Weather Technology : कोकणातील बागायतदारांना मिळणार हवामान तंत्रज्ञानावर आधारित सल्ला

हवामान केंद्राद्वारे उपलब्ध ‘डाटा’ व ‘फोरकास्टिंग मॉडेल्स’ यांच्या अनुषंगाने विश्‍लेषण होऊन त्या आधारित पीक व्यवस्थापन सल्ला बागायतदारांना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाद्वारे मिळणार आहे. त्याद्वारे अचूक, प्रभावी पीक व्यवस्थापन शक्य होणार आहे.
Weather Technology
Weather Technology Agrowon

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (BSKKV Dapoli) कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या (पुणे) संचालकपदी कार्यरत होते.

त्या वेळी हवामान केंद्रांची (Weather Station) उभारणी व हवामानावर आधारित द्राक्ष सल्ला (Weather Based Grape Advisory) ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. द्राक्ष बागायतदारांप्रमाणे कोकणातील बागायतदारांनाही (Farmers IN Konkan) फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी या तंत्रज्ञान (Weather Technology) निर्मिती व वापराला येथील कृषी विद्यापीठात चालना दिली आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानाची निर्मिती

डॉ. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने शेतकऱ्यांना परवडू शकेल अशा स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित हवामान केंद्र युनिटची निर्मिती केली आहे. त्यासाठीचे ‘इलेक्ट्रॉनिक’ भाग आणून त्याचे ‘डिझाईन’ (सर्किट डायग्रॅंम, मदर बोर्ड) येथेच केले.

सेन्सर्सचीही निवड केली. येथील अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. अतुल मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन पाल्टे (एमई- ‘इन्स्ट्र्यूमेंटेशन) तंत्रज्ञान निर्मितीत गुंतले आहेत.

या हवामान केंद्राची किंमत ११ हजार रुपयांपर्यंत आहे. ‘बल्क’मध्ये घेतल्यास ती आणखी कमी होऊ शकते. पाचहजार ते सात हजार रुपयांपर्यंत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, असा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

शेतकऱ्याच्या बागेत हवामान केंद्र

डॉ. मोहोड म्हणाले, की कोकण पट्ट्यात भारतीय हवामान खात्याची (आयमएमडी) हवामान केंद्रे तुलनेने कमी प्रमाणात असल्याचे डॉ. सावंत यांना जाणवले. संपूर्ण डोंगराळ आणि घाट असल्याने डोंगराच्या अलीकडे- पलीकडे तसेच तालुका- जिल्हा स्तरावरील वातावरणात खूप फरक पडतो.

त्यामुळे केवळ ‘आयएमडी’ च्या सल्ल्यावर अवलंबून राहाता येत नाही. यावर उपाय म्हणजे शेतकऱ्याच्या बागेत त्याचे वैयक्तीक हवामान केंद्र हवे.

Weather Technology
Weather Station : शेतकऱ्यांनी पर्जन्यमापक यंत्राला घातला पुष्पहार

तरच त्याला आपल्या बागेतील हवामानाचे घटक समजून त्यानुसार किडी-रोग वा एकूणच पीक व्यवस्थापन अचूक करता येईल. रात्र आणि दिवसांतील तापमान- आर्द्रता यातील फरक या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत.

त्यातील अचूकता वैयक्तीक हवामान केंद्रामुळेच समजू शकते. त्याचबरोबर मागील तीस वर्षांचा उपलब्ध तसेच हवामान केंद्राद्वारे मिळणारा रोजचा स्थानिक डाटा यांतील विश्‍लेषणही शास्त्रज्ञांना करता येणार आहे.

हवामान केंद्राची शिफारस यंदाच्या वर्षी झालेल्या जॉइंट ॲग्रेस्को परिषदेत या हवामान केंद्राची शिफारस झाली आहे. त्यामुळे त्याच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे.

Weather Technology
Konkan Kapila : पशुपालकांच्या सहयोगातूनच ‘कोकण कपिला’चा विकास

...असे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान

या यंत्रणेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कोकणात आंबा व काजू ही मुख्य पिके आहेत. आंब्यावरील करपा (ॲथ्रॅकनोज),

तुडतुडे (प्लॅंट हॉपर्स) व भुरी या मुख्य समस्या बागायतदारांना भेडसावतात. त्यांच्या नियंत्रणासाठी अचूक सल्ला देण्यासाठी हवामान केंद्रांचा प्रामुख्याने उपयोग होणार आहे. हे केंद्र बागेतील झाडाच्या कॅनॉपीमध्ये योग्य आधारावर ठेवणे शक्य होणार आहे. त्यातून स्टॅंडचा खर्च कमी होऊन केंद्राची किंमत कमी होऊ शकते.

हवामान केंद्राद्वारे तापमान, आर्द्रता, मातीतील ओलावा व तापमान या चार बाबींच्या अनुषंगाने ‘डाटा’ उपलब्ध होईल. तो शेतकऱ्याला मोबाईल ॲपवर मिळेल.

कृषी विद्यापीठातील ‘सर्व्हर’ लाही तो उपलब्ध होईल. विद्यापीठाने या किडी-रोगांच्या अनुषंगाने ‘फोरकास्टिंग माॅडेल्स’ तयार केली आहेत. हवामान केंद्राकडून सर्व्हरला आलेल्या डाटाचे शास्त्रीय विश्लेषण या ‘फोरकास्टिंग मॉडेल्स’द्वारे केले जाईल.

त्यावरून कोणत्या किडीची वा रोगाची तीव्रता वा धोका किती आहे, त्यावरून कोणत्या वेळी कोणते उपाय केले पाहिजेत आदी मार्गदर्शन या यंत्रणेद्वारे शेतकऱ्याच्या थेट मोबाईल ॲपला ऑटोमॅटिक पद्धतीने केले जाईल. हेच ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आहे.

महत्त्वाचे म्हणजे झाडाला पालवी किंवा फुलोरा केव्हा येणार याची पूर्वसूचनाही किमान सहा दिवस आधी देता येते. कारण या मुख्य किडी-रोगांचा प्रादुर्भाव पालवी वा फुलोरा अवस्थेतच होतो. त्यामुळे फवारणीची अचूक वेळ कळून अनावश्यक फवारण्या व त्यावरील खर्चात बचत होते.

बागेतील झाडाच्या वाढीची अवस्था, परिस्थिती, मागील केलेल्या फवारण्या, सद्यःस्थितीत कोणत्या रोग- किडीचा प्रादुर्भाव आहे का आदी प्रश्‍नांची विचारणा ‘ॲप’द्वारे शेतकऱ्यांना केली जाईल. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्लेषण होऊन त्यांच्यापर्यंत अचूक सल्ला यंत्रणेद्वारे पुरवला जाईल.

त्यामुळे सरसकट एकच सामुहिक सल्ला शेतकऱ्यांना देण्याची गरज पडणार नाही. त्याऐवजी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या बागेतील स्थितीनुसार (मायक्रो लेव्हल) वैयक्तिक अचूक सल्ला देता येणार आहे.

Weather Technology
Crop Advisory : वादळी वारे, पावसात पीक व्यवस्थापन कसं करालं?

बागायतदारांनी पुढे येण्याचे आवाहन

बागेत हवामान केंद्रे उभारण्यासाठी, तसेच तंत्रज्ञानाचे ‘फील्ड व्हॅलिडेशन’ होण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वेच्छेने पुढे येण्याची गरज आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बागेत हवामान केंद्रे उभी राहिल्यास अधिकाधिक डाटा उपलब्ध होण्यास मदत मिळेल,

त्याआधारे हवामानावर आधारित सल्ला-मार्गदर्शन तंत्रज्ञान अधिक प्रभावी, अचूक होण्यास मदत होईल. त्यासाठी पीक संरक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी व डॉ. मोहोड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.

Weather Technology
Climate Change : हवामान बदलास पूरक शेती पद्धतीचा अवलंब करावा

वेदर स्टेशनची वैशिष्ट्ये

-‘कस्टमाइज्ड’ पद्धतीने निर्मिती. (आपल्या गरजेनुसार विविध तंत्रांचा वापर.)

-मायक्रो कंट्रोलर, वाय फाय, ब्लू टूथ, अन्य ‘कम्युनिकेशन सुविधा.

-बॅटरी चार्ज करण्यासाठी ‘पॉवर सेक्शन’.

-जीएसएम मॉडेल. ज्याच्या नावावर सीम कार्ड आहे त्याच्या मोबाईल क्रमांकाचे नोंदणीकरण केले की ‘डाटा’ त्याला उपलब्ध होऊ शकतो. ‘एमएमएस’ पाठवण्याचीही सुविधा. बागेत ‘वायफाय’ सुविधा असल्यास सीम कार्डचीही गरज नाही.

- ‘यूजर नेम’ व ‘पासवर्ड’ची सुविधा. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यालाच वापर करता येईल.

(डाटा सुरक्षितता)

-ई- मेलला ‘डाटा’ पुरवण्याची सुविधा.

-दररोजचा ‘डाटा’ किती कालावधीने दिसायला हवा त्याचे ‘सेटिंग’ करता येते. त्यामुळे युनिट ‘स्लीपमोड’मध्ये नेण्याचीही सोय. त्यातून बॅटरीची ऊर्जा कमी खर्च होते.

-बागेत विजेची समस्या असल्यास सौरऊर्जेवर आधारित (सोलर पॉवर्ड) काम करण्याची सोय.

-बॅटरी बॅक अप. रात्रीही ‘रेकॉर्डिंग’ होऊ शकते. दोन ते अडीच दिवस ‘विनाबॅटरी चार्जिंग’ उपकरण काम करू शकते.

-सध्या चार सेन्सर्स. त्याद्वारे किमान, कमाल, सरासरी तापमान व आर्द्रता,

मातीचे तापमान व मातीचा ओलावा या बाबी मोजता येतात.

-'मल्टिपल सेन्सर्स’ ची सुविधा. विस्तारित (एक्स्पान्शन) पोर्टसही दिले आहेत.

भविष्यात ‘पर्जन्यमान’, वाऱ्याचा वेग, दिशा, ‘सोलर रेडिएशन’ आदी घटकांसाठीही सेन्सर्स समाविष्ट करण्याचे नियोजन. मात्र त्यामुळे उपकरण किमतीत वाढ होऊ शकते.

-संदेशवहन व्यवस्था सुरू आहे की नाही हे कळण्यासाठी बझर युनिट.

-उपकरणाला ‘स्टॅंड’. त्यामुळे कोठेही नेणे सोपे.

फ्राय, स्मोक आणि सुकवलेली मच्छी घ्या...

अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी विभागाने सागरी अन्नावर प्रक्रिया करणारे पोर्टेबल युनिट तयार केले आहे. ते संशोधन प्रक्रियेत असून प्रीती जे. ही विद्यार्थिनी त्यावर संशोधन करते आहे.

दापोली परिसरातील समुद्रकिनारे (बीचेस) प्रसिद्ध आहेत. येथील हर्णे बंदर माशांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. विविध प्रकारचे ताजे मासे खरेदी करण्यासाठी पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. त्यामुळेच या भागात अनेक ठिकाणी ‘मासे फ्राय करून मिळतील’ असे फलक दिसतात.

डॉ. मोहोड म्हणाले, की पर्यटक बीचवर दोन ते पाच किलो मच्छी खरेदी करतात. ती ‘फ्राय’ केल्यानंतर पूर्ण संपवावी लागते. सोबत नेता येत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर आम्ही तयार केलेले युनिट उपयोगी ठरणारे आहे.

त्याद्वारे पर्यटकांना माशांचे ‘कुकिंग, स्मोकिंग करून घेता येईल. शिल्लक ‘क्वांटिटी’ सोबत नेण्यासाठी सुकवण्याची सुविधाही आहे. पुढे दोन दिवस खाता येऊ शकेल. कुकिंगसाठी २० मिनिटे तर स्मोकिंगसाठी ३० ते ३५ मिनिटे लागतात.

सुकवण्याचा कालावधी मासा कोणत्या प्रकारचा आहे, किती काळ सुकवायचा त्यावर अवलंबून राहतो. ‘स्मोक’ केलेला मासा शक्यतो खराब होत नाही. हा व्यवसाय म्हणून सुरू करून स्थानिकांना त्यातून रोजगार निर्मिती करण्याची संधी आहे.

पाणी साठवा, पीक घ्या, वीजही तयार करा

पावसाचे पाणी साठवा, पीक उत्पादन घ्या, वीजही तयार करा अशा तिहेरी गोष्टींचा (पाणी, अन्न व ऊर्जा) फायदा एकाचवेळी देणाऱ्या तंत्रज्ञानावर या विभागाचे संशोधन सुरू आहे. स्नेहल डोंगरदिवे या प्रकल्पातील संशोधिका आहेत. यात चार बाय एक बाय एक मीटर खोल जलकुंड आहे.

त्यात चारहजार लिटरपर्यंत पावसाचे पाणी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) साठवता येते. सुमारे १२.५ चौरस मीटर आकारात शेडनेटमध्ये टोमॅटो व ढोबळी मिरची ही पिके घेतली आहेत. जलकुडांतून पाइपद्वारे पाणी आणून ठिबक सिंचन केले आहे. त्याआधारे पीक उत्पादन घ्यायचे.

तिसरा फायदा म्हणजे वीजनिर्मिती करण्यासाठी शेडनेटच्या वरच्या बाजूस प्रत्येकी तीनशे वॉटचे दोन सोलर पॅनेल्स (एकूण सहाशे वॉट) वापरले आहेत. सहा तास ऊन असेल तर तीन ते साडेतीन युनिट वीज त्यातून तयार होऊ शकते.

त्याआधारे पाणी उपसण्याचा पंप सुरू करता येतो. फवारणी पंपाची तसेच अन्य बॅटरी चार्ज करता येते. हवामान केंद्राच्या युनिटला वीज देता येते. या प्रयोगात शेडनेटमधील झाडांची वाढ एकसमान तसेच प्रति झाडाला पाच ते कमाल सात ते नऊ फळे मिळाल्याचे आढळले आहे.

ठळक बाबी

-सोलर पॅनेल्सचे तापमान सूर्यकिरणांमुळे आवश्‍यकतेपेक्षा जास्त वाढल्यास त्यांची कार्यक्षमता घटते. हे लक्षात घेऊन पॅनेल बसविण्याची विशिष्ट रचना.

-सोलर पॅनेलची सावली पिकांवर येऊन प्रकाश संश्‍लेषण क्रियेत बाधा येणार नाही अशा पद्धतीने पॅनेलला ॲगल.

-शेडनेट व पॅनेलमुळे खर्चात वाढ होऊ शकते. मात्र ती एकदाच केलेली गुंतवणूक असते. पुढे जाऊन अतिरिक्त झालेली वीज विकताही येऊ शकते.

टीप- दोन्ही तंत्रज्ञाने अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या स्थळी प्रात्यक्षिक (डेमो) म्हणून पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

संपर्क-

डॉ. मकरंद जोशी, ९४२२३९२२३८

डॉ. अतुल मोहोड, ९४२२५४६९०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com