
झेंडेवाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) मधील २० महिलांनी एकत्र येऊन २०१४ मध्ये लक्ष्मी महिला बचत (Laxmi Women Self Group )आणि शेतकरी गट (Farmer Group) स्थापन केला. या गटाच्या माध्यमातून पहिल्या टप्यात लोणची (Pickel), चटणी (Chutney), पापड आदींचे उत्पादन आणि विक्री व्यवसाय सुरू होता. यासाठी नाबार्ड, कृषी विभागाचे प्रशिक्षण (Agriculture Department Training) आणि सहकार्य मिळत होते. बचत गटातून व्यवसायाचा आत्मविश्वास आल्यानंतर शेतकरी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्षा संगीता झेंडे यांनी सांगितले. कृषी विभागाचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे आणि स्मार्टचे अधिकारी दशरथ तांभाळे यांच्या मार्गदर्शनानुसार स्मार्ट प्रकल्पांतर्गत २०२० मध्ये पुरंदर लक्ष्मी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली.
सध्या कंपनीचे ३५० भागधारक सभासद असून, या कंपनीमार्फत फळे, इतर भाजीपाला प्रक्रिया करून शीतगृहाद्वारे साठवणूक करत विक्री व्यवस्था उभारली जात आहे. यासाठी प्राथमिक पातळीवरील तीन लाख रुपयांची फ्रोझन यंत्रणा आणि फ्रिज घेण्यात आला आहे. सध्या कंपनीच्या अध्यक्षा संगीता विठ्ठल झेंडे असून, सचिवपदाची जबाबदारी स्नेहल विशाल खटाटे यांच्याकडे आहे. संचालक मंडळामध्ये मनिषा सुखदेव खटाटे, रूपाली सचिन खटाटे, बायडा नामदेव झेंडे, जयश्री दत्तात्रय झेंडे, सारिका गोरख झेंडे, कविता सोमनाथ झेंडे, शोभा बाळासाहेब झेंडे, आरती राजेश झेंडे यांचा समावेश आहे.
कोरोना संकटाचे संधीत रूपांतर ः
साधारणपणे २०२० मध्ये शेतकरी कंपनीची स्थापन झाली. मात्र याच काळात कोरोनाचे संकट आले. यामुळे बाजारपेठा बंद होत्या. शेतकऱ्यांच्यापुढे शेतीमाल विक्रीचा प्रश्न उभा राहिला होता. नेमक्या याच काळात कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांकडून टोमॅटो, सीताफळ, वाटाणा खरेदी करून काही प्रमाणात प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. हा प्रयत्न सदस्यांना आत्मविश्वास देणारा ठरला. कोरोना काळात कंपनीने १५ लाख रुपयांचा व्यवसाय केला. यामध्ये सीताफळ पल्प ५ टन, आंबा फोडी १ टन, फ्रोझन वाटाणा २ टनांची विक्री स्थानिक बाजारपेठेत केली. पाच टन सीताफळ पल्प विक्री हैदराबाद येथील व्यापाऱ्याला करण्यात आली, असे कंपनीच्या सचिव स्नेहल खटाटे यांनी सांगितले.
प्रक्रिया केंद्राची उभारणी ः
सुमारे दोन कोटींच्या प्रकल्पामध्ये कंपनीला स्मार्ट प्रकल्पामधून ९७ लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. तर बॅंक ऑफ महाराष्ट्रद्वारे ५२ लाख आणि स्व हिस्सा १४ लाख रुपयांचा आहे. या निधीतून २० गुंठे क्षेत्रावर प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, नुकतेच बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी कृषी विभागाचे संचालक (आत्मा) दशरथ तांबाळे, कृषी विभागाचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, ‘नाबार्ड’चे अधिकारी सचिन कांबळे, रोहन मोरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक विजय कांबळे, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, मंडळ कृषी अधिकारी शेखर कांबळे उपस्थित होते.
प्रकल्प सुरू झाल्यानंतर विविध शेतीमाल प्रक्रिया आणि विक्रीसाठी ५० महिला आणि १० पुरुषांना रोजगार मिळणार आहे. यामध्ये महिला प्रक्रिया, पॅकिंग करणार आहेत. तर पुरुषांकडे शेतीमाल वाहतूक आणि विक्रीची जबाबदारी असणार आहे, असे अध्यक्षा झेंडे यांनी सांगितले.
३५० शेतकरी सभासदांची नोंदणी ः
पुरंदर तालुक्यात सीताफळ, वाटाणा, टोमॅटो, अंजीर, पेरू, चिकू, मका, मेथी, कोथिंबीर यांचे मोठे लागवड क्षेत्र आहे. कंपनीच्या सभासदांकडूनच शेतीमालाची खरेदी केली जाणार आहे. कंपनीमध्ये सध्या ३५० सभासदांची नोंद झाली आहे. या सर्व सभासदांचे विविध भाजीपाला लागवड क्षेत्र सुमारे ६०० एकरांचे आहे. कंपनीतर्फे प्राधान्याने परिसरातील शेतीमालावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्राथमिक प्रक्रिया केल्यावर ही उत्पादने उणे ३५ अंश सेल्सिअस तापमानाला गोठवून शीतगृहात साठविण्यात येणार आहे. यासाठी सध्या प्राथमिक यंत्रणा घेण्यात आल्या आहेत. नव्या प्रकल्पासाठी मोठ्या यंत्रणांची खरेदी सुरू झाली आहे. महिला कंपनीला फ्रोझन भाजीपाला प्रक्रियेमध्ये काम करावयाचे असल्याने शीतगृह आणि संबंधित तांत्रिक माहितीसाठी कंपनीच्या वतीने विठ्ठल झेंडे यांनी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर मधून शीतगृह उभारणी आणि व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
बचत गटाचे उपक्रम ः
२०१४ मध्ये लक्ष्मी महिला बचत आणि शेतकरी गटाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या टप्यात सभासदांनी टोमॅटो पल्प, लोणची, पापड निर्मितीवर भर दिला होता. त्यानंतर बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन गटाने सीताफळ पल्प निर्मितीला सुरुवात केली. सासवड परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून सीताफळांची खरेदी केली जाते. दर महिन्याला सरासरी ३ टन पल्प तयार केला जातो. गुजरात, हैदराबाद येथील व्यापारी हा पल्प १५० ते २०० रुपये प्रति किलो दराने खरेदी करतात.
गटातर्फे महिला सदस्यांना गाय, म्हैस, शेळी खरेदी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी कमी व्याज दरात आर्थिक मदत केली जाते. येत्या काळात कंपनीच्या माध्यमातून पशूपालनाला चालना देण्यात येणार आहे. फळे, भाजीपाला प्रक्रियेच्या बरोबरीने दूध डेअरी सुरू करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे, अशी माहिती संगीता झेंडे यांनी दिली.
संपर्क ः संगीता झेंडे, ९८८१२१३२५१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.