Group Farming : ‘कृषी क्रांती’ घडविण्यासाठी कंपनीची पाऊलवाट

सोनेवाडी (जि. औरंगाबाद, ता. कन्नड) या दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गटशेतीचा प्रवास ‘कृषी क्रांती हायटेक ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’पर्यंत येऊन ठेपला आहे. ‘क्लीनिंग- ग्रेडिंग, पशुखाद्य निर्मिती, भाजीपाला वाळवणी यंत्र, बीजोत्पादन, विविध बियाण्यांचे विविध ब्रॅण्ड आदी वैविध्यपूर्ण उपक्रमातून गेल्या तीन वर्षांत एक कोटींहून अधिक उलाढाल कंपनीने केली आहे.
Krushi Kranti FPC
Krushi Kranti FPCAgrowon

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील सोनेवाडी हा दुर्गम व काहीसा आदिवासी (Tribal Farmer) असलेला भाग आहे. येथील कृष्णा पवार यांनी २००४-०५ मध्ये कृषी मित्र (Krushi Mitra) म्हणून कार्यरत असतानाच कृषी क्रांती शेतकरी बचत गटाची (Krushi Kranti Farmer Self Help Group) स्थापना केली. सुमारे १० वर्षांचा अनुभव घेतला. कन्नडचे तत्कालीन तहसीलदार प्रमोद मुळे व कृषी उपसंचालक उदय देवळाणकर यांच्या मार्गदर्शनातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापण्याचा विचार गटापुढे आला.

त्यातून परिसरातील दहा गावांमधून १५ शेतकरी गटाच्या समन्वयातून कृषी क्रांती हायटेक ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. संचालक म्हणून कृष्णा पवार यांच्यासह विनोद राठोड, योगिता दुधमल पवार, अल्ताफ युनूस कुरेश, भूषण प्रदीप जैन हे संचालकपदी आहेत. मंगेश गायकवाड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कंपनीशी जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव, सिल्लोड या तीन तालुक्‍यांसह लगतच्या चाळीसगाव तालुक्यासह (जि. जळगाव) ९० गावांतील पंधराशे शेतकरी जोडले गेले.

क्लीनिंग- ग्रेडिंग युनिट

सर्वप्रथम २०१५-१६ मध्ये कंपनीने धान्य स्वच्छता- प्रतवारी (क्लीनिंग- ग्रेडिंग) युनिट व गोदाम उभारले. ताशी दोन टन क्षमतेच्या या युनिटद्वारे ज्वारी, बाजरी, गहू, तूर, मका आदी विविध धान्यांवर प्रक्रिया होते. बाजारात प्रति क्‍विंटल १०० रुपये दर असताना कंपनीच्या सभासदांना ५० रुपये दराने प्रतिक्‍विंटल दराने सेवा दिली जाते. त्यातून सहा व्यक्‍तींना सहा महिने रोजगार मिळाला आहे.

Krushi Kranti FPC
FPC : शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करा

डाळीचा ‘जीवन’ ब्रॅण्ड

सन २०१६-१७ मध्ये कंपनीने मिनी डाळ मिल उभारली. प्रति दिन एक टन डाळनिर्मितीची क्षमता आहे. फेब्रुवारी ते जून काळात तूर, मूग, उडीद, हरभरा आदी डाळींचे एकूण ४० टनांपर्यंत उत्पादन होते. त्यातील ४० ते ५० टक्के डाळ जीवन ब्रॅंडखाली विकली जाते. उर्वरित डाळ शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात तयार करून दिली जाते.

पशुखाद्य निर्मिती

पंचक्रोशीतील पशुपालकांची गरज लक्षात घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत २०१७-१८ पशुखाद्य निर्मिती युनिट उभारले. लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत दराने खरेदी केला जातो. ‘किरण’ ब्रॅंन्डने त्याची विक्री होते. आठ महिने चालणाऱ्या व ताशी एक टन क्षमतेच्या या युनिटमधून महिन्याला १०० टन उत्पादन होते. स्थानिक पशुपालकांसह औरंगाबाद जिल्ह्यांसह चाळीसगाव (जि. जळगाव), नांदगाव (जि. नाशिक) आदी दूध डेअऱ्यांना विक्री होते.

Krushi Kranti FPC
Soybean Rate : सोयाबीन उत्पादकतेला सततच्या पावसाचा फटका

बीजोत्पादन व ब्रॅण्ड

केंद्र शासन प्रकल्पातून बीज साठवण गोदामासह आवश्‍यक यंत्रांची खरेदी करून कंपनी२०१८-१९ मध्ये बीजोत्पादनाकडे वळली. खरिपात १५० तर रब्बीत २०० पर्यंत शेतकरी या प्रक्रियेत सहभागी होतात. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरातमधील कृषी विद्यापीठांकडून त्यासाठी बियाणे घेतले जाते. विविध पिके व त्यांच्या विविध वाणांची विक्री विविध ब्रॅण्डने होते. उदा. तूर- रुची, हरभरा- सम्राट, गहू- सिंघम, मूग- समर्थ, उडीद- स्वामी, कांदा- ब्रह्मा.

यातील ठळक बाबी

-बियाण्याच्या गुणवत्तेशी तडजोड नाही.

-कांदा बीजोत्पादनासाठी कांदा आणि लसूण राष्ट्रीय संशोधन केंद्राशी करार.

-शेतकऱ्यांकडून करारानुसार ठरलेल्या दराने खरेदी.

-नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गेल्या वर्षीच्या खरीप व रब्बीत १२५ एकरांवर तर यंदा खरिपात १२० एकरांवर शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर व मुगाचे बियाणे मोफत दिले.

-रब्बीत १०० एकरांवर हरभरा बियाणे मोफत देण्याची योजना.

शेळी पैदास केंद्र

शेळीपालन हा दुर्गम भागातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा पूरक उद्योग आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे शेळीचे ‘ब्रीड’ मिळावे म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून २०२१-२२ शेळी पैदास केंद्र सुरू केले. सध्या उस्मानाबादी ४५ शेळ्या व पाच बोकड आहेत.

दोन एकरांवर मुरघास, सुबाभूळ, लसूण घास, दशरथ घास आदीची लागवड आहे. शेळीपालकांचा कल ओळखून जमनापूरी, बीटल, संगमनेरी, सिरोही आदी शेळ्यांचेही संगोपन सुरू असून, उत्तम पैदास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या १३५ पर्यंत शेळ्यांची संख्या झाली आहे.

भाजीपाला सुकवणी

कांदा, आले, टोमॅटो, हळद, लसूण आदींवर निर्जलीकरण करणारे सुकवणी युनिट सुरू केले आहे. एका कंपनीला मागणीनुसार उत्पादन व पुरवठा केला जातो. उन्हाळी हंगामभर चालणाऱ्या या केंद्रातून किमान २५ महिलांच्या हाताला काम मिळते. कंपनीच्या संचालक योगिता पवार युनिटच जबाबदारी सांभाळतात.

कंपनीविषयक ठळक बाबी

-नागद येथे कृषी सेवा केंद्र. सभासदांना वाजवी दरात निविष्ठांचा पुरवठा.

-एकूण उपक्रमांद्वारे तीन वर्षापासून एक कोटीपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल.

-हमीदराने शेतीमाल खरेदीतही तीन वर्षे सहभाग.

-राजमा पिकाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार करण्यासाठी प्रयत्न

-व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार गहू, ज्वारी, मका यांचा पॅकिंगद्वारे पुरवठा.

- ‘ॲग्रोवन’ने पुणे येथे अलीकडेच आयोजित केलेल्या शेतकरी कंपन्यांच्या परिषदेत कंपनीची निवड व सहभागही.

संपर्क ः कृष्णा (किरण) पवार, ९४२२७८१४४६, ९६०४७४२९५६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com