Vegetable Production : बारमाही गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन

पळासखेडा बुद्रुक (जि. जळगाव) येथील जितेंद्र पाटील यांचे मुख्य पीक कापूस आहे. मात्र टोमॅटो, गिलके, वांगी, कलिंगड, काकडी अशा बारमाही भाजीपाला पीक पद्धतीचा वापर त्यांनी खुबीने केला आहे.
Vegetable Production
Vegetable ProductionAgrowon

Success Story : जळगाव जिल्ह्यात पळासखेडा बुद्रुक (ता. जामनेर) शिवारात जितेंद्र श्रीराम पाटील यांची पाच एकर मुरमाड, मध्यम शेती आहे. मोठ्या नदीचा स्रोत नाही. पाऊसमान कमी राहिल्यास विहिरींची पातळी घटते. एक बैलजोडी, एक विहीर आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) पदविकेचे शिक्षण घेतल्यानंतर पाटील यांनी नोकरीऐवजी पूर्णवेळ शेती करण्यालाच प्राधान्य दिले. सर्व शेती एकाच ठिकाणी आहे.

यामुळे व्यवस्थापन करणे सोपे होते. मुख्य पीक कापूस असून, त्यासाठी भाडेतत्त्वावरील सहा एकर क्षेत्र घेतले आहे. आपल्या पाच एकरांत बारमाही भाजीपाला शेती पाटील यांनी विकसित केली आहे.

बारमाही भाजीपाला पद्धती

विविध हंगामांत भाजीपाला लागवड होते. उदाहरणार्थ, डिसेंबरच्या काळात टोमॅटो घेतला जातो. तो प्लॉट मेपर्यंत सुरू असतो. दरवर्षी चार बाय एक फूट अंतरावर त्याची लागवड असते. यंदा ती पाच बाय अडीच फूट अंतरावर केली आहे.

गिलक्याची लागवड देखील नोव्हेंबरच्या दरम्यान होते. फेब्रुवारीत हा प्लॉट संपतो. मेच्या अखेरीस विहिरीच्या पाण्यावर पावसाळी वांगी घेतली जातात. लहान काटेरी, हिरवी वांगी असलेल्या वाणांची निवड होते.

Vegetable Production
Vegetable Crop damage : टोमॅटो, वांगी उत्पादकांना फटका

एक ते दीड रुपये प्रति रोप अशा दरात नजीकच्या नर्सरीतून रोपे उपलब्ध करून घेतात. पावसाळा व हिवाळ्याच्या काळात हे पीक हाती येते. कलिंगडाची लागवडही साधारण डिसेंबरच्या काळातच होते. हिवाळ्यातही गिलके व काकडी, टिंडा आदी पिके घेण्यात येतात.

भाजीपाला शेतीत काढणी सतत असल्याने मजुरांची गरजही सातत्याने भासते. तथापि, पत्नी सुरेखा स्वतः लागवडीपासून ते काढणीपर्यंतची कामे करीत असल्याने मजुरी खर्च काही प्रमाणात कमी होण्याबरोबर कामेही व्यवस्थित व वेळेत होतात.

व्यवस्थापनातील बाबी

पाऊसमान चांगले राहिल्यास विहिरीत मुबलक जलसाठा असतो. त्यामुळे बारमाही भाजीपाला शेती शक्य होते. परंतु पाऊसमान एक वर्षही कमी झाल्यास पाणीपातळी घटते. या समस्येवर उपाय म्हणून पाटील यांनी गावानजीक चिंचखेडा भागात मुबलक जलसाठ्याची जमीन भागीदारीने घेतली आहे.

त्यातही भाजीपाला, कलिंगडाचे नियोजन केले जाते. भाजीपाला पिके विविध किडी- रोगांना बळी पडतात. त्यावर उपाय म्हणून दरवर्षी फेरपालट केली जाते. दर वर्षी तीन एकरांत तीन ट्रॉली शेणखताचा वापर होतो.

कापसाची डिसेंबरमध्येच काढणी होते. त्यामुळे त्या जागी कलिंगड किंवा अन्य भाजीपाला घेणे शक्य होते. अधूनमधून उन्हाळा तीळ, त्यात उडीद व मुगाचे आंतरपीक घेण्यात येते.

उत्पादन व विक्री व्यवस्था

विक्री भुसावळ व जळगाव येथील बाजार समितीत केली जाते. येथील खरेदीदार, अडतदारांशी अनेक वर्षांचा संपर्क आहे. कलिंगडाची विक्री जागेवर किंवा थेटही होते.

टोमॅटोचे एकरी ३५ ते कमाल ४० टनांपर्यंत, वांग्याचे २० ते २२ टन, कलिंगडाचे १५ ते कमाल २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. टोमॅटोचे उन्हाळ्यात उत्पादन हाती येत असल्याने दर किमान सात व कमाल १० रुपये प्रति किलो मिळतो. गिलक्यांना कुठल्याही वेळेस दर बऱ्यापैकी म्हणजे किलोला

२५ पासून ५० ते ५५ रुपये मिळतात. वांग्यालाही २० ते ४० रुपये तर कलिंगडाला साडेसहा ते आठ रुपये दर मिळतात.

उंचावले अर्थकारण

कोणतेही भाजीपाला पीक असले तरी एकरी ७५ हजार रुपयांपासून दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यातून वर्षभर ताजे उत्पन्न मिळत असल्याने घरचे दैनंदिन खर्च निघून जातात. मुलगा अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत असून, शिक्षणाचा खर्चही त्यामुळेच शक्य झाला आहे.

काका तसेच गावातील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण ओंकार पाटील, क्लब हाउस व व्हॉट्‍सॲप माध्यमातून मार्गदर्शन मिळते. जिल्ह्यातील विविध भागांतील शेतांना भेट देऊन त्यातील बारकावे समजून घेतले जातात.

Vegetable Production
Exotic Vegetable Production : परदेशी भाजीपाला विक्रीचा ‘फ्रेश बास्केट’ ब्रॅण्ड

गिलक्यास बारमाही उठाव

गिलक्यास जळगाव बाजार समितीत बारमाही मागणी असते. सर्वाधिक आवक जामनेर तालुक्यातून होते. श्रावण महिन्यात गिलक्याला सर्वाधिक दर मिळतो. सर्वाधिक ३० ते ४० रुपये प्रति किलो दर मागील वेळेस मिळाला.

पावसाळी हंगानात चार महिने दररोज सरासरी १८ क्विंटल आवक होते. हिवाळ्यात हीच आवक तीन महिने राहिली. या कालावधीत २५ ते ३० रुपये प्रति किलो दर जळगाव बाजार समितीत मिळाला. सध्या उन्हाळ्यात आवक कमी म्हणजे प्रतिदिन १६ क्विंटल आहे. मागील मार्च महिन्यात सरासरी प्रति किलो ४० रुपये दर होता.

बाजार समितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड भागातूनही आवक होते. काही शेतकरी गावोगावी आठवडी बाजारात थेट विक्रीही करतात. गिलक्याचे दर बऱ्यापैकी टिकून असल्याने शेतकरी तिन्ही ऋतूत लागवडीचे नियोजन करतात.

जळगाव जिल्ह्यापुरते बोलायचे तर सर्वाधिक १२० एकर लागवड जामनेर तालुक्यात असावी. उन्हाळी गिलक्याची लागवड जिल्ह्यात एकूण ३०० हेक्टरवर झाली आहे. एकरी खर्च अन्य पिकांच्या तुलनेत कमी असल्याने लागवड वाढत आहे.

जितेंद्र पाटील, ९७६३४५३९७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com