लोकसहभागातून जलविकासाचा पाचोड पॅटर्न

दुष्काळामुळे पाचोड गावाचं अर्थकारण बिघडून गेलं होतं. २०१५ मध्ये ग्रामसभा आणि पंच मंडळींनी पाणीप्रश्‍न गांभीर्याने घेऊन तो सोडविण्याचा चंग बांधला. जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्था आणि अफार्म, पुणे यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या सहकार्याने नेकनूर (ता. जि. बीड) येथील हिंद ही जलसंधारणाच्या क्षेत्रात काम करणारी संस्था पुढे आली. त्यास गावकऱ्यांची लोकवर्गणी, लोकसहभाग आणि सहकार्य या तीन घटकांची साथ मिळाली. गावकऱ्यांनी एकूण खर्चाच्या १० टक्के भार उचलला. तसेच श्रमदान देखील केले. लोकसहभाग, लोकवर्गणी, पाणी साक्षरता, पाणी व्यवस्थापन, नियोजन आणि पाणी वापरातील काटकसर या आयुधांचा वापर करून गावकऱ्यांनी पाणीटंचाईला हरवले.
Water Conservation
Water ConservationAgrowon

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात जरी नाथसागर (Nathsagar Project) हा महाकाय प्रकल्प असला, तरी त्यामुळे पूर्ण तालुक्याची तहान भागलेली नाही. तालुक्याचा बराच भाग कोरडवाहू (Dry Land) आणि दुष्काळी (Drought) आहे. औरंगाबाद-बीड रोडवर असणारे पाचोड हे असेच एक दुष्काळी गाव (Drought Village) आहे. गावाची लोकसंख्या सहा हजारांच्या घरात आहे. एकूण पिकांखालील क्षेत्र १४५७ हेक्टर आहे. त्यात निव्वळ पावसाच्या पाण्यावर आधारित क्षेत्र १२७४ हेक्टर आहे. पाचोड गावाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती आणि शेती संलग्न व्यवसायांवर आधारित आहे.

गावकऱ्यांच्या मतानुसार, १९९०च्या दशकात गावामध्ये मुबलक पाणी असताना शेतकरी पारंपरिक पिके घेत होते. मात्र १९९१ नंतर शेतकरी नगदी आणि बागायती पिकांकडे वळले. विशेषतः मोसंबीकडे कल वाढला. परिणामी, बागायती क्षेत्र वाढले. परंतु जलसंधारणाची कामे नसल्याने भूजल पातळी घटत गेली. पिकांना पारंपरिक पद्धतीने पाणी दिले जायचे. त्यामुळे पाणीसाठे लवकर आटले. पाणी व्यवस्थापन, नियोजन आणि काटकसर यांत हयगय झाली. पाण्याची गरज वाढत होती; पण पाणी आणणार कोठून?

गेल्या दोन दशकांपासून गाव हळूहळू तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात होते. परंतु २०१३ ते २०१५ च्या दरम्यान पडलेल्या दुष्काळाने गावकऱ्यांना आत्मपरीक्षण करायला लावले. कारण पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागला. पाणीटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवावी लागली. ऊस आणि इतर भाजीपाला पिकेदेखील कमी झाले. विहीर आणि कूपनलिका हे पाणीस्रोत जानेवारी महिन्यात कोरडे पडायचे. एकंदर पाणीटंचाईमुळे बागायती फळपिके आणि रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले होते. परिणामी उत्पादन घसरले, तसेच शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढले. याशिवाय चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला. पशुधन घटले. त्याचा परिणाम दूध व्यवसायावर झाला. तरकारी, तृणधान्य, कडधान्य, फळबाग आणि भाजीपाला या शेतीमालाच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली. आठवडी बाजाराला मरगळ आली. या सगळ्याचा गावातील अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक परिणाम झाला. गावातून शहरात स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण वाढले.

या पार्श्‍वभूमीवर २०१५ मध्ये ग्रामसभा आणि पंच मंडळींनी पाणीप्रश्‍न गांभीर्याने घेऊन तो सोडविण्याचा चंग बांधला. त्यांना जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्था आणि अफार्म, पुणे यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या सहकार्याने नेकनूर (ता. जि. बीड) येथील हिंद ही जलसंधारणाच्या क्षेत्रात काम करणारी संस्था पुढे आली. त्यास गावकऱ्यांची लोकवर्गणी, लोकसहभाग आणि सहकार्य या तीन घटकांची साथ मिळाली. गावकऱ्यांनी एकूण खर्चाच्या १० टक्के भार उचलला. तसेच श्रमदानदेखील केले.

हिंद संस्था, गावकरी आणि प्रशासकीय कर्मचारी या सर्वांनी मिळून काम सुरू केले. पाचोड गावाचे नैसर्गिक संसाधने, ग्रामीण मूल्यावलोकन, सामाजिक सर्वे, ग्रामसभा, शिवारफेरी, शेतकरी- शिवार जाणकार यांच्याशी चर्चा, ग्रामपंचायतीच्या पंचमंडळी यांच्याशी बैठका यातून ‘माथा ते पायथा’ कामाचा आराखडा बनवला गेला. या आराखड्यानुसार जलसंधारणाच्या कामांची तंतोतंत अंमलबजावणी केली. जलसंधारणाच्या कामांमध्ये जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याला प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार गावाच्या माथ्यावरील शिवारात बांधबंदिस्ती केली. तसेच गावात असलेल्या पाझर तलावातील गाळ लोकवर्गणीतून काढला. गावाच्या शिवारात गलाटी नदी आणि ओढे-नाले यांच्यावर १० सिमेंट बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे उभारल्यापासून त्याचील गाळ काढलेला नव्हता. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता नष्ट झालेली होती.

या बंधाऱ्यांमधील गाळ काढण्यात आला. याशिवाय शिवारातील नदी-नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. निघालेला गाळ नदीच्या काठावर टाकून १२ फुट रुंदीची संरक्षण भिंत उभारली. या भिंतीचा वापर शेतकरी शेतात जाण्यासाठी शेतरस्ता म्हणून करत आहेत. गाळातून स्मशानभूमीत जाणारा रस्ता तयार केला. तसेच पूर्वीचे खराब झालेले रस्ते दुरुस्त केले. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत २०१५ मध्ये माथ्याचे आणि कोरडवाहू शिवारात बांधबंदिस्तीचे काम केले. एकंदर जलसंधारणाच्या कामाद्वारे शिवारातील पडलेल्या पावसाचे पाणी शिवारात राहील ही काळजी घेतली गेली. हिंद संस्थेचे सचिव संजय शिंदे म्हणाले, की जलसंधारणाच्या कामांची गरज ओळखून आराखडा बनवला व त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली. त्यामुळे जलसंधारणाची कामे होऊन ६ वर्षे झाली तरीही गावाच्या शिवारामध्ये बंधाऱ्यांना चांगलं पाणी आहे. तसेच भूजल पातळीही वाढली.

बदल घडला

जलसंधारणाची कामं केल्यानंतर पाचोड गावाला कायमस्वरूपी पाणीस्त्रोत मिळाला. शिवाय शेजारच्या रांजनगाव दांडगा, मुरमा या गावांच्या शिवारातील भूजल पातळी वाढली. या सर्व गावांच्या पिण्याचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी मिटला. जलसंधारणाच्या कामामुळे २०४.४० टीसीएम पाणीसाठा वाढला. त्यामुळे शिवारात कोरड्या पडलेल्या अनेक विहिरी आणि कूपनलिकांना पाणी आले. भूजल पातळीत दोन-तीन मीटरची वाढ झाली. जलसंधारणाच्या कामांमुळे पहिल्याच वर्षी (२०१६) भूजलपातळीत मोठी वाढ झाली. परिणामी, उन्हाळा हंगामामध्ये नदी-नाले आणि बंधाऱ्यामध्ये पाणी टिकून राहिले. उन्हाळा हंगामात कोरड्या पडलेल्या विहिरीची ३० फुटावर तर बोअरवेलची ४०-५० फुटावर पाणीपातळी आली असल्याचे गावकरी सांगतात.

जलसंधारणाची कामं झाल्यानंतर बागायती क्षेत्र वाढलं. ते १२४.३० हेक्टरवरून ३२४.३२ हेक्टरवर गेले. यात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली. याशिवाय डाळिंबाचं क्षेत्रही वाढलं. पाणीसाठे वाढल्याने नव्याने ५० ते ६० हेक्टरवर रेशीम आणि १५० हेक्टरवर उसाची लागवड झाली. तर २६० ते २७० हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड वाढली.

शेतकरी सिद्धेश्वर तारे म्हणाले, की आमचं कुटुंब ५० वर्षांपासून मोसंबीची शेती करत आहे; पण २०१३ ते १५ च्या दरम्यान दुष्काळामुळे मोसंबीचे क्षेत्र कमी झालं. मात्र जलसंधारणाच्या कामानंतर पुन्हा पाच एकर मोसंबी आणि सहा एकर डाळिंब लागवड केली. अशाच कहाण्या गावातील इतर शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळतात.

सरपंच शिवराज भुमरे यांच्या मते ‘मोसंबीचे गाव’ ही पाचोडची नाहीशी होत चाललेली ओळख जलसंधारणाच्या कामामुळे पुन्हा मिळवता आली. इतर पिकांचंही उत्पादन वाढलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँकांमधल्या ठेवी वाढल्या. तसेच शेतीतील गुंतवणूकदेखील वाढली. महिला बचत गटांची सख्या आणि ठेवी वाढल्या. शेतमजुरांना गावातच वर्षभर रोजगार मिळू लागला. बाजार समितीमार्फत मोसंबीची बाजारपेठ सुरु झाली. तसेच प्रकिया उद्योगासाठी ग्रेडिंग, पॅकिंग आणि वॅक्सिंग अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मोसंबी, डाळिंब खरेदीसाठी पुणे, मुंबई आणि औरंगाबाद येथून व्यापारी गावात येऊ लागले आहेत. गावातच नाशीवंत शेतीमाल साठवण्यासाठी २५ कोटी रुपये खर्चाचे कोल्ड स्टोअरेजचे चार युनिट उभारणे चालू आहे. गावात ‘शेतकरी उत्पादन कंपन्या’ स्थापन झाल्या आहेत. त्या शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायामध्ये उतरल्या आहेत.

जलसंधारणाची कामे झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन आणि नियोजनावर लक्ष दिले. पाण्याचा काटकसरीने वापर सुरू आहे. जवळपास ९० ते ९५ टक्के शेतकरी ठिबक वापरत आहेत. पूर्वी केवळ १८ शेततळी होती. आता त्यांची संख्या २७०-२८० झाली आहे. तसेच बोअरवेल आणि विहिरींची संख्या वाढली. पशुधन मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यामुळे दुधाचा व्यवसाय वाढला. दररोज साडे तीन ते चार हजार लिटर दुधाचे संकलन होते.

फक्त जलसंधारणाची कामं करूनच गावकरी थांबलेले नाहीत. तर पावसाळा संपल्यानंतर बंधारे, नदी आणि पाझर तलावातील पाणी उपसण्यावर बंदी घातली. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यांतील कडक उन्हाळ्यात बंधाऱ्यांमध्ये पाणी टिकून राहतं. लोकसहभाग, लोकवर्गणी, पाणी साक्षरता, पाणी व्यवस्थापन, नियोजन आणि पाणी वापरातील काटकसर या आयुधांचा वापर करून गावकऱ्यांनी पाणीटंचाईला हरवले. राज्यभरातील दुष्काळी गावांसाठी पाचोड गावचा जलविकासाचा पॅटर्न प्रेरणादायी ठरू शकतो.

लेखक शेती, दुष्काळ, पाणीप्रश्‍नांचे अभ्यासक असून ‘द युनिक फाउंडेशन, पुणे’ येथे वरिष्ठ संशोधक आहेत. (sominath.gholwe@gmail.com)

मो. ९८८१९८८३६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com