Horticulture
HorticultureAgrowon

Horticulture : बाजारपेठेचा अभ्यास, दर्जेदार उत्पादनावर भर

जळगाव शहरातील सुनील कवरलाल जैन यांनी प्लॅस्टिक उद्योग सांभाळून आवडीतून शेतीदेखील चांगल्या प्रकारे विकसित केली आहे. हरताळा (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील शिवारात जैन यांच्या शेतीमध्ये केळी, खरबूज, कलिंगड ही मुख्य पिके आहेत. बाजारपेठेचा अभ्यास, भागीदारांची साथ आणि दर्जेदार उत्पादनातून त्यांनी वेगळी ओळख तयार केली आहे.

सुनील जैन हे मूळचे पळासखेडा (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील आहे. तेथे त्यांच्या कुटुंबाची शेती होती. परंतु काही कारणाने पळासखेडा येथून जैन कुटुंबाला जळगाव येथे स्थलांतर करावे लागले. काही वर्षांपूर्वी जैन यांनी जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये चटई निर्मिती आणि इतर लघू उद्योग सुरू केला. जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरामध्ये त्यांचे वास्तव्य आहे. लघू उद्योगात बंधू संतोष, पुत्र नमित व समकीत यांची मदत होते. नमित हे चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) आहे. सुनील यांनी कौशल्य आणि सचोटीने चटई, प्लॅस्टिक उद्योगाचा यशस्वी विस्तार केला.

हा उद्योग करतानाच शेतीची आवड जोपासली जावी, शेतीत गुंतवणूक करून आपल्यासह इतरांना त्याचा लाभ मिळावा यासाठी जैन यांनी २००८ पासून जळगावपासून ४५ किमी अंतरावरील हरताळा (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) शिवारात टप्प्याटप्प्याने शेत जमीन घेण्यास सुरुवात केली. सध्या जैन कुटुंबाची ४२ एकर शेती आहे. या शेतीमध्ये सिंचनासाठी त्यांनी ओझरखेड प्रकल्पातून जलवाहिनी करून संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली आणली आहे.


...असे आहे पीक व्यवस्थापन

पीक नियोजनाबाबत सुनील जैन म्हणाले, की बाजारपेठेचा अभ्यास करूनच आम्ही पिकांचे नियोजन करतो. हरताळा येथील शिवारातील ४२ एकर शेतीमध्ये दरवर्षी १२ ते १५ एकरांत टप्प्याटप्प्याने केळीच्या उतिसंवर्धित रोपांची लागवड केली जाते. १५ ते २० हजार केळी रोपे दरवर्षी असतात. मृग बहरातील केळी आमच्याकडे आहे. पाण्याचा निचरा होणारी जमीन असल्याने जून ते ऑगस्ट यादरम्यान टप्प्याटप्प्याने साडेपाच बाय साडेपाच फूट अंतरावर केळी लागवड केली जाते. यापाठोपाठ मका, कांदा, कलिंगड या पिकांची लागवड असते. सर्व फळ पिकांची लागवड उंच गादीवाफा पद्धतीने केली जाते.

संपूर्ण क्षेत्र हे ठिबक सिंचनाखाली आहे. पिकामध्ये प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन केले जाते.
जैन यांनी केळी लागवडीपूर्वी प्रयोगशील शेतकरी तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. तसेच पीकवाढीच्या काळातदेखील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने खते, कीडनाशकांच्या योग्य वापरावर भर असतो. केळी पिकातील प्रयोगशील शेतकरी प्रशांत महाजन (तांदलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव) यांच्याकडून त्यांनी पीक व्यवस्थापनाचे वेळापत्रक तयार करून घेतले आहे. निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी जैन यांनी फ्रूटकेअर पद्धतीचा अवलंब केला आहे. यासाठी त्यांना केळीतज्ज्ञ के. बी. पाटील, तसेच डॉ. आर. एम. पाटील यांचे पहिल्यापासून मार्गदर्शन मिळत आहे.

Horticulture
एकीचे बळ, मिळते फळ; रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनीची भरारी

खरबूज, कलिंगडाचे दर्जेदार उत्पादन ः

केळी पिकाचे चांगल्या पद्धतीने नियोजन जमल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून सुनील जैन हे कलिंगड, खरबूज लागवडीकडे वळले. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने गेल्या उन्हाळ्यात जैन यांनी पाच एकरात कलिंगड तसेच खरबुजाची दीड एकरात लागवड केली होती. खरबुजाचे वेल उभ्या स्थितीत जावेत यासाठी बांबू, तारांचा आधार देत मंडप तयार केला. यामुळे फुले, फळांची जोमदार वाढ झाली. जमिनीशी थेट संपर्क न आल्याने डाग विरहित फळे मिळाली. त्यांचा रंग, दर्जा चांगला राखणे शक्य झाले. फूल गळही कमी झाली. वेलांची चांगली वाढ दिसून आली. पिकाचे अपेक्षित उत्पादनही मिळाले.
जैन यांनी दोन कंपन्यांच्या माध्यमातून खरबूज आणि कलिंगडाची देखील निर्यात केली. कलिंगडास सरासरी ८ ते १० रुपये प्रति किलो दर मिळाला. खरबुजास एका कंपनीने ७० रुपये आणि

दुसऱ्या कंपनीने ३० ते ४० रुपये प्रति किलो दर दिला. दर्जेदार उत्पादनामुळे या पिकातून त्यांना चांगला आर्थिक नफा मिळाला. पहिल्यापासूनच पीक व्यवस्थापनामध्ये काटेकोरपणा आणि निर्यातक्षम उत्पादनाचे ध्येय जैन यांनी ठेवले आहे. जैन यांना केळीची सरासरी २५ किलोची रास मिळते. कलिंगड एकरी २० टन आणि खरबूज एकरी १५ टन उत्पादनाची सरासरी त्यांनी गाठली आहे. यंदाच्या हंगामात पाच एकरांतील कलिंगडातून त्यांना पाच लाख, एक एकर खरबूज लागवडीतून अडीच लाख आणि केळी पिकातून एकरी एक लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. यंदा त्यांनी खरीप हंगामात चार एकरांवर कलिंगड लागवडीचे नियोजन केले आहे.

Horticulture
संडे फार्मर : अभियंत्याने दिली शेतीला पूरक उद्योगाची जोड

जमीन सुपीकतेकडे लक्ष

जमीन सुपीकतेच्या दृष्टीने जैन पीक फेरपालटीवर भर देतात. तसेच बेवडासाठी कांदा पीक घेतात. केळीसाठी नियोजित क्षेत्रामध्ये पुरेशा प्रमाणात शेणखताची मात्रा दिली जाते. केळी, कलिंगड आदी पिकांचे अवशेष अधिकाधिक जमिनीत गाडण्यावर त्यांचा भर असतो. यामुळे जमिनीचा पोत राखला जातो. रासायनिक खत आणि पाण्याच्या नियंत्रित वापरासंबंधी त्यांनी पीकनिहाय वेळापत्रक करून घेतले आहे. आंतरमशागतीसाठी पॉवर टिलरचा उपयोग केला जातो.

थेट विक्री आणि खरेदीदारांशी मैत्री ः

कलिंगड, केळी, खरबूज, मका आदी पिकांची थेट शेतातूनच विक्री करण्यावर जैन यांचा भर आहे. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून त्यांचा व्यापारी, खरेदीदारांशी चांगला संपर्क झाला आहे. निर्यातक्षम उत्पादनावर भर तसेच शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता असल्याने व्यापाऱ्यांना थेट शेतातून खरेदी करणे सोईचे झाले आहे. यामुळे वाहतूक, मजुरी खर्चासह वेळेची बचत होते. शिवाय दरही चांगले मिळतात. केळी, कलिंगड, खरबूज विक्रीसाठी जैन यांचा शेतीमाल खरेदी कंपनी, खरेदीदार, व्यवस्थापक, संचालकांशी परिचय आहे. एका फळपिकाच्या विक्रीसाठी जैन किमान चार ते पाच खरेदीदारांच्या संपर्कात असतात. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार केळी, कलिंगड पीक लागवड कालावधीदेखील ते निश्‍चित करतात. यामुळे दरांची काहीशी हमी त्यांना लागवडीच्या वेळेसच मिळून जाते.

भागीदारीने इतरांचाही विकास ः

शेती आपल्या एकट्याने सांभाळली जाणार नाही, हे लक्षात घेऊन सुनील जैन यांनी दोन शेतकरी कुटुंबांना भागीदारीने शेती करण्यासाठी तयार केले. या कुटुंबांची मेहनत, देखरेख, मजुरी, इतर किरकोळ खर्च आदी जबाबदारी असते. यापोटी या दोन्ही कुटुंबांना एकूण उत्पादनातील निम्मा हिस्सा सुनील देतात. यामुळे संबंधित कुटुंबीयांचाही चांगला आर्थिक विकास झाला आहे. सहयोगी शेतकरी कुटुंबांना जैन यांच्या शेती नियोजनातून आर्थिक बळ मिळाल्याने त्यांची घरे आणि इतर मालमत्ताही झाल्याचे सुनील सांगतात. जेवढा अधिक नफा तेवढा भागीदारांनाही चांगला लाभ होतो. भागीदारांकडूनच शेती मशागतीसाठी बैलजोडीची व्यवस्था करण्यात येते. भागीदारांचे कुटुंबीयदेखील या कामात समाधानी आहेत. बारमाही पाणी व्यवस्थापनामुळे शेतीमध्ये दररोज काम आणि खात्रीशीर नफा दिसू लागला आहे.

उच्चशिक्षित परिवार, सर्व कुटुंबाची मदत ः

सुनील व संतोष हे बंधू वाणिज्य विषयातील पदवीधर आहे. त्यांचे दोन्ही पुत्र वाणिज्य विषयातील पदवीधर आहेत. सून प्रतिमा नमित जैन सीए आहे. कन्या सिद्धी यादेखील वाणिज्य विषयातील शिक्षण मुंबई येथे घेत आहेत. शेती नियोजनात सुनील यांना पत्नी सुनीता यांची समर्थ साथ मिळते. तसेच बंधू संतोष हे कारखान्यातील प्रक्रिया, इतर व्यवस्थापन सांभाळतात. पुत्र समकीत हे विक्री व इतर व्यवस्थापन सांभाळतात. नमित हे अकाउंट, कर विषयक बाबींमध्ये मदत करतात. त्यामुळे सुनील यांना बऱ्यापैकी वेळ मिळत असल्याने शेती व्यवस्थापनावर ते अधिक लक्ष देतात.

शेती व्यवस्थापनाचे नियोजन ः

१) दर एक दिवसाआड शेतीचे व्यवस्थापन, कार्यवाही आदी बाबींची पाहणी. दर आठवड्याचे पीकनिहाय सिंचन, खते याबाबत ते भागीदारांना सूचना.
२) प्रयोगशील शेतकऱ्यांशी संपर्क वाढावा यासाठी रावेर, मुक्ताईनगर भागात शिवारफेरी.
३) दर वर्षी पीकनिहाय वार्षिक जमा-खर्चाच्या सर्व नोंदी. त्यानुसार क्षेत्र,नव्या पिकांची लागवड.
४) येत्या काळात यांत्रिक शेती तसेच अधिकाधिक क्षेत्र फळबागांखाली आणण्याचे नियोजन.

संपर्क ः सुनील जैन, ९४२२२८४४४९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com