Flower Farming : चला फुलांच्या राज्यांत, निकमवाडीत

सातारा जिल्ह्यातील निकमवाडी या छोट्या गावाने फुलशेतीत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सर्वाधिक शेवंती, त्याचबरोबर झेंडू, पार्सली आदी एकूण मिळून सुमारे २०० एकरांवर क्षेत्र फुलशेतीत गुंतले असावे. दैनंदिन सुमारे ११ ते १२ टन एवढ्या प्रमाणात फुले गावातून बाजारपेठांना रवाना होत असावीत. या फुलशेतीतून गावातील कुटुंबांचे अर्थकारण चांगल्या प्रकारे उंचावले आहे.
Flower Farming
Flower Farming Agrowon

सातारा जिल्ह्यातील निकमवाडी (Nikamwadi Flower Village) (ता. वाई) हे एक हजार लोकसंख्या असलेले छोटेसे गाव असून, गावाची हद्द सातारा व वाई तालुक्यात आहे. किसनवीर सहकारी साखर कारखाना (Kisanveer Cooperative Sugar Factory) स्थळापासून पाच किलोमीटरवरील या गावात पाण्याची उपलब्धता (Water Availability) असल्याने मोठ्या प्रमाणात ऊस (Sugarcane), हळद (Turmeric) पिके घेतली जात. त्यास पर्याय म्हणून काही शेतकरी भाजीपाला पिके (Vegetable Crop) घेत. त्यामुळे पुणे व मुंबई येथील ‘मार्केट’ त्यांचे सतत जाणे असायचे. या निमित्ताने फुलांची मागणीही (Flower Demand) समजू लागली. मग अधिक विचार करून येथील शेतकऱ्यांनी फुलशेती (Flower Farming) करायचा निर्णय घेतला.

Flower Farming
Flower Market:गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील फुलबाजार फुलला

फुलशेतीला प्रारंभ

गावात तशी २००५ च्या आधी फुलशेती व्हायची. पण ती अल्प प्रमाणात होती. त्या काळात धर्मराज गणपत देवकर, संजय नारायण भोसले, विक्रम महादेव निकम आदींनी झेंडू लागवडीतून फुलशेतीचा विस्तार केला असे म्हणता येईल. अर्थकारण फायदेशीर ठरतेय असे वाटू लागल्यानंतर अन्य शेतकऱ्यांनी अनुकरण करण्यास सुरुवात केली. आजमितीला गावात ६० एकरांवर झेंडूचे क्षेत्र पोहोचले आहे. शंभरावर शेतकरी दरवर्षी हे पीक घेतात.

शेवंती, पार्सलीवर भर

निकमवाडीत आज फुलशेतीत सर्वाधिक भर शेवंती फुलावर आहे. दीडशेहून अधिक शेतकऱ्यांकडे व सुमारे ११० एकरांवर हे पीक असावे. सण, उत्सव या दृष्टीने आठ ते दहा प्रकारच्या शेवंतीच्या वाणांची विविधता गावातील मळ्यांमध्ये दिसून येते. हार दररोज लागत असल्याने त्यांची मागणी कायम असते.

पार्सली हा परदेशी भाजीचा प्रकार आहे. निकमवाडीतील शेतकरी हारामध्येही त्याचा समावेश करतात.

सन २००७ मध्ये गावात या भाजीच्या लागवडीस सुरुवात झाली. आज सुमारे ३० एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र आहे.

Flower Farming
Flower Farming : पुष्पोत्पादनाला मिळणार 'बुस्टर'

गावातील फुलशेतीबाबत ठळक बाबी

-वर्षभर विविध हंगामांत झेंडूची लागवड. पॉली मल्चिंग पेपरचा त्यासाठी वापर.

-स्थानिक नर्सरीतून रोपांची दोन ते साडेतीन रुपये प्रतिरोप दराने खरेदी.

-शेवंतीसाठी मार्च महिन्याचा लागवड हंगाम. वाणनिहाय ९० ते १५० दिवसांपासून फुले येण्यास सुरुवात. सुमारे चार महिने बहर सुरू राहतो. बंगळूरहून प्रति रोप तीन रुपयांप्रमाणे रोपांची खरेदी.

-पार्सलीची प्रत्येक शेतकऱ्यांकडे पाच ते दहा गुंठे क्षेत्रावर लागवड. एक ते दी़ड महिन्यात उत्पादन सुरू.

सुमारे सात महिने ते सुरू राहाते. पेंडी बांधून क्रेटमधून ती ‘मार्केट’ला पाठवली जाते.

-फुलशेतीस कृषी विभाग व कृषी सहायक व्ही एस वराळे यांचे मार्गदर्शन.

-गावातील तरुणांना फुलशेती शाश्‍वत वाटल्याने ८० टक्के कुटुंबे फुलशेतीत आहेत.

-गावात मालवाहतुकीसाठी खरेदी केलेली दहा वाहने गावात पाहायला मिळतात. दैनंदिन सुमारे ११ ते १२ टन एवढ्या प्रमाणात फुले गावातून बाजारपेठांना रवाना होत असावीत.

-या शेतीतून अनेक तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे.

-बहुतांशी कुटुंबात महिलांचे पाठबळ महत्त्वाचे मिळाले असल्याने मजुरांची कमरतता भासत नाही.

अर्थशास्त्र

गावातील शेतकऱ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात अर्थशास्त्र सांगायचे तर झेंडूस मशागत, लागवडीपासून ते फुले मार्केटला विक्रीला नेण्यापर्यंत ९० हजार ते एक लाखापर्यंत भांडवली खर्च येतो. एकरी सरासरी सहा ते नऊ टनांपर्यंत उत्पादन मिळते. वर्षभराचा सरासरी ३० ते ४० रुपये प्रति किलो दर गृहीत धरल्यास सुमारे दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. शेवंतीलाही हा खर्च दोन लाखांपर्यंतचा असतो. त्याचे एकरी ८ ते १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. वार्षिक किलोला सरासरी ६० ते ७० रुपये दर मिळतो. पार्सलीचा हा खर्च दीड लाखापर्यंत, तर एकरी लाख ते सव्वा लाख पेंड्या मिळतात. प्रति पेंडीस तीन रुपये दर मिळतो. गावातून दररोज फुलांच्या गाड्या भरून जात असल्याने पुणे व दादर ‘मार्केट’मध्ये गावाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. गोवा, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, पुणे, सोलापूर तसेच व्यापाऱ्यांच्या माध्यमातून परदेशातही फुले गेली असल्याचे येथील शेतकरी सांगतात. वर्षभर फुलांना मागणी व मिळत असलेल्या ताज्या उत्पन्नामुळे गावातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सक्षम होण्यास मदत झाली आहे.

संतोष देवकर, ९८८१९५३४४१

गावात २००५ पासून मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी फुलशेतीकडे वळण्यास सुरुवात झाली. सध्या गावातील ८० टक्के कुटुंबातील शेतकरी फुलशेतीत व्यस्त आहेत.
धर्मराज देवकर, ज्येष्ठ फूल उत्पादक
माझे फुलशेतीचे दीड एकर क्षेत्र असून अनेक वर्षांपासून या शेतीत आहे. त्याच जोरावर २० गुंठे क्षेत्र खरेदी केले असून, टुमदार घर बांधू शकलो आहे.
संतोष देवकर, फूल उत्पादक ९८८१९५३४४१
फुलशेतीच्या जोरावर तीन पिकअप वाहने घेतली. फुलशेतीबरोबरच या पूरक वाहतूक व्यवसायातूनही उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे.
विशाल निकम ९०११०३१७५६
फुलशेतीत घरातील सर्व सदस्य काम करतात. याच शेतीतून वाहतुकीसाठी दोन वाहने घेतली. दीड एकर शेती खरेदी केली. टुमदार बंगला बांधला.
संजय भोसले ९२२५८४९४०७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com