बारमाही फूलशेतीने उंचावले अर्थकारण

शिरसोली प्र.न. (ता.जि.जळगाव) येथील अनिल राजाराम ताडे यांच्या कुटुंबाचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी फूलशेतीच (Flower Farming) मुख्य कारण ठरली आहे. बाजारात वर्षभर फुलांना (Flower Demand) राहणारी मागणी ओळखून सहा एकरांत गुलाब (Rose), लिली, शेवंती, झेंडू (Marigold) आदींचे लागवडीपासून ते काढणीपर्यंत यशस्वी नियोजन व व्यवस्थापन त्यांनी केले. मुख्य म्हणजे सिंचनाची शाश्‍वत सोय करून ही शेती यशस्वी केली आहे.
Floriculture
FloricultureAgrowon

जळगाव जिल्ह्यात शिरसोली येथे अनिल ताडे यांची शेती आहे. संयुक्त कुटुंब होते त्यावेळी नागवेल (पानमळा) शेतीवर भर होता. कुटुंब विभक्त झाल्यानंतर अनिल यांच्या वाट्याला सहा एकर शेती आली. जमीन हलकी, मध्यम आहे. टंचाईग्रस्त भाग म्हणून शिरसोलीचा परिसर ओळखला जातो. दोन विहिरी असूनही फक्त चार महिने सिंचनासाठी (Irrigation) पाणी मिळायचे. उन्हाळ्यात मार्चपासून ते जूनपर्यंत पाण्याचे संकट असायचे. फार दुष्काळी स्थितीत तर कोरडवाहू पीक पद्धतीचाच विचार करावा लागे. यावर उपाय शोधण्यासाठी मोठा निधी खर्चून लमांजन (ता.जळगाव) शिवारात गिरणा नदीकाठी ताडे यांनी जमीन खरेदी केली. त्यात विहीर व कूपनलिका घेतली. तेथून तीन किलोमीटरचे अंतर पार करून जलवाहिनी शिरसोलीच्या शेतात आणली. यामुळे सिंचनासाठी वर्षभर पाणी उपलब्ध झाले. सुमारे १८ वर्षांपासून थोड्या फार प्रमाणात फूलशेती (Flower Farming) सुरू होती. पण पाण्याच्या सोयीनंतर म्हणजे सन २०१४ नंतर सुमारे पाच ते सहा एकरांवर ती नियमितपणे कली जाते. पिकांसाठी ठिबक यंत्रणा, एक बैलजोडी व त्यावर आधारित अवजारे आहेत.

पीक पद्धती

-सहा एकर शेती एकाच ठिकाणी १०० टक्के ओलिताखाली.

-सुमारे दीड एकरांत लिली, एक एकर गुलाब, दोन एकर शेवंती, दीड एकर झेंडू आहे. दरवर्षी त्यात थोडा फार बदल होतो.

-झेंडूची लागवड लिंबू व शेवगा पिकात आंतरपीक म्हणून. लिलीच्या क्षेत्रात सीताफळाची सुमारे ४० झाडे.

-गुलाब व लिली यांचे उत्पादन हिवाळ्याचे काही महिने वगळता वर्षभर सुरू.

-एक एकरात गुलाबाची सुमारे १८०० झाडे. लिली तीन बाय दीड फूट तर शेवंती अडीच बाय दीड फूट अंतरात आहे. झेंडूची लागवडही बारमाही किंवा कुठल्याही महिन्यात केली जाते.

-सर्व पिकांची रोपे रोपवाटिकेतून उपलब्ध केली जातात.

-शेवंतीचे एकरी दररोज दीड क्विंटल, झेंडू दोन एकरांतून ८० किलो, लिली दीड एकरात दररोज २५० ते ३०० बंडल (प्रति बंडल ५० कळ्या) तर गुलाबाचे तीनहजार ते चार हजार नग एकरी मिळतात. शेतातच करून घेतली जातात.

बाजारपेठेत ताजी फुले पोचविण्यावर कटाक्ष

जळगाव येथे फूल बाजारपेठ आहे. तेथे लिलाव सकाळी सहालाच सुरू होतात. तेथे ताजी व टवटवीत फुले वेळेवर पोचवण्यासाठी ताडे यांची काढणीची धडपड पहाटे चारपासूनच सुरू होते.

त्यासाठी बारमाही सहा मजुरांची व्यवस्था आहे. पहाटे साडेपाचपर्यंत तोडणी पूर्ण झाल्यानंतर सहा वाजेपर्यंत फुले बाजारात पोचतात.

Floriculture
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात केंद्राची गरज

बाजारपेठ व दर (चौकट)

फुलांची विक्री जळगावच्या बाजारासह पुणे, मुंबई, गुजरातमधील सुरत, बडोदा येथेही होते.

वर्षातून एकदा परराज्यातील बाजारात व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी अनिल जातात. श्रावण, गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी, लग्नसराई,

मोहरम या काळात चांगले दर मिळतात. गुलाब प्रति शेकडा ६० ते ७० रुपये वर्षभर, कमाल १५० रुपये मिळतो. झेंडूला २०२० मध्ये कोव्हिड काळात प्रति किलो २०० रुपये दर मिळाला. एरवी तो ४० रुपयांपर्यंत असतो. शेवंतीला नोव्हेंबर व डिसेंबर (मार्गशीर्ष महिना) दरम्यान १५० ते २०० रुपये तर एरवी ६० ते ७० रुपये प्रति किलो दर मिळतो. लिली फुलांना ३० ते ४० रुपये प्रति बंडल दर गणपती व मोहरमच्या काळात मिळाले. उत्पादन खर्च वगळता फूलशेतीतून वर्षात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो.

Floriculture
Floriculture : प्रकारानुसार करा निशिगंध जातींची निवड

शेतीचा विकास

तज्ज्ञांच्या नियमित संपर्कातून अनिल यांनी फूलशेतीचा विकास साधला आहे. रोजगार हमी योजनेतून लिंबू लागवड तर एकात्मिक फलोत्पादन अभियानातून २४ बाय २४ मीटर आणि चार मीटर खोल शेततळे घेतले आहे. जळगावचे मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, ‘आत्मा’ चे समन्वयक सोनू कापसे पाटील, कृषी पर्यवेक्षक शरद पाटील, कृषी सहायक कमलेश पवार, भारत पाटील यांचे सहकार्य मिळते. वार्षिक जमा- खर्चाच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात. शेवग्याची सुमारे २०० झाडे आहेत. सीताफळही आहे. फुलांना अशी जोड असल्याने ताजा पैसा खेळता राहतो.

फूलबाजार स्थिर, उठाव वाढणार

कोव्हिड काळ दूर होत असल्याने जळगावचा फूलबाजार जोर धरत आहे. जळगाव शहरात वल्लभदास बालाजी व्यापारी संकुलात फुलांचा स्वतंत्र बाजार तयार झाला आहे. येथून गुजरातमधील सुरत, बडोदा, अहमदाबाद, राज्यातील नागपूर, अकोला, मध्य प्रदेशातील इंदूर, खंडवा येथे फुले पाठविली जातात. मागील आठ महिने बाजारात सर्व फुलांचे दर टिकून आहेत. सध्या गुलाब, लिली, निशिगंध, मोगरा, झेंडू आदींची अधिक आवक आहे. गुलाबांची दररोज ४० हजारांपर्यंत तर झेंडूची १५ क्विंटलपर्यंत आवक आहे. गुलाबाचे दर सध्या ३० रुपये प्रति शेकडा आहेत. श्रावणमास, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, अशी आगामी सणांची मालिका आहे. या काळात आवक व दर चांगले राहतील असे संकेत आहेत. जरबेरा, जास्वंद, चाफा आदींचीही व्यावसायिक शेतीही शिरसोली, असोदा, भुसावळ तालुक्यात वाढत आहे.

अनिल ताडे- ७२१८८०७१००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com