डाके कुटुंबाच्या एकीतून तयार झालेला ‘रानमेवा’

श्रीगोंदा- दत्तवाडी (जि. नगर) येथील अत्यंत कष्टातून पुढे आलेल्या डाके कुटुंबाने घरातीलच शेतीमालावर प्रक्रिया करून लिंबू, लोणचीयुक्त उत्पादने निर्मिती सुरू केली आहे. रानमेवा या ब्रॅंडनेमने ऑनलाइन क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी तसेच स्थानिक वितरकांची बाजारपेठ मिळवली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कुटुंब या उद्योगात कार्यरत असल्याने उद्योगाला चांगली चालना मिळाली आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका लिंबू उत्पादनाचे (Lemon Production) आगार समजला जातो. तालुक्यातील बहुतांश गावांत प्रत्येक शेतकऱ्यांकडे लिंबाची बाग (Lemon Orchard) दिसून येते. श्रीगोंदा शहरालगत असलेल्या दत्तवाडी येथे संपतराव व चांगुणाबाई डाके यांचे कुटुंब आहे. त्यांचे पूत्र मारुती डाके यांनी शेतीत विविध प्रयोग केले. त्यांना २०१२ मध्ये ‘उद्यानपंडित’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. (Food Processing)

Food Processing
Food Processing: प्रक्रिया उद्योगासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एकत्रित कुटुंबाचा आदर्श

मारुती यांना पत्नी संगीता यांची समर्थ साथ आहे. त्यांना अक्षय व शीतल अशी दोन मुले आहेत. मारुती यांना बंधू खंडू व भावजय नंदाबाई यांचीही तेवढीच मोठी साथ मिळते. खंडू यांना शुभम व अभिजित ही मुले आहेत. एकत्रित कुटुंबाचा आदर्श असलेले हे कुटुंब मूळचे येथून जवळच असलेल्या मखरेवाडीचे. काही वर्षांपूर्वी त्यांनी दत्तवाडी परिसरात जमीन खरेदी केली. सध्या स्वतःची १५ एकर व नातेवाइकांची १४ एकर जमीन ते कसतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे आलेल्या डाके कुटुंबाने शेतीत आदर्श निर्माण केला आहे. पंचवीस वर्षापासून डाळिंब, लिंबू, भाजीपाला आदी पिके ते घेतात. सध्या पाच एकर डाळिंब, लिंबाची एक हजार झाडे, कापूस, गहू, आले, साधी व सिमला मिरची, हळद, लसूण अशी पिकांची विविधता त्यांच्याकडे आहे.

Food Processing
Food Grain : कमी पावसामुळे धान्य उत्पादन कमी होणार?

प्रक्रिया उद्योगाची सुरुवात

उत्पन्नवृद्धी, उद्योजकता विकास व महिला रोजगारनिर्मिती या हेतूने संगीताताई व मुलगी शीतल (सध्या विवाहित) यांनी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे ठरवले. श्रीगोंदा येथे एक महिन्याचे प्रशिक्षणही त्यासाठी घेतले. त्यानंतर आपल्या शेतात पिकणाऱ्या लिंबापासून लोणचे तयार करण्यास सुरुवात केली. विविध भागांतील प्रदर्शने, महोत्सवात हे लोणचे ठेवण्यास सुरुवात झाली. त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला.

कुठेतरी घडी बसत असतानाच कोरोनामुळे अडचण निर्माण झाली. पण कुटुंबाने धडपड थांबवली नाही. आज बीई (मेकॅनिकल) झालेल्या अक्षयने घरच्यांच्या साथीने उद्योगाची जबाबदारी सांभाळली आहे.

उद्योगाचे व्यवस्थापन

-आज लिंबाचे तीन प्रकार (साधे, मिरचीयुक्त व क्रश) तर मसाल्याचे तीन प्रकार (चिकन, मटण व ऑल इन वन) अशी उत्पादने तयार होतात.

-त्यासाठी मिरची, हळद, आले, लसूण या कच्च्या मालाचे उत्पादन घरच्या शेतातच होते.

गरजेनुसार कच्चा माल व अन्य साहित्य बाहेरूनही घेण्यात येते.

-दोन टनांपर्यंत लिंबू लोणचे, पाच क्विंटलपर्यंत कैरी लोणचे तर चारशे किलोपर्यंत मसाला तयार केला जातो. उत्पादन प्रकारानुसार १५ ग्रॅम, १२० ग्रॅम, १५०, २५० ग्रॅम ते एक किलोपर्यंत फूड ग्रेड पॅकिंग आहे. फूड सेफ्टी विभागाचा व अन्य आवश्‍यक परवाने घेतले आहेत.

-ग्राहकांची मागणी व बाजारपेठेतील संधी पाहून हळद पावडर, जवस चटणी, पुदिना पावडर निर्मितीही सुरू केली आहे. सोलापूर भागातून आणून ज्वारीच्या पोह्यांची विक्री १५० रुपये प्रति किलो दराने होते.

विक्री व बाजारपेठ

रानमेवा असे उत्पादनांचे ब्रॅण्डनेम तयार केले आहे. अक्षय फूड्स ग्रहउद्योग ही फर्म उत्पादन निर्मितीसाठी तर मार्कटिंगसाठी युराशी फूड्स ॲण्ड बिव्हरेजेस प्रा. लि. नावाने अधिकृत नोंदणी केली आहे.

सर्व उत्पादने ‘ॲमॅझॉन’ या ऑनलाइन विक्रीतील प्रसिद्ध कंपनीच्या माध्यमातून विक्रीस उपलब्ध केली आहेत. या कंपनीचे श्रीगोंदा येथे संकलित केंद्र आहे. तेथे पॅकिंग करून पुरवठा केला जातो.

शिवाय श्रीगोंदा येथे वितरकांचीही नेमणूक केली आहे. महिन्याला सुमारे एक लाख तर वर्षाला

खपली गव्हाची थेट विक्री

आरोग्याच्या दृष्टीने ‘खपली गव्हा’ला अलीकडे मागणी वाढली आहे. ती ओळखून डाके कुटुंबाने दोन वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीच्या वापरातून त्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. ८०, १०० ते १२० रुपये प्रति किलो दराने दोन वर्षांत ४० क्विंटलपेक्षा अधिक गव्हाची ऑनलाइन पद्धतीने विक्री यशस्वी केली आहे.

मदत व भांडवल

कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत प्रक्रिया उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दहा लाख रुपये अनुदान दिले जाते. यात मर्यादित यंत्रे- साहित्य देण्यासाठी ‘पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ राबवली जाते. डाके परिवाराची प्रक्रिया उद्योगातील धडपड पाहून या योजनेतून यंत्रे घेण्यासाठी कृषी विभागाने त्यांना हातभार लावला. उद्योग उभारणीसाठी सुमारे १२ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूक केली

आहे. त्यासाठी बॅंकेचे कर्जही घेतले. कृषी विभागाच्या मदतीने मसाले उत्पादने पॅकिंग यंत्र, दळण यंत्र, यासह अन्य साहित्य खरेदी करता आले. त्यामुळे उद्योगाला उभारी मिळाली. यात तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर व ‘आत्मा’चे तालुका समन्वयक नंदकिशोर घोडके यांची मदत मिळाली आहे.

शेततलावाने तारले

डाके कुटुंब पंचवीस वर्षांपासून डाळिंब घेतात. आता या भागात कुकडीचे पाणी उपलब्ध होते. मात्र पूर्वी पंचवीसपेक्षा अधिक विंधन विहिरी घेऊनही पाण्याची टंचाई होती. सन २०१२ मध्ये फलोत्पादन विभागाच्या मदतीने एक एकरांवर साडेतीन कोटी लिटर क्षमतेचा शेततलाव केला. त्या वर्षी चार एकरांत डाळिंब होते. त्या वेळी उन्हाळ्यात पाणी देऊन चांगले उत्पादन घेतले.

संपर्क ः अक्षय डाके, ९३७३०९६२९३

संगीता डाके, ७५८८६०३५५८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com