Mahakranti Seeds : ‘महाक्रांती’ बियाण्याची परराज्यातही लोकप्रियता

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या ऊसपट्ट्यात शिगाव येथे ‘झुकेनी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ कार्यरत आहे.
Mahakranti Seeds
Mahakranti SeedsAgrowon

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या ऊसपट्ट्यात शिगाव येथे ‘झुकेनी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ (Zukeni Farmers Producer Company) कार्यरत आहे. ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ या वचनाप्रमाणे एकहजाराहून अधिक संख्येने असलेले कंपनीचे सभासद सोयाबीन, भुईमूग व हरभरा आदींचे बीजोत्पादन (Seed Production) करीत आहेत. ‘महाक्रांती’ हा खात्रीशीर ब्रॅण्ड तयार करून राज्यासह परराज्यांत या बियाण्याने आपली ओळख तयार केली आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका प्रामुख्याने ऊसपट्टा म्हणून ओळखला जातो. हळद, द्राक्षे, भाजीपाला व हंगामी पिकांतही या भागातील शेतकरी प्रगतिशील म्हणून ओळखले जातात. तालुक्यातील आष्टा शहरापासून नऊ किलोमीटरवर वारणा नदीच्या काठावर शिगाव हे सुमारे सात हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील कौस्तुभ बारवडे देखील धडपडे व प्रयोगशील युवा शेतकरी आहेत. सन २०१४ ते २०१८ पर्यंत त्यांनी झुकिनी, चेरी टोमॅटो, बेसिल, रेड कॅबेज आदी परदेशी भाज्यांची शेती केली. त्यात ओळखही तयार केली. पुढे बाजारपेठेतील अस्थिर दर व मागणी आदी समस्या वारंवार उदभवू लागल्याने अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण होऊ लागले. अखेर दुसरा पर्याय शोधणे त्यांना भाग पडले.

Mahakranti Seeds
Crop Management : काढणीयोग्य पीक व्यवस्थापनातील या बाबी लक्षात घ्या

शेतकरी कंपनीचा मार्ग गवसला

कौस्तुभ सांगतात की मी पिकवीत असलेला परदेशी भाजीपाला पाहून अनेक शेतकरी प्रोत्साहित झाले होते. मात्र त्यांच्याही अडचणी कमी नव्हत्या. त्यामुळे आपण सर्वजण एकत्र आलो तर एकाच छताखाली आपल्या समस्या सोडवणे सोपे होईल असा विचार पुढे येऊ लागला. त्यादृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा मार्ग दिसू लागला. कोणते उत्पादन घ्यायचे? विक्री व्यवस्था काय असणार याचाही अभ्यास सुरु केला.

सुरवातीला परिसरात शेतीशाळा घेतल्या. शेतकऱ्यांच्या गाठी- भेटी घेतल्या. कंपनी स्थापन करण्याचे फायदे त्यांच्यापर्यंत पोचविण्यास सुरवात केली. सर्वांच्या विचारातून सोयाबीन बीजोत्पादन ही संकल्पना समोर आली. त्यातून शेतकऱ्यांची मोट बांधणेही सोपे झाले. भांडवल जमा होण्यासाठी प्रति शेतकरी एक हजार रुपये शुल्क ठेवले. सर्व प्रयत्नांती सन २०१९ मध्ये झुकेनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन झाली. कौस्तुभ कंपनीचे अध्यक्ष असून भादोले (ता. हातकणंगले) येथील शाहूराजे माने यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी जबाबदारी आहे.

Mahakranti Seeds
Indian Agriculture : गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदासाठी फुटले भाव

गटही जोडले गेले

कौस्तुभ सांगतात की सुमारे चार वर्षे झुकिनी व परदेशी भाज्या उत्पादनाचा अनुभव घेतला. या पिकांनी चांगले उत्पन्न व ओळख देखील मिळवून दिली. त्यामुळे कंपनीचे नामकरण त्याआधारे केले. आज सुमारे १११० पर्यंत कंपनीचे सभासद आहेत. परिसरातील २० शेतकरी गटही कंपनीला जोडले गेले आहेत. त्यासाठी कृषी व ‘आत्मा’ विभागाचे सहकार्य झाले. तालुका कृषी अधिकारी भगवान माने आणि नागेश जमदाडे यांची त्यात मोठी मदत झाली. सांगली व कोल्हापूर जिल्हा ही कंपनीची कार्यक्षेत्रे आहेत.

कृषी विद्यापीठांच्या वाणांचे बीजोत्पादन

सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र कार्यरत आहे. येथील सोयाबीन बियाणे पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांची भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाकडील सोयाबीनच्या फुले संगम, फुले किमया या पैदासकार वाणांपासून बीजोत्पादनास सुरवात झाली. लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकरी त्यात कुशल होऊ लागले. केवळ सोयाबीनपुरते मर्यादित राहून चालणार नव्हते. मग खरीप भुईमूग, त्यात फुले वारणा, फुले मोरणा तर हरभरा पिकात फुले विक्रम वाणाचे बीजोत्पादन सुरू झाले. ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

विपणनाचे प्रयत्न

भाजीपाला असो वा बियाणे, विक्री हा घटक सर्वात जोखमीचा आणि अवघड असतो. अर्थात त्याचा विचार आधीच केला होता. सोशल मिडियातील विविध स्रोतांच्या माध्यमातून बियाण्याचे ‘मार्केटिंग’ सुरू केले. त्यातून स्थानिक शेतकऱ्याचे ‘नेटवर्क’ वाढू लागलेच. शिवाय परराज्यांत कार्यरत असलेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींची मदत घेऊन तेथेही प्रसार सुरू केला. बियाणे दर्जेदार राहील याची काळजी घेतली. ‘माऊथ टू माऊथ पब्लिसिटी होऊन विक्री व्यवस्था उभारण्यास मदत झाली.

आज राजस्थान, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा पाच राज्यांपर्यंत बियाण्याचा प्रसार झाला आहे. महाक्रांती असा ब्रॅण्ड तयार केला आहे. शेतकऱ्यांना बीजोत्पादनासाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच बाजारभावापेक्षा १० टक्के अधिक दराने त्यांच्याकडून खरेदी देखील केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह देखील वाढतो. झुकेनी फार्म नावाने संकेतस्थळही सुरू केले आहे.

विक्री व उलाढाल

सुरवातीच्या वर्षी कंपनीची उलाढाल तशी कमी होती. मात्र गेल्या दोन वर्षांत त्यात उल्लेखनीय वृद्धी झाली आहे. यंदा सोयाबीन ७५ टन, हरभरा १० टन तर भुईमुगाच्या दीड टन बियाण्याची विक्री करण्यात यश आले आहे. कंपनीने १६ लाख रुपयांच्या स्वभांडवलातून गोदाम उभारले आहे. त्यासाठी २९ वर्षांसाठी भाडेतत्वावर जागा घेतली आहे.

सोयाबीन बीजोत्पादन- दृष्टीक्षेपात

वर्ष.... उत्पादन दर (प्रति किलो)

२०२०-२१...१० टन...१२० रु..

२०२१-२२...३२ टन...१२० रु..

२०२२-२३...७५ टन ...१३० रु..

बियाणे दर (प्रति किलो)

-सोयाबीन- १३० रु..

-भुईमूग- ३०० रु..

-हरभरा- ८० रु..

उलाढाल

वर्ष... .उलाढाल

२०२१-२२... ७५ ते ८० लाख रू.

२०२२-२३ - एक कोटी ४० ते ६० लाख रू. (अपेक्षित)

सध्या शासनाची मदत न घेता प्रकल्प सुरू आहे. वाळवा तालुक्यातील एका शेतकरी कंपनीकडूनच सध्या बियाणे प्रक्रिया करून घेण्यात येते. प्रकल्पाची एकूण किंमत एक कोटी ४३ लाख ६९ हजार रुपये असून ६० टक्के अनुदान ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मिळणार आहे. पुरेसे भांडवल उपलब्ध झाल्यानंतर कंपनीत विस्तार करणे सुकर होणार असल्याचे कौस्तुभ यांनी सांगितले.

संपर्क- कौस्तुभ बारवडे- ७६२०५६१४३७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com