भाजीपाला पिकातून साधला समृद्धीचा मंत्र

नाशिक जिल्ह्यातील मुंगसे (ता. सटाणा) येथील मोठाभाऊ व विजय निकम ही भावंडे १२ वर्षांपासून शेती करत आहेत. मागील चार वर्षापासून पूर्वीची द्राक्षबाग कमी करत हंगामी पिकांचे नियोजन सुरू केले. आज त्यांच्याकडे खरीप व रब्बी हंगामात ५ ते ६ एकरांवर भाजीपाला असतो. या बहुपीक पद्धती आणि मागणी केंद्रित गुणवत्तापूर्ण पुरवठ्यामुळे आर्थिक भरभराट साधली आहे.
Vegetable
Vegetable Agrowon

मुरलीधर वामन निकम यांच्या वाट्याला वडिलोपार्जित अवघी ४ एकर कोरडवाहू जमीन आली. त्यातून उदरनिर्वाह अवघड होत असल्याने जोडधंदा किराणा दुकान चालवले, तर बायजाबाई यांनी शेळीपालन करत हातभार लावला. यातून कष्टाने एकेक पैसा जोडत त्यांनी १२ एकर शेती खरेदी केली. त्यांची मुले मोठाभाऊ हे पदवीधर, तर विजय हे बारावी उत्तीर्ण झाले.

साधारण २० वर्षांपूर्वी शेतीची सूत्रे मुलांकडे आली. २००४ मध्ये पीकबदल म्हणून १० एकरांवर डाळिंब लागवड केली. काही काळ चांगले उत्पादन मिळाले, तरी तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावामुळे २०१२ मध्ये ती उपटून टाकावी लागली. दरम्यान, मोठाभाऊ यांनी ट्रॅक्टर खरेदी करून भाडेतत्त्वावर मशागतीचा व्यवसाय सुरू केला.

हंगामामध्ये अविश्रांत मेहनत केली. अगदी मणक्याची एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे जड कामे करणे मुश्कील झाले. आता काय करायचं, हा प्रश्‍न उभा राहिला.

ट्रॅक्टर व्यवसायातून मिळवलेल्या ५ लाख रुपयांच्या कमाईतून द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये पिंगळवाडे येथील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्लोन-२’ या वाणाची एक एकरावर लागवड केली. पुढे बँकेच्या कर्जाच्या मदतीने टप्प्याटप्प्याने सुधाकर सीडलेस, थॉमसन, क्लोन-२ या वाणाची लागवड करत विस्तार ८ एकरापर्यंत नेला. दोन वर्षे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनही घेतले. मात्र पूर्वहंगामी द्राक्ष अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडे.

एकरी अवघे २ ते ३ टन माल हाती येई. कांद्यातून मिळालेले उत्पन्न द्राक्षासाठी खर्च होत असल्याने एकूणच उत्पादन खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसे. निराशा वाढत होती. मग दोघा भावंडांनी कुटुंबात एकत्र चर्चा केली. द्राक्ष बागा काढून नवीन पिकांकडे वळण्याचा निर्णय केला. २०१८ मध्ये द्राक्ष बाग काढली. हंगामी भाजीपाला पिकातून किमान दोन पिके घेता आल्यास धोका कमी होईल, हा विचार त्यामागे होता.

मागणीनुसार भाजीपाला उत्पादन :

द्राक्ष बागेचे स्ट्रक्चर शेतात उभे होते. त्याचे ॲंगल विक्री करून पैसे करण्याचा अनेकांनी सल्ला दिला तरी त्यावरच भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला. भाजीपाला लागवडीचा फारसा अनुभव नव्हता. या वेळी विजय यांचे मित्र मनोज भामरे, प्रवीण सोनवणे यांची मदत झाली. स्वतःही चांगल्या शेतकऱ्यांना भेटी देत माहिती घेतली. खरीप व उन्हाळी हंगामात वेगवेगळ्या ५ भाजीपाला पिकांच्या प्रत्येकी एक ते दीड एकरावर लागवड असते. लागवडीपूर्व प्रत्येक वाणाची निवड करताना रोग प्रतिकारकशक्ती, फळधारणा, उत्पादकता, टिकवणक्षमता आणि बाजारातील मागणी यांचा विचार केला जातो. त्यातून चुहा कारले, चकाकी व टिकवणक्षमता असलेले टोमॅटो वाण व हिरवी मिरची ही प्रमुख पिके झाली. पूर्वीपासूनच कांदा हे त्यांचे हुकमी पीक आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत असली, तरी गरजेनुसार पाणी विकत घेऊन पिके जगवतात. त्याचाही फायदा होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

शेती व वार्षिक पिके दृष्टिक्षेपात :

एकूण क्षेत्र...२२ एकर

पिके...क्षेत्र (एकर)

भाजीपाला पिके...१० (फेरपालट)

रब्बी उन्हाळी कांदा...१२

खरीप कांदा...४

मका...७

बाजरी, भुईमूग...१

भाजीपाला पिके क्षेत्र व लागवड काळ :

पीक...क्षेत्र...खरीप...उन्हाळी...सरासरी उत्पादन (टन)...तीन वर्षांतील सरासरी दर (रुपये प्रति किलो)

००...००...००...००...००...२०१९...२०२०...२०२१

काकडी...१.५... मे...फेब्रुवारी...३५ ते ४०...१२...१८...२१

कारले...१.५...सप्टेंबर...फेब्रुवारी...१५ ते १८...१६...१८...४५

टोमॅटो...१.५...जून...फेब्रुवारी...६० ते ६५...२५...४०...६

वाल...१...मे...फेब्रुवारी...५ ते ६...२०...२५...६०

हिरवी मिरची...१...जून...फेब्रुवारी...८ ते १०...३५...१०...४०

(चालू वर्षी दोडका, टरबूज, भोपळा लागवड प्रथमच केली आहे.)

उपलब्ध संसाधनांचा काटेकोर वापर आणि खर्चात बचत :

-कुटुंबातील सर्व सदस्य राबतात. मजुरी खर्चात वार्षिक ५० टक्के बचत.

-काढणीपश्चात दैनंदिन हाताळणी, प्रतवारी व पॅकिंग कुटुंबीयच करतात.

-शेतीसाठी आवश्यक बहुतांश सर्व अवजारे घेतली आहेत. कार्यक्षमता वाढली, खर्च वाचला.

-अत्याधुनिक फवारणीयंत्रामुळे वेगाने फवारण्या शक्य. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत फवारण्या करतात. त्यामुळे ६० हजार रुपये प्रति वर्षापर्यंत बचत.

आर्थिक प्रगती अन् शेतीची सुधारणा :

द्राक्ष, डाळिंब ही नगदी पिके असली तरी त्याचा उत्पादन खर्च जास्त (एकरी २ ते २.५ लाख रुपये) आहे. काहीही आपत्ती आल्यास त्यातून सावरणे अवघड होई. तुलनेने भाजीपाला पिकाचा उत्पादन खर्च खूप कमी आहे. एकापेक्षा अधिक पिके घेता येतात. फेरपालट करता येते. एकात नुकसान झाले, तर दुसऱ्यातून वसूल होते. या शेती उत्पन्नातून पुढील कामे करणे शक्य झाले.

-या भावंडांनी आजवर ६ एकर जमीन खरेदी केली.

-कांदा साठवणुकीसाठी ८ लाख रुपये खर्चून १ हजार क्विंटल क्षमतेची कांदाचाळ उभारली.

- या पिकात आंतरमशागत व अन्य कामांसाठी आवश्यक छोटा ट्रॅक्टर, त्याचे रोटाव्हेटर, टिलर, पल्टी नांगर, तर मशागतीसाठी वखर, आळवणीसाठी स्लरीगाडा, खत वाहतूक गाडा, ब्लोअर यांची हळूहळू खरेदी केली.

- ५ विहिरी खोदल्यामुळे बागायती क्षेत्र ४ एकरांवरून १५ एकरांवर नेले.

-भाजीपाला हाताळणी व प्रतवारीसाठी पॅकहाउस व वाहतुकीसाठी स्वमालकीची वाहतूक व्यवस्था केली.

बाजारपेठेचे आकलन महत्त्वाचे :

विजय सांगतात, ‘‘द्राक्ष पिकामुळे शास्त्रीय पद्धतीने शेती करायला शिकलो. त्यातील अनेक घटक आम्ही भाजीपाला पिकातही वापरतो. गरजेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेणे, तांत्रिक चर्चासत्रे, परिसंवादांना जाणे सुरू ठेवले. त्यातून शिकलेल्या बाबींचा पीक व्यवस्थापनामध्ये वापर करतो. विशेषतः बाजारपेठेतील मागणी, बाजारभाव यांचे अपडेट ठेवतात. व्यापाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक गुणवत्तेचा शेतीमाल थेट वाहनाद्वारे पाठवतो. प्रत्येक खरेदीदार व्यापारी आणि बाजारपेठेची मागणी वेगवेगळी असू शकते. त्यानुसार काढणीचे नियोजन करत कमाल हंगामी दर मिळवण्याचा प्रयत्न असतो. प्रामुख्याने गुजरातमध्ये सुरत, बडोदा, भरूच व राज्यात नंदुरबार व नवापूर बाजारात शेतमाल पाठवतो. विशेषतः बाजारातील तेजी मंदीचा अभ्यास करून काढणीवेळी कोणत्या पिकाला दर मिळतील, याचा अंदाज आम्ही घेत असतो. सोबतच उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न असतो. कारण १० ते ४० टक्के अधिक उत्पादन मिळाल्यास दर कमी झाले तरी ताण सहन करणे शक्य होते.

व्यवस्थापनात उत्पादन वाढ, श्रम बचतीला महत्त्व

-तणनियंत्रण व बाष्पीभवन रोखण्यासाठी मल्चिंग पेपरचे आच्छादन.

-शिफारशीत अंतरावर रोपे व झाडे राहतील, याची नियोजन. यामुळे लागवड थोडी विरळ वाटली तरी अनेक खर्च वाचतात. उत्पादन वाढते.

-जिवामृत निर्मिती व आळवणी.

-बाजारातील नवीन वाण, विद्राव्य खते यांचा परिणाम तपासूनच वापर.

-कीड-रोग नियंत्रणासाठी निरीक्षण करून प्रतिबंधात्मक फवारण्यांवर भर.

- मे महिन्यात टोमॅटो पिकाच्या फुलधारणा अवस्थेत साडी व नेटचे आच्छादन.

-ऑगस्टपासून साठवलेल्या कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री.

आर्थिक विनियोग काटकसरीनेच...

-जसा वडिलांनी काटकसरीने प्रपंच केला. पैसा वाचवून जमिनी घेतल्या. त्याच धर्तीवर दोन्ही भावंडाचे कामकाज सुरू आहे. वर्षाआड एक एकर शेती घ्यायची आणि ती विकसित करण्याचे धोरण आहे.

-लाखो रुपयांचे उत्पन्न येत असतानाही अजूनही जुनी मोटरसायकल व कार वापरतात.

-वार्षिक उत्पन्नातून आगामी वर्षाचा पीक व कुटुंबाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करतात. शेतीतही अनावश्यक खर्च टाळले जातात. तेवढी रक्कम बाजूला काढण्याचा प्रयत्न असतो. वार्षिक जमा खर्चाच्या नोंदी जपतात. त्यामुळे आर्थिक शिस्त जपली जाते. अगदी पीककर्जही काढावे लागत नाही.

-मुलांच्या शिक्षणावर भर असून, त्यांच्यासाठी चांगल्या शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत. ही मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक मानतात.

-वार्षिक ४५ ते ५० लाख उत्पन्न हाती येते. त्यात जवळपास ४० टक्के नफा मिळतो. यातून शेतीखरेदी, त्यात सुधारणा व सिंचन स्रोतांचे बळकटीकरण अशा अधिक उत्पन्नक्षम बाबीमध्ये अधिक गुंतवणूक.

-बाकीच्या भपक्यापेक्षा शेतीतच अधिक रस असल्याचे कुटुंबीय मानाने सांगतात.

शेतीत बदलाचे नियोजन :

वाढत्या तापमानात शेती शाश्‍वत करण्यासाठी संरक्षित शेती महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी पॉलिहाउस व शेडनेट प्रत्येकी २ एकर करण्याचे नियोजन सुरू आहे. कधीकधी मुलांमध्ये गाडी व नवीन घराबाबत आग्रह होत असला तरी त्यांना समजावतो. कारण शेती उत्पन्न देणारी असते. गाडी, बंगले म्हणजे नुसताच खर्च. मोठे बंगले बांधून त्याला नाव देण्यापेक्षा शेतीला ‘संघर्ष फार्म’ असे नाव दिले. ही आमच्या कुटुंबाच्या संघर्षातून उभारलेल्या वैभवाचीच खूण असल्याचे विजय सांगतात.

संपर्क : विजय निकम, ७८७५९३८८७१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com