जाते. दिवसातून तीन वेळा अर्थात
सकाळी सहा वाजता, दुपारी अडीच ते तीन वाजता तर सायंकाळी साडेसहा अशा शेड्यूलमध्ये ते दिले जाते. व्यवस्थापकांच्या निगराणीत खाद्याचा वापर होते. त्यामुळे अंड्यांचा दर्जा राखण्यात आला आहे.
-आरोग्य तपासणी करून लसीकरण. पाण्यासाठीचे टॅंक दोन दिवसातून एकदा तर निपल दररोज स्वच्छ करण्यावर भर आहे.
-ॲटोमॅटिक फिडींग मशिन २५ हजार पक्षांच्या शेडमध्ये बसविली आहे. त्याची किंमत २५ लाख रुपये आहे. हे यंत्र वापरण्यासाठी केवळ एक व्यक्ती पुरेशी ठरते. अशा प्रकारचे हे अमरावती
जिल्ह्यातील पहिलेच तंत्रज्ञान असावे अशी शक्यता आहे. अन्य पोल्ट्री व्यवसायात मानवाकरवी म्हणजे ‘मॅन्युअल फिडींग’ यंत्रणा वापरली जाते. ज्याची किंमत १० ते १२ लाख रुपयांपर्यंत आहे.
- कॅलिफोर्निया केज’ पध्दतीचा वापर केला आहे. यामुळे एका केजमध्ये (बॉक्स) चार ते पाच पक्षीच ठेवले जातात. त्यामुळे त्यांना मोकळी हवा मिळण्यास मदत होते. वावरण्यास जागा अधिक प्रमाणात उपलब्ध होते.
या तुलनेत ‘बॅटरी केज’मध्ये पक्ष्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना नैसर्गिक हवा मिळत नाही. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात असा अनुभव आहे. केज बांधणीवर प्रति पक्षी ५५० रुपये व बांधकाम खर्चाचा समावेश केल्यास एक हजार रुपयांचा खर्च होतो.
-वर्षभरात मुबलक प्रमाणात पोल्ट्रीखतही तयार केले जाते. पाचहजार ते साडेपाचहजार रुपये प्रति ट्रॉली दराने त्याची विक्री होते.
उत्पादन, ‘मार्केटिंग’ व विक्री
प्रति कोंबडीपासून ५०० दिवस सुमारे ५०० पर्यंत अंडी (प्रति दिन एक) मिळतात. दररोज सुमारे ७० हजारांपर्यंत अंडी उत्पादन होते. प्रति नग ३ रुपये ६५ पैसे असा उत्पादन खर्च आहे. साडेचार ते साडेपाच रुपये या दरम्यान विक्री दर आहे.
कोकाटे फार्म नावाचा ब्रॅण्ड तयार करण्यात आला आहे. तर धारणी, अकोट, दर्यापूर व मध्य प्रदेशातील भैसदेही या चार ठिकाणी थेट विक्री केंद्रे (आऊटलेट) उभी केली आहेत. दरदिवशी १५ ते २० हजार अंड्यांची विक्री या ठिकाणाहून होते.
प्रत्येक ‘आऊटलेट’वर दोन कामगार असून त्यांना दरमहा वेतन दिले जाते. ताजी अंडी मिळत असल्याने ग्राहकांची वाढती मागणी राहते. खाद्याच्या प्रकारानुसार अंडी उत्पादनांचेही प्रकार केले आहेत.
वर्षाला एकूण दहा ते बारा कोटी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असल्याने अनिकेत यांनी सांगितले. जमा खर्चाचा ताळेबंदही आवर्जून ठेवण्यात येतो.
अंड्यांचे ब्रॅण्डिंग
कोकाटे फार्म नावाने उत्पादनांचे लेबल तयार केले आहे. येत्या काळात ब्रॅण्डद्वारे सहा आणि बारा अंडी याप्रमाणे पॅकिंगमधून विक्री केली जाणार आहे. इंदूर व मध्यप्रदेशातील अन्य भागात त्याचे अधिक ‘प्रमोशन’ करण्याचा मानस आहे.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी व मकरंद अनासपुरे हे उत्पादनांचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे अनिकेत यांनी सांगितले.
भविष्यकाळात अंडी पावडर निर्मिती प्रकल्प उभारून त्याचा पुरवठा भारतीय लष्करी सेवेत दुर्गम भागात कार्यरत असलेल्या जवानांना करण्याचा मानस आहे.
युवकांना मिळाला रोजगार
अनिकेत यांच्या पोल्ट्री व्यवसायाने १५० ते १७५ जणांना रोजगार दिला आहे. त्यातील एक असलेले आशिष वामनराव बायस्कार (नरशिंगपूर) पुणे येथे नोकरीस होते. कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर ते गावी परतले.
त्यावेळी अनिकेत यांनी त्यांना अंड्यांची वाहतूक करण्याचे काम दिले. त्यासाठी भांडवल साह्य केले. वाहनाची खरेदी केली. आता बायस्कार यांच्याप्रमाणे अनेक युवकांना रोजगार मिळाला आहे. काही तरूणांना व्यवस्थापक म्हणून जबाबदारी मिळाली आहे.
व्यापारी, ग्राहकांची वर्दळ वाढल्याने बसस्थानकावर देखील उपाहारगृह, चहाचे ठेले लागले आहेत.
अनिकेत कोकाटे - ७२१८०१२१४१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.