
सोलापूर- बार्शी महामार्गावर (Solapur Barshi Highway) शेळगाव (आर) हे साडेपाच हजार लोकसंख्येचं गाव. भौगोलिक क्षेत्र सुमारे पाच हजार एकरांपर्यंत विस्तारले आहे. त्यापैकी चार हजार एकरांवर शेती होते. गावच्या अगदी बाजूने वाहणारा हंगामी ओढा आणि लघुपाटबंधारे विभागाचा (Irrigation Department) गावाजवळचा तलाव (Lake) हे पाण्याचे खात्रीशीर स्रोत आहेत.
याच जोरावर पहिल्यापासून गाव शेतीमध्ये पुढे आहे. टोमॅटो (Tomato), सिमला मिरचीसह विविध प्रकारचा भाजीपाला (Vegetable) गावात होतो. वर्षातील बाराही महिने प्रतिदिन किमान १५ टन भाजीपाला शेळगावमधून बाजारात जातो. यामध्ये कांदा, भेंडी आणि पपईत गावाने चांगली आघाडी घेतली आहे. या पिकातील मास्टर शेतकरी या गावात आहेत.
विकासकामात आघाडीवर...
गावातील विकासकामांवर ग्रामपंचायतीचे विशेष लक्ष असते. सध्या गावातंर्गत रस्ते, दिवाबत्ती आणि पाण्याची चांगली सोय करण्यात आली आहे. प्रत्येक घरात शौचालय आहे. स्वच्छताही उत्तम आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाडीसाठी प्रशस्त अशी इमारत आणि खेळासाठी मैदान आहे. शाळेला आयएसओ मानांकन आहे. सर्वात जास्त आणि कमी वेळेत घरकुल उभारणीत महाआवास योजना २०२१-२२ साठी तालुकास्तरावरील पहिले बक्षीस गावाला मिळाले आहे.
बंगलोर बाजारपेठेत दिवसाला १२५ टन कांदा
खरिपात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. या हंगामात तब्बल एक हजार एकरावर सोयाबीन होते. सोयाबीननंतर रब्बीमध्ये कांदा लागवड केली जाते. कांद्याच्या लागवडी गादीवाफ्यावर होतात. तसेच ठिबक संचाचा हमखास वापर केला जातो. डिसेंबर-जानेवारीमध्ये काढणी सुरू होते.
साधारण ३५० हून अधिक शेतकऱ्यांकडून ९०० एकरांवर कांदा लागवड असते. यंदाही तेवढीच लागवड आहे. पुढे डिसेंबरपासून मेपर्यंत जवळपास सहा महिने कांद्याची काढणी सुरू असते. या कालावधीत गावातून दिवसाला १२५ टन कांदा थेट बेंगलोरच्या बाजारात जातो. या एकूण हंगामात एकट्या शेळगावमधून १२ हजार ५०० टन कांद्याची विक्री होते.
पुणे, मुंबईमध्ये पपई, भेंडी विक्री
आज शेळगावात सुमारे २५० एकरांवर पपई आहे. पपईच्या बाराही महिने लागवडी होतात. लागवडीनंतर सहा महिन्यांत उत्पादनाला सुरुवात होते. काही जिद्दी शेतकरी तब्बल दीड वर्षे उत्पादन घेतात. एका हंगामात एकरी सरासरी ६० टन उत्पादन मिळते. भेंडीचे क्षेत्र सुमारे ३०० एकरांपर्यंत आहे. एप्रिल-मेमध्ये भेंडी लागवड पूर्ण होते. लागवडीनंतर अवघ्या सव्वा महिन्यात उत्पादन सुरू होते. एक दिवसाआड तोडा होतो. या एका तोड्यात एकरी सरासरी ५०० किलो उत्पादन मिळते. त्याशिवाय टोमॅटो, सिमला मिरची यांसारख्या फळभाज्याही काही शेतकरी घेतात. पपई आणि भेंडीची विक्री पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत होते.
वर्षाकाठी नव्वद कोटी रुपयांची उलाढाल
कांद्याची एका हंगामात प्रतिदिन १२५ टन विक्री आणि सरासरी २००० रुपये दर गृहित धरल्यास गावाची उलाढाल सुमारे २५ ते ३० कोटी रुपये होते. भेंडीचे एका हंगामात किमान १५ टन उत्पादन घेतले जाते. भेंडीचा दर प्रतिकिलो १५ ते २० रुपये धरल्यास सुमारे १५ कोटी रुपये आणि पपईचेही सहा महिन्यांतील किमान उत्पादन १० टन आणि दर प्रतिकिलो १० रुपये गृहीत धरल्यास १५ कोटी रुपये आणि खरीपातील सोयाबीनच्या उत्पादनातून किमान ३५ कोटी रुपये या प्रमाणे सुमारे ९० कोटी रुपयांची उलाढाल केवळ या तीन पिकांतून होते.
जलयुक्त शिवारमुळे फायदा
शासनाच्या जलयुक्तशिवार योजनेमधून गावात शेतीच्या पाण्याच्या दृष्टीने दोन वर्षांपूर्वी मोठे काम झाले आहे. कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांचे साह्य यामध्ये मिळाले होते. गावातील सर्वांत मोठा आणि परिसरातील पाच-सात गावच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असणारा लघुपाटबंधारे तलाव दुरुस्त करण्यात आला. गावातील ओढ्यावर दहा बंधारे उभारण्यात आले. यामुळे गावातील विहिरी आणि कूपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ झाली. शेळगावमध्ये प्रयोगशील शेती विस्तारण्यात या प्रकल्पांचा मोठा हातभार आहे.
बियाणे,निविष्ठा विक्रीतून मोठी उलाढाल
दरवर्षी कांद्याच्या रोपासाठी जून-जुलैमध्ये तयारी केली जाते, याच महिन्यात कांद्याचे रोप शेतकरी टाकतात. शेळगाव (आर)मध्ये पाच कृषी विक्रेते आहेत. या दोन महिन्यांत साधारण या विक्रेत्यांकडून दोन टनांपर्यंत केवळ कांदा बियाणांची विक्री होते. तर भेंडीच्या २ क्विंटल बियाणाची विक्री होते. कांदा बियाणातून ४० लाख रुपये आणि भेंडीच्या बियाणातून १८ लाखांपर्यंतची उलाढाल होते.
आमच्या गावातील शेतकरी धाडसी आणि जिद्दी आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणारे, मार्केटचा अभ्यास करणारे आहेत. त्यांच्यामुळेच आज गावाची ओळख या पिकांमध्ये तयार झाली आहे.
-प्रकाश बादगुडे, सरपंच
मुख्यतः पाण्याचा शाश्वत स्रोत असल्याने आम्ही विविध पिकांची लागवड करतो. कांदा, भेंडी, पपई ही आमच्या गावाची प्रमुख पिके आहेत. केवळ उत्पादनच नव्हे, तर गुणवत्ता आणि एकरी उत्पादकताही चांगली आहे.
-विजय आडसूळ, प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य
मी पपई लागवड करतो. या पिकाचा खर्च कमी आहे. फळांना चांगला दर मिळत असल्याने किफायतशीर उत्पन्न मिळते.
-विष्णु गोडगे, शेतकरी
कांद्याला दर असो वा नसो, मी दरवर्षी कांदा करतोच. यंदा सहा एकरावर कांदा लागवड आहे. त्याशिवाय लिंबू, पपई लागवड आहे. कांदा पिकातून आम्हाला चांगला आर्थिक नफा मिळतो.
-प्रफुल्ल देवकर, शेतकरी
गेल्या दोन वर्षांपासून मी पपई करतो, सध्या माझ्याकडे दोन एकर पपई आहे. एकरी सरासरी ५० टन उत्पादन घेतो. दर चांगला मिळाल्यास खर्चवजा जाता एकरी दोन लाखांचा निव्वळ नफा मिळतो.
-शहाजी कचरे, शेतकरी
माझ्याकडे एक एकर भेंडी आहे. एका हंगामात सरासरी १५ टन उत्पादन मिळते. प्रतिकिलो १५ ते २० रुपयांचा दर मिळतो. एकरी मला दीड ते पावणेदोन लाखाचे उत्पन्न या पिकातून मिळाले आहे.
-प्रभाकर आडसूळ, शेतकरी, शेळगाव (आर)
प्रकाश बादगुडे ७४१४९६८११७ (सरपंच, शेळगाव (आर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.