सिंचन, शेतीसह ग्रामविकासात राजुरी ठरले भारी

जलसंधारण, सिंचनाची शाश्‍वती, व्यावसायिक पिके व आठवडी बाजाराद्वारे शेतीचे बळकटीकरण, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधा सोयी आदी उपक्रम राजुरी (जि. सोलापूर) गावाने यशस्वी राबवत आपला लौकिक वाढवला. लोकसहभाग, ग्रामपंचायत व सर्वांच्या एकोप्यातून राजुरी ग्रामविकासात अगदीच भारी ठरले आहे.
सिंचन, शेतीसह ग्रामविकासात राजुरी ठरले भारी
Rural DevelopmentAgrowon

सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात करमाळा- पुणे महामार्गावर राजुरी हे पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे. मुख्य महामार्गापासून आत, आडमार्गावर आणि दळण-वळणाच्या दृष्टीनं गाव तसं गैरसोईचे होतं. गावाला जोडणारे रस्ते आणि शेतीला मिळालेल्या शाश्‍वत पाण्यामुळे अलीकडील पाच-सात वर्षांत गावचा चेहरा पूर्ण बदलला आहे. पाच वर्षांपूर्वी गावाला डॉ. अमोल दुरंदे यांच्या रूपाने तरुण, उच्चशिक्षित लोकनियुक्त सरपंच मिळाला. लोकसहभाग आणि सामूहिक प्रयत्नांतून त्यांनी गावाला विकासाच्या टप्प्यावर आणलं आहे. उपसरपंच सौ. सुशीला जाधव, सदस्या सौ. शामल जाधव, हनुमंत टापरे, संचिता शिंदे, सौ. सरला शिंदे, दिगंबर जाधव, शिवाजी दुरंदे, सौ. मंगल जगताप, संतोष दुरंदे, कैलास साखरे, सौ. अर्चना गरुड यांची त्यांना समर्थ साथ आहे. गावात ग्रामदैवत बाळनाथ महाराज स्वामींचे सुंदर मंदिर आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेला भरणारी यात्रा गावाचा एकोपा जपते. सर्व जाती-धर्मांचे लोक या वेळी एकत्र येतात.

प्रयत्नांमुळे ८० टक्के क्षेत्र ओलिताखाली

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाच्या ‘बॅकवॅाटर’च्या उत्तरेला सात-किलोमीटरवर राजुरी गाव येते. अर्थात, एवढ्या अंतरावरून पाणी आणणं खर्चिक आणि अडचणीचं होतं. पण ६० टक्के ग्रामस्थांनी खर्च करून धाडसानं धरणावरून पाइपलाइन केली. त्यातून पाण्याची शाश्‍वत सोय झाली. अनेक शेतकऱ्यांनी हे पाणी विहिरीत टाकलं. सततच्या उपलब्धतेमुळे विहीर, बोअरच्या पाणी पातळीतही वाढ झाली. गावातील एकूण ८० टक्के क्षेत्र आज ओलिताखाली आले आहे.

सर्वाधिक ऊस, कांदा उत्पादन

एकेकाळी ज्वारी, गहू, तूर अशा पारंपारिक पिकांवर गावाची मदार होती. सात-आठ वर्षांत शेतीत गावाने मोठी प्रगती केली आहे. राजुरीचे भौगोलिक क्षेत्र सुमारे १५०० हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक ५० टक्के क्षेत्रात ऊस, २०० हेक्टर कांदा आणि १०० हेक्टरवर केळी घेतली जाते. अन्य क्षेत्रांवर पेरू, लिंबू आदी पिके आहेत. या सर्व नगदी पिकांत राजुरीचे नाव आवर्जून घेण्यात येते. उसाचे एकरी सरासरी ५० ते ६० टन तर ७० ते ८० टनांपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरीही गावात आहेत.

ग्रामविकासात सक्रिय

तीन वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावाने वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला. लोकसहभागातून त्या वेळी गावच्या ओढ्याचे खोलीकरण, गायरान आणि वनजमिनीत सीसीटी आणि डीप सीसीटी, व वैजिनाथ देवस्थान टेकडीवर वृक्ष लागवड झाली. या कामांत मनोज सोलंकी, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, गोविंदपर्व कारखान्याचे चेअरमन शेखर जगताप, शालेय समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, डॉ. चंद्रकांत सारंगकर, मंगशे सराटे, विलास जाधव, अमेरिकास्थित संतोष सारंगकर यांनी साह्य केले.

पायाभूत सुविधांवर भर

राजुरी गाव काहीसे विखुरलेलं आहे. गावातील अनेक कुटुंबं शेतात वस्ती करून राहतात. पण ग्रामस्थांच्या सोयीसाठी सिमेंट रस्ते, गटार, मुख्य चौकात हायमास्ट दिवे आदी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. सांडपाण्यासाठी नांदेड पॅटर्नचे शोषखड्डेही घेतले आहेत. स्वच्छतेवर ग्रामपंचायतीचे लक्ष असते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून राजुरी ते माळीवस्ती, राजुरी ते पारेवाडी, राजुरी ते मांजरगाव हे रस्ते पूर्ण झाले. राजुरी ते वाशिंबे या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यासाठी भरीव निधी मिळाला आहे.

बचत गटांतून महिलांचा विकास

गावात पूर्वी दोन महिला बचत गट होते. उमेद अभियानाच्या माध्यमातून आता ४० महिला बचत गट कार्यरत आहेत. ब्यूटी पार्लर, मेंहदी, कराटे, लघू उद्योग आदी प्रशिक्षणांचा लाभ त्यांना देण्यात आला आहे. बँक ऑफ इंडियाच्या कोर्टी शाखेतून लघू उद्योगासाठी ५६ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. त्याद्वारे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. गटांसाठी स्वतंत्र कार्यालयही देण्यात आले आहे.

आठवडे बाजाराचा फायदा

गावात सर्वाधिक ऊस, केळी, कांदा ही पिके असल्याने ग्रामस्थांना परिसरातील गावांत भाजीपाल्यासाठी जावे लागे. आता वर्षभरापूर्वी गावात दर सोमवारी आठवडा बाजार भरविण्यास सुरुवात केली आहे. त्यातून गावातील शेतकरीही भाजीपाला घेऊ लागले आहेत. त्यांच्यासह उंदरगाव, मांजरगाव, सोगाव या गावातील शेतकऱ्यांसाठीही गावची बाजारपेठ तयार झाली आहे. ऊस गाळप हंगामात पाचशेहून अधिक ऊसतोड मजूर गावात वास्तव्यास असतात. त्यांचीही सोय झाली.

शाळेसाठी लोकवर्गणी

गावातील जिल्हा परिषद शाळेची शालेय व्यवस्थापन समिती बिनविरोध निवडण्यात आली. गणेश जाधव अध्यक्ष झाले. सुमारे दीड लाख रुपये लोकवर्गणीसाठी पुढाकार घेत शाळेचे रुपडे पालटण्याचा त्यांनी प्रयत्न कला आहे. ‘ई-लर्निंग’चा स्वतंत्र वर्ग, ग्रंथालय असून, दोनशे विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य वाटप केले जाते.

९० टक्के लोकांचा विमा

गावात बँक ऑफ इंडियाची मिनीशाखा असून ती ३६५ दिवस सुरू असते. शाखेच्या माध्यमातून ९० टक्के ग्रामस्थांचा विमा उतरवण्यात आला आहे. जीवनज्योती या योजनेतून ३३० रुपये आणि जीवन सुरक्षा योजनेतून १२ रुपये वार्षिक ‘प्रीमियम’द्वारे अपघात किंवा नैसर्गिक मृत्युपश्‍चात वारसांना दोन्ही योजनेतून प्रत्येकी दोन लाख याप्रमाणे चार लाखांचे सुरक्षाकवच मिळते आहे.

कोव्हिड सेंटरची सुविधा

सरपंच डॉ. दुरंदे स्वतः डॉक्टर असल्याने जागरूकता दाखवत गावातील डॉ. मणेरी यांच्या सहकार्याने त्यांनी कोविड काळात गावात त्याचे सेंटर उभे केले. त्या माध्यमातून गावातील रुग्णांवर वेळीच उपचार व मोफत औषधोपचार झाले. दिव्यांग आणि वयोवृद्धांना मोफत किराणा मालाचे वाटपही झाले.

संपर्क ः डॉ. अमोल दुरंदे, ९९६०४५५९४६

सरपंच, राजुरी

गावात लोकसहभागातून विकासाची कामे झाली. आता कुकडी प्रकल्पाचे पाणी राजुरी तलावात सोडण्याची मागणी आहे. त्यामुळे पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे.डॉ.
अमोल दुरंदे, लोकनियुक्त सरपंच, राजुरी
नव्याने वीज उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी अडीच कोटी व ८० लाखांचा निधी मिळाला आहे. कामे लवकरच सुरू होतील.
रामेश्‍वर गलांडे, ग्रामसेवक, राजुरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com