Nagpur News: ऑरेंज सिटीतील शेतकऱ्यांना करवंदांनी घातली भुरळ

‘ऑरेंज सिटी’ ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यातील तेलकामठी (ता. कळमेश्‍वर, नागपूर) गावआता हिरव्या व गुलाबी करवंदाच्या व्यावसायिक लागवडीसाठी ओळखले जाऊ लागले आहे. कमी देखभालीत येणाऱ्या या फळाला खानदेश, नागपूर, रायपूर आदी बाजारपेठही इथल्या शेतकऱ्यांनी मिळवली आहे.
Conkerberry Nagpur News
Conkerberry Nagpur NewsAgrowon

Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील कळमेश्‍वर तालुक्‍यात वसलेले तेलकामठी हे पाच हजार लोकवस्तीचे आणि सावनेर-काटोल मार्गावर वसलेले गाव आहे. परिसरात संत्रा लागवड (Orange Cultivation) क्षेत्र सुमारे १२५ हेक्‍टर आहे.

तालुका कृषी अधिकारी राकेश वसू, कृषी पर्यवेक्षक उज्ज्वल डाखोळे, कृषी सहायक मधुरा मखमले, रोशन नान्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील बहुतांश शेतकरी बागांचे व्यवस्थापन (Orchard Management) करतात.

इंडो इस्राईल पद्धतीने संत्रा

इंडो- इस्राईल प्रकल्पांतर्गत विकसित उत्कृष्ट गाव तयार करणे या उपक्रमात कृषी विभागाकडून तेलकामठी गावाचा समावेश करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी सुमारे ३५ हेक्‍टरवर इंडो-इस्राईल पद्धतीने कृषी विभागाने दोन सामूहिक शेततळी अनुदानावर दिली असून, त्यातील पाण्याचा वापर संरक्षित सिंचनासाठी होतो.

करवंद झाले व्यावसायिक पीक

गावात अनेकांच्या बांधावर करवंदाची झुडपे किंवा दाट बन दिसून येते. वन्यप्राण्यांचा त्रास रोखण्यासाठी ही कुंपणवजा झाडे महत्त्वाची ठरतात. गुलाबराव घोरमडे यांनी गावात पहिल्यांदा दीड एकरावर करवंदाची सलग लागवड केली.

त्यापूर्वी बांधावर हिरव्या आणि गुलाबी करवंदाची झाडे दिसायची. घोरमडे यांनी व्यावसायिक दृष्टिकोन जपत ही फळे नागपूर मार्केटला पाठविण्यास सुरुवात केली. किलोला पाच ते सात रुपये दर मिळायचा.

हळूहूळू त्यांचे पाहून अन्य शेतकऱ्यांनी करवंदविषयी व्यावसायिक दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली. नागपुरातील एका ‘फ्रूट कंपनी’ला गावातील शेतकरी करवंदे पुरवत.

ही माहिती खानदेश भागातील व्यापाऱ्याला कळल्यानंतर त्याने थेट गाव गाठले. त्याला माल दिल्यास विक्रीची चांगली सोय होणार होतीच. शिवाय वाहतुकीवरील खर्च कमी होणार होता. सन २०१५ नंतर जळगावातील बाजारपेठदेखील मिळाली.

Conkerberry Nagpur News
Orange Pest : कोळशी नियंत्रणाची योजना अडकली आचारसंहितेत

पारंपरिक पिकांऐवजी करवंद

गावशिवारात कपाशीचे एकरी एक, दोन ते पाच क्‍विंटलपर्यंतच कापूस उत्पादन हाती लागायचे अशा क्षेत्रात शेतकऱ्यांनी सलग करवंद लागवडीच्या पर्यायाला पसंती दिली आहे. गावातील अनुभवी शेतकरी रुकेश देशमुख यांच्या मते करवंद उत्पादकांची गावातील संख्या ४० च्या आसपास असावी.

पारंपरिक पिकांच्या तुलनेत हे पीक फायदेशीर ठरत आहे. हरिश्‍चंद्र डोईफोडे यांची मोसंबी बाग होती. त्यांच्या शेतातून वीज वाहिनीचे ‘टॉवर’ गेले असल्याने वानरांचा खूप त्रास व्हायचा.

पक्ष्यांकडूनही फळांचे नुकसान होत होते. त्यांनी आता मोसंबी बाग काढून करवंद लागवड केली आहे. अमोल देशमुख, राजेंद्र घोरमाडे, रमेश मोहोड, विनायक डोईफोडे, हरिचंद्र डोईफोडे, अविनाश फलके, प्रवीण देशमुख, भोजराज घोरमाडे, विजय देशमुख, गणपत दुर्बळे, सुरेश दुर्बळे, रमेश देशमुख, प्रशांत चवणे आदी गावांतील प्रातिनिधिक करवंद उत्पादकांची नावे सांगता येतील.

कमी देखभालीत व्यवस्थापन

करवंदाचा फुले- फळे हंगाम जूनपासूनच सुरू होतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फळकाढणी हंगाम असतो. जमिनीचा प्रकार व पोत पाहून १५ बाय ५, २० बाय ५ फूट अंतरावर गावातील शेतकरी करवंदाची लागवड करतात.

एकरी ४०० हून अधिक झाडे बसतात. उन्हाळ्यात पाण्याच्या दोन ते तीन पाळ्या पोषक ठरतात. फळे खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी गरजेनुसार कीटकनाशक फवारणी होते. यापेक्षा फार व्यवस्थापन करावे लागत नाही.

तोडणीसाठी मजूर गावात

तोडणीच्या हंगामात खास कौशल्य असणारे मजूर लागतात. करवंदाला काटे असतात. त्यामुळे तोडणीचे काम क्‍लिष्ट राहते.

तेलकामठीतील मजुरांनी या कामात अनेक वर्षांपासून सातत्य राखल्याने त्यात कौशल्य मिळविले आहे. त्यांना ८०० रुपये प्रति क्‍विंटल दर दिला जातो.

Conkerberry Nagpur News
Orange Farmers : संत्रा-मोसंबी फळपीक उत्पादकांसाठी धोरण ठरवा

आश्‍वासक अर्थकारण

लागवडीनंतर साधारण पाचव्या वर्षांपासून व्यावसायिकदृष्ट्या चांगले उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. प्रति झाड १० ते १२ किलो किंवा एकरी चार ते पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते.

रूकेश देशमुख यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी किलोला १० ते १५ रुपयेच दर मिळायचा. कोरोनापूर्वी तो २५ रुपयांपर्यंत होता. गेल्या दोन वर्षांत तो ५० रुपये मिळू लागला आहे. गुलाबी फळांना हिरव्या फळांपेक्षा अधिक दर मिळतो.

एकरी उत्पादन खर्च व व काढणीचा खर्च वगळता किमान ४५ हजार रुपये व त्यापुढेही नफा मिळतो. त्यामुळे हे पीक आमच्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरल्याचा दावा तेलकामठीचे शेतकरी करतात. लगतच्या गावातील शेतकऱ्यांनाही करवंदाचे अर्थकारण माहीत झाल्याने अनेकांनी या गावातून रोपे खरेदीवर भर दिला आहे. त्यामुळे गावात रोपवाटिकाही तयार झाल्या आहेत.

करवंदांचा उपयोग

हे फळ कच्चेच वापरले जाते. त्याचा स्वाद आंबट असतो. हिरव्या करवंदांचा वापर लोणच्यासाठी अधिक होत असल्याने मागणी चांगली असते. गुलाबी करवंद हे खाऊच्या पानासाठी चेरी याकामी उपयोगी येते.

त्यामुळे अधिक दर मिळतो. मुरांबासाठीही त्याचा वापर होतो. अलीकडे खरेदीदारांची संख्या व पर्यायाने स्पर्धा वाढत असल्याने अधिकचा दर मिळू लागला आहे. यंदा तब्बल ३५ टन मालाची पाठवणूक गावातून झाली.

हे उष्ण कटीबंधीय पीक आहे. मध्य प्रदेश, बालाघाट, कोकणचा काही भाग, महाराष्ट्रातील डोंगरदऱ्या तसेच आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये त्याची झुडपे आढळतात. सुरुवातीला हिरवे, लाल-गुलाबी आणि नंतर फळे काळी होतात. यामध्ये लोहाचे (आयर्न) प्रमाण अधिक असल्याने आदिवासी त्याचा आहारात वापर करतात. त्याचे स्थानिक वाण आहेत. त्यावर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. जैविक कुंपणासाठी या झाडाचा चांगला पर्याय ठरतो. कोकण बोल्ड हे वाण दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. विदर्भातील वातावरण पाहिल्यास स्थानिक वाण आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. प्रति झुडपापासून ६ ते ८ किलो असे उत्पादन मिळते. बांधावर लागवड असल्यास ठिबक नळीची (इनलाइन अधिक असल्यास उत्तम) सोय करावी. बांधावर लागवडीचा पीक संरक्षण आणि उत्पन्न असा दुहेरी फायदा होतो.
डॉ. शशांक भराड, फळशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. ९६५७७२५७११
करवंदाचे ताजे फळ असल्यास त्यातील बियांचा वापर करून लागवड केली पाहिजे. जास्त काळ या बिया ठेवल्यास त्यांची उगवणक्षमता कमी होते, असे डॉ. गोविंद जाधव सांगतात. बिया, गुटी कलम, मृदुकाष्ठ कलम यांचा वापर अभिवृद्धीसाठी करता येतो. गुटीकलम ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये अधिक यशस्वी होतात असेही निरीक्षण आहे. यापासून तयार होणारा नकल चीरी खाद्यपदार्थ आणि लोणचे आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळेच मागणी चांगली राहते.
डॉ. गोविंद जाधव, सहायक संचालक, मध्यवर्ती संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला मो. ९४२२९००६३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com