पोल्ट्री व्यवसाय झाला मुख्य आर्थिक कणा

कायम अवर्षणग्रस्त ढालगाव (जि. सांगली) येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी सागर झुरे याने आठ वर्षांपासून करार शेतीअंतर्गत ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायात सातत्य ठेवले आहे. अनुभव, कौशल्य, आर्थिक नियोजन, वातानुकूलित व अन्य तंत्रज्ञान वापरातून विस्तार व ‘अपग्रेडेशन’ करीत पोल्ट्री व्यवसायाला कुटुंबाचा मुख्य आर्थिक कणा बनविला आहे.
Poultry
PoultryAgrowon

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात अलीकडील काळात टेंभूचे पाणी वाहू लागले. तरीही अवर्षणग्रस्त अशी त्याची ओळख कायम आहे. तालुक्यातील ढालगाव हे पाणीटंचाईशी दोन हात करणारे गाव आहे. गावातील युवक सागर अप्पासो झुरे यांचं आई श्रीमती शोभा, भाऊ वैभव यांच्यासोबतचं छोटं कुटुंब आहे. शेती अवघी दोन एकर. पण न डगमगता संकटांवर मात करण्यासाठी कुटुंब नेहमी जिद्दीने उभे असते. शेतीला पूर्वी जनावरांची जोड दिली. दुधाचा गावातच रतीब लावून विक्री व्हायची. भाजीपाला विक्री करून बंधू वैभव घराला हातभार लावतात.

व्यवसाय उभारणी

शेतीतून उत्पन्न कमी असल्याने पूरक व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा मनात होती. व्यवसाय म्हटलं की धोके, विक्री व्यवस्था या बाबी आल्याच. पर्यायांचा शोध घेत असताना समोर आले गावात असलेले पोल्ट्री व्यवसाय. त्यांच्यासह सातारा व अन्य ठिकाणचे ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय पाहिले. व्यवसायासाठीचे भांडवल अधिक होते. विक्री व्यवस्था उभी करणे मुश्कील होते. जोखीमही होती. त्यामुळे व्यवसाय सुरू करावा की नाही याबाबत मनात घालमेल सुरू होती. पण धाडस व जोखीम पत्करल्याशिवाय यश मिळणार नाही हे उमगल्यावर पुढे पाऊल टाकण्याचे नक्की केले.

थेट विक्रीपेक्षा कंपनीशी करार

पोल्ट्री व्यवसायात पक्ष्यांची मरतूक व विक्रीची जोखीम मोठी जोखीम असते. वेळेत विक्री झाली नाही तर अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे स्वतः विक्री व्यवस्थेत न पडता कंपनीसोबत करार केला तर फारसा ताण येणार नाही हे सागर यांनी जाणले. सुरुवातीला एका कंपनीशी करार करून सन २०१४ मध्ये व्यवसायाला प्रारंभ केला. आजमितीला आठ वर्षे झाली. यात कंपन्या बदलल्या असतील, पण चिकाटी ठेवून सागर यांनी तो चांगल्या प्रकारे टिकवला आहे. कंपनीकडून पक्षी, खाद्य, लसीकरण आदी सुविधा देण्यात येतात. सुमारे ४० ते ४५ दिवसांची बॅच असते. या काळात पक्ष्याचे वजन अडीच किलो ते २ किलो ८०० ग्रॅमपर्यंत होते. कंपनी पक्षी घेऊन जाते. त्यास प्रति किलो सहा रुपये दर दिला जातो. अर्थात, खर्च नियंत्रणात ठेवून तुम्ही वजनवाढ दिली तर बोनस रक्कमही मिळते.

वातानुकूलित यंत्रणा

सागर सांगतात, की आमच्या भागात विशेषतः उन्हाळ्यात तापमान जास्त असते. त्यामुळे पक्षी सांभाळणे मुश्कील असते. पक्षी दगावण्याची समस्या होती. ‘फॉगर सिस्टिम’ उभारली. पण तरीही अपेक्षित रिझल्ट मिळत नव्हता. त्यावर ठोस मार्ग कसा निघेल याचा अभ्यास सुरू केला. यू-ट्यूब चॅनेलवर ‘एन्व्हॉयर्न्मेंट कंट्रोलर सिस्टिम’ पाहण्यात आली. सातारा, जत तालुका, शेगाव येथे जाऊन अशी यंत्रणा कशा पद्धतीने चालते हे पाहिले. यात आर्द्रता व तापमान योग्य प्रमाणात राहिल्याने पक्ष्यांची वाढ चांगली होते हे समजले. त्यानुसार मागील वर्षी डिसेंबरमध्ये ही वातानुकूलित (एसी) यंत्रणा उभारली आहे. त्यादृष्टीने पोल्ट्री शेडची आखणीही सुधारित पद्धतीची केली. त्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च आला. आतापर्यंत दोन बॅचेस घेतल्या असून, तिसरी बॅच सुरू होणार आहे.

व्यवस्थापनातील बाबी

-१२५ बाय ३१ फूट आकाराची दोन शेड्‍स

-प्रति शेडमध्ये पूर्वी अडीच हजार पक्षी. एसी यंत्रणेनंतर क्षमता पावणेचार हजार पक्षी.

-अडीच हजार पक्ष्यांपासून व्यवसायाला सुरुवात. आता साडेसात हजार पक्षी क्षमता.

-वर्षाला सहा बॅचेस. बॅच संपल्यानंतर शेडची स्वच्छता. निर्जंतुकीकरणानंतर चुन्याचा वापर.

-दर पंधरा दिवसांनी कंपनीकडून तपासणी.

-सध्या कोंबडी खताला मागणी अधिक आहे. वर्षाला सुमारे ३६ ट्रेलर खताची विक्री होते. प्रति ट्रेलर सहा हजार रुपये दर मिळतो. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.

वातानुकूलित यंत्रणेविषयी...

-शेडला सात फुटाला सीलिंग केले आहे. चारही बाजूंनी हवा आत येऊ नये यासाठी शेततळ्याचा कागद वापरला आहे. चार बाजूंना २०० मायक्रॉन, तर सिलिंगसाठी ३०० मायक्रॉनचा कागद.

-शेडच्या एका बाजूस दोन एक्झॉर्स्ट फॅन्स. फॅनच्या दुसऱ्या बाजूस कूलिंग पॅडचा वापर

-प्रति फॅनसाठी सहा पॅड्‍स.

त्याचे झालेले फायदे

-शेडमधील तापमान व आर्द्रता (विशेषतः उन्हाळ्यात) नियंत्रणात राहते. सरासरी तापमान

२५ ते २७ अंश सेल्सिअस ठेवले जाते. बॅच फेल होत नाही. मरतुकीचे प्रमाण कमी होते. पक्ष्यांची वाढ चांगली होते. पूर्वी दीड चौरस फुटात एक पक्षी असायचा. आता हे प्रमाण एक चौरस फुटावर आले. त्यामुळे पक्षांची संख्या वाढली

-पूर्वी पक्षाला प्रति किलो सहा रुपये दर मिळायचा. आता त्यात दोन रुपये वाढ मिळत आहे.

-पक्ष्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत

आर्थिक आधार

या व्यवसायातून प्रति बॅच सुमारे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. दोन एकर शेतीतील उत्पन्नापेक्षा हा व्यवसायच कुटुंबाचा मुख्य आर्थिक कणा बनला असल्याचे सागर सांगतात.

संपर्क ः सागर झुरे, ९४०५८६०३८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com