Success Story : शिरुर तालुक्यातील नंदा भुजबळ यांनी पौष्टिक डाळींचा तयार केला ब्रॅण्ड

Pulses Process : शिक्रापूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथील नंदा पांडुरंग भुजबळ यांनी अवघ्या बाराशे रुपयांमध्ये घरगुती स्वरूपात डाळ प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. डाळींचे विविध प्रकार आणि गुणवत्तेमुळे देश-परदेशातील ग्राहकांकडून मागणी मिळू लागली.
Success Story
Success StoryAgrowon

Pulses Processing Business : शिक्रापूर (जि. पुणे)सारख्या कोरडवाहू गावात अंगणवाडी सेविकेची नोकरी सांभाळून नंदा भुजबळ या कुटुंबाची चार एकर शेती पतीसह कसत होत्या. कोरडवाहू शेतीतून फारसे काही उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी नोकरी सोडून काहीतरी व्यवसाय करण्याचा विचार करत होत्या.

२०१० मध्ये व्यवसायासाठी परिसरातील चार महिलांना सोबत घेऊन अवघ्या बाराशे रुपयांमध्ये घरगुती जात्यावर कडधान्ये भरडून डाळनिर्मिती उद्योगाला सुरुवात केली. डाळनिर्मिती व्यवसाय वाढीसाठी त्यांनी महिला बचत गट स्थापन केला. पाच वर्षांपूर्वी ‘आत्मा’अंतर्गत २५ महिलांना एकत्र करून सेंद्रिय बचत गटाला देखील सुरुवात केली.

सेंद्रिय शेती प्रशिक्षणासाठी ‘आत्मा’चे तत्कालीन संचालक सुनील बोरकर, अविनाश निर्मल यांचे सहकार्य लाभले. बियाणे, खतांसाठी अनुदान मिळाले. याचबरोबरीने महिलांनी सेंद्रिय खताच्या उपलब्धतेसाठी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला देखील सुरुवात केली. प्रशिक्षणानंतर गटातील काही महिलांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली.

काही महिलांनी आठवडे बाजारात भाजीपाला, मसाले, पापडाच्या विक्रीस सुरुवात केली. बचत गटांच्या माध्यमातून सदस्यांनी बंगळूर, जयपूर, म्हैसूर, नागपूर, कोल्हापूर, पुणे, बारामती या ठिकाणी अन्न प्रक्रिया, विपणन, सेंद्रिय शेती आणि गोवंश संवर्धनाबाबत प्रशिक्षणदेखील घेतले आहे.

Success Story
Dal Mill Business : कमी भांडवलावर उभारा डाळ प्रक्रिया उद्योग

जमीन सुपीकतेवर भर

बचत गटातून विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतल्यानंतर नंदाताईंनी स्वतःची शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढाविसाठी धैंचा, ताग लागवड केली. सेंद्रिय खताच्या उपलब्धतेसाठी गांडूळ खतनिर्मितीचे दोन युनिट उभारले. दोन गाईंच्या शेण- मूत्रापासून जिवामृत निर्मितीवर भर दिला.

आत्माअंतर्गतही जैविक खतांची उपलब्धता झाली. पुरेशा प्रमाणात सेंद्रिय निविष्ठांच्या वापरातून त्यांनी रासायनिक खतांचा वापर बंद केला. प्रामुख्याने त्यांनी तीळ आणि कडधान्ये उत्पादनावर भर दिला आहे. नंदाताईंनी उत्पादित कडधान्यांवर प्रक्रिया करून डाळ निर्मिती करतात.

स्थानिक प्रदर्शन ते थेट दुबई मार्केट

राज्यभरातील महिला बचत गटांच्या विविध प्रदर्शनात सहभागी झाल्यानंतर नंदाताईंचा विविध भागांतील महिला गट आणि ग्राहकांशी संपर्क वाढला. पुणे शहरातील साखर संकुल, कृषी विभाग, जिल्हा परिषद, भीमथडी जत्रा आदि प्रदर्शनांमधून सात्त्विक डाळींचा ग्राहकवर्ग तयार झाला.

या दरम्यान नंदाताईंना १४ जानेवारी २०१३ मध्ये ‘झेप उद्योगिनींची’ या संस्थेमार्फत दुबईमधील महिला उद्योजकांच्या प्रदर्शनामध्ये जाण्याची संधी मिळाली. या प्रदर्शनामध्ये त्यांनी विविध डाळींची उत्पादने सादर केली. यामुळे थेट दुबईतून भारतीय ग्राहकांकडून मागणी वाढू लागली आहे. नोकरी व्यवसायानिमित्त दुबईत स्थायिक झालेल्या भारतीयांकडून आणि विशेषतः पुणे, मुंबई येथील ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

हे ग्राहक पुणे, मुंबईत आल्यावर डाळींची खरेदी करतात. परदेशी ग्राहकांचा व्हॉट्‍सॲप ग्रुप केला असून, त्यांच्या माध्यमातून डाळींची विक्री केली जाते. दुबई येथे गेल्यानंतर अनेकांनी नंदाताईंच्या डाळनिर्मिती व्यवसायाची प्रशंसा केली. येथील उद्योजकाने एक कंटेनर डाळीची मागणी केली होती, परंतु तेवढे उत्पादन हाती नव्हते.

परंतु येत्या काळात दुबई बाजारपेठेत एक कंटेनर डाळ निर्यातीचे त्यांनी लक्ष ठेवले आहे. डाळ प्रक्रिया आणि वितरण व्यवस्थेमध्ये नंदाताईंना पती पांडुरंग, तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली साथ मिळाली आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक महिलांनी त्यांच्या प्रकल्पास भेट दिली आहे.

मुलांना दिले उच्च शिक्षण

डाळनिर्मिती व्यवसाय सांभाळत नंदाताईंनी मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. मोठी मुलगी तेजश्री जगताप प्रिंटिंग व्यवसायामध्ये, दुसरी मुलगी धनश्री झगडे ही महावितरणमध्ये अभियंता आहे. मुलगा दीपक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झाला असून, एमबीए शिक्षणासाठी अमेरिकेस चालला आहे.

ब्रॅण्डद्वारे मॉलमध्ये विक्री

- डाळ, तांदूळ आणि कडधान्यांची ‘श्री बालाजी एंटरप्रायजेस’ ब्रॅण्डद्वारे घाऊक विक्री.

- बारामती, नाशिक, मुंबई, ठाणे, ऐरोली, लातूर, औरंगाबाद येथील मॉल्समध्ये विक्री.

- तूरडाळ १४० रुपये, मूगडाळ १४० रुपये, उडीदडाळ १३० रुपये, हरभराडाळ १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री.

- ग्राहकांच्या मागणीनुसार लोकवन गहू, सरबती गहू, खपली गहू, गावरान कडधान्ये तसेच इंद्रायणी तांदळाची खरेदी करून विक्री.

डाळ मिल उद्योगात प्रगती

- ‘स्टार्ट अप इंडिया’ योजनेतून १३ लाखांचे कर्ज. डाळ मिलमध्ये २५ लाखांची गुंतवणूक.

- पॅकिंग, प्रतवारी यंत्राची खरेदी.

- डाळींच्या वाहतुकीसाठी आत्मा अंतर्गत चारचाकी वाहन खरेदी.

- डाळीचे पॉलिश केले जात नसल्याने पौष्टिकता टिकून, ग्राहकांची पसंती.

- उद्योगातून परिसरातील २५ महिलांना रोजगार.

- वार्षिक उलाढाल सुमारे ५० लाखांपर्यंत.

Success Story
Tur Processing Industry : शेतकरी कंपनीची डाळ उद्योगात गगन भरारी

पुरस्कारांनी गौरव

- ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती तर्फे शारदा सन्मान पुरस्कार.

- पुणे जिल्हा परिषदेचा (२०२०-२०२१) कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार.

- ‘सीएआयटी‘तर्फे २०२३ चा आयकॉनिक वूमन पुरस्कार.

- ‘झेप उद्योगिनींची‘ संस्थेतर्फे दुबई येथे महिला रत्न पुरस्कार.

संपर्क - नंदा भुजबळ, ९६५७१४५०३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com