शेती- जलसंधारणासह पायाभूत कामांमध्ये बारलिंगाची कामगिरी

अकोला जिल्ह्यात बारलिंगा (ता. बाळापूर) येथील गावाने जलसंधारण, शेती, शेतरस्ते, शालेय व तसेच गावकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा आदींमध्ये उल्लेखनीय विकासकामे साधली आहेत. ग्रामपंचायतीला शिक्षित नेतृत्व मिळण्याबरोबरच ग्रामस्थ व शासकीय विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमधून गावाने उल्लेखनीय विकास साधला आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon

अकोला जिल्ह्यात बारलिंगा (Barlinga Village) (ता. बाळापूर) हे हजार-बाराशे लोकवस्तीचे गाव आहे. शेती हाच गावच्या अर्थकारणाचा प्रमुख घटक आहे. सुमारे ५० वर्षांपासून भाजीपाला शेती (Vegetable Farming) करणारे गाव म्हणून बारलिंगाची ओळख आहे. मध्यंतरी भूजल पातळी (Water Level) खालावल्याचे चटके येथील शेतकऱ्यांना बसले. बारमाही ओलिताचे क्षेत्र कमी झाले. मात्र भूजल पातळी पुन्हा पूर्ववत होऊ लागल्याने सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता झाली आहे. बारलिंगाचे युवा सरपंच गजानन रामप्रसाद अवातिरक यांनी ‘एमबीए’ (मार्केटिंग) केले आहे. नोकरी न करता ते अकोल्यात स्वतःची यांत्रिक ‘एजन्सी’ चालवतात. २०१७ मध्ये ते जनतेच्या सहकार्याने सरपंच म्हणून निवडून आले. गावच्या समस्या एकेक करीत सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. गावकरी, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवकांची साथ त्यांना मिळाली.

...अशी झाली विकासकामे

छोट्या गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचे स्रोत कमी असतात. शासन निधीही लोकसंख्येच्या प्रमाणात मिळत असल्याने तो तोकडा पडण्याची शक्यता असते. अशा वेळी ग्रामपंचायतीने

विविध योजनांचा पैसा विकास कामांसाठी कसा वापरता येईल याचा अभ्यास केला. लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा केला. त्यातून पावणेदोन कोटींची कामे झाली. बारलिंगा ते गोरेगावदरम्यान सुमारे तीन किलोमीटर शेत रस्ता झाला.

Water Conservation
कडवंची : ग्रामविकासाचे सूत्र : जल अन् मन संधारण

जलसंधारणामुळे पातळी वाढली

कधीकाळी जलसंपन्न असलेल्या बारलिंगा शिवारात सात- आठ वर्षांत पाण्याची समस्या भीषण वळणावर होती. जमिनीतील पाण्याचा उपसा झाल्याने व लगत धरण नसल्याने पाणी जिरवल्याशिवाय पर्याय नव्हता. अशावेळी प्रमुख नाल्यांचे खोली- रुंदीकरण केले. जैन संघटनेने त्यासाठी यंत्रे उपलब्ध करून दिली. लोकसहभागातून डिझेल व चालक मजुरीसाठी पैसे उभारण्यात आले. दुर्दैवाने दोन वर्षे या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने काही ठिकाणी नाल्याचा भराव वाहून गेला. तरीही

भूजल पातळी कमालीची सुधारली. खोली-रुंदीकरणानंतर उपलब्ध झालेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरला. पूर्वी जिथे ६०० फुटांपर्यंत बोअर करूनही पाणी मिळत नव्हते तिथे दोनशे फुटांवर मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. काही शेततलावही बनविले आहेत. मुबलक पाऊस होत असल्याने त्यांचा फायदा मिळत आहे.

Water Conservation
‘जलसंधारण’च्या ३९ पदांवर एकत्रीकरणामुळे संकट

बारमाही भाजीपाला

गावातील दोडका, दुधी भोपळा, पालक, मिरची, टोमॅटो, कांदा आदी विविध भाजीपाला पिके घेण्यात येतात. अकोला येथील बाजारपेठेत ती विक्रीस जातात. ५० वर्षांहून अधिक काळापासून भाजीपाला उत्पादनाची परंपरा गावकऱ्यांनी जपल्याचे येथील शेतकरी मुगुटराव पाटील यांनी सांगितले. गावात १८ ते २० एकरांवर फुलशेती होते. झेंडू, गुलाब, मोगरा अशी फुलशेती करतात. दरवर्षी दोन ते अडीच एकरांत फूल उत्पादन घेत चांगले उत्पन्न मिळवत असल्याचे फूल उत्पादक दादाराव अवातिरक सांगतात.

कृषी विभागाचे सहकार्य

ठिबक सिंचन, तुषार संच, शेततळे, फळबागा योजनांसाठी तसेच ‘आत्मा’च्या पुढाकाराने गावात शेतकरी गटांची नोंदणी करून अवजारे बँकेचा लाभ देण्यात आला. तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने, मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रेय काळे, कृषी पर्यवेक्षक रवी धनभर, कृषी सहायक सौ. ए. एस. निलखन आदींचे सहकार्य मिळते.

दुग्ध व्यवसायाचा आधार

अकोला शहर जवळ असल्याने गावातील काही शेतकरी दुग्ध व्यवसायातही उतरले आहेत.

गावातून दररोज ५०० लिटरपेक्षा अधिक दूध अकोला येथे नेले जाते. त्याची ६० ते ६५ रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. राष्ट्रीय कोरडवाहू विकास मिशन अंतर्गत लाभार्थ्यांना ५२ गायी-म्हशींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळेही गावाची दुधाची गरजही भागू लागली आहे.

शाळेचे चित्र बदलले

गावातील शासकीय शाळेचे जुने रूप पालटण्यात आले. खोल्यांचे नूतनीकरण केले. जुने टीनपत्रे काढून त्यांचा पुनर्वापर म्हणजे कुंपण केले. रंगरंगोटी केल्याने शाळा परिसराचा ‘लुक’ बदलला. शाळा डिजिटल करण्यासाठी सुविधा निर्माण केल्या. पूर्वी २० ते २५ विद्यार्थ्यांपर्यंत संख्या घटलेल्या या चौथीपर्यंतच्या शाळेत आता ६० ते ७० विद्यार्थी शिकतात.

हनुमान मंदिर आकर्षण

गावातील हनुमान मंदिर हे जागरूक देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथे शनिवारी मोठ्या संख्येने भाविक येतात. हनुमान जयंतीचा मोठा उत्सव गावकरी साजरा करतात. अन्य गावांतील भाविक वर्षात किमान सात ते आठ वेळा नगर भोजनाचे कार्यक्रम घेतात. मंदिराची सुंदर उभारणी केली असून, रंगरंगोटी केल्याने ते खुलले आहे. मंदिराचे सभागृह विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध झाले आहे.

गावातील काही ठळक कामे

-प्रशासनाच्या सहकार्यातून उभारलेल्या ‘आरओ’ प्लँटमधून गावातील कुटुंबांना पाच रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी मिळते.

-गावात प्रवेशाच्या ठिकाणी दोन स्वागत कमानी

-ठिकठिकाणी सौरदिवे

-बांधांवर वृक्ष लागवड

गजानन अवातिरक, ७०००६१५२०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com