Agriculture Innovation Center
Agriculture Innovation CenterAgrowon

विद्यार्थी, शेतकऱ्यांसाठी `कोनोव्हेशन'

दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे ‘नॅशनल ॲग्रिकल्चर हायर एज्युकेशन प्रोग्रॅम' (नाहेप) या प्रकल्पाची सुरवात झाली. या अंतर्गत ‘कोनोव्हेशन सेंटर' देखील कार्यरत आहे. विद्यार्थांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि त्यांच्या संकल्पनांना ‘स्टार्ट अप' मध्ये रूपांतर करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

नवनिर्मितीसाठी प्रत्येकाकडे विविध संकल्पना असतात. या संकल्पना तातडीने प्रत्यक्षात येणार नसल्या तरी त्यातून नवनिर्मितीला चालना मिळते,उपाय शोधण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन कृषी क्षेत्रातील नव्या संकल्पनांना चालना देण्यासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे ‘नॅशनल ॲग्रिकल्चर हायर एज्युकेशन प्रोग्रॅम' (नाहेप) या प्रकल्पाची सुरवात झाली. या अंतर्गत ‘कोनोव्हेशन सेंटर' (कोकण इनोव्हेशन सेंटर) सुरू झाले आहे. पहिल्या टप्यात दापोली कृषी विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी, तज्ज्ञ आणि विविध विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सेंटरमध्ये आपल्या संकल्पना मांडण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.

याबाबत प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ.प्रशांत बोडके म्हणाले की, गेल्या नोव्हेंबर महिन्यात विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत आणि अधिष्ठाता डॉ. सतीश नारखेडे यांच्या पुढाकारातून ‘नाहेप' प्रकल्पाला दिशा मिळाली. सध्या कृषी विद्यापीठातील विद्यार्थी, तज्ज्ञ आणि विविध विभागातील कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या संकल्पना ‘कोनोव्हेशन' मध्ये नोंद होतात. या सेंटर सोबत देशभरातील विविध कृषी उद्योगसमूह विद्यापीठाशी जोडले जात आहेत. यातून विद्यार्थांना कृषी आणि संलग्न व्यवसायातील नवीन तंत्रज्ञानाची ओळख होत आहे. पीक उत्पादन, पूरक उद्योग, प्रक्रिया उद्योगापासून ते विक्री पर्यंतचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. तसेच कृषी क्षेत्रातील ‘स्टार्ट अप' साठी पुढाकार घेतला आहे.

दरवर्षी चतुर्थ वर्षांचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातून विविध खेडेगावात जातात. हे विद्यार्थी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणी तसेच यावर शोधलेल्या उपाययोजनांची नोंद सेंटरमध्ये करतात. ही माहिती संबंधित विषयातील तज्ज्ञांच्याकडे पोहोचविली जाते. या उपक्रमामध्ये आम्ही विद्यापीठाच्या माजी विद्यार्थांना सहभागी करून घेतले आहे. विविध संकल्पना नोंदविण्यासाठी संकेतस्थळ (idpdapoli.in ) तयार केले आहे.

‘ग्रीन ॲण्ड ड्रीम कॅंपस' संकल्पना ः

‘कोनोव्हेशन' सेंटरच्या माध्यमातून विघटनशील तसेच अविघटनशील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून प्रदूषणमुक्त कॅंपस आराखडा विद्यार्थांनी तयार केला आहे. याबाबत डॉ. विनायक पाटील म्हणाले की, कृषी विद्यापीठ, वसतिगृहाचा परिसर तसेच संशोधन प्रक्षेत्र स्वच्छता तसेच प्लॅस्टिक कचरा निर्मूलनाच्यादृष्टीने वीस संकल्पना विद्यार्थांनी सेंटरमध्ये जमा केल्या आहेत. त्यातील व्यवहार्य संकल्पनांवर विचार करून त्या प्रत्यक्षात आणण्यास सुरवात होत आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध विभागाच्या इमारती आहेत. या इमारतीवर पावसाळ्यात जमा होणारे पाणी गोळा करून (रूफ वॉटर हार्वेस्टिंग) त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. हे सर्व पाणी मध्यवर्ती शेततळ्यास सोडून त्यामध्ये मत्स्यपालन केले जाणार आहे. शेततळ्यातील पाणी कॅंपसमधील झाडांना पुरविले जाणार आहे. अशा प्रकारच्या विविध संकल्पना सेंटरकडे जमा होत आहेत. त्यावर विद्यार्थी आणि तज्ज्ञ एकत्रितपणे काम करत आहेत.

डिजिटल प्रणालीचा वापरः

कृषी, उद्यानविद्या,वनशास्त्र, कृषी अभियांत्रिकी आणि मत्स्यपालनातील शिक्षणावर आमच्या सेंटरच्या माध्यमातून विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यासंबंधी डॉ. अतूल मोहोड म्हणाले की,पहिल्या टप्यात खासगी संस्थेच्या माध्यमातून मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थांना मत्स्यपालनातील विविध विषय सोप्या पद्धतीने समजण्यासाठी शैक्षणिक मॉड्यूल तयार करण्यात येत आहेत.

उदाहरण सांगायचे झाले तर, रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयासाठी आम्ही विविध माशांच्या प्रजातींची ॲनॉटॉमी रचना डिजिटल पद्धतीने समजाऊन सांगण्यासाठी प्रणाली विकसित करत आहोत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून टप्याटप्याने सर्व विभागांच्या विषयातील संकल्पना या प्रणालीच्या माध्यमातून विकसित होतील.

परदेशी भाषेसाठी ‘लॅग्वेज लॅब' ः

सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देणारी लॅग्वेज लॅब' सुरू झाली आहे. याबाबत डॉ.संतोष सावर्डेकर म्हणाले की, विद्यार्थी, तज्ज्ञांना इंग्रजी,जर्मन ही भाषा शिकवली जात आहे. लॅबचा फायदा परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसेच तज्ज्ञांना होईल. यासाठी आम्ही परदेशातील विद्यापिठांसोबत करार केला आहे. सध्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी ५०० विद्यार्थी आणि १०० स्टाफ मेंबर्सनी नोंद केली आहे.

मुलांनो, संकल्पना मांडा ः

विद्यापीठाच्या ड्रीम कॅंपस अंतर्गत ‘आयडिया लॅब' सुरू झाली आहे. याबाबत डॉ. बोडके म्हणाले की, विद्यार्थांना संकल्पना मांडण्यासाठी प्रोत्साहित करणे, कृषी तसेच पूरक उद्योगासाठी उपयुक्त संकल्पना मांडणे आणि त्यांना मूर्त स्वरूप देण्यावर आमचा भर आहे. विद्यार्थांनी नोंदविलेल्या संकल्पनांची निवड तज्ज्ञ समितीकडून केली जाते. यासाठी राष्ट्रीय नवनिर्माण संस्थेसोबत समन्वय साधला आहे.

विविध संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी थ्रीडी मॉडेल उपयोगी ठरते. यासाठी लॅबमध्ये थ्रीडी प्रिंटर आणि सॉफ्टवेअर आहे. यातून थ्रीडी इमेज, थ्रीडी मोल्ड तयार करण्याची सुविधा विद्यार्थांना उपलब्ध झाली आहे. लॅबमध्ये व्हर्चुअल रिॲलिटी (आभासी वास्तव) तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देण्यासाठी सिम्युलेशन मॉडेल तंत्रज्ञान आहे. उदाहरण द्यायचे झाले तर जनुकीय तंत्रज्ञान,ट्रॅक्टर, हार्वेस्टर कसा चालतो हे सिम्युलेशन मॉडेलच्या माध्यमातून पाहता येते. विविध कृषी तंत्रज्ञान, अभियांत्रिकी विषयातील मॉड्यूल येथे विकसित करण्यात येतील. त्याचा फायदा विद्यार्थांना विविध संकल्पना समजण्यासाठी होणार आहे.

शेतकऱ्यांच्या संशोधनाची दखल ः

ज्या शेतकऱ्यांनी शेती आणि पूरक उद्योगातील दैनंदिन अडचणीवर मात करण्यासाठी एखादे संशोधन केले असेल,तर त्याची नोंद ‘आयडिया लॅब' मध्ये सुरू आहे. विद्यापीठातील तज्ज्ञ या संशोधनावर अधिक अभ्यास करून त्यास तांत्रिकदृष्ट्या सक्षम करतील. या संशोधनाचे पेटंट संबंधित शेतकऱ्याला देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. राजेश ठोकळ यांनी दिली.

विद्यार्थांसाठी ‘स्मार्ट क्लास रूम‘ ः

‘नाहेप' सेंटरमध्ये ऑडिओ, व्हिडिओ तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून ‘स्मार्ट क्लासरूम' तयार केली आहे. या माध्यमातून देश, विदेशातील संस्था, कृषी विद्यापीठांशी जोडले जात आहे. विद्यापीठाने अमेरिका आणि ऑस्टेलियातील विद्यापिठांच्याबरोबरीने शैक्षणिक करार केला आहे. स्मार्ट क्लासरूम उपक्रमात कृषी आणि पूरक उद्योगातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या माध्यमातून विविध विषयांचे प्रशिक्षण उपलब्ध होत आहे.

कृषी शिक्षणासोबत कमोडिटी मार्केट, डिजिटल तंत्रज्ञान, प्रमाणीकरण आणि शेतीमाल निर्यात आदी विषय विद्यार्थांना अभ्यासता येणार आहेत. कृषी विद्यापीठातील विद्यार्थांना परदेशातील कृषी विद्यापीठात शिक्षणासाठी जाण्याची संधी उपलब्ध होईल तसेच परदेशातील विद्यार्थी दापोलीमध्ये विशेष अभ्यासक्रमासाठी येतील. विद्यार्थांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना आकार, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी तयार करणे तसेच उद्योग समुहांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व तयार करण्यामध्ये प्रकल्पाचा मोठा वाटा असणार आहे, अशी माहिती डॉ.प्रशांत बोडके यांनी दिली.

संपर्क ः डॉ.प्रशांत बोडके, ८२७५२०११३०

‘‘ कृषी विद्यार्थांना नेहमीच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त ‘नाहेप' प्रकल्पातून माहिती तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर तसेच शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत आहोत. विद्यार्थांच्या संकल्पनांची नोंद घेण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त आहे. ‘कोनोव्हेशन'च्या माध्यमातून कृषी क्षेत्राबरोबर पूरक उद्योग, प्रक्रिया उद्योगातील ‘स्टार्ट अप'साठी आम्ही विद्यार्थांना प्रोत्साहन देत आहोत.‘‘
डॉ. संजय सावंत, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com