Food Processing
Food ProcessingAgrowon

प्रक्रिया उद्योग झाला उत्पन्नाचे सक्षम साधन

प्रतिकूल हवामानामुळे आंबा बागेचे दरवर्षी अपरिमित नुकसान होते. कोकणातील बागायतदारांनी त्यामुळेच प्रक्रिया उद्योगाचा पर्याय निवडला. प्रकल्प उभारून तसेच घरगुती स्तरावरही विविध उत्पादने तयार करून त्यास चांगली बाजारपेठ मिळवून उत्पन्नाचे सक्षम साधन तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात असोरे (ता. गुहागर) या दुर्गम गावातील राजेंद्र निमकर यांनी पुणे येथे पशुवैद्यक विषयातील शिक्षण व ‘प्रॅक्टिस’ त्यांनी केली. सन १९८९ मध्ये आपल्या असोरे गावचा रस्ता धरला. कोकणातील उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणजे आंबा (Mango). मात्र दरवर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पन्नात कधीच स्थिरता नसते. यामुळे उत्पन्नाला कौशल्याची, प्रक्रियेची (Food Processing) जोड दिली तर स्थिरता येईल असे राजेंद्र यांना वाटले. यातूनच बीज रोवले गेले ते ’शंतनू फूड प्रॉडक्ट्सचे.’ गुहागरचे आमदार तात्यासाहेब नातू यांनी कोकणातील मुलांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रशिक्षण देण्याची विनंती दापोली येथील कृषी विद्यापीठाला केली होती. त्यांच्या पुढाकाराने फळ प्रक्रियेचे लघू प्रशिक्षण वर्गही सुरू झाले. राजेंद्र यांनी त्याचा लाभ घेतला.

खडतर प्रयत्न

राजेंद्र यांनी १९९३ ते ९४ च्या दरम्यान प्रक्रिया व्यवसाय सुरु केला. हापूस आंब्याचा रस, कोकम सरबत, आगळ, लोणची आदी उत्पादने बनवण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला अडचणींचा डोंगर उभा होता. अतिशय दुर्गम भागात वसलेले गाव. कुठल्याही सुविधा नीट उपलब्ध नव्हत्या. रोजचे किराणा सामान आणायचे झाले किंवा बसने जायचे तरी थांब्यापर्यंतचे दोन ते तीन किलोमीटर अंतर चालत जावे लागे. जवळचे मोठे शहर म्हणजे रत्नागिरी. तेही ५० किलोमीटरच्या अंतरावर. पण परिस्थितीपुढे रडत न बसता राजेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात स्वतः मार्केटमध्ये जाऊन आपली उत्पादने विकण्यास सुरुवात केली. पत्नी नमिताही घरचा कारभार सांभाळताना व्यवसायाचीही जबाबदारी सांभाळतात. व्यवसायानिमित्त राजेंद्र यांना सतत बाहेरगावी जावे लागते. अशावेळी संपूर्ण व्यवस्थापन त्यांच्याकडे असते.

विस्तारलेला व्यवसाय

सुरुवातीला घरातील आंब्यापासून पल्पची निर्मिती केली. आज सुमारे ३५ टन आंब्यापासून पल्प तयार करण्यापर्यंत मजल मारली आहे. सुमारे १७ प्रकारची उत्पादने व सुमारे सहा पेये तयार होतात. आंबा पल्प व कोकम सरबत ही दोन मुख्य उत्पादने तर आंबा वडी, आंबा पोळी, सरबत, जॅम तसेच लिंबू, संत्रा, आंबा, जिरा आदींवर आधारित पेये आदींचा समावेश आहे. कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्र, औरंगाबादपर्यंत व्यवसाय पसरला आहे. वर्षाला सुमारे तीस लाखांहून अधिक उलाढाल होते.

‘इंडो-इस्राईल’अंतर्गत प्रयोग

गुहागर भागातील आंबा साधारण दोन मेनंतरच तयार व्हायचा. कधी एकूण क्षेत्रातून सहाशे तर कधी तीनशे पेटीपर्यंतच आंबा मिळायचा. राजेंद्र यांनी व्यवस्थापनात सुधारणा करताना मार्चमध्ये उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दापोली येथील कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन मिळाले. सन २०११-१२ मध्ये गुहागरचे तत्कालीन कृषी अधिकारी श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडो-इस्राईल प्रकल्पांतर्गत छाटणीच प्रयोगही केला. सुमारे ४० वर्षांच्या भल्या मोठ्या झाडांची उंची कमी करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. दोन वर्षांनंतर उत्पादनात वाढ झाल्याचे आढळले. इस्राईलमधील दोन संशोधकही हा प्रयोग पाहण्यासाठी आले होते.

आंबा पल्प, कैरी पावडर अन् फणस गरेनिर्मिती

रत्नागिरी तालुक्यातील नेवरे-चिंचवणे येथील उदय व अनघा या कोल्हटकर दांपत्याने प्रक्रिया उद्योगातूनच उत्पन्नाचे शाश्‍वत साधन तयार केले आहे. आंबा बागांची जबाबदारी उदय तर प्रक्रिया उद्योगाची जबाबदारी अनघा सांभाळतात. त्यांनी नैसर्गिकरीत्या बनवलेला आंबा पल्प ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. पुणे हे अनघा यांचे माहेरघर. तेथे खादी ग्रामोद्योगच्या सहकार्याने पापडनिर्मिती गृहउद्योगाचा अनुभव त्यांना होता. हाच धागा पकडून नेवरे येथेही प्रक्रिया उद्योगाला चालना दिली.

उत्पादनांची विविधता

-सन २००२ च्या सुमारास आंबा पल्प बनविण्यास आरंभ केला. स्वतःची दोनशे हापूस कलमांची बाग असल्याने प्रक्रियेसाठी आंबा उपलब्ध होण्यास अडचण येत नाही.
-आमसूल, आगळ, सांडगी मिरची, भाजणी, तळलेले गरे, फणस व आंबा पोळी, आंबा व कैरी पावडर, आंबोशी आदी उत्पादनांचीही निर्मिती.
-स्थानिकसह पुणे, मुंबईत बाजारपेठ मिळवली आहे.
-काही महिन्यांपूर्वी पल्प काढण्याचे यंत्र घेतले. खर्च वगळता सुमारे ४० टक्के नफा मिळतो.
-कोल्हटकर कोकण प्रोडक्ट्‌स नावाने ‘फूड सेफ्टी’ क्षेत्रातील संस्थेकडून परवाना.
-घरातील ज्येष्ठ मंडळी श्रीधर आणि वासुदेव कोल्हटकर, नणंद संगीता गोंधळीकर आणि जावई अमेय बेडेकर यांचे सहकार्य.
-फणसाची पन्नास झाडे. कापा व बरका असे दोन प्रकार. मेच्या अखेरीस तळलेले गरे बनविण्यास सुरवात. दरवर्षी पन्नास किलोपर्यंत गरे तयार होतात. यंदा मुंबईहून सुमारे पाचशे किलोची मागणी.
-भविष्यात याच पद्धतीने विक्री वाढविण्याचा प्रयत्न.
-आंब्याच्या हंगामात रोजच्या जेवणात अनेकांना कैरीची फोड सोबतीला लागते. पण हंगाम संपल्यानंतर काय? ही बाब लक्षात घेऊनच कैरी व आंब्याची पावडर विक्रीला आणली आहे. त्यास चांगली मागणी आहे.

संपर्क ः राजेंद्र निमकर, ९२८४७२१२७७

अन्य बागायतदारांनाही सेवा

अन्य बागायतदारांनाही त्यांच्या मागणीनुसार त्यांच्याकडील आंब्याचा पल्प बनवून देण्याचे काम केले जाते. प्रति बाटली रस बनविण्यासाठी सुमारे ८० रुपयांचे शुल्क त्यासाठी घेण्यात येते. सुमारे एक हजार लिटरहून अधिक पल्पची निर्मिती या माध्यमातून होते. त्यातून उत्पन्नाचे अतिरिक्त साधन तयार होते.

संपर्क ः अनघा कोल्हटकर, ८८८८१९०५२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com