Pomegranate : डाळिंबाने समृद्ध झाले तुपेवाडीचे शिवार

औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्‍यातील ७० ते ८० उंबऱ्यांचे तुपेवाडी हे छोटेसे गाव. अनेकदा दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या या गावातील युवा शेतकऱ्यांनी अलीकडच्या काही वर्षात डाळिंब लागवडीस चालना दिली आणि त्यांच्या अर्थकारणात समृद्धी आली. याशिवाय काही क्षेत्रावर मोसंबी, सीताफळ लागवड देखील आहे. खरिपात कपाशी, तूर आणि मोसंबीत आंतरपीक म्हणून घेतला जाणारा रब्बी कांदा देखील या गावाचे वैशिष्ट आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon

छोट्या छोट्या पाच गावांच्या दरेगाव गटग्रामपंचायतीचा भाग असलेल्या तुपेवाडीतील शेतकऱ्यांची शेती तुपेवाडीसह तांडा बु., यासिनपूर आणि बालानगर आदी गावशिवारात विस्तारली आहे. ११२ कुटुंब आणि ६५० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावात अल्पभूधारक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. साधारणपणे ६७८.२६ हेक्‍टर भौगोलिक क्षेत्र असलेल्या तुपेवाडी शिवारात लागवडीलायक क्षेत्र ३५१.९१ हेक्‍टर आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (Nanasaheb Deshmukh Krushi Sanjivani Project) गावाचा समावेश आहे. कापूस, तूर या खरिपातील पिकांसह (Kharif Crop) मोसंबी या पारंपारिक पिकाला डाळिंब (Pomegranate), सीताफळ (Custard Apple), पेरू आदी फळपिकांची (Fruit Crop) जोड मिळाली आहे. याशिवाय कुटुंबाची गरज म्हणून बाजरी, मूग, उडीद लागवडदेखील असते. शिवारातील ६५ हेक्‍टर क्षेत्र विविध फळबागांनी व्यापले आहे. यामध्ये ३८ हेक्‍टर डाळिंब, २५ हेक्‍टर मोसंबी आणि २ हेक्‍टरवर सीताफळ, पेरू बागा आहेत. तुपेवाडी शिवारात नव्याने २७ हेक्‍टरवर डाळिंबाची लागवड झाली आहे. गावातील पाच शेतकरी गटांची आत्माकडे नोंद आहे. सध्या तुपेवाडी आणि ववा गावातील शेतकऱ्यांनी पैठणनाथ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. येत्या यासिनपूर आणि तुपेवाडीतील शेतकरी मिळून नवीन शेतकरी उत्पादक कंपनीस (Farmer Producer Company) सुरवात करत आहेत.

Pomegranate
शेतकरी पीक नियोजन : डाळिंब

तीन शेतकऱ्यांपासून सुरवात ः

तुपेवाडी शिवारात २०१३ मध्ये डाळिंब लागवडीची सुरवात संभाजी नलावडे, बद्रीनाथ नलावडे आणि ज्ञानेश्वर नलावडे यांनी केली. या शेतकऱ्यांना डाळिंबाचे चांगले उत्पादन मिळाल्याने हळूहळू गावातील इतर शेतकरी डाळिंबाकडे वळले. आता अपवाद वगळता गावातील सर्वच कुटुंबाकडे डाळिंबाची लागवड आहे. विशेष म्हणजे २० ते ४० वर्ष वयोगटातील युवा शेतकऱ्यांनी या गावात डाळिंब चांगल्या प्रकारे रूजविले. बहुतांश लागवड ही भगवा जातीची आहे. सुरवातीला २०१६ ते १८ दरम्यान शेतकऱ्यांनी डाळिंबाचा मृग बहर घेतला. त्यानंतर एक वर्ष दुष्काळाने हिरावले. त्यानंतर २०२० व २१ मध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आंबे बहराकडे वळले आहेत. यंदाचे आंबे बहराचे तिसरे वर्ष आहे.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार बहरात बदल करण्याचा निर्णय शेतकरी घेतात. बहर व्यवस्थापनानुसार खते, पाणी, कीडनाशकांच्या फवारणीचे काटेकोर नियोजन शेतकरी करतात.त्यामुळे दर्जेदार फळांचे उत्पादन मिळते. शाश्वत सिंचनासाठी काही शेतकऱ्यांनी धरणावरून पाइपलाइन केली आहे. याशिवाय विहीर तसेच कृषी विभागाच्या योजनेतून तयार झालेल्या ५२ शेतततळ्यांची मोठी मदत शेतकऱ्यांना होत आहे. सुमारे १५ शेतकऱ्यांनी सौर पंप घेतला आहे. या शेतकऱ्यांना तज्ञांसोबतच प्रयोगशील शेतकरी विठ्ठलराव भोसले यांचा सल्ला मोलाचा ठरला आहे.

Pomegranate
Pomegranate : हस्त बहराच्या डाळिंब बागेचे व्यवस्थापन

पूरक उद्योगाची जोड ः

तुपेवाडीतील काही कुटुंबांनी दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि मेंढीपालनास सुरवात केली आहे.गावातील ६ कुटुंबांकडे संकरित गाई आहेत. चार जणांकडे १५ ते ३५ शेळ्यांपर्यंतचे शेळीपालन आणि दोघांकडे ३५ ते ४० पर्यंत मेंढ्यांचे पालन केले जाते.

बांगलादेश, नेपाळची बाजारपेठ...

शेतकऱ्यांनी पहिली दोन वर्ष नाशिकच्या बाजारपेठेत डाळिंबाची विक्री केली. परंतु अलीकडे गावशिवारात क्षेत्र वाढल्याने व्यापारी बागेत येऊन डाळिंबाची खरेदी करतात. भूज, सोलापूर, सटाणा, सांगोला, बेंगलूरू, चेन्नई, कलकत्ता आदी ठिकाणचे व्यापारी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत तुपेवाडी शिवारातील डाळिंबाची खरेदी करतात. काही व्यापारी बांगलादेश, नेपाळमध्ये डाळिंब विक्रीसाठी पाठवितात. शिवारात वाढणारे क्षेत्र पाहता मोसंबीच्या खरेदीचे केंद्र असलेले बालानगर भविष्यात डाळिंब खरेदीचे प्रमुख केंद्र बनणार आहे.

तुपेवाडीची वैशिष्टे ः

- संपूर्ण फळबागांचे क्षेत्र ठिबकवर.

-सिंचनासाठी गावशिवारात ५२ शेततळी.

-नियोजनपूर्वक विक्रीवर शेतकऱ्यांचा भर.

- डाळिंबाला मोसंबीची चांगली आर्थिक साथ.

- तण व्यवस्थापनासाठी ब्रश कटरचा वापर, काटेकोर, खत, कीडनाशकांचा वापर.

- सुमारे २५ हेक्‍टरपर्यंत मोसंबीत रब्बी कांदा लागवड.

- काही शेतकऱ्यांनी खेर्डा प्रकल्पावरून केली पाण्याची सोय.

तुपेवाडी येथील युवा शेतकऱ्यांनी डाळिंबातून समृद्धी आणली आहे. या शिवाय मोसंबी, कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे. कृषी विभाग, पोकरा आणि इतर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. एकत्रितपणे शेतकऱ्यांनी फळबागेला चांगली चालना दिली आहे.
स्वाती काळे, ७५८८९३१७१८ (कृषी सहायक, तुपेवाडी, पारूंडी)
आमच्या एकत्र कुटुंबात दोन भावांची मिळून १८ एकर जमीन आहे. आम्ही पहिल्यांदा २०१३ मध्ये डाळिंब लागवड केली, त्यांनतर २०१८ आणि २०१९ मध्ये डाळिंब लागवड वाढविली. सध्या १५ एकरावर डाळिंब लागवड आणि तीन एकरावर शेततळे आहे. पहिल्या लागवडीचे आजवर सहा बहर, त्यानंतरच्या लागवडीचे दोन बहर घेतले आहेत. सेंद्रिय घटकांच्या वापरावर आमचा भर आहे. एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. सुरवातीला ५० ते ६० रुपये आणि अलीकडे दोन वर्षात ८० ते १२० रुपये प्रति किलो दर मिळतो आहे. डाळिंबाने आम्हाला चांगली साथ दिली आहे.
बद्रीनाथ नलावडे, ९०९६३३३२१७
मी २०१३ आणि २०१६ मध्ये दोन टप्प्यात डाळिंब लागवड केली. सध्या १० एकरावर डाळिंब बाग आहे. सात वर्षापासून दर्जेदार फळ उत्पादन आणि जाग्यावर विक्रीवर भर दिला आहे. गावातील डाळिंब उत्पादक शेतकरी एकमेकांशी सातत्याने चर्चा करतात, त्यामुळे चांगल्या प्रकारे तंत्रज्ञान प्रसार होत आहे.
संभाजी नलावडे
माझी तीन एकर डाळिंबाची बाग आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू असतानाच मी डाळिंबाच्या बागेकडे लक्ष दिले आहे. पहिल्या वर्षी ८० रुपये आणि दुसऱ्या वेळी ७२ रुपये प्रति किलोस दर मिळाला. येत्या पंधरवड्यात डाळिंबाची काढणी सुरू होईल. दर्जेदार उत्पादनावर आमचा भर आहे.
अनिरुद्ध नलावडे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com