‘फिनिक्स’प्रमाणे घेतली राखेतून झेप!

पलूस (जि. सांगली) येथील राजाराम राडे यांनी कोणताही पूर्वानुभव नसताना धाडस करत तनिष्क ॲग्रो प्रोसेसिंग उद्योग सुरू केला. आज ‘फिनिक्स’ या ब्रॅंडअंतर्गत सुमारे २१ उत्पादने तयार केली जातात. त्याची विक्री व्यवस्थाही १२ जिल्ह्यांमध्ये उभारली आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत गेल्यामुळे मागणी सातत्याने वाढत आहे. त्यांनी ‘फिनिक्स’प्रमाणे अपयशाच्या राखेतून झेप घेतली आहे.
‘फिनिक्स’प्रमाणे घेतली राखेतून झेप!
Food ProcessingAgrowon

सांगली जिल्ह्यातील पलूस द्राक्ष उत्पादनातील आघाडीचे गाव. येथील राजाराम रामचंद्र राडे यांची एकत्रित कुटुंबाची दहा एकर शेती. प्रमुख पीक ऊस. वडील रामचंद्र, आई सौ. बाळाबाई आणि चुलते अप्पा यांच्या प्रयत्नांमुळे कुटुंब प्रगतिपथावर राहिले आहे. राजाराम यांचेही बी.ए.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर शेतीमध्ये लक्ष घालू लागते. मात्र त्यांच्या मनात स्वतःचा उद्योग असला पाहिजे, ही प्रेरणा होती.

वायनरी पार्कमुळे मिळाली दिशा
पलूस तालुक्यात द्राक्षाची शेती वाढत होती. या भागात वायनरी पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. २००३-०४ च्या दरम्यान, स्व. पतंगराव कदम उद्योगमंत्री असताना यासाठी पुढाकार घेतला. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये या प्रकल्पासाठी उद्योजकांना जागा उपलब्ध होऊ लागल्या. या वेळी राडे यांनी वायनरी उभी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा अभ्यासही सुरू केला. २००८ च्या दरम्यान याच परिसरात खासगी जागाही विकत घेतली. मात्र त्याच्या विक्रीतील व अन्य अडचणी लक्षात घेता हा प्रकल्प रद्द केला.

नव्या उद्योगाची उभारणी
वायनरी उद्योगात अडचणी आल्या, तरी आता राजाराम यांना एकूण उद्योगातच रस वाढला होता. त्यांनी टोमॅटो प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी म्हैसूर येथे सी.एफ.टी.आर.आय. येथे अन्नप्रक्रियेचे एक वर्षाचे प्रशिक्षणही घेतले. आवश्यक ते परवाने मिळवले. यात दोन वर्षे गेली. २०१० मध्ये सुमारे ८५ लाख रुपयांची गुंतवणूक करून टोमॅटो प्रक्रिया उद्योग सुरू केला. त्याविषयी बोलताना राजाराम राडे यांनी सांगितले, की प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करणेही तितकेच जिकिरीचे असते. त्यातील बारकावे, छोट्या छोट्या अडचणी यातून पुढे जात दर्जेदार उत्पादने विकसित केली. सुरुवातीला ३०० किलो उत्पादन घेऊ लागलो. पुढे विक्रीचे आव्हान होतेच. एकवेळ उत्पादन करणे सोपे असते, पण नवीन उत्पादनासाठी बाजारात जम धरणे अवघड होते.
मग त्यासाठी धडपड सुरू झाली. आपला ग्राहक नेमका कोण, याचा विचार करताना त्यांच्या डोळ्यासमोर हॉटेल व्यावसायिक, त्यातही चायनीज अन्न तयार करणे व्यावसायिक उभे राहिले. यांना दररोज मोठ्या प्रमाणात टोमॅटो सॉस लागतो. सांगली जिल्ह्यातील प्रत्येक अशा सेंटरला भेट देत आपल्या सॉसविषयी माहिती दिली. मोफत सॅम्पल दिले. पुढे सातारा, पुणे, सोलापूरपर्यंत त्यांचे सॅम्पल पोहोचवले. त्यांच्याकडून फिडबॅक घेतला. त्यानुसार योग्य ते बदल केले. या लोकांकडून हळूहळू मागणी वाढत गेली.

मागणीनुसार चवीत केला बदल
लोकांकडून सातत्याने फिडबॅक घेतला. मागणीनुसार योग्य ती चव देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी रेसिपी बदलावी लागली. नव्याने प्रक्रिया बसवून, पुन्हा सॅम्पल देण्यात आले. कोणीही काही तक्रार केली तरी सकारात्मक वृत्तीने घेत बदल केले. त्याचा फायदा राजाराम यांना झाला. चव आणि दर्जा कायम राखला जात असल्याने प्रति दिन ३०० किलो उत्पादनापासून सुरू झालेला प्रवास आता दहा टनांपर्यंत पोहोचला आहे. ग्राहकांचा विश्‍वास वाढत गेला.

उद्योगाचा विस्तार
चायनीज सेंटरला टोमॅटो सॉसप्रमाणेच चिली सॉस, सोया सॉस ही उत्पादनेही लागतात. त्यांचेही उत्पादन सुरू केले. आता उद्योगाचा आणखी विस्तार करण्याचा ध्यास घेतला. २०१७ मध्ये मॅंगो पल्प या व्यवसायात उडी घेतली. त्यासाठी आवश्यक ती यंत्रे खरेदी केली.
त्यासाठी कच्चा म्हणजे पाडाचा आंबा रत्नागिरीत खरेदी करू लागले. रायपनिंग चेंबरमध्ये तो चांगला पिकवल्यानंतर त्यातील गर काढला जातो.

* व्यवसायास एकूण १२ वर्षे पूर्ण.
* आर्थिक उलाढाल प्रति महिना : ४० लाख रुपये.
* निव्वळ नफा : दीड ते दोन लाख रुपये.
* उत्पादने ः सॉसेस (५ प्रकारचे), जाम (२ प्रकारचे), टीन पॅकिंगमध्ये मॅंगो पल्प, टोमॅटो प्युरी, स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न अशी एकवीस उत्पादने.
* प्रति दिन उत्पादन क्षमता : १० ते १२ टन
* उत्पादन प्रति माह (सर्व प्रकारांचे) - २०० टन
* मागणीचा अंदाज घेत उत्पादन केले जाते.

गुंतवणूक ः
राजाराम यांनी या उद्योगासाठी सुमारे तीन कोटीची गुंतवणूक केली आहे. त्यातून शेड, विविध यंत्रे, साहित्य, कच्चा माल, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य आणि खेळते भांडवल अशी आर्थिक तरतूद केली.
यामध्ये दीड कोटी स्वः भांडवल असून, उर्वरित बॅंकेकडून कर्जाऊ घेतली आहे.
सर्व खर्च, हप्ते वजा जाता भविष्यातील विस्तारासाठी दरमहा ठरावीक रक्कम बाजूला ठेवली जाते.

कच्चा माल आणि विक्रीची व्यवस्था ः
* लागणारा कच्चा माल हा स्थानिक बाजारातून आणि शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी केला जातो.
* आंब्याची खरेदी रत्नागिरीहून करतात.
* उत्पादन व पॅकिंग प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकरणावर अधिक भर.
* अन्न सुरक्षिततेसंदर्भातील आवश्यक ते परवाने घेतली आहेत. उदा. एफएसएएसएआय.
* १२ जिल्ह्यांत विक्री व्यवस्था उभारली. आता जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत स्टॉकिस्टची नेमणूक केली आहे.
* युनिटमधील उत्पादनाची जबाबदारी प्राधान्याने पत्नी तेजस्विनी सांभाळतात. तर मार्केटिंगची जबाबदारी राजाराम स्वतः पाहतात.

वायनरीचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच अडखळल्यामुळे आत्मविश्‍वास खचला होता. त्या काळात सर्वांच्या प्रयत्नांतून उभारी धरली. प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले. त्यातून उत्साह वाढला. स्वतःचे मार्केटिंगचे कसब वापरल्याने ग्राहक मिळवणे शक्य झाले. दर्जा टिकवल्याने ग्राहकांचा विश्‍वास टिकू शकला. आता हा विश्‍वासच आम्हाला फिनिक्सप्रमाणे राखेतून झेप घ्यायला प्रेरणा देत आहे.
राजाराम राडे, ९८६०११९४९७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com