Mango : आंबा नर्सरी व्यवसायाची शोधली नामी संधी

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील तरुणांनी केसर आंबा लागवडीचे वाढते क्षेत्र व रोपांची वाढती मागणी व संधी ओळखली. प्रशिक्षण, अनुभवातून त्यांनी कलम निर्मिती व्यवसायाला आकार देत आल्या रोपवाटिका नावारूपाला आणल्या आहेत. त्यातून घरादारासाठी आर्थिक सक्षम पर्याय उभा केला आहे.
Mango Nursery
Mango NurseryAgrowon

नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पेठ, त्र्यंबकेश्‍वर व सुरगाणा तालुक्यात भात (Paddy), नागली, वरई अशी जिरायती पिके होतात. अनेकांना खरीप हंगामानंतर (Kharif Season) रोजीरोटीसाठी स्थलांतर करावे लागे. मात्र गेल्या २५ वर्षांत कृषी विभाग (Agriculture Department), बायफ संस्था यांच्या माध्यमातून केसर आंबा लागवडीसाठी (Kesar Mango Cultivation) चालना मिळाली आहे. त्यातून जिल्ह्यात पाच हजार हेक्टरपर्यंत आंबा लागवडी (Mango Cultivation) विस्तारल्या आहेत. त्यात पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात क्षेत्र सर्वाधिक आहे. साहजिकच कलमांना असलेली मागणी व संधी लक्षात घेऊन या भागातील काही युवा शेतकरी रोपवाटिका (नर्सरी) उद्योगात उतरले आहेत. त्यातून कौटुंबिक अर्थव्यवस्था त्यांनी भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. या युवकांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) मार्गदर्शन व ‘रोपवाटिका व्यवस्थापन’ (Nursery Management) प्रशिक्षण मिळत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांनी केव्हीके तसेच शासकीय रोपवाटिकांमध्ये रोजंदारीवर काम करून रोपनिर्मिती तंत्र व कौशल्य आत्मसात केले आहे.

‘नर्सरी’ व्यवसाय झाला आधार

आंबा कलमांची वाढती मागणी ओळखून सुरवातीला जमापुंजीतून तीन-चार अनुभवी तरुणांनी भागीदारीत नर्सरी व्यवसाय सुरू केला. आता त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील निरगुडे, चीरापली, चिंचवड, साप्तेकोणे या गावांमध्ये कृषी विभाग मान्यताप्राप्त ‘आंबा फळ रोपवाटिका’ सुरू झाल्या आहेत. शासकीय परवान्यानुसार दरवर्षी पाच हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत रोपेनिर्मितीचे प्रयत्न होतात. सात ते आठ तरुण स्वतः रोपवाटिका संचालक झालेच शिवाय कुशल मनुष्यबळाला त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला. केव्हीके, कृषी विद्यापीठ व शासकीय रोपवाटीकांमधून मातृवृक्षांची उपलब्धता केली जाते. व्यवसायासाठी पॉली टनेल्स, शेडनेट यांची उभारणी तरूणांनी स्व भांडवलातून केली आहे. तांत्रिक निकषांनुसार कलम पट्टी, कात्री, प्रशिक्षित असे कुशल मनुष्यबळ त्यांच्याकडे आहे. केशरसह सिंधू, दशहरी, लंगडा या वाणांचीही रोपनिर्मिती होते.

Mango Nursery
Mango Man : कलीमउल्लाची कलमीकरणाची कला

...अशी होते रोपनिर्मिती

-मे, जूनमध्ये देशी आंब्यांच्या कोयींचे जंगलातून संकलन. गादीवाफ्यांवर त्यांची पेरणी.

-पाऊस झाल्यानंतर १५ ते २२ दिवसांची लाल पाने व हिरव्या देठाची रोपे उपटण्यात येतात.

-मातृवृक्षांवरून निरोगी व फुटवा होणारी काडी निवड पद्धतीने काढली जाते.

-कलम करण्यापूर्वी कोय रोपे व काडी बुरशीनाशक द्रावणात बुडविण्याची प्रक्रिया होते.

-काडीच्या खालील बाजूस चार ते सहा सें.मी. लांबीचे दोन तिरकस काप विरुद्ध बाजूला पाचरीसारखा आकार देऊन काडी कापात व्यवस्थित बसवली जाते. त्यांनतर कलमजोड पॉलिथिन पट्टीने घट्ट बांधला जातो.

-त्यानंतर कलमे पॉलिथिनच्या पिशवीत कोयींसह लावली जातात.

-काडीला फुटवा येण्यासाठी व पावसाळ्यात गारवा अधिक असल्याने तापमान २५ अंश से. नियंत्रित ठेवण्यासाठी रोपपिशव्या पॉलीटनेलमध्ये दोन महिने ठेवल्या जातात. रोपे एकजीव झाल्यानंतर कलम पट्टी सोडून रोपे शेडनेट मध्ये ठेवण्यात येतात.

-आठ ते दहा महिन्यांच्या रोपे विक्रीसाठी तयार होतात.

Mango Nursery
Mango Cultivation: राज्यात वाढतेय आंबा लागवड

शेतकरी अनुभव

निरगुडे (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील अंबादास भोये सात-आठ वर्षांपासून कलम रोपे तयार करतात. कला शाखेत पदव्युत्तर, त्यानंतर ‘सेट’ परीक्षा ते उत्तीर्ण झाले. हरसूल येथे चार वर्षे तासिका तत्त्वावर अध्यापन केल्यानंतर ते पूर्णवेळ याच व्यवसायात उतरले. मागील दोन वर्षे अनुक्रमे अनुक्रमे १७ हजार, ३५ हजार रोपांची विक्री त्यांनी केली. प्रति रोप ८० रुपये असा दर आहे. यंदा ७६ हजार रोपनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. हरसूलच्या घाटाखाली केसर आंब्याच्या वाढीस पोषक वातावरण आहे. त्यामुळे रोपांना चांगली मागणी असते असे ते सांगतात. भोये यांनी देखील २७०० झाडांची लागवड केली आहे. या व्यवसायातून २० टक्के फायदा त्यांना होतो. सुरुवातीला १० ते १२ लाख रुपये कर्ज काढावे लागे. आता त्याची पूर्णपणे फेड करण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांच्या घरातील सर्व सदस्यांची त्यांना मोठी मदत होते.

सुरुवातीला सघन पद्धतीने आंबा लागवड केली. त्या वेळी शेतकरी बाग पाहायला यायचे. त्यातून रोपांची मागणी करायचे. त्यातून संधी उमगली. आता सर्वसुविधांसह शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिका उभारून व्यवसाय नावारूपाला आणला आहे.

नामदेव रघुनाथ लहारे, तुळसाई नर्सरी, चिरापाली, ता. त्र्यंबकेश्‍वर

रोजगार संधी

या व्यवसायातून शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे. कोयी संकलन करणाऱ्यांना तसेच प्रति काडी २ ते ३ रुपये प्रमाणे बांधणी असा परतावा मिळतो. जून ते ऑगस्ट पर्यत कलमे तयार केली जातात. प्रति मजूर दिवसाला ५०० च्या वर कलमे बांधत असल्याने एक हजार रुपयांवर उत्पन्न दररोज हाती येते. शिवाय त्यांचे स्थलांतरही आता थांबले आहे.

केव्हीकेच्या तांत्रिक सहकार्याने व उपलब्ध साधनांचा वापर करून तरूणांनी रोपवाटिका सुरू केल्या आहेत. पूर्वी पारंपरिक पिके व अत्यल्प उत्पन्न मिळविणारे हे तरुण व्यावसायिक झाले असून आर्थिक लाभ घेत आहे.

हेमराज राजपूत, विषय विशेषज्ञ- उद्यानविद्या, केव्हीके, नाशिक

अंबादास भोये- ९४२०६२०३६४

नामदेव लहारे- ८८३००७६३८८

हेमराज राजपूत- ९४२२७७३६०२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com